आयपीएल हा टीआरपी क्षेत्रातला सगळ्यात मोठा भारतीय ब्रँड आहे. त्यामुळे अनेक उत्पादनं आणि सेवा या ब्रँडचा वापर करुन आपले उखळ पांढरे करुन घेत असतात. कोरोनामुळे आयपीएलचा १४ वा हंगाम मध्यावरच थांबवावा लागल्याने जवळपास दोन हजार कोटी रुपयांचा तोटा होण्याची शक्यता वर्तवली जातेय.
आयपीएलचा बायो बबल भेदून कोरोना क्रिकेटच्या मैदानात घुसला. त्यामुळे बीसीसीआयला तातडीने आयपीएल थांबवावी लागली. देशभरात जळणार्या चितांची, ऑक्सिजनविना तडफडणार्या पेशंटची दृष्यं पाहून आयपीएल बंद करा असा सूर अनेक जणांनी लावला होता. त्यावर आयपीएल हे लोकांना घरात थांबवून ठेवण्यासाठी महत्वाचं आहे.
नकारात्मक वातावरणातून थोडा दिलासा देणारी आहे असा युक्तिवाद केला जात होता. आयपीएल अखेर थांबली. आयपीएलच्या थांबण्याने असा काय फरक पडणार आहे? असा प्रश्न स्वाभाविक आहे. याचं उत्तर खुद्द बीसीसीआय अध्यक्षांनीच दिलंय. आयपीएलचा १४ वा हंगाम मध्यावरच थांबवावा लागल्याने जवळपास दोन हजार कोटी रुपयांचा तोटा होण्याची शक्यता त्यांनी वर्तवलीय.
आयपीएल हा सगळा पैशाचा खेळ असल्याचं आपण सर्वसामान्य लोक बोलत असतो. ते खरंही आहे. पण, हा आर्थिक खेळ फक्त खेळाडू आणि फ्रेंचायजी यांच्यापुरताच मर्यादीत नसतो. या आर्थिक खेळात अनेकजण बॅटिंग करत आपला स्कोअर वाढवण्याचा प्रयत्न करत असतात. आयपीएल हा टीआरपी क्षेत्रातील सर्वात मोठा भारतीय ब्रँड आहे. त्यामुळे अनेक उत्पादनं आणि सेवा या ब्रँडचा वापर करुन आपलं उखळ पांढरं करुन घेत असतात.
यंदाच्या आयपीएलमधे अशा अनेकांनी ’स्ट्रॅटेजिक टाईम आऊट’मधे आपल्या वेळा निश्चित करत मार्केटिंग स्ट्रॅटेजी राबवली होती. त्यामुळेच राहुल द्रविडच्या रागाची जाहिरातबाजी, रणबीरसिंहचा गिगाबाईटच्या वेगात सळसळणारा उत्साह आपल्याला सातत्याने टीवीवर दिसत होता. या सर्वांना आयपीएलच्या स्ट्रॅटेजिक टाईम आऊटचा सहारा होता.
याच जीवावर स्टार स्पोर्ट्स आणि डिझने हॉटस्टार ही आयपीएल प्रसारणाचे हक्क असलेले चॅनेल यंदा जवळपास ३ हजार ५०० कोटी कमवणार असा अंदाज वर्तवला गेलाय. पण, आयपीएल मध्यावर थांबली आणि या ब्रँडिंगच्या जगाला मोठा धक्का बसला. आधीच अर्थव्यवस्थेच्या पतंगाला वाराच लागत नाहीये त्यात आयपीएल सारख्या चांगले ब्रँडिंग होणारी स्पर्धा रद्द झाल्याने आर्थिक दोरा अजूनच ढिला पडला.
हेही वाचा: स्पर्श न करता खेळता येतं, म्हणून आपल्याकडे क्रिकेट वाढलं
आयपीएलमधे थेट राज्य क्रिकेट संघटनांचा संबंध दिसत नाही. पण, आयपीएलचे सामने खेळवण्यात येणार्या मैदानांचा आणि तिथल्या सुविधांचा वापर केला जातो. या सर्व सुविधा थेट राज्य संघटनांच्या अखत्यारीत येतात. या सुविधा वापरण्यासाठी बीसीसीआय राज्य संघटनांना काही प्रमाणात मोबदला देत असते.
यंदाच्या आयपीएलमधे बायो बबलमुळे मैदानांची संख्या मर्यादित करण्यात आली होती. त्यातच प्रेक्षकांविना खेळवण्यात येणार्या आयपीएलमुळे आधीच या मोबदल्यात घट झाली होती. त्यात आता आयपीएल थांबवण्यात आल्याने अनेक राज्य संघटनांना या थोडाफार मिळाणार्या मोबदल्यावरही पाणी सोडावं लागण्याची शक्यता आहे. राज्य सरकारही आयपीएलवर मनोरंजन कर लावते.
