बाहेरून आणलेलं सामान वायरस फ्री करण्याचं साधंसोप्पं प्रॅक्टिकल

१५ एप्रिल २०२०

वाचन वेळ : ६ मिनिटं


भाजीपाला, फळं, किराणा मालाच्या पिशव्या, दुधाच्या पिशव्या अशा बाहेरून घरात आलेल्या कुठल्याही गोष्टीवर कोरोना वायरस असू शकतो. वापरण्याआधी या सगळ्या गोष्टींचं निर्जंतुकीकरण करणं गरजेचं आहे. मुंबई आयआयटीनं तर अशा निर्जंतुकीकरणासाठी एक मशीनच शोधून काढलंय. पण हे मशीन अजून बाजारात उपलब्ध नाही. त्यामुळे सध्या तरी ही साफसफाई आपल्याला घरच्या घरीच करायची आहे.

कालच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सगळा देश ३ मेपर्यंत लॉकडाऊन करण्याचा निर्णय जाहीर केला. १४ एप्रिलला संपणाऱ्या लॉकडाऊनला मुदतवाढ दिल्यामुळे आता ३ मेपर्यंत आपल्याला घरातून विनाकारण बाहेर पडायचं नाही. बाहेरच्या कुठल्याही वस्तूवर किंवा जागेवर कोरोनाचे वायरस आपली वाट बघत थांबलेले असू शकतात.

बाहेरच्या कुठल्या वस्तूला आपण हात लावला की ते आपल्या हातावर आलेच म्हणून समजा. त्यामुळे आपण घरात आहोत तेच सेफ आहे. पण पोटातल्या भूकेला लॉकडाऊन वगैरे काही समजतं का? बाहेर वायरस आहे त्यामुळे बाहेर पडून किराणामाल, भाजीपाला, फळ आणू शकत नाही, असं भूकेला सांगितलं तरी ती ऐकणारे थोडीच?

अशा परिस्थितीत घरातल्या एका माणसाला घराबाहेर पडून आवश्यक त्या सगळ्या वस्तू, औषधं आणि फळ, भाज्या वगैरे गोष्टी आणाव्याच लागतात. त्यासाठी तोंडाला मास्क लावणं घराबाहेर लोकांपासून ६ फुटांचं अंतर पाळणं, बाहेरच्या कमीतकमी गोष्टींना स्पर्श करणं, कॅशलेस व्यवहार करणं असे उपाय आपण करू शकतो. असं केलं तरच परिस्थिती गंभीर होण्यापासून आपण रोखू शकतो..

कोरोनाचा प्रादुर्भाव आधीपेक्षा जास्त वेगाने पसरतोय. आपण घरात आणलेल्या फळ, भाजीपाल्यावर, किराणामालाच्या आणि औषधांच्या वगैरे पाकीटावरही कोरोनाचे वायरस असू शकतात. त्यामुळेच बाहेरून कोणतंही सामान आणल्या आणल्या त्याचं निर्जंतुकीकरण करावं लागेल. निर्जंतुकीकरण करायचं म्हणजे त्या गोष्टीवर असणारेनसणारे वायरस नष्ट करायचे.

हेही वाचा : किराणा दुकानातून आपण कोरोनाला घरी नेण्यापासून कसं वाचू शकतो?

वायरस नष्ट करणारं मशीन

गरज हीच शोधाची जननी  आहे, असं म्हटलं जातं. बाहेरून आणलेल्या सामानाचं निर्जंतुकीकरण करायची गरज निर्माण झाली आणि आयआयटी म्हणजेच इंडियन इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजीच्या मुंबईतल्या विद्यार्थ्यांनी लगेचच निर्जंतुकीकरण करण्याचं मशीन शोधून काढलंय. युवी रेच्या माध्यमातून हे मशीन बाहेरून आणलेल्या सगळ्या वस्तू वायरस फ्री करण्याचं काम करतं.

लाईव मिंटच्या एका बातमीनुसार, एखाद्या जुन्या ट्रंकसारखं हे मशीन दिसतं. त्याच्यात डाव्या हाताला एक एलईडी लाईटसारखा दिवा असतो. बाहेरून आणलेल्या सगळ्या वस्तू, भाजीपाला, किराणा माल, दूधाची पिशवी किंवा अगदी आपलं पैशाचं पाकीट आणि पैसेसुद्धा यात ठेवून त्याचं निर्जंतुकीकरण करू शकतो. मशीन चालू करून ३० मिनिटं सगळ्या गोष्टी या मशीनमधे ठेवाव्या लागतात. ट्रंकमधल्या एलईडी लाईटमधून युवी रे सोडले जातात. त्यामुळे वस्तुंवर वायरस असेल तर तो नष्ट होतो. ३० मिनिटांनंतरही पुढची दहा मिनिटं गोष्टी ट्रंकमधेच ठेवाव्या लागतात. त्यानंतर त्या वापरता येतील.

स्वस्तात मस्त अशा या मशीनचं नाव ‘सॅनिटरी ट्रंक’ असं ठेवण्यात आलंय. हे मशीन फक्त ५०० रूपयांना उलपब्ध असेल. अगदी घरच्याघरीही आपण हे मशीन वापरून शकू. पण अजून हे मशीन बाजारात उपलब्ध झालेलं नाही. त्यामुळे निदान मशीन येत नाही तोपर्यंत तरी बाहेरून आणलेल्या गोष्टींचं निर्जंतुकीकरण कसं करायचं याचा जुगाड आपल्याला शिकून घ्यायला हवं.

हे कोरोना स्पेशलही वाचा : 

कोरोनाग्रस्त मृतदेह जाळायचा की पुरायचा?

जगाच्या तुलनेत भारत कसा लढतोय कोरोनाशी?

साथीच्या आजारात सारं जग समाजवादी वळण घेतं

एकदा बरं झाल्यानंतर पुन्हा कोरोनाचा संसर्ग होतो का?

कोरोनाचा पेशंट वेंटिलेटरवर किती काळ जिवंत राहतो?

डॉक्टरांनी घातलेला सूट म्हणजे कोरोनाविरूद्धचं चिलखतच!

कोविड-१९ आजारावर औषध नसताना पेशन्ट बरं कसं होतात?

स्वच्छतेच्या ५ पायऱ्या

बाहेरून आणलेल्या वस्तूंचं निर्जंतुकीकरण घरच्या घरीही करता येईल. त्यासाठी कुठल्याही महागड्या जंतुनाशकांची वगैरे गरज लागत नाही. तर घरी सहज उपलब्ध होऊ शकतं अशा साबणाच्या नाहीतर डेटॉलच्या पाण्यानेही ही साफसफाई करता येईल. आपल्याकडे उपलब्ध असतील तर हातात ग्लोव घालणं सगळ्यात चांगलं. पण ग्लोव्ह्स नसतील तरी काही हरकत नाही. या काही सोप्या स्टेप्स वापरून आपण सुरक्षितपणे साफसफाई करू शकतो.

१) सामान वेगळं ठेवा

हँड ग्लोव्ज असतील तरे वापरून आणलेलं सामान सुरवातीलाच पिशवीतून काढून एका बाजूला ठेवावं. हे सामान आपल्या नेहमीच्या सामानासोबतच ठेवलं तर त्यावरचे वायरस आधीच स्वच्छ असलेल्या सामानावर जातील. त्यामुळे बाहेरून आणलेलं हे सामान वेगळं ठेवावं. सामान ठेवतो ती जागाही स्वच्छ असेल तरच आपण केलेल्या साफसफाईचा उपयोग होऊ शकेल.

२) सामानाची विभागणी

सामान बाहेर काढून ठेवलं की त्याचं वर्गीकरण करावं लागेल. भाजीपाला, फळं वेगळं करावीत. प्लॅस्टिकच्या पिशवीतून आणलेले गहू, तांदूळ, डाळी, दुधाच्या पिशव्या वेगळं आणि प्लॅस्टिकच्या आवरण असलेल्या गोष्टी म्हणजे बिस्किटं, चहा पावडर, ब्रेड अशा वस्तू वेगळ्या ठेवाव्या.

३) भाज्या, फळांसाठी बेकिंग सोडा

बाहेरून आणलेल्या सगळ्या भाज्या आणि फळं आपण एरवीही धुवून घेतोच. पण या लॉकडाऊनच्या काळात नुसतं पाण्याने धुवून भागणार नाही. तर आपल्या नेहमीच्या पाण्यात बेकिंग सोडा म्हणजे खायचा सोडा टाकावा आणि त्या पाण्याने भाज्या आणि फळं धुवावी. बेकिंग सोडा म्हणजे केक, ढोकळा अशा खाण्याच्या पदार्थांत खालतो तो सोडा. या पाण्यानं भाज्या, फळं धुवून झाली की ती उरलेल्या सामानापासून लांब एखाद्या स्वच्छ ठिकाणी किंवा सरळ फ्रीजमधे ठेवली की आपलं काम झालं!

४) खाण्याच्या पदार्थात कोरोना नसतो

न्यू इंग्लंड जनरल ऑफ मेडिसिन या मासिकात छापून आलेल्या एका संशोधनानुसार प्लॅस्टिक आणि स्टेनलेस स्टील सारख्या मटेरिअलवर कोरोना वायरस ७२ तासांपर्यंत जिवंत राहतो. तर कार्डबोर्डपासून बनलेल्या गोष्टींवर २४ तास असू शकतो. पण खाण्याच्या पदार्थांच्या वर किंवा त्या पदार्थांमधे हा वायरस असत नाही. शिवाय, स्वयंपाक करताना आपण शक्यतो सगळेच पदार्थ शिजवतो. त्यामुळे खाण्याच्या पदार्थांवर वायरस असलाच तरी उष्णतेमुळे तो नष्ट होऊन जाईल. म्हणजे वायरस चांगला फ्राय होईल.

म्हणूनच प्लॅस्टिकच्या किंवा कागदाच्या पिशवीतून आणलेलं धान्य, कडधान्य, साखर सारख्या किराणा मालाच्या गोष्टी एखाद्या स्वच्छ डब्यात काढून ठेवल्या आणि त्यांची वेष्टन फेकून दिली तरी चालण्यासारखं आहे. पिशवीतलं दूधही एका स्वच्छ पातेल्यात काढून पिशवी फेकून द्यावी लागेल. पण त्याआधी आपण एक गोष्ट केली पाहिजे. हातला साबण किंवा हँड वॉश लिक्विड लावावं. आणि त्याचं हातानं दुधाची पिशवी धुऊन घ्यावी. मग पिशवीतून दुध काढून ते वापरायला घेता येईल. हीच गोष्ट आपण प्लॅस्किटबंद दुसऱ्या वस्तुंसाठीही करू शकतो.

५) टिश्यू पेपरनं पुसा

बाजारातून आणलेली बिस्किटं, ब्रेड यांच्यासारख्या पदार्थांवर वायरस असण्याचा मोठा धोका आहे. शिवाय, या वस्तू बाहेर काढून ठेवणं थोडं अवघड असतं. अशावेळी साबणाच्या किंवा डेटॉलच्या पाण्यात एक स्वच्छ रूमाल बुडवून त्या रूमालाने किंवा टिश्यूपेपरने या सगळ्या गोष्टींची वेष्टन, पॅकिंग पुसून घेता येऊ शकेल. त्याने त्या वस्तूंवर कोरोनाशिवाय इतर कुठलाही वायरस असेल तरी तो मरून जाईल आणि आपल्याला सुरक्षितपणे गोष्टी वापरता येतील.

एकाच टिश्यूने सगळ्या गोष्टी पुसता येणार नाहीत. त्यासाठी दोन तीन टिश्यूही लागतील. टिश्यू बदलताना वापरून झालेला टिश्यू स्वच्छ केलेल्या सामानात ठेवला जाणार नाही ना याचीही काळजी घ्यावी लागेल. सगळी साफसफाई झाल्यावर वापरलेले सगळे टिश्यू फेकून द्यावेत.

हेही वाचा :  अमेरिकेला हवं असणारं औषधं भारतात कसं आलं, त्याची गोष्ट

ग्लोव्ज घातला तरी हात धुणं गरजेचं

ही सगळी साफसफाई करताना एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवावी लागेल. निर्जंतुकीकरण केलेलं आणि न केलेलं सामान वेगवेगळं ठेवणं. वस्तू डेटॉलच्या पाण्याने पुसल्यावर किंवा भाज्या धुतल्यावर पुन्हा आधीच्याच सामानासोबत ठेवलं तर आपल्या साफसफाईचा काहीही उपयोग होणार नाही. शिवाय, ओट्यावर किंवा जमिनीवर हे सामान ठेवण्याआधी त्या जागेचीही आपल्याला सफाई करून घ्यावी लागेल. इतकंच नाही तर बाहेरून आणलेलं सगळं सामान नीट धुवून, पुसून जागेवर ठेवलं की पुन्हा त्या जागेची सफाई करायला हवी.

शिवाय, सगळी सफाई झाल्यावर आपण ग्लोव्ज घातले असतील तर ते ग्लोव्ज फेकून द्यावे लागतील. ग्लोव्ज काढण्यासाठीही विशिष्ट पद्धत वापरावी लागते. ग्लोव्ज घालून स्वच्छता केली असेल तर त्या वस्तूंवरचा वायरस ग्लोव्जवर असण्याची शक्यता असेल. त्यामुळे ग्लोव्जच्या तळहाताला धरून ग्लोव्ज काढून चालणार नाही. तर एका ग्लोव्जमधे दुसरा हात घालून तो उलटा करावा लागेल. म्हणजे ग्लोव्जची वायरस असलेली बाजु आतल्या बाजुला जाईल आणि हाताच्या बाजुला असलेली स्वच्छ बाजू वर येईल. थोडक्यात, ग्लोव्ज काढताना त्याच्या तळहाताच्या बाजुला स्पर्श होणार नाही याची काळजी घ्यायला हवी. आणि वापरून झालेले हे ग्लोव्ज फेकून द्यावे लागतील.

एवढी सगळी काळजी घेऊनही सगळी स्वच्छता झाल्यावर पुन्हा एकदा साबणाने आपले हात धुवायची गरज आहे. त्यानंतरच आपल्या नाकाला, डोळ्यांना किंवा घरातल्या इतर गोष्टींना हात लावणं योग्य ठरेल. आपण ग्लोव्ज घालून स्वच्छता केली असेल तरीही सुरक्षा म्हणून हात धुवावाच लागेल.

हेही वाचा : जगाचा बिझनेस कोमात, डीमार्ट जोमात, F.Y.B.Com ड्रॉपआऊट काकांची सक्सेस स्टोरी

वस्तुंपेक्षा माणसांचा धोका

कोरोनापासून सुरक्षित रहायचं असेल तर प्रत्येकवेळी सामान आणल्यावर आपल्याला वर सांगितली ती सारी कसरत करावीच लागेल. आपण दर दोन तीन दिवसांनी सामान आणायला बाहेर जात असू तर दर दोन तीन दिवसांनी या सगळ्या साफसफाईत आपल्याला दोन तास घालवावे लागतील. यापेक्षा एकदाच बाहेर जाऊन महिन्याचं किंवा एक दोन आठवड्यांचं सामान आणणं कधीही शहाणपणाचं ठरेल. कारण तुम्ही जेवढ्यांदा घराबाहेर पडला तेवढ्यावेळी आ बैल मुझे मारसारखं आ वायरस मुझे मार असं म्हटल्यासारखं होईल.

शिवाय, कोरोनाची लागण होण्याची भीती किराणा दुकानातून आणलेल्या गोष्टी किंवा भाजीपाल्यापेक्षा दुकानात किंवा बाजारात गेल्यावर तिथं असणाऱ्या लोकांपासून असते. 'कोरोनाचे वायरस असलेल्या गोष्टींपासून किंवा इन्फेक्टेड जागांपासून कोरोनाचं संक्रमण व्हायची शक्यता असतेच. पण आत्तापर्यंत समोर आलेल्या अभ्यासातून या गोष्टींपेक्षा कोरोनाची लागण झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आल्यानं बहुतांश लोकांना कोरोना झाल्याचं समोर आलंय.' असं कोलंबिया युनिवर्सिटीतल्या साथरोगतज्ञ एंजेला रासमुसेन यांनी अमेरिकेतल्या नॅशनल पब्लिक रेडियोला सांगितलंय. त्यामुळे दुकानात गेल्यावर प्रत्येक माणसापासून ६ फूट लांब अंतर राखणं आपल्या सगळ्यांच्याच फायद्याचं आहे.

हेही वाचा : 

अब आया वाधवान सातारा के पहाड के नीचे

कोरोनाचं युद्ध लढणाऱ्या आणि जिंकणाऱ्या महिला लीडर

डॉक्टरांनी घातलेला सूट म्हणजे कोरोनाविरूद्धचं चिलखतच!

तू देवमाणूस आहेस, की खराखुरा देवच, एका कोरोना योद्ध्याला पत्र

कोरोना रोखण्यासाठी डिग्लोबलाइज होणं ही तर आपली घोडचूक ठरेल

प्लेगची साथ रोखण्यासाठी गांधीजींनी उभारलेल्या जुगाड हॉस्पिटलची गोष्ट