अडचणीच्या काळात म्युच्युअल फंड प्लॅन थांबवायचा की कर्ज काढायचं?

०८ जानेवारी २०२०

वाचन वेळ : ३ मिनिटं


गेल्या काही वर्षांमधे म्युच्युअल फंडमधल्या गुंतवणुकीला चांगले दिवस आलेत. म्युच्युअल फंडमधली गुंतवणूक वाढली असली तरी याबद्दल सर्वसामान्य गुतंवणुकदारांमधे अजून पुरेशी माहिती नाही. अडचणीच्या काळात म्युच्युअल फंडातल्या गुंतवणुकीचं काय करायचं हा प्रश्न सर्वसामान्यांना सतावत असतो.

अडचणीच्या काळात इक्विटी म्युच्युअल फंडमधील रक्कम काढणं किंवा सिस्टिमॅटिक इन्वेस्टमेंट प्लॅन थांबवण्याचा निर्णय घेण्याऐवजी म्युच्युअल फंडच्या युनिटच्या बदल्यात कर्ज घेणं हा उत्तम निर्णय ठरू शकतो. या कृतीचा आपल्याला कसा फायदा आहे आणि त्यासाठी कसा अर्ज करावा लागेल, त्याचबरोबर त्याची फेड न केल्यास काय होऊ शकते, हे जाणून घेऊ.

कर्ज घेणं फायद्याचं

अनेक गुंतवणूकदारांना तीन महिने किंवा सहा महिन्यांच्या कर्जाची गरज भासते. यासाठी आपण इक्विटी म्युच्युअल फंडमधली रक्कम काढतो किंवा एसआयपी थांबवून ती संपूर्ण रक्कम काढून घेण्याचा निर्णय घेतो. मात्र, त्याऐवजी म्युच्युअल फंडच्या युनिटच्या बदल्यात कर्ज घेण्याचा पर्याय हा फायदेशीर ठरू शकतो.

म्युच्युअल फंडच्या युनिटवर कर्ज घेताना आपल्याला युनिटस् विकण्याची गरज भासणार नाही. याचाच अर्थ असा की, आपल्या फायनान्शिअल योजनांवर कोणताही परिणाम होत नाही. यात कराची कोणतीही अडचण येत नाही आणि फंडचे युनिट गहाण ठेवल्याने त्याच्या मालकी हक्कावर परिणाम होत नाही.

म्युच्युअल फंडच्या मोबदल्यात मिळणार्‍या कर्जाने पैशाची निकड तातडीने भागवली जाते. कमी कालावधीसाठी पैशाची गरज भागवणे आणि दुसर्‍या कर्जाच्या तुलनेत कमी कालावधीच्या ओव्हरड्राफ्टप्रमाणे या पर्यायाचा वापर करता येतो. या आधारावर वापराअभावी पडून असलेल्या म्युच्युअल फंडच्या गुंतवणुकीचा लाभ घेता येतो. 

हेही वाचाः एनआरसी, सीएएः माणूस महत्त्वाचा की माणसानं तयार केलेल्या संस्था?

कर्जाचं मूल्य किती?

आपण म्युच्युअल फंडच्या युनिटला कर्जासाठी बँक किंवा नॉन बँकिंग फायनान्स कंपनी अर्थातएनबीएफसीकडे गहाण ठेवू शकता. आपण जेवढं कर्ज घेऊ, त्यावर व्याज भरावं लागतं. साधारणपणे व्याजदर साडेदहा ते बारा टक्के राहतो. जोपर्यंत युनिट बँकेकडे गहाण आहेत, तोपर्यंत त्याची विक्री करू शकत नाही.

या आधारावर भरण्यात येणारा व्याजदर हा लिक्विड फंड किंवा डेट निगडित फंडच्या उत्पन्नापेक्षा अधिक राहतो. त्यामुळे कर्ज घेताना इक्विटी निगडित म्युच्युअल फंडचे युनिट गहाण ठेवणे फायद्याचे ठरू शकते. 

अर्ज कसा करावा?

काही ऑनलाईन पोर्टल आपल्याला कर्जाचे प्री अप्रव्यूल देण्याची सुविधा प्रदान करतात. आपल्याकडे म्युच्युअल फंड डिमॅटच्या स्वरूपात असतील तर हे काम आणखी सोपं होतं. अर्थात हे युनिट फिजिकल फॉर्ममधे असेल तर कर्ज घेण्याच्या प्रक्रियेला विलंब लागू शकतो. यात अगोदर आपल्याला कर्जदात्याशी करार करावा लागेल. त्यानंतर तो म्युच्युअल फंड रजिस्ट्रारकडे युनिटची मागणी करेल.

कर्जदाराच्या मागणीनुसार आणि नियमानुसार निश्‍चित युनिट फ्रिज केले जातील. साधारणपणे कोणताही फायनान्सर गहाण ठेवलेल्या युनिटच्या मूल्यांच्या तुलनेत 60 ते 70 टक्के कर्ज मंजूर केले जाते. 

म्युच्युअल फंडचे युनिट कधी गहाण ठेवता येणार नाही. कर्ज फेडल्यानंतर फायनान्सर हा फंड हाऊसला पत्र लिहून फंड मुक्‍त करण्याचे निर्देश देईल. तत्पूर्वी काही प्रमाणात कर्ज फेड झाल्यानंतर फायनान्सरदेखील यासंदर्भात काही प्रमाणात निर्बंध हटवण्याची मागणी करेल. कालांतराने संपूर्ण युनिट हे मुक्‍त होतील.

हेही वाचाः 

एफडी : रिस्क फ्री गुंतवणुकीचा बेस्ट पर्याय

अचूक गुंतवणुकीतून महागाईवर मात कशी करायची?

म्युच्युअल फंडमधली एसआयपी गुंतवणूक थांबवण्याची वेळ आलीय का?

दिल्ली निवडणूकः नरेंद्र मोदी नाही तर केजरीवालांभोवती फिरणार प्रचार

नव्या वर्षात घराