यशवंतरावांचा महाराष्ट्र विचार: एकसंघ राज्याचं श्रेय विदर्भ, मराठवाड्यालाच

०३ मे २०२०

वाचन वेळ : ३ मिनिटं


नवं महाराष्ट्र राज्य १ मे १९६०ला अस्तित्त्वात आलं, तरी त्याचा उत्सव तीन दिवस आधी म्हणजे २७ एप्रिललाच सुरू झाला. तेव्हाच्या रितीनुसार हा दिवस शिवजयंतीचा होता. त्या दिवशी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांनी आकाशवाणीवर एक भाषण केलं. त्या काळातल्या सर्वात महत्त्वाच्या माध्यमात बोलताना यशवंतरावांनी वेगवेगळ्या भागांतल्या मराठी माणसाला त्यांच्याशी समान व्यवहाराचं आश्वासन दिलं.

महाराष्ट्रांत आज सर्वत्र शिवजयंती उत्साहानें साजरी होत आहे. ज्याला आपण अर्वाचीन महाराष्ट्र म्हणतों त्याची उभारणी करण्याचें श्रेय शिवाजी महाराजांकडेच जातें. शिवाजी महाराजांचें मोठेपण हें त्यांचा अतुल पराक्रम, त्यांची राजकारणपटुता, त्यांचें विशुद्ध चारित्र्य या थोर गुणांत जेवढें आहे तेवढेंच किंबहुना त्याहूनहि अधिकांशानें शासनकार्यांतील त्यांची विधायक दृष्टि व कर्तव्यपरायणता यांत आहे असें मला वाटतें. महाराष्ट्राच्या स्वराज्याची ते उभारणी करूं शकले ती मुख्यतः या गुणांमुळेंच.

शिवाजी महाराजांचे अमात्य रामचंद्र नीळकंठ यांनीं 'आज्ञापत्रांत' महाराजांचें जें बहारदार वर्णन केलं  आहे तें या दृष्टीनें पाहण्यासारखें आहे. 'तस्करादि अन्यायी यांचें नांव राज्यांत नाहींसें केलें. देशदुर्गादि, सैन्यादि बंद नवेच निर्माण करून एकरूप अव्याहत शासन चालविलें. केवळ नूतन सृष्टीच निर्माण केली.' या वर्णनावरून शिवाजी महाराजांच्या कार्यक्षम व लोकाभिमुख राज्यकारभाराची कल्पना येईल. शौर्य व धैर्य या गुणांना चारित्र्य व विधायक दृष्टि या गुणांची जोड मिळाल्यानेंच शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे भाग्यविधाते झाले.

यंदाच्या शिवजयंतीचें महत्त्व तर अधिकच आहे. कारण आजपासून आपण महाराष्ट्र राज्यस्थापनेचा उत्सव साजरा करीत आहोत. अशा रीतीनें पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडा या भागांचे प्रथमच एक सबंध राज्य निर्माण होते आहे. हें सर्व कसे घडत गेलें याचा इतिहास आपल्यापुढें अगदीं ताजा आहे.

हेही वाचा : शेतकऱ्याच्या पोरासाठी झटणाऱ्या पंजाबरावांचा वारसदार विदर्भाला कधी मिळणार?

किंबहुना या घटना अद्याप इतिहासजमा झालेल्या नाहींत असेंच म्हणणे अधिक रास्त ठरेल. तेव्हां त्यांचा मी येथें पुनरुच्चार करीत नाहीं. भारतांतील इतर राज्यांप्रमाणें आपलें पण भाषिक राज्य असावें अशी मराठी लोकांची इच्छा होती व लोकशाहीच्या तत्त्वानुसार भारतीय संसदेनें मराठी जनतेच्या या इच्छेस मान देऊन महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेस अनुमति दिली आहे.

