राहुल गांधींनी यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात स्वतःच नरेटीव उभं केलं. त्यामुळे भाजप समर्थकांची खूप गोची झाली. काँग्रेस समर्थक भाजपवाल्यांना चौकीदार चोर है म्हणून चिडवत होते. यावर मोदी समर्थकांकडे काही उत्तरच नव्हतं. मात्र आता मोदींनी आपल्या समर्थकांना मैं भी चौकीदार म्हणायला लावत ही कोंडी फोडलीय. याचा विरोधक कसा सामना करणार?
परवा ३१ मार्चला नरेंद्र मोदींनी मैं भी चौकीदार या कार्यक्रमांतर्गत देशभरच्या लोकांशी संवाद साधला. त्या गप्पा कम भाषणामधे त्यांनी ऑलमोस्ट सगळ्या मुद्द्यांना स्पर्श केला. त्याच दिवशी मुंबईत अल्ट्रा लक्झरी कारची रॅली निघाली. ज्यात बसलेले अतिउच्चभ्रू लोक मैं भी चौकीदार असं म्हणत होते. त्यांची खूप चर्चा झाली. डिजिटल मीडियावरही जोक असतील किंवा मिम, हा विषय चर्चेत आहे हे नक्की.
यानिमिताने मोदींच्या या कॅम्पेनला थोडं सविस्तर समजून घेतलं पाहिजे. खरंतर राहुल गांधींच्या चौकीदार चोर हैला उत्तर म्हणून मोदींसाठी ही कॅम्पेन लाँच करण्यात आली. गेल्या काही वर्षात पहिल्यांदाच दुसऱ्याने अजेंडा सेट केला आणि त्याला मोदींना उत्तर द्यावं लागलं ते कॅम्पेन म्हणजे चौकीदार चोर है. पण आता या उत्तरातून मोदींनी एका दगडात अनेक पक्षी मारलेत, असं म्हणायला हरकत नाही.
हेही वाचाः राहुल गांधी ७२ हजारांत गरिबीवर वार कसा करणार?
पहिलं म्हणजे, चोर हैच्या नरेटीवला स्वतःच पॅरलल नरेटीव उभं केलं. आजवर काँग्रेस समर्थक, भाजपवाल्यांना चौकीदार चोर है म्हणून चिडवत होते. तेव्हा मोदी समर्थकांकडे काही उत्तरच नव्हतं. सोशल मीडियावर तर ही कंडिशन सगळ्यात वाईट असते. आज मात्र मोदी समर्थकांना उत्तर द्यायला मिळालंय. यामुळे अर्थातच पहिल्या कॅम्पेनचा परिणाम कमी होतो.
परवाचं मोदींचं भाषण बघितलं तर असं लक्षात येईल की जे जे चांगलं, त्याचा सांभाळ करणारा म्हणजे चौकीदार अशा अर्थाची मांडणी त्यांनी केली. त्यामुळे चौकीदार हा शब्द सर्वसमावेशक तर बनलाच. पण उद्या कोणताही मुद्दा, कोणतेही कॅम्पेन ते या कॅम्पेनला कनेक्ट करू शकतात. या लोकसभेत स्थानिक, राज्यवाईज वेगवेगळे मुद्दे आहेत आणि ते त्या त्या राज्यात चालवावे लागणार आहेत. पण त्या सगळ्याला अंबरेला थॉट म्हणून हा विचार त्यांना देता आला. ज्याने कोणी हा प्रचार डिझाईन केलाय त्याचं हे मोठं यश आहे, असं म्हणावं लागेल.
या पोझिशनिंगमुळे विरोधकांची एक वेगळीच गोची करण्यात ते यशस्वी झालेत. बहुतांशी भारतीय हे दुटप्पी वागत असतात. आपण श्रमप्रतिष्ठा, समानता आदी तत्वं मानत असलो आणि स्वीकारत असलो तरी प्रत्यक्षात मात्र आपण उच्चनीच भेदभाव करत असतोच. सो, चौकीदार म्हणजे खालच्या दर्जाचं काम अशी टीका करायला लागल्यावर हा दुटप्पीपणा उघडा पडतो आणि मग विरोधी पक्ष ही मूल्यं मानत नाहीत का? असा प्रश्न पडतो.
हेही वाचाः राजकारणातल्यापेक्षाही इतिहासातली चौकीदारी जास्त इंटरेस्टिंग
त्यामुळे हे कॅम्पेन लाँच झाल्या झाल्या चौकीदार किती खालच्या दर्जाचं काम आहे, आणि पंतप्रधान स्वतःची हलक्या दर्जाशी तुलना करून घेतोय अशी टीका करायचा प्रयत्न झाला. पण तो फारसा तग धरू शकला नाही. कारण त्यातून दिसणारा ढोंगीपणा. चायवाला असो, पकोडेवाला असो की चौकीदार. प्रत्येकवेळी मोदींनी या ढोंगीपणाला टार्गेट केलेलं दिसतं.
याचाच परिणाम असा झाला, की आज आयटी इंजिनिअर्स, वेगवेगळ्या कंपन्यांचे सीईओ यांनी ट्विटरवर स्वतःच्या नावामागे चौकीदार हा शब्द लावलाय. जर का त्यांना ही पदवी खालच्या दर्जाची वाटत असेल तर त्यांनी स्वतःला चौकीदार का म्हटलं असतं?
यातच दडलेले अजून एक लॉजिक असं की आजची तरुणाई ही फ्युडल मेंटलिटीतून बाहेर आलीय, यायला बघत आहे. त्यामुळे त्यांना अशा समानतेचं, श्रम प्रतिष्ठेचं कौतुक वाटतं. त्यांच्या स्वतःच्या कंपनीत जेव्हा सोडेक्सोने नेमलेले सफाई कामगार किंवा बीवीजीने नेमलेले चौकीदार आणि त्यांचा सीईओ एकाच कँटीनमधे एकसारखंच जेवण घेत असतात, तेव्हा त्यांनी ही समानता बघितलेली असते. तिथे त्यांना मोदी रिलेट होतो. मोदीला तरुण मत देतात ते याचसाठी.
याचंच अजून एक उदाहरण म्हणजे जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात मोदींनी सफाई कर्मचाऱ्याचे पाय धुतले. ते खूप नाटकी होतं. प्रचारासाठी केले होते हे लोकांना कळतंच. पण तरीही ते लोकांना भावतं. कारण सत्तेसाठी का होईना, कोणी जवळपास ५ मिनिटं सफाई कर्मचाऱ्यांचे पाय धुवेल का? समजा तुम्हाला मी असं सांगितलं की जर का तुम्हाला प्रमोशन, प्रॉफिट किंवा त्या स्वरुपाच्या काही लाभासाठी तुमच्या सोसायटीत येणाऱ्या सफाई कामगारांचे पाय धुवा. तर तुम्ही धुवाल का?
हेही वाचाः चौकीदार ऑल इज वेल
आपल्यातले बरेचसे लोक माघारी फिरतील, का कु करतील. फारच गरज असेल तर नाईलाजाने सेकंदभर पायावर पाणी ओतल्यासारखं करतील. जर का आपल्यासारखे लोक असं काही करायला मनापासून तयार नसतील तर अशावेळी साक्षात पंतप्रधान अशी एखादी गोष्ट करतो याचं अप्रुप आमच्यासारख्या मध्यमवर्गाला का असणार नाही? पुन्हा इथे बेसिक मुल्यं, तत्वं वगैरेंचं रक्षण होतंच. आपल्यातला दुटप्पीपणा इतक्या स्मार्टपणे दुसऱ्या कोणी वापरला असेल असं वाटत नाही.
आता प्रश्न पडतो की या कॅम्पेनला राहुल गांधी पॅरलल नरेटीव काय उभं करणार? या सगळ्यात चौकीदार चोर है फारच माग पडलंय. कारण आता चोर है म्हणणं याचा अर्थ फक्त मोदींना नाही तर स्वतःच्या मागे चौकीदार लावणाऱ्या सगळ्यांना चोर है म्हणणं असा होतो. आणि यात काही राजकीय नेते, कार्यकर्ते सोडले तर कॉमन मॅनसुद्धा आहे.
उद्या जर का मला कोणी चोर म्हटलं तर मी त्याला मत का देईन? त्यामुळे आपोआपच ही लाईन मागं पडते. कारण एखादा भाजपवर नाराज असणारा मतदार नोटा दाबेल पण त्याला चोर म्हटलंय म्हणून काँग्रेसकडे जाणार नाही.
हेही वाचाः गुजरात भेटीनंतर राज उतरणीला लागले, तेच उद्धव यांचं होणार?
मग आता राहुल गांधींनी काय लाईन आणली पाहिजे किंवा आणलीय? असं नरेटीव आणायची उत्तम संधी त्यांना १५ दिवसांपूर्वी मिळाली होती. चेन्नई इथं एका कॉलेजमधल्या कार्यक्रमात त्यांनी स्वत:ला ‘कॉल मी राहुल’ असं सांगितलं होतं आणि त्यावर जिने प्रश्न विचारला ती तरुणी लाजली तर बाकी जणींनी जल्लोष केला. हा विडीओ प्रचंड व्हायरल झाला. मला स्वतःला ती एक फार मोठी संधी वाटली होती.
पत्रकार सुनील तांबे यांनी मधे एका कार्यक्रमात असं म्हटलं होतं की राहुल गांधी स्वतःची प्रतिमा मेट्रो सेक्शुअल अर्थात शहरी तरुणाईला आवडेल, रुचेल अशी बनवायचा प्रयत्न करताहेत. तो विडियो हा या प्रतिमा निर्मितीचा बेस्ट अवतार होता. कारण कोणत्याही मोठ्या कंपनीत, एमएनसीत आणि शहरी वातावरणात आजकाल वय, पद यांचा विचार न करता एकमेकांना नावाने हाक मारली जाते आणि या गोष्टींची क्रेझ गावोगावी असणाऱ्या मुलांना त्यांच्या शहरातल्या मित्रांमुळे, मोबाईलवर सीट कॉम आणि वेब चॅनेल पाहिल्यामुळे नक्कीच आहे. याचं उत्तम कॅम्पेन नक्कीच झालं असतं.
पण हाय रे दुर्दैव. तो विडीओ आला तसा वाहून गेला. हा विडीओ विरून जायची जी कारणं आहेत तीच मोदी आणि गांधी यातला फरक दाखवतात. पहिलं म्हणजे केडर. मोदींनी चौकीदार असा ट्रेंड ठरवला की त्यांच्या गावपातळीच्या सरपंचापासून ते केंद्रीय मंत्र्यापर्यंत सगळे चौकीदार हा शब्द वापरू लागतात. त्यामुळे, ज्या झपाट्याने मेसेज तळागाळात पोचतो ती ताकद आज काँग्रेसमधे नाही असं दुर्दैवाने म्हणावं वाटतं.
हेही वाचाः वर्ध्याच्या सभेत नरेंद्र मोदी शरद पवारांवर का घसरले?
मला स्वतःला खरंच वेगवेगळ्या कॉलेजमधे तिथले स्थानिक नेते तरुणाशी संवाद साधताहेत, त्यांचे प्रश्न अंगावर घेत आहेत, जीन्स आणि फॉर्मल कुडता घालून तरुणाईशी बोलताहेत असं चित्र बघावंसं वाटलं असतं. आणि याने तरुणाईचे मत थोडं तरी बदललं असतं. पण खरंच काँग्रेसच्या सर्व नेत्यानी हे केलं असतं? एकेरी उल्लेख जाऊ दे, पण साहेबवरून निदान सरला आले असते का सगळे? माझा हा प्रश्न आता तरी अनुत्तरीत आहे.
एकुणातच आता काँग्रेसकडे त्यांचा सर्व मुद्द्यांना सामावून घेईल असं अंब्रेला कॅम्पेन नाही. आणि याचाच फटका त्यांना बसताना दिसतोय. 'न्याय' चा मुद्दा मोदींच्या एका लाईव जाण्याने मागे पडला. आता मग २२ लाख जॉब्सची घोषणा आली. पण त्यात त्यांचाच दोन दिवसांपूर्वी काढलेला स्टार्ट अपला एंजल टॅक्स नाही हा मुद्दा मागे पडला. एकच सेट नरेटीव नसल्याने त्यांचाच एक मुद्दा त्यांच्याच दुसऱ्या मुद्द्याची जागा खातोय. खरंतर या सगळ्या मुद्द्यांना एकत्र बांधणारं काहीतरी राहुल गांधींनी आणायला हवं असं मनोमन वाटतं.
कारण यामुळे झालंय असं की एकाच इलेक्शनसाठी दोन वेगवेगळी कॅम्पेन सुरू आहेत. मोदी राष्ट्रवाद, भ्रष्ट्राचार या मुद्यावर लढताहेत तर राहुल गांधी जॉब्स, शेती असे मुद्दे आणायचा प्रयत्न करताहेत. मोदींच्या मुद्यावर गांधी बोलत नाहीत आणि गांधींचे मुद्दे वातावरणात फार काळ राहत नसल्याने मोदीना ते अवॉईड करणं सोपं जातंय.
हेही वाचाः भाषणांचा सुकाळ, भीषण दुष्काळ
असं होणं खरंतर लोकशाहीच्या दृष्टीने योग्य नाही. कारण, निवडणूक म्हणजे दोन्ही बाजूंनी जनतेच्या महत्वाच्या मुद्यावर बोलून मग त्यातला बेस्ट निवडणं. पण तसं काही होत नाहीये. पण त्याहून जास्त नुकसान हे काँग्रेस पक्षाचं आहे. कारण जर का शेती, सहिष्णुता, नोटबंदी या मुद्द्यावर खरंच लोकांच्या मनात चीड असेल तर ते सर्व लोक एव्हाना राहुल गांधींच्या बाजूला यायला हवे होते.
कोणीतरी असं म्हटलंय की नेता लाट तयार करत नाही तर जनता ती तयार करते आणि नेता त्यावर स्वार होतो. जर का देशात मोदीविरोधी अंडरकरंट असेलच तर त्यावर स्वार होण्याची सुवर्णसंधी आता राहुल गांधी घालवताहेत का असा प्रश्न एक सामान्य नागरिक म्हणून पडलाय.
हेही वाचाः
(लेखक हे आयटी तज्ज्ञ, उद्योजक आहेत.)