गेल्या वर्षा दोन वर्षात कोरोनाने जो काही धुमाकूळ घातलाय, त्यामुळे राज्यांचं आर्थिक गणित वजाबाकीतच गेलं आहे. त्यांच्या या वजाबाकीच्या गणितात आयपीएलच्या मनोरंजन कराची थोडी का असेना पण बेरीज होणार होती. आता त्याही बेरजेच्या आकड्यासमोर वजाबाकीचे चिन्ह लागलंय. काही महिन्यांनी आयपीएलचा उरलेला हंगाम खेळवण्यात आला तरी आता बीसीसीआय तो भारतात खेळवण्याची शक्यता जवळपास मावळली आहे.
राज्य संघटनांना आधीच स्थानिक क्रिकेट हंगाम रद्द झाल्यामुळे बीसीसीआयकडून मिळणारा निधी आटला असणार त्यात आयपीएलचा थोडाफार आधार होता तोही आता मिळणार नाही. राज्य संघटनांबरोबरच आयपीएलची मैदानं तयार करणार्या ग्राऊंड्समन आहेत त्यांच्याही रोजी रोटीचा प्रश्न आहेच.
आयपीएलच्या आठ फ्रेंचायजी आणि त्यांचा लवाजमा हा फार मोठा असतो. काही काही टीमचे तर प्रत्यक्ष मैदानात खेळणार्या खेळाडूंपेक्षा त्यांना सपोर्ट करणारा सपोर्टिंग स्टाफच मोठा असतो. त्यात मुख्य कोच, बॉलिंग कोच, बॅटिंग कोच, फिल्डिंग कोच असतात. त्यांच्या जोडीला फिजिओ, मेंटल कंडिशनिंग कोच, मसाज करणारा, वीडियो अॅनॅलिस्ट असा मोठा जमाव ड्रेसिंग रुममधे असतो.
या सर्व लोकांना काय हवं, काय नको हे पाहणारीही एक टीम अविरत काम करत असते. आयपीएल थांबल्याने या सर्वांचंही काम थांबलंय. काम थांबलं म्हणजे अर्थार्जनही थांबणारच. भारतीय क्रीडा जगतात आयपीएल सोडलं तर इतर काही हालचाल सुरु आहे असं दिसत नव्हतं. म्हणजे या सर्वांना आयपीएलचाच आधार होता. आता तोही मिळणार नाही.
देशातल्या अनेक राज्यात कोरोनाच्या दुसर्या लाटेमुळे लॉकडाऊन सदृष्य परिस्थिती आहे. त्यामुळे हॉटेल रेस्टॉरंट सारखी सेवा देणारी क्षेत्रं पूर्णपणे ठप्प पडली आहेत. पण, आयपीएलच्या बायो बबलमधे मोजक्याच का असेना पण या हॉटेल्सना सामावून घेण्यात आलं होतं. त्यामुळे तिथल्या कर्मचार्यांचीही चूल पेटत होती. आता त्याच्यावरही बालट येण्याची शक्यता आहे.
हेही वाचा: आयपीएलच्या तपाची कहाणी : थोडी मिठी, जास्त खट्टी
आयपीएलचे उरलेले सामने जरी रद्द झाले तरी त्याचा खेळाडूंच्या मानधनावर कोणताही परिणाम होणार नाही. त्यांना आधीच त्यांच्या मानधनाचा एक हिस्सा मिळाला असून उरलेले दोन हिस्सेही त्यांना विनासायास मिळणार आहेत. पण, खेळाडूंचं जरी आर्थिक नुकसान होणार नसलं तरी आयपीएल थांबल्याने त्यांच्या खेळाचं मात्र नुकसान होणार आहे.
आपल्याला आठवत असेल की पहिल्यांदाच जग लॉकडाऊन झालं त्यावेळी खेळाडूही घरात लॉक झाले होते. खेळाडूंच्या या घरात लॉक होण्याने त्यांच्या खेळावर त्याचा मोठा परिणाम झाला होता. क्रिकेट हा कौशल्याचा खेळ आहे. पण, या कौशल्याची धार जर सातत्याने सराव केला नाही तर कमी होते. याची प्रचिती आपल्याला भारतीय टीम जवळपास एका वर्षाच्या गॅपनंतर ऑस्ट्रेलियात कसा खेळत होता हे पाहून आलीच असेल.
विराट सारखा तगडा फिल्डरही साधे साधे बॉल सोडताना आपण पाहिलं आहे. त्याचबरोबर बॉलिंग आणि बॅटिंगचा फॉर्मही मोठ्या गॅपनंतर सहज मिळून जाईल याची शाश्वती नसते. त्याचा सामना खेळाडूंना करावा लागण्याची शक्यता आहे.
भारताची मुख्य टीम जूनमधे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळण्यासाठी इंग्लंडला जाणार आहे. ऑगस्ट दरम्यान टीम इंग्लंडबरोबर टेस्ट खेळणार आहे. पण, टी २० वर्ल्डकपच्या तोंडावर टीममधल्या अनेक खेळाडूंच्या सरावावर देशातल्या कडक निर्बंधांमुळे मर्यादा येणार आहेत.
आयपीएल सुरळीत झाली असती तर या टी - २० स्पेशलिस्ट खेळाडूंचा उत्तम सराव झाला असता. ज्यांचा फॉर्म हरपला आहे त्यांना तो परत मिळवता आला असता. टीममधे स्थान मिळवण्यासाठी आयपीएलमधली कामगिरी उपयोगाला आली असती. पण, आयपीएल रद्दच झाली तर मात्र नवख्या खेळाडूंचं नुकसान होणार आहे. सध्या देशातल्या स्थानिक क्रिकेटच्या स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे भारतीय टीमचं दार ठोठावण्याची एकमात्र संधी ही आयपीएल होती.
बीसीसीआयने याच्यावर तोडगा काढण्यासाठी इंग्लंड दौर्याबरोबरच श्रीलंका दौर्याचीही आखणी केली आहे. या दौर्यात मुख्य टीमची निवड न झालेले खेळाडू असतील. तसंच यात टी २० आणि एकदिवसीय क्रिकेटमधले स्पेशालिस्ट खेळाडू असतील. या दौर्यामुळे टी २० वर्ल्डकपपूर्वी खेळाडूंचा मॅचचा सराव होईल.
हेही वाचा: क्रिकेटचे लघुउद्योग सुटलेत सुसाट
आयपीएलच्या बायो बबलमधे कोरोना शिरण्याने फक्त आयपीएलच प्रभावित झालेली नाही. तर याचा परिणाम टी २० वर्ल्डकप सारख्या मोठ्या स्पर्धेवरही झाला आहे. गेल्या वेळेचा ऑस्ट्रेलियात होणारा टी २० वर्ल्डकप कोरोनामुळेच होऊ शकला नव्हता. आता तो भारतात होणार होता. पण, भारतात कोरोनाची दुसरी लाट थैमान घालत आहे.
या सुनामीरूपी लाटेमुळे भारतीय वैद्यकीय क्षेत्रावर प्रचंड ताण पडला आहे. ही व्यवस्था थोड्या फार फरकाने कोसळलीच आहे असं म्हणावं लागेल. या परिस्थितीचा भारतात होणार्या टी २० वर्ल्डकपवरही परिणाम होण्याची शक्यता आहे.
आयपीएलचा १४ वा हंगाम सुरु झाला त्यावेळी भारतात कोरोनाची दुसरी लाट आपले आक्राळ विक्राळ रूप धारण करण्याच्या तयारीत होती. पण, टी २० वर्ल्डकपपूर्वी विविध देशांचे अव्वल खेळाडू उत्तम सराव होईल या आशेने भारतात आले.
बीसीसीआयने गेला आयपीएल हंगाम हा युएईत सुरक्षित बायो बबल तयार करून यशस्वी करुन दाखवला होता. यंदाची आयपीएलही भारताला युएईत किंवा इतर सुरक्षित ठिकाणी खेळवून यशस्वी करता आली असती. पण, बीसीसीआयने बहुदा टी २० वर्ल्डकप भारतातच आयोजित करण्यासाठी एक उत्तम उदाहरण ठेवण्यासाठी आयपीएलचा १४ वा हंगाम भारतात खेळवण्याचं धाडस केलं.
त्यांचं हे धाडस निम्मी आयपीएल होईपर्यंत यशस्वीही झालं पण, अखेर कोरोनाने बायो बबल भेदला आणि आयपीएल थांबवावी लागली. आठ - दहा टीमचा डोलारा एका बायो बबलमधे सुरक्षित ठेवून दाखवण्याचा प्रयत्न फसला. आता याचा परिणाम भारत यजमान असलेल्या यंदाच्या टी २० वर्ल्डकपवरही होण्याची दाट शक्यता आहे.
भारतातली कोरोनाची दुसरी लाट लवकर आटोक्यात नाही आली तर भारताला आपलं यजमानपद गमवावं लागेल. पर्यायाने मिळणार्या पैशावरही पाणी सोडावं लागेल. आधीच आटलेले उत्पन्नाचे स्त्रोत बीसीसीआयच्या अवाढव्य व्यापाला आव्हान देत आहेत. त्यात टी २० वर्ल्डकप यजमानपदालाही आयपीएल स्थगित झाल्याने गालबोट लागलंय.
हेही वाचा:
महेंद्र सिंग धोनी: वनडेतला ‘ग्रेट फिनिशर’
मेजर ध्यानचंद यांनी हिटलरचा प्रस्तावही नाकारला