आणखी तीन दिवसांनी अस्तित्वांत येणारें आपलें हें महाराष्ट्र राज्य विविधतेनें नटलेलें आहे. ही विविधता निसर्गाच्या रचनेंत जशी आहे तशी माणसांत सुद्धा आहे. उत्तरेस सातपुडा आणि पश्चिमेस सह्याद्रि यांचीं उत्तुंग शिखरें व त्यांच्या उतरणीवरील घनदाट जंगलें यांनीं या भागांस भव्योदत्त सौंदर्य प्राप्त झालें आहे, तर वर्धा-वैनगंगेच्या खोऱ्यात जागोजाग असलेली जलाशयें व पळसाच्या लाल फुलांनी डंवरलेलीं रानें मनाला प्रसन्नता आणतात.

कोंकणचा किनारा अथांग पश्चिम सागराचें दर्शन घडवितो, तर गोदेच्या पाण्याने पुनीत व समृद्ध झालेली मराठवाड्याची भूमि महाराष्ट्राच्या तेजस्वी भूतकाळाची व संस्कृतीची आठवण करून देते. नागपूरच्या परिसरांत भारतांतच केवळ नव्हे तर सर्व आशियांत उत्तम म्हणून नांवाजलेली संत्री पिकतात, तर रत्नागिरीकडे भारतांत ज्याच्या तोडीचा दुसरा आंबा नाहीं तो हापूस आंबा अमाप पिकतो. विदर्भ-मराठवाड्याच्या काळ्याभोर जमिनींत कापूस भरघोस फुलतो, तर नगर-सोलापूर-कोल्हापूर भागांत पिकणारा रसदार ऊंस सर्वांचे तोंड गोड करतो. 

निरनिराळ्या भागांतील लोकांच्या बाबतींतहि ही विविधता आहे. कोंकणपट्टींतील माणसाचे अनुनासिक उच्चार ऐकून देशावरच्या माणसाला मौज वाटते, तर खानदेश-वऱ्हाडचा माणूस एक विशिष्ट हेल काढून बोलूं लागला कीं सांगली कोल्हापूरकडील माणसांच्या चेहऱ्यावर स्मिताची रेषा न झळकली तरच आश्चर्य. पण या विविधतेंतच महाराष्ट्रांतील जीवनाचें सौंदर्य सांठलेलें आहे. अशी विविधता नसेल तर जीवन नीरस व रंगहीन होईल.

पण या विविधतेंतहि एकता आहे व असली पाहिजे. विविधतेनें जीवनाला जसें सौंदर्य येतें तसें एकतेंत जीवनाचें सामर्थ्य प्रतीत होतें. विदर्भ, मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्र यांची भाषिक एकता तर आहेच, पण शिवाय लोकांच्या चालीरीती व परंपरा आणि सामाजिक संघटनेचें एकूण स्वरूप हेंहि कसें सारखें आहे याचीं वाटेल तेवढीं उदाहरणें देतां येतील. तसेंच महाराष्ट्राचा सांस्कृतिक व राजकीय इतिहासहि त्याची साक्ष देतो.

हे कोरोना स्पेशलही वाचा : 

लस सापडल्यावर तरी कोरोना संपेल का?

कोरोनाग्रस्त मृतदेह जाळायचा की पुरायचा?

कोरोनाचा पेशंट वेंटिलेटरवर किती काळ जिवंत राहतो?

डॉक्टरांनी घातलेला सूट म्हणजे कोरोनाविरूद्धचं चिलखतच!

कोरोना कुटुंबातलं सातवं पोरच इतकं वात्रट कसं निघालं?

कोविड-१९ आजारावर औषध नसताना पेशन्ट बरं कसं होतात?

कोरोनाला रोखण्यासाठी तैवानकडून आपण काय शिकलं पाहिजे?

एकदा बरं झाल्यावरही पेशंटला का होतेय पुन्हा कोरोनाची लागण?

प्राचीन काळीं विदर्भ व मराठवाडा हे महाराष्ट्राच्या केंद्रस्थानीं होते. शालिवाहन व चालुक्यांची राजधानी मराठवाड्यांतील पैठण येथें होती, तर वाकाटक या राजघराण्यानें महाराष्ट्राचा सर्व प्रदेश आपल्या छत्राखालीं आणला होता. वाकाटक हे विदर्भाचे राजे होते व त्यांची राजधानी चांद्याजवळ भांदक येथें होती. देवगिरीच्या यादवांच्या काळांत महाराष्ट्राची व मराठी भाषेची विशेष भरभराट झाली. मराठीचे आद्य व श्रेष्ठ कवि मुकुंदराज, ज्ञानेश्वर व नामदेव याच काळांत झाले.

चक्रधर या महानुभावी पंथाच्या संस्थापकाचा एक शिष्य महींद्र व्यास यानें सुमारें ७०० वर्षांपूर्वीं लिहिलेल्या लीलाचरित्रांत महाराष्ट्राचें जें वर्णन केलें आहे त्याचा येथें उल्लेख करण्याचा मोह मला आवरतां येत नाहीं.

साठी लक्ष देश महाराष्ट्र । तेथिचेशिहाणेसुभटू ।
वेदशास्त्रचातुर्यांचीपेठू । भरैलीतियेदेशीं ॥
ऐसे ते महाराष्ट्ररायेसुंदरू । वरी महाराष्ट्रभाषाचतुरु ।
तेहींवसविलेंगंगावीरू । क्षेत्र त्र्यंबकूवेऱ्हीं ॥
पश्चिमे त्र्यंबकूपूर्वसागरवेऱ्हीं । द्वादश योजनें उभय गंगातीरीं ।
ऐसेंतेंगंगातटमहाराष्ट्रीं । वसिजेपुण्यातन ॥
देश म्हणजे खंडमंडळ । जैसेंफलेठाणापासौनिदक्षिणेसि
मऱ्हाटी भाषा जेतुलांठाइं वर्ते तें एक मण्डल॥
तयासि उत्तरे बालेघाटाचा सेवट असे । ऐसें एक खंडमंडळ ।
मग उभय गंगातीरतेहि एक खंडमंडळ । 
आनतयापासौनिमेधकरघाटतें एक मंडळ ॥
तयापासौनिआवघेवराडतेंहि एक मंडळ ।
पर आघवीचिमिळौनिमहाराष्ट्रचिबोलिजे॥

यापुढच्या काळांत राजकीयदृष्ट्या महाराष्ट्र जरी भंगला तरी संत कवींनीं महाराष्ट्राची सांस्कृतिक एकता सतत टिकवून ठेविली. संत कवींच्या कार्यांचें हें मर्म आपण ध्यानांत घेतले पाहिजे. ज्ञानेश्वरापासून तों तुकारामापर्यंत सुमारें चारशें वर्षे संतांनीं वारकरी सांप्रदायाच्या द्वारें सामाजिक समतेच्या तत्त्वांचा प्रसार करून सर्व मराठी जनतेचें ऐक्य साधलें. संतांची ही शिकवण महाराष्ट्र कधीहि विसरणार नाही.

हेही वाचा : विदर्भातील दहा हाय व्होल्टेज लढतीकडे राज्याचं लक्ष

नव्या महाराष्ट्र राज्यांत ही एकता आपण अधिक दृढ केली पाहिजे. आज आपण देशाच्या सामाजिक व आर्थिक विकासाचीं मोठमोठीं कामें हातीं घेतलीं आहेत. महाराष्ट्रांत गेलीं चार पांच वर्षे राज्यपुनर्रचनेचा प्रश्न सतत तेवता राहिल्यानें जनतेचें मन विचलित राहिलें व त्यामुळें विकास कार्याकडे द्यावें तेवढें लक्ष तिनें दिलें नाहीं, ही वस्तुस्थिति आहे. परंतु या कार्याची आतां हेळसांड होऊं न देतां लोकांनी त्यावर आपलें जास्तींत जास्त लक्ष केंद्रित केलें पाहिजे.

भाषिक राज्याची स्थापना हें साधन असून जनतेचा सर्वांगीण विकास हें साध्य आहे. या बाबतींत दुमत होण्याचें कारण नाहीं. एखाद्या प्रश्नासंबंधीं मतभेद असणें यांत वावगें कांहीं नाहीं, आणि मतभेद असेल म्हणचे चर्चा, वाद या गोष्टीहि आल्या. लोकांच्या जागरूकतेचें व कोणतीहि गोष्ट पारखून घेण्याच्या चोखंदळ वृत्तीचेंचतें द्योतक आहे असें मी समजतों. परंतु वादामधून तत्त्वबोध झाला पाहिजे. नाहींतर त्या वादाला कांहीं अर्थ उरणार नाहीं. मतभेद केवळ मतभेदांसाठींच असूं नयेत. तसे ते असले तर त्यांनी वैयक्तिक वा पक्षीय हेव्यादाव्यांचें स्वरूप येतें आणि त्यांने कार्य हानि होते.

विकास कार्याच्या द्वारें लोककल्याण साधावयाचें या ध्येयासंबंधीं अर्थातच मतभेद असण्याचें कारण नाहीं. मार्गासंबंधीं मतभेद होऊं शकतील हें मी मान्य करतों. पण असे मतभेद लोकशाहीच्या मार्गानेंच सोडविले पाहिजेत. या दृष्टीनें विभाग, जिल्हा, तालुका व गांव या पातळीवर निरनिराळ्या संस्था स्थापन करण्यांत आल्या आहेत. जनतेच्या विकासाला प्राधान्य द्यावयाचें ही भूमिका एकदां मान्य झाल्यानंतर या मतभेदांतून हि सहकार्याचें क्षेत्र वाढवितां येईल असा माझा विश्वास आहे.

हेही वाचा : कोकणातलं पाणी मराठवाड्यात वळवणं खरंच शक्य आहे?

ज्या नव्या महाराष्ट्र राज्याच्या स्वागताचा सोहळा आपण साजरा करीत आहोंत त्यासंबंधीं महाराष्ट्रांतील जनतेंत जास्तींत जास्त मतैक्य आहे याबद्दल मला तिळमात्र शंका नाहीं. कांहीं जण मात्र थोडासा विरोधी सूर काढीत आहेत. हा विरोधी सूर काढणाऱ्या माझ्या मित्रांना माझी प्रेमाची विनंती आहे कीं, लोकशाहीचा कौल मान्य करून महाराष्ट्रांतील आम जनतेच्या हिताच्या दृष्टीनें त्यांनीं आपला विरोध आतां सोडून द्यावा व नवमहाराष्ट्राच्या उभारणीच्या कार्यात सहभागी व्हावें.

तीन वर्षांपूर्वी सर्व मराठी प्रदेश एकत्र आल्यानंतर आपण परस्परांच्या कितीतरी जवळ आलों आहोंत. मुंबईचा माणूस आतां नागपूर-नांदेडचा विचार करूं लागला आहे, तर अमरावती-अकोल्याच्या माणसाला सांगली-कोल्हापूर हे आपल्यापैकींच आहेत असें वाटूं लागलें आहे. वाहतुकीचीं साधनें वेगाचीं झालीं कीं अंतर कमी होतें हें जसें सत्य आहे, त्याचप्रमाणें ममत्वाच्या भावनेनें अंतर कमी होतें हा अनुभव गेल्या तीन वर्षांपासून आपल्याला अधिकाधिक येत आहे.

बराच काळ दूर राहिल्यामुळें सुरुवातीला थोडेसे संशयाचें वातावरण, थोडीशी दूरपणाची भावना राहणें हे मानवी स्वभावाला धरूनच आहे. पण समजूतदारपणानें व जाणीवपूर्वक हा संशयाचा आडपडदा दूर सारला पाहिजे. महाराष्ट्र आज एकसंध होत आहे त्याचें फार मोठें श्रेय विदर्भ व मराठवाड्यांतील नेते व विचारवंत यांनीं या दिशेनें केलेल्या प्रयत्नासं आहे यांत मुळीच शंका नाहीं. 

हेही वाचा : प्रबोधनकारः महाराष्ट्राला वळण लावणारे विचारवंत

महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यानंतर एकीकरणाचें हें कार्य संपलें अशी चूक कोणीं करूं नये. एक महत्त्वाचा टप्पा आपण गांठला. पण आपल्याला अजूनहि पुढें वाटचाल करावयाची आहे. पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ व मराठवाडा यांना एकरूप करण्याची जबाबदारी केवळ शासनानेंच पार पाडावयाची आहे अशी अपेक्षा सर्वस्वी चुकीची ठरेल. साहित्य संस्था, शिक्षण संस्था, सांस्कृतिक व सामाजिक कार्य करणाऱ्या संस्था यांनी शासनापेक्षांहि हें कार्य अधिक भरीवपणें करतां येईल असें माझें मत आहे. त्या दिशेनें होत असलेल्या प्रयत्नांची मला अर्थातच जाणीव आहे.

एकरूप महाराष्ट्र निर्माण करण्याचे प्रयत्न शासनाच्या द्वारें होत आहेत व त्यांत संपूर्ण यश येईपर्यंत ते चालू राहतील असें आश्वासन मी देतों. या बाबतींत एका गोष्टीचा उल्लेख मी येथें करूं इच्छितों. मुंबई राज्याचें गुजरात व महाराष्ट्र अशा दोन राज्यांत विभाजन करण्यासंबंधींच्या विधेयकांत नागपूर कराराचा समावेश केलेला नाहीं म्हणून आमच्या कांहीं मित्रमंडळींचा राग झालेला आहे. 

कांहीं तांत्रिक घटनात्मक गोष्टींचा विचार करतां या कराराचा विधेयकांत समावेश करतां आला नसला तरी या करारामागची भूमिका मान्य करण्यांत आलेली आहे आणि त्या दृष्टीनें मुंबई विधानसभेंत विभाजनाच्या विधेयकावर झालेल्या चर्चेच्या वेळीं सरकार तर्फे तसें स्पष्ट निवेदन करण्यांत आले आहे. त्याकडे मी आमच्या मित्रांचे लक्ष वेधूं इच्छितों. नागपूर कराराचा समावेश या निवेदनांत केलेला आहे.

नागपूर ही एका राज्याची राजधानी होती, ती आतां न राहिल्यामुळें विदर्भातील जनतेला राजधानीपासून होणारे लाभ अन्य प्रकारें मिळवून दिले पाहिजेत ही गोष्ट मान्यच आहे. सबंध महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टीनें विदर्भांतील जनतेला हा जो त्याग करावा लागत आहे, ही जी तोशीस सहन करावी लागत आहे त्याची जाणीव सबंध महाराष्ट्रांतील जनतेनें जरूर ठेविली पाहिजे आणि म्हणूनच नागपूरला राजधानीचा दर्जा राहिला नसला तरी या शहराचें महत्त्व कायम राखून त्यापासून विदर्भातील जनतेला पूर्वी मिळत असलेले फायदे यापुढेही मिळत राहतील अशी तरतूद या निवेदनांत केली आहे.

नव्या राज्यांत नागपूरला हायकोर्टाचें बेंच राहणार असून राज्य विधिमंडळाचें दरसाल निदान एक तरी अधिवेशन नागपूरला भरविण्यांत येईल आणि सरकारी कचेऱ्याकांही काळ तेथें हलविण्यांत येतील. विदर्भ व मराठवाडा विकास कार्याच्या बाबतींत मागें आहेत हें लक्षांत घेऊन त्यांच्या सर्वांगीण विकासाकडे खास लक्ष पुरविण्यांत येईल. त्या दृष्टीनें या विभागांसाठी वेगळीं विकासमंडळें स्थापन करण्यांत येतील.

हेही वाचा : दांभिकतेच्या वेढ्यात अडकलेली 'आयडिया ऑफ महाराष्ट्र'

तसेंच, राज्यकारभारांत विकेंद्रीकरणाच्या तत्त्वाचा अवलंब केल्यानें या विभागांना हरेक बाबतींत केंद्राकडे डोळे लावून बसण्याची गरज राहणार नाहीं. नोकरभरती, तांत्रिक शिक्षणाच्या सोयी, शेती, उद्योगधंदे, पाटबंधारे, पिण्याच्या पाण्याच्या सोयी, खाणी वगैरे बाबतींत या विभागांकडे विशेष लक्ष पुरविण्यांत येईल, असें या निवेदनाचें थोडक्यांत सार आहे.

सर्वांत महत्त्वाची गोष्ट ही कीं, या निवेदनांतील तरतुदी उपकारकर्त्यांच्या किंवा दात्याच्या भावनेनें नव्हे तर कर्तव्यबुद्धीनें व प्रामाणिकपणें पाळण्यांत येतील असें आश्वासन मी येथें देतों. तेव्हां संसदेच्या विधेयकांत नागपूर कराराचा अंतर्भाव केला नाहीं म्हणून ज्यांचा रोष झाला असेल त्या सर्वांना माझी अशी कळकळीची विनंती आहे कीं, त्यांनीं या निवेदनामागील प्रामाणिक भावना लक्षांत घेऊन आपला रोष दूर करावा व आपण ज्या नव्या महाराष्ट्र राज्याचा आनंदोत्सव आज साजरा करीत आहोंत त्याच्या उभारणीच्या कार्यास त्यांनीं हातभार लावावा.

अनेक अडचणींतून मार्ग काढीत आतां महाराष्ट्र राज्याची स्थापना होत आहे. बंधुभावानें आपण आज एकत्र आलों आहोंत व हा बंधुभाव आपल्याला वाढीस लावावयाचा आहे. 'पूर्व दिव्य ज्यांचें त्यांना रम्य भावि काळ' या कवि विनायकांच्या वचनाप्रमाणें महाराष्ट्राचें भवितव्य उज्ज्वल आहे अशी आपणां सर्वांची श्रद्धा आहे. नव्या भारतांत आपल्याला नव्या महाराष्ट्राची उभारणी करावयाची आहे. बुद्धिमान्, प्रामाणिक व कष्टाळू महाराष्ट्र या कामांत मागें पडणार नाहीं याबद्दल माझ्या मनांत शंका नाही.

हेही वाचा : 

यशवंतरावांच्या अखेरच्या दिवसातल्या आठवणी

संयुक्त महाराष्ट्रासाठी आपण गुजरातला किती कोटी दिले?

आयडिया ऑफ महाराष्ट्रः हा जमिनीचा तुकडा नाही, विचार आहे

आयडिया ऑफ महाराष्ट्रः शरद पवारांच्या नजरेत महाराष्ट्र विचार

बहुजन समाजाने सत्तेत राहिलं पाहिजे, असं यशवंतराव चव्हाण का म्हणाले?

शिवाजी विद्यापीठाचं नाव बदलण्यावर यशवंतराव चव्हाण काय म्हणाले होते?

(साठ वर्षांपूर्वीचं हे भाषण जुन्या व्याकरणाच्या नियमांप्रमाणे उतरवलेलं आहे. ते तसंच कायम ठेवलेलं आहे. हे भाषण ybchavan.in वेबसाईटवरून साभार.)