हैदराबादचा निकाल भाजपचा आत्मविश्वास वाढवणारा

०८ डिसेंबर २०२०

वाचन वेळ : ४ मिनिटं


ग्रेटर हैदराबाद महापालिका निवडणुकीत भाजपने चांगलीच मुसंडी मारली. ४ जागांवरून भाजपने ४४ जागांवर झेप घेतली. एमआयएमचं फारसं नुकसान झालेलं नसलं तरी टीआरएसच्या जागा जवळपास निम्म्याने कमी झाल्या. तर, काँग्रेस दिवसेंदिवस अधिकाधिक कमकुवत होत चाललीय. धार्मिक ध्रुवीकरण जसं भाजपला फायदेशीर ठरतं. तसंच, ते एमआयएमला देखील फायदेशीर ठरल्याचं यातून दिसतं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वातली भाजप ही अत्यंत प्रभावी अशी निवडणूक यंत्रणा झालीय. एखादी निवडणूक झाल्यानंतर लगेच पाच वर्षांनी येणाऱ्या त्याच निवडणुकीसाठी भाजपची तयारी सुरू होते, असं म्हटलं जातं. परंतु, एखाद्या महापालिका निवडणुकीत केंद्रीय नेतृत्वानं लक्ष घालण्याचा प्रसंग आतापर्यंत आलेला नव्हता. हैदराबाद महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने मात्र भाजप महापालिका निवडणूकही मोठ्या ताकदीने लढू शकते हे स्पष्ट झालं.

काँग्रेस  होतेय कमजोर

खुद्द केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीयमंत्री स्मृती इराणी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निवडणुकीत प्रचार केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही त्याच काळात हैदराबादमधल्या एका कंपनीला कोरोना लसीसंदर्भात भेट दिली. भाजपने हैदराबाद महापालिका निवडणुकीला एवढं महत्त्व देण्याचं कारण काय?

भाजपला कर्नाटक वगळता दक्षिण भारतातल्या राज्यांमधे मुसंडी मारता आलेली नाही. पण, त्यासाठी भाजप प्रयत्नशील आहे. त्या द़ृष्टीने तेलंगण हे राज्य भाजपनं लक्ष बनवलंय. हे राज्य आंध्र प्रदेशपासून वेगळं झाल्यापासून या राज्यावर तेलंगण राष्ट्र समिती टीआरएसच्या के. चंद्रशेखर राव यांची पकड आहे. राज्याच्या राजकारणात प्रमुख विरोधी पक्ष असलेली काँग्रेस कमजोर होत चाललीय.

हेही वाचा : हैदराबाद महानगरपालिका निवडणूक भाजपनं प्रतिष्ठेची केली त्याची पाच कारणं

तेलंगणाकडून व्हावी नुकसानभरपाई

काँग्रेसची जागा घेत आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत टीआरएसला आपण सक्षम पर्याय आहोत हे मतदारांना दाखवून द्यायला भाजप उत्सुक आहे. असा डाव भाजपने गेल्या लोकसभा निवडणुकीत ओडिसा आणि पश्चिम बंगालमधे यशस्वीरीत्या खेळलाय. शिवाय पुढील लोकसभा निवडणुकीत भाजपचा बालेकिल्ला झालेल्या हिंदी भाषिक राज्यांमधे जर पीछेहाट झाली तर त्याची नुकसानभरपाई तेलंगणसारख्या राज्यांमधून व्हावी अशीही भाजपची व्यूहनीती आहे.

तेलंगणमधे लोकसभेच्या १७ जागा आहेत. त्यापैकी सध्या ४ जागा भाजपकडे आहेत. हैदराबाद महापालिका क्षेत्रात विधानसभेच्या २४ जागा आहेत. म्हणजे महापालिकेवर पकड मिळाली तर या जागांवरही लगेच थेट प्रभाव पाडता येईल असंही गणित आहे. नुकत्याच झालेल्या दुबाका या मतदारसंघातल्या पोटनिवडणुकीने भाजपचा आत्मविश्वास वाढवला. टीआरएसचा बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघात भाजपने विजय मिळवला. त्यामुळे उत्साह वाढलेल्या भाजपने हैदराबाद महापालिका निवडणूक प्रतिष्ठेची केली.

धार्मिक ध्रुवीकरणाचा ट्रेंड

भाजप सातत्याने प्रत्येक राज्यामधे ‘धार्मिक ध्रुवीकरण’ करून त्याचा लाभ उठवण्याचा प्रयत्न करते. दिल्ली विधानसभा निवडणुकीत ते प्रकर्षानं दिसलं होतं. पुढील वर्षी होणाऱ्या पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत भाजप ध्रुवीकरणाचाच खेळ खेळेल, अशी चिन्हं आहेत. त्याआधी हैदराबादमधे त्याच परिचित खेळाची झलक दिसली. योगी आदित्यनाथ यांनी हैदराबादचे नामांतर ‘भाग्यनगर’ करू, असं आश्वासन दिलं. तर, अमित शहा यांनी ‘निजामी संस्कृती’पासून हैदराबाद मुक्त करू, अशी घोषणा केली.

जमातवादी वक्तव्यांसाठी कुप्रसिद्ध कर्नाटकचे तरुण खासदार आणि ‘भाजपयुमो’चे राष्ट्रीय अध्यक्ष तेजस्वी सूर्या यांनी भाजप संपूर्ण दक्षिण भारताचं भगवेकरण करेल आणि त्याची सुरुवात हैदराबादपासून होतेय, असं वक्तव्य केलं. हैदराबादमधे रोहिंग्या मुस्लिम निर्वासित म्हणून रहातात आणि त्यांच्यावर सर्जिकल स्ट्राईक करू, अशा घोषणाही दिल्या गेल्या.

भाजपच्या ध्रुवीकरणाचा कुणाला फायदा?

महापालिकेतल्या १५० पैकी जवळपास ५० जागांवर मुस्लिम मतदारांचा प्रभाव आहे. उर्वरित १०० जागांवर हिंदू मतदारांचं ध्रुवीकरण करायचं अशा द्वेषपूर्ण प्रचारामागचं एक कारण. शिवाय हैदराबादमधे एमआयएमचा प्रभाव आहे. तसंच, बिहार निवडणुकीनं दाखवल्याप्रमाणे असदुद्दीन ओवैसी यांचा देशात इतरत्रही प्रभाव वाढत आहे. पश्चिम बंगालमधे एमआयएम निवडणूक लढवणार आहे. उत्तर प्रदेशातही एमआयएमची मोर्चेबांधणी सुरूय. 

भाजपच्या अशा ध्रुवीकरणाच्या प्रचाराचा उलट फायदा ओवैसी यांच्या एमआयएमला होतोय. त्यामुळे काँग्रेस आणि इतर सेक्युलर भूमिका घेणाऱ्या ५ प्रादेशिक पक्षांनाच त्याचा फटका बसतो, हे एव्हाना सिद्ध झालंय. ते महाराष्ट्रातही दिसलंय आणि नुकतंच बिहारमधेही. हैदराबादमधल्या अशा प्रचाराचा ‘राजकीय लाभ’ देशात इतरत्र घेता येईल, अशी भाजपची अटकळ होती म्हणूनच ‘हाय प्रोफाइल’ नेत्यांनी तिथं उपस्थिती लावली.

हेही वाचा : कोणत्या दिशेने वाहतायत बिहार निवडणुकीचे वारे?

निकालाचा अर्थ काय?

गेल्या निवडणुकीत १५० पैकी ९९ जागा टीआरएसने जिंकल्या होत्या. एमआयएम ४४, काँग्रेस २ आणि भाजप केवळ ४ जागांवर विजयी झाली होती. टीआरएस ५५ जागांसह सर्वात मोठा पक्ष झालेला असला तरी ७६ या बहुमताच्या आकड्यापासून दूर आहे. 

एमआयएमने आपल्या ४४ जागा राखल्यात. काँग्रेसची २ जागांसह जी दुर्दशा झाली होती ती कायम राहिलीय. भाजपने मात्र जोरात मुसंडी मारलीय. ४ जागांवरून ते ४८ जागांपर्यंत अशी झेप भाजपने घेतलीय. महापालिकेत प्रमुख विरोधी पक्ष म्हणून स्थानापन्न होणं ही भाजपसाठी मोठी कामगिरी आहे. याचा अर्थ भाजपच्या ध्रुवीकरणाच्या प्रचाराला यश मिळतंय, असाच घेतला जाईल. 

भाजप पुन्हा करेल का फोडाफोडी?

त्यामुळे आगामी काळात तेलंगण तसंच इतरत्रही योगी आदित्यनाथ, तेजस्वी सूर्या हे अल्पसंख्याकविरोधी भडक व्यक्तव्य करणारे चेहरे सर्वत्र दिसतील आणि प्रचाराचे मुख्य सूत्र हे धार्मिक ध्रुवीकरणाचंच राहील हे उघड आहे. केवळ ध्रुवीकरणावर निवडणूक जिंकता येत नाही हे भाजपला माहीत आहे. त्यामुळेच विरोधी पक्षातले बलशाली नेते ईडी, सीबीआयचा धाक किंवा सत्तेचे गाजर दाखवून आपल्या पक्षात घेणं हा मार्ग भाजप अवलंबतं.

जे सध्या पश्चिम बंगालमधे दिसतंय. तोच फोडाफोडीचा प्रयोग तेलंगणमधेही दिसेल. भविष्यात टीआरएसला काँग्रेसपेक्षा भाजपला विरोधी पक्ष म्हणून सामोरं जाणं आव्हानात्मक ठरेल. भाजपच्या ध्रुवीकरणाच्या प्रचाराला सामोरं कसं जावं हा सध्या सर्वच सेक्युलर भूमिका घेणाऱ्या पक्षांसमोरचा प्रश्न आहे. आधीच कमजोर झालेल्या काँग्रेससाठी भाजपचा तेलंगणमधला हा वाढत जाणारा प्रभाव धोक्याची घंटा आहे.

एमआयएमने आपली ताकद टिकवून ठेवलीय. भाजप आणि एमआयएमचे राजकारण एकमेकाला पूरक आहे. त्यामुळे एमआयएमचा फटका हा शेवटी काँग्रेस आणि इतर सेक्युलर पक्षांनाच बसणार आहे. एकूण चंद्रशेखर राव यांनी हैदराबादमधली सत्ता राखली असली तरी त्यांची चिंता आणि भाजपचा आत्मविश्वास वाढवणारा हा निकाल आहे.

हेही वाचा : 

आंखी दास यांच्या फेसबूक राजीनाम्याच्या निमित्ताने

हत्ती आणि गाढव अमेरिकेच्या राजकारणात आले कसे?

कॉर्पोरेट घराण्यांच्या हातात बँकेच्या चाव्या देणं धोक्याचं?

लस असतानाही आपल्याला वायरसवरच्या औषधांची गरज पडेल?

शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवायचे असतील तर बाबासाहेब वाचावे लागतील

साना मारिन: जगातल्या सगळ्यात तरुण पंतप्रधान पाच पक्षांचं सरकार चालवतात

(लेखक राजकीय विश्लेषक आहेत)