कॉण्टॅक्ट ट्रेसिंगने लॉकडाऊनसोबतच कोरोनाची दुसरी लाटही रोखता येईल!

२८ जुलै २०२०

वाचन वेळ : ६ मिनिटं


अनलॉक सुरू झाल्यापासून भारतातल्या कोरोना वायरसच्या पेशंटमधे प्रचंड वाढ झाली. पुन्हा देशाला टाळं लावावं लागेल, अशी भीतीही व्यक्त केली जातीय. पण लॉकडाऊन न करताही हा प्रसार थांबवणं शक्य आहे. त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून प्रभावीपणे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करावं लागेल. त्यासाठी प्रशिक्षित अधिकाऱ्यांची एक टीम हवी.

कोरोना वायरसचा प्रसार दिवसेंदिवस वाढतोय. पुन्हा लॉकडाऊन करावा लागेल की काय अशी शंका अनेकांच्या मनात येतेय. दुसरीकडे पुन्हा लॉकडाऊन झाला तरी आम्ही पाळणार नाही असा पावित्रा व्यावसायिक, दुकानदार आणि हातावर पोट असणाऱ्या सगळ्या कामगारांनी घेतलाय. सगळं नेहमीसारखं खुलं करायचं म्हटलं तर त्यासाठी लागणारी सशक्त आरोग्य व्यवस्था तयार ठेवायला हवी. ती व्यवस्था उभारायची ताकद आपल्याकडे नाही. नियोजन न करता संपूर्ण अनलॉक चालू केला तर कोरोना वायरसची दुसरी लाट येण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा परिस्थितीत कोरोना वायरसचा प्रसार थांबवायचा कसा असा प्रश्न प्रशासनासमोर पडलाय.

उत्तर सोपंय! - कॉण्टेक्ट ट्रेसिंग. देशातला प्रत्येक माणूस कुठे जातो, कुणाला भेटतो या सगळ्याचा सगळा डाटा आरोग्य विभागाकडे अगदी व्यवस्थित जमा झाला तर तर लॉकडाऊन न करताही कोरोनाचा प्रसार थांबवता येऊ शकतो असं वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने आपल्या अहवालात सांगितलंय.

हेही वाचा : जीवघेणा लॉकडाऊन संपवण्याचे चार साधेसरळ मार्ग

कॉण्टॅक्ट ट्रेसिंग म्हणजे काय?

‘सार्स कोव २' या वायरसमुळे पसरणारा कोविड १९ हा एका माणसाकडून दुसऱ्या माणसाकडे पसरणारा संसर्गजन्य आजार आहे. या वायरसचा प्रसार रोखण्यासाठी आपल्याला संसर्गाची साखळी तोडून लागण झालेल्या माणसाकडून एकाही माणसाला संसर्ग होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. त्यासाठी एखाद्याला लागण झाल्याचं नक्की झाल्यानंतर कॉण्टेक्ट ट्रेसिंग करून तो माणूस कुणाकुणाच्या संपर्कात आलाय ते शोधणं आणि त्या लोकांना क्वारंटाईन करणं गरजेचं आहे,’ असं डब्लूएचओच्या अहवालात लिहिलंय.

सोप्या शब्दांत सांगायचं तर कोरोना वायरसची लागण झालेल्या पेशंटच्या संपर्कात कोण कोण आलंय याची माहिती काढणं म्हणजे कॉण्टेक्ट ट्रेसिंग. पण फक्त ओळखल्यानंतर कॉण्टेक्ट ट्रेसिंगची प्रक्रिया संपते असं नाही. तर या लोकांना ओळखून, त्यांची विचारपूस करून, गरज असेल तर त्यांना औषधं देऊन साधारण १४ ते १५ दिवसांसाठी त्यांचं व्यवस्थापन करणं हे सगळं कॉण्टेक्ट ट्रेसिंगमधे अभिप्रेत असतं.

कॉण्टेक्ट म्हणजे कोरोना वायरसची लागण झालेल्या माणसाच्या संपर्कात आलेली व्यक्ती आणि ट्रेसिंग म्हणजे त्या व्यक्तीचा माग काढणं. पण ही व्यक्ती नेमकी कोण याचेही काही निकष आहेत. १५ मिनिटांपेक्षा जास्त काळ कोरोना वायरसची लागण झालेल्या व्यक्तींच्या आसपास असणाऱ्या, कोरोना वायरसची लागण झालेल्या व्यक्तीच्या थेट संपर्कात येणाऱ्या, पीपीई किटचा वापर न करता कोविड १९ च्या पेशंटची सेवा करणाऱ्या किंवा पेशंटसोबत एका घरात, एका खोलीत राहणाऱ्या व्यक्तींकडे कॉण्टेक्ट म्हणून पाहिलं जातं.

कॉण्टॅक्ट कसे ओळखायचे?

एखादी व्यक्ती कोरोना पॉझिटीव आहे, हे नक्की झाल्यानंतर २४ तासांच्या आत ती व्यक्ती कुणाकुणाच्या संपर्कात आली हे शोधावं लागतं. त्यानंतर त्यापैकी कुणाला कॉन्टक्ट म्हणायचं हे ठरवण्यात येतं. अशा कॉन्टॅक्ट्सची एक यादीच बनवली जाते. पहिल्यांदा त्यातल्या प्रत्येक माणसाला फोन करून किंवा प्रत्यक्ष भेटून ते कॉण्टेक्ट असल्याची माहिती दिली जाते. त्यावेळी कॉण्टेक्ट ट्रेसिंगची प्रक्रिया काय असते हे त्यांना समजावून सांगितलं जातं.  त्यासोबतच त्यांना क्वारंटाईन व्हावं लागेल की नाही, क्वारंटाईन होण्याची योग्य पद्धत कोणती, क्वारंटाईन झाल्यावर स्वतःच्या आरोग्याकडे कशाप्रकारे लक्ष ठेवायचं, क्वारंटाईन काळात आजारी पडल्यासारखं झालं तर काय करायचं, कुणाला कळवायचं याचीही माहिती देतात.

फोनवर शक्य नसल्यास ही सगळी माहिती मेसेज किंवा ईमेल द्वारे पोचवाता येते. याशिवाय कोणतेही प्रश्न त्या कॉण्टेक्ट व्यक्तीच्या मनात असतील तर त्याचीही समाधानकारक उत्तरं आरोग्य अधिकाऱ्यांना द्यावं लागतं. तसंच त्या व्यक्तीची सगळी माहिती गोपनीय राहील याचीही शाश्वती द्यावी लागते. क्वारंटाईन असेपर्यंत दररोज फोन करून त्या व्यक्तीची चौकशी केली जाते. अनेकदा त्यांना स्वतःच स्वतःची माहिती नोंद करून ठेवावी लागते.

एखाद्यावेळी कॉण्टेक्टशी संपर्क झाला नाही तर पेशंटचे इतर नातेवाईक, मित्रमैत्रिणी किंवा शेजारपाजाऱ्यांना विचारून कॉण्टेक्टपर्यंत पोचण्याचा प्रयत्न केला जातो. लागण झालेल्या माणसाच्या आसपासच हे कॉण्टेक्ट राहत असतील तर अधिकारी ते काम लगेचच करू शकतात. पण त्या व्यक्तीला भेटल्यानंतर हे कॉण्टेक्ट दुसऱ्या दूरच्या ठिकाणी गेले असतील तर त्या भागातल्या कॉण्टेक्ट ट्रेसिंग अधिकाऱ्यांकडे त्या व्यक्तीची जबाबदारी दिली जाते.

हे कोरोना स्पेशलही वाचा : 

ये दोस्ता, लस कशी तयार केली जाते?

साथीच्या आजारात सारं जग समाजवादी वळण घेतं

डॉक्टरांनी घातलेला सूट म्हणजे कोरोनाविरूद्धचं चिलखतच!

कोविड-१९ आजारावर औषध नसताना पेशन्ट बरं कसं होतात?

कोरोनाला रोखण्यासाठी तैवानकडून आपण काय शिकलं पाहिजे?

एकदा बरं झाल्यावरही पेशंटला का होतेय पुन्हा कोरोनाची लागण?

किराणा दुकानातून आपण कोरोनाला घरी नेण्यापासून कसं वाचू शकतो?

प्रशिक्षित टीम तयार करायची गरज

लॉकडाऊन असेल तर हे कॉण्टेक्ट ट्रेसिंग करणं सोपं असतं. लोकांना घराबाहेर पडण्याची परवानगी नसल्याने ते फार लोकांच्या संपर्कात येत नाहीत. पण अनलॉकनंतर गेल्या १५ दिवसांत आपण नेमकं कुणाकुणाला भेटलो हे लागण झालेल्या माणसाला आठवत नाही. त्यातही समूह संसर्ग म्हणजेच कम्युनिटी स्प्रेड सुरू असेल तर कॉण्टेक्ट ट्रेसिंग करणं आणखी अवघड होतं. त्यामुळेच कोणत्याही ऐऱ्यागैऱ्या माणसाला हे काम देऊन चालत नाही.

तर कॉण्टेक्ट ट्रेसिंग करण्यासाठी संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांना विशिष्ट प्रकारचं प्रशिक्षण द्यावं लागतं. खरंतर साथरोग नसतानाच या प्रशिक्षणाची सुरवात व्हायला हवी. पण भारतासकट इतर अनेक देशात कोविड १९ ची साथ आल्यानंतर कॉण्टेक्ट ट्रेसिंगची व्यवस्था उभी करण्यात आलीय. उद्या कोरोना गेला तरी तो उलटून परत येऊ नये किंवा दुसरा एखादा साथरोग उद्भवला तर त्याची वेळेवर माहिती मिळावी यासाठी कॉण्टेक्ट ट्रेसिंगची चांगली व्यवस्था निर्माण करणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणूनच कोर्सेरासारख्या ऑनलाईन इन्स्टिट्यूशन्सवर कॉण्टेक्ट ट्रेसिंगचे कोर्सेसही सुरू झालेत.

आता नवीन तंत्रज्ञानामुळे कॉण्टेक्ट ट्रेसिंग आधीपेक्षा खूप सोपं झालंय. इलेक्ट्रॉनिक साधनांचा वापर करून मोठ्या प्रमाणावरचं कॉण्टेक्ट ट्रेसिंगही अगदी व्यवस्थित आणि सफाईदारपणे करता येऊ शकतं. साथरोगात लोकांवर पाळत ठेवण्यासाठी आणि कॉण्टेक्ट ट्रेसिंग करण्यासाठी बनवलेली गो डाटासारखी काही सॉफ्टवेअर ऍप्लिकेशन यात मदत करतात. कोरोनाचा प्रसार झाल्यानंतर अनेक देशांनीही आपापली सॉफ्टवेअर तयार केलीयत.

कोरोना वायरसविरोधातलं आदर्श मॉडेल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दक्षिण कोरियानंही कॉण्टेक्ट ट्रेसिंगच्या जोरावरच वायरसचा प्रसार रोखून दाखवलाय. भारत सरकारनंही आरोग्य सेतू ऍप लॉन्च केलं गेलंय. आपल्या स्मार्टफोनचा जीपीएस वापरून आपण कुठे जातो, काय करतो याचा सगळा डाटा हे ऍप सरकारला पुरवतं. त्यावरून आपण कोरोनाची लागण झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आलो आहोत की नाही हे कळू शकतं. साधारण १२ कोटी भारतीय नागरिकांनी आरोग्य सेतू ऍप डाऊनलोड केलंय. सरकारनं कॉण्टेक्ट ट्रेसिंग करणं सोप्पं जावं म्हणून हे ऍप वापरणं बंधनकारक करण्याचाही प्रयत्न केला. पण ते शक्य झालं नाही.

खासगीपण लागलंय पणाला

या कॉण्टेक्ट ट्रेसिंगच्या बाबतीत जग दोन भागात विभागलं गेल्याचं म्हटलं जातंय. काही देश डाटा साठवण्यासाठी सेंट्रलाईज्ड म्हणजेच केंद्रीकृत पद्धतीचा वापर करतायत. या पद्धतीत देशातल्या सगळ्या माणसांची माहिती, त्यांचं मोबाईल लोकेशन असा सगळा डाटा एका अज्ञात सर्वरवर साठवला जातो. या सर्वरवरच कोण कुणाच्या संपर्कात येतंय, त्यातल्या कुणाला लागण झालीय याची जुळवणी केली जाते. इस्रायल, पोलंड, रिपब्लिक ऑफ माकडोवा, बेलारुस, सायप्रस, रशियन फेडरेशन, ब्रिटन अशा काही देशांनी या पद्धतीचा वापर सुरू केलाय. आपलं आरोग्य सेतू ऍपही याच पद्धतीने काम करतं. या ऍपचा सर्वर कोणता, तो कोण चालवतं याबाबत अनेक वादही झाले होते.

याउलट डिसेंट्रलाईज्ड म्हणजेच विकेंद्रीकरणाच्या पद्धतीत आपली कोणती माहिती पुरवायची यावर जास्तीत जास्त नियंत्रण ते ऍप वापरणाऱ्याला ठेवता येतं. आपली सगळी माहिती सर्वरवर न जाता आपल्या फोनमधेच साठवून तिथूनच आपण कुणाच्या संपर्कात आलोय त्याची जुळवाजुळव केली जाते. गुगल, ऍपल आणि इतर मोठ्या आंतरराष्ट्रीय कंपन्या अशा प्रकारचे ऍप तयार करण्याचा प्रयत्न करतायत. फिनलँड, इटली, नॉर्वे, रोमानिया, स्पेन, सर्बिया, स्लोवेनिया अशा काही देशांनी त्यांच्या नागरिकांसाठी असं ऍप तयारही केलंय.

मात्र, दोन्ही पद्धतींमधे आपली खासगी माहिती सरकारला किंवा दुसऱ्या माणसाला सहज मिळवता येते. त्यामुळेच इलेक्ट्रॉनिक पद्धतींचा वापर कॉण्टेक्ट ट्रेसिंगसाठी करताना आपल्या खासगीपणावर गदा येत असल्याचं अनेकांचं म्हणणं आहे. एकदा हे ऍप फोनमधे आलं की माणूस कुठे जातो, काय करतो, त्याला कधी ताप येतो यासोबतच माणूस काय पाहतो, त्याच्या गॅलरीत कोणते फोटो आहेत, मोबाईलमधे कोणती गाणी आहेत, तो कुणाशी बोलतो अशी सगळी माहिती सरकारजमा होत राहील. यामुळे साथरोगाच्या काळात या ऍपची मागणी वाढलीय तसं त्याच्याविरोधात बोलणाऱ्या लोकांची संख्याही हळूहळू वाढतीय.

हेही वाचा : खरंच, भारतात कोरोनाची दुसरी लाट जूनमधे येणार आहे?

दुसरी लाट रोखावी लागेल

माणसाचं खासगीपण जपणाऱ्या कॉन्टॅक्ट ट्रेसिंगच्या पद्धती निर्माण कराव्यात असा सूर उमटतोय. अशी पद्धत किंवा कोरोना वायरसविरोधातली लस येत नाही तोपर्यंत तरी भारतात आपल्याला या इलेक्ट्रॉनिक पद्धतींचा वापर करावाच लागेल. कोरोनाची लागण होणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असली तरी देशाच्या एकूण लोकसंख्येच्या तुलनेत ही संख्या कमीच म्हणावी लागेल.

थायरोकेअर या खासगी पॅथॉलॉजी लॅबने २० दिवसांत ६०० ठिकाणांवरून ६० हजार लोकांची अँटीबॉडी टेस्ट केली. या टेस्टमधून भारतातल्या फक्त १५ टक्के लोकांमधे कोविड १९ या आजाराविरोधातल्या अँटीबॉडीज निर्माण झाल्या असल्याचं समोर आलंय. याचाच अर्थ अजूनही उर्वरीत ८० ते ८५ टक्के लोकांना कोरोना वायरसची लागण होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत भारताच्या किनाऱ्यावर कोरोना वायरसची दुसरी लाट जोरात येऊन धडकू शकते. फक्त आणि फक्त कॉन्टॅक्ट ट्रेसिंगच्या आधुनिक पद्धती वापरूनच ही लाट रोखता येऊ शकते.

हेही वाचा : 

कोरोना वायरसबद्दल मुलांशी आपण कसं बोलायचं?

कोरोना पॉझिटिव आलो तरी आम्ही घरीच राहिलो, कारण

सुपर स्प्रेडर म्हणजे काय? ते मुद्दाम कोरोना पसरवतात का?

एडवर्ड जेन्नरः देवी संपवणाऱ्या या देवमाणसाने लसीकरण शोधलंय

कोरोनाच्या R0 नंबरवर आपलं, लॉकडाऊनचं भवितव्य अवलंबून आहे?

हर्ड इम्युनिटी ठरू शकते का कोरोनाच्या युद्धातलं भारताकडचं ब्रम्हास्त्र?

कोरोना काळात आपल्याला पेशंटचे १७ अधिकार माहीत असायला हवेत!

विटॅमिन डीच्या कमतरतेमधे दडलंय देशांच्या वेगवेगळ्या मृत्यूदराचं गुपित?