मासिक पाळीविषयी आपल्या मुलामुलींशी कसं बोलायचं?

०८ मार्च २०१९

वाचन वेळ : ६ मिनिटं


रीतिरिवाज, बंधनं, नियम, दडपण सोबत घेऊनच मुलगी मोठी होते. स्वतःच्या शरीराकडे, मासिक पाळीकडे लाजिरवाणी गोष्ट म्हणून पाहते. म्हणूनच २१ व्या शतकातही मुली मासिक पाळीच्या दिवसांत बाजूला बसतात. लोणची पापडाला शिवत नाहीत. देवाला जात नाहीत. पण हे सगळं करण्याची गरज नाही. त्यासाठी प्र्त्येक पालकांनी वाचावा आणि मुलांना वाचायला द्यावा, असा लेख. महिला दिन विशेष.

तुमचं पहिलं घर कोणतं असं तुम्हाला विचारलं तर तुम्ही काय सांगाल? माझ्या गावाकडचं घर ते माझं पहिलं घर. किंवा माझं बालपण अमक्या गावात गेलं ते माझं पहिलं घर. असंच सांगालं ना?

आमच्या दुसरं दशक नावाच्या शिबिरातली मुलंही असंच उत्तर देतात. पण या विटांच्या, मातीच्या, सिमेंटच्या घरात राहण्याआधी तुम्ही, मी, आपण सगळेच एका उबदार घरात राहत होतो.

ते घर म्हणजे आपल्या आईचं पोट, आईचं गर्भाशय! एक दिवस नाही, दोन दिवस नाही, तर नऊ महिने आपण या घरात राहिलो. आपल्या या पहिल्या घराविषयी आपल्याला माहिती तर नसतेच फारशी.  पण या घराविषयी काही लोकांना घृणासुद्धा वाटते!

हेही वाचाः महात्मा बसवण्णाः ९०० वर्षांपूर्वी पाळीचा विटाळ झुगारणारा महापुरूष

शरीराशी नातं हवं, संवाद हवा

आपलं आपल्या शरीराशी काही एक नातं असतं. मात्र वयात येणाऱ्या मुलींना हे नातं बांधताच येत नाही. तिचं स्वतःशी, स्वतःच्या शरीराशी जे काही थोडं थोडकं नातं असतं ते संस्कृतीने बांधून दिलेलं असतं. त्यामुळे हे दिलेलं नातं फार मजबूत असतं. हेच नातं पुढच्या पिढीला जसंच्या तसं पोचवलं जातं. ही संस्कृती अर्थातच पुरुषप्रधान असते. या नात्यात मुलीचा स्वतःच्या शरीराशी नीट संवादच होत नाही, होऊ दिला जात नाही.

रीतिरिवाज, बंधनं, नियम, दडपण इत्यादींचे संदर्भ घेऊनच मुलगी मोठी होते. स्वतःच्या शरीराकडे दुय्यमत्वाने, लाजेने पाहू लागते. मासिक पाळीकडेही गुप्त, लाजिरवाणी गोष्ट म्हणून बघितलं जातं. आणि म्हणूनच २१ व्या शतकातही काही मुली मासिक पाळी चालू असताना बाजूला बसतात. लोणची पापडाला शिवत नाहीत, देवाला जात नाहीत. हे सगळं करणाऱ्या मुलींना आणि तिच्या पालकांना विज्ञानातलं काहीच माहीत नाही, असं आहे का? तर असं नाही.

विज्ञानाची अगदी सखोल सूक्ष्म माहिती नसली तरी मासिक पाळी बाळाच्या जन्मासाठी गरजेची असते, एवढं साधं विज्ञान किंवा तर्क नक्कीच माहीत असतो. तरीही मासिक पाळीविषयीचे गैरसमज, दडपण कमी होताना दिसत नाहीत. म्हणजेच काय तर  मासिक पाळीबद्दल असणाऱ्या अंधश्रद्धांचा पगडा आपल्याला मिळूनही प्रचलित वैज्ञानिक माहिती जात नाही. 

दुसऱ्या दशकातलं आरोग्य भान

मुलीने स्वतःच्या शरीराशी नव्याने नातं बांधणं गरजेचं आहे. या नव्या नात्यात त्यांना स्वतःच्या शरीराबद्दल सहज अभिमान वाटला पाहिजे. शरीराबद्दलच्या कल्पना क्लिअर झाल्या पाहिजेत. निदान स्वतःच्या शरीराविषयी स्वतःलाच लाज आणि घृणा तरी वाटू नये. हे नातं बांधण्यासाठीच तर एक वेगळा प्रयत्न 'आरोग्य भान' गटाच्या 'दुसरं दशक' या शिबिरात केला जातो.

तारुण्यात येणारी ही मुलंमुली स्वतःच्या आयुष्याच्या दुसऱ्या दशकात म्हणजेच ११ ते २० या वयाची असतात. ही मुलं वयाने लहान असली तरी त्यांच्याकडे काही ना काही अनुभव असतो. दुसरं दशक या अनुभवापासूनच संवादाची बांधणी करायला घेतं.

जसं मेंदूच्या, फुफ्फुसाच्या कामाविषयी बोललं जातं, तसं गर्भाशयाच्या कामाविषयी बोललं जात नाही. मेंदू, फुफ्फुस यासारखाच गर्भाशय हा स्त्रीच्या शरीराचा एक अवयव आहे. म्हणूनच शिबिरात मुलांना शरीराची माहिती गाण्यांद्वारे दिली जाते. मेंदूचं, फुफ्फुसांचं, अन्नाच्या पिशवीचं काम सांगताना गर्भाशयाचं कामही सांगितलं जातं. यामुळे मेंदू, फुफ्फुस, इतर अवयव आणि गर्भाशय एका पातळीवर येतात. त्यांच्याबद्दल आपल्या मनात पूर्वापार ठाण मांडून असलेला भेदभाव निवळत जातो.

हा भेदभाव दूर झाल्यावर मुलांच्या मनात त्या अवयवाबद्दल आणि एकूणच मासिक पाळीबद्दल सहज सन्मान रुजवण्याची गरज असते. मासिक पाळीची माहिती देताना समोर बसलेल्या किशोरवयीन मुलींना थेट 'तुमच्या शरीरात असे असे बदल होतात' असं सांगितलं तर मुली खाली मान घालतात. त्यांना लाज वाटते. त्यांच्यावर प्रचंड दडपण येतं.

हेही वाचाः मुलीच्या मासिक पाळीने देवाचं ब्रम्हचर्य भ्रष्ट होईल?

पण मुलामुलींना सांगणार कसं?

मुलींच्या मनातली ही भावना दूर करण्यासाठी फ्लॅशबॅक पद्धत वापरली पाहिजे. आपली आई १२ - १३ वर्षांची होती, तेव्हा तिच्या शरीरात तुम्ही येण्याची पूर्वतयारी चालू झाली होती, असं आपण सांगितल्यावर मुलामुलींना दिलासा मिळतो. ही त्यांच्या आईबाबतीत घडलेली त्यांच्या जन्माच्या आधीची कहाणी असते. साहजिकच त्या कहाणीसाठी मनात सॉफ्ट कॉर्नर तयार होतो. 

मुलांनाही मासिक पाळीची जाणीव करून दिली पाहिजे. तुम्हीही तुमच्या आईच्या पोटात पाहुणे म्हणून जाणार असता आणि तुम्ही येण्याची पूर्वतयारी आईच्या शरीरात फार पूर्वीपासून होत असते हे मुलांपर्यंत पोचवणं सोपं होतं.

गर्भाशयाच्या घराला खोल्या किती, त्याची रचना कशी, आपण कुठे राहिलो, हे समजून घ्यायला मुलंमुली उत्सुक असतात. गर्भाशयाची पोकळी, बीजांडकोष, बीजवाहक नळ्या असे अवघड शब्द मग फक्त नाव म्हणून राहतात. बीजांडकोषात अनेक अंडी असतात. आपली आई १२-१३ वर्षांची असताना एक दिवस यातलं एक अंड थोडं मोठं झालं आणि बीजांडकोषातून बाहेर येऊन बीजवाहक नळीत आलं.

सोबतच गर्भाशयाच्या पोकळीत गादी तयार होत होती. ही गादी म्हणजे रक्तवाहिन्यांचं  जाळं. चांगलं आणि बाळासाठी उपयुक्त रक्त. जेव्हा अंडं बीजवाहक नळीत येतं तेव्हा शुक्राणू योनीमार्गातून म्हणजेच बाळवाटेतून आईच्या गर्भाशयात आले आणि त्यातला एक शुक्राणू आईच्या अंड्याला जाऊन मिळाला. त्यातूनच गर्भाचा जन्म होतो, असं आपण मुलांना सांगितलं पाहिजे.

आपली आई तेव्हा लहान होती, शाळेत जात होती. त्यामुळे शुक्राणू येण्याचा काही शक्यताच नव्हती. शुक्राणू अंड्याला न मिळाल्याने आईचं अंडं आणि बाळासाठी तयार झालेली गादी हळूहळू सुटी होऊन योनीमार्गातून बाहेर येते. ही तिची पहिली मासिक पाळी. दर महिन्याला असा रक्तस्राव होतो म्हणून तिला मासिक पाळी म्हणतात. तर अशी ही आईच्या शरीरात होणारी आपल्या जन्माआधीची, जन्मासाठीची पूर्वतयारी.

मुलं भरपूर प्रश्न विचारतात. जुळं बाळ कसं होतं, किती रक्त जातं, हे एवढं चांगलं रक्त वाया जातं तर ते आपण दान का करत नाही किंवा शुक्राणू आईच्या अंड्यापर्यंत कसा जातो असं बरंच काही. मुलांच्या या सगळ्या प्रश्नांचं समाधान होईल, अशी वैज्ञानिक उत्तर आपण दिली पाहिजे. उत्तर देण्याचं किंवा मासिक पाळीचा विषय त्यांच्यापासून टाळायला, लपवून ठेवायला नको. आणि हे सगळं आपण संवादी पद्धतीने सांगायला हवं.

बरं झालं आम्हाला हे सांगितलं!

आणि महत्त्वाचं म्हणजे मुलींना जसं तिच्या शरीराबद्दल सांगतो, तसंच आपण मुलांनाही त्यांच्या शरीरात होणाऱ्या नैसर्गिक बदलांबद्दल आपण त्यांना वेळीच शास्त्रीय माहिती द्यायला हवी. हे करताना मुलींना आणि मुलांना एकत्र बसवूनच संवाद साधला पाहिजे. त्यामुळे मुलामुलींना आपल्या शरीरात होणारे हे बदल म्हणजे माझ्या एकट्यासोबतच असं काहीतरी वाईट घडतंय, असं वाटणार नाही.

यात मुलींना किंवा मुलांना कुठेही शरम वाटत नाही किंवा ते ऐकताना, त्याविषयी चर्चा करताना अवघडलेपणही येत नाही. मासिक पाळीची ही माहिती मुलामुलींना एकत्र बसवून का दिली? असा प्रश्न मुलांना विचारला पाहिजे. मुलींना वेगळं बसवून फक्त मासिक पाळीची माहिती आणि मुलांना वेगळं बसवून फक्त पुरुषांच्या बाबतीतली माहिती द्यायला हवी होती का असाही प्रश्न आम्ही शिबीरात विचारतो. यावर मुलंमुली एकसुराने नाही असं सांगतात.

'बरं झालं ही माहिती एकत्र दिली ते. मुलांनाही कळलं पाहिजे की मासिक पाळी काय असते' असं मुली सांगतात. 'आमच्या आजूबाजूला आमची आई, बहीण असते त्यांना काय होतं हे आम्हाला आज कळलं. आता आम्ही त्यांची काळजी घेऊ शकू. त्यांना मदत करू शकू.' अशी मुलांची प्रतिक्रिया असते.

हेही वाचाः मुलीच्या मासिक पाळीने देवाचं ब्रम्हचर्य भ्रष्ट होईल?

खरंच मासिक पाळी ही अडचण आहे?

या सगळ्याला महत्वाचा घटक म्हणजे मासिक पाळीबद्दलच्या गैरसमजांची चर्चा. रोजच्या बोलीत मासिक पाळीला सहसा मासिक पाळी म्हटलंच जात नाही. 'अडचण', 'प्रॉब्लेम' हे म्हटलं जातं. विशेष म्हणजे मासिक पाळीत प्रॉब्लेम काहीच नाहीये हे कळलं तरीही त्याला प्रॉब्लेमच म्हटलं जातं. 

महिला घरात भरपूर काम करत असतात. निदान मासिक पाळीत बाईला आराम मिळावा म्हणून तिला बाजूला बसवलं जातं असं बऱ्याचदा मुलांना घरी सांगितलेलं असतं. यात परंपरेचं ग्लोरिफिकेशन असतं. आपले पूर्वज कसे बरोबर होते आणि त्यांनी जे काही ठरवलंय त्यामागे त्यांचा विचार कसा बरोबर होता, हे मुलांना सांगितलेलं असतं. पण आराम मिळावा म्हणून बाजूला बसावं असं सांगण्यात काहीही पॉईंट नाही.

मुळात बाईला खरंच आरामाची गरज असते का हा प्रश्न आहे. मुली सांगतात की आमच्या पोटात दुखतं, पाय दुखतात. कंबर दुखते. पण मुलींची शारीरिक वाढ व्यवस्थित असेल, तिचं पोषण नीट झालं असेल, तिचा व्यायाम योग्य असेल तर मासिक पाळी सुरु असताना पोटात दुखण्याचं काहीच कारण नाही.

पोटात दुखतं कारण मासिक पाळीविषयी चुकीचे समज मनात घर करून असतात. त्यामुळे हे दुखणं मानसिक जास्त असतें. त्या दुखण्याचा बाऊ केला नाही तर मासिक पाळीचा बाऊ करायला आता कारणच उरणार नाही. अगदीच दुखलं तर पॅरासिटेमॉलची एक किंवा दीड गोळी घेऊन बरं वाटू शकतं. मासिक पाळीतही मुली नेहमीसारख्याच हिंडू, फिरू, काम करू शकतात.

एकमेकांच्या सन्मानाची जाणीव करून देण्याची गरज

काही मुलं सांगतात की शरीरातून जे जे बाहेर टाकलं जातं ते घाण असतं. जसं की, लघवी, विष्ठा. मुलांचं हे बोलणं तर्काला धरून आहे. पण ज्या रक्तावर गर्भ जगतो, ज्या रक्तावर तुम्ही आम्ही जगलो ते रक्त घाण, अपवित्र कसं असेल? याचा विचार मुलं करतात.

मुलांना ब्लेम केलं किंवा 'तुम्ही असा विचार करता, तुमच्या घरी असं पाळतात' असं म्हटलं की संवाद तुटतो. त्यापेक्षा मुलंमुली स्वतः चर्चा करून नवी शास्त्रीय माहिती आत्मसात करतात. आणि त्यामुळे बाईच्या शरीराबद्दलची दुय्यमत्वाची, गोपनीयतेची भावना दूर होते.

मुलांना स्वतःच्या आणि दुसऱ्याच्या सन्मानाची जाणीव करून देणं, त्यांची शरीर  स्वप्रतिमा आणि सौंदर्याची संकल्पना याविषयी बोलणंही तितकंच गरजेचं आहे. स्त्रीपुरुष समतेपासून सकस आहारापर्यंत सगळ्या गोष्टी मुलामुलींशी बोलल्या तर या सगळ्यांचा एकत्रित परिणाम स्वतःच्या शरीराशी संवाद साधण्यात होतो. स्वतःच्या शरीराशी नवं नातं निर्माण होतं.

हेही वाचाः 

राधिका सुभेदार सांगत्येय, मासिक पाळीविषयी गुप्तता नको स्वच्छता बाळगा

थायरॉइडविषयी हे समजून घ्यायला हवंच

(लेखिका या मुलामुलींमधे वयानुसार होणाऱ्या शारीरिक बदलाविषयी आरोग्य भान तयार करण्यासाठी शिबीरं घेतात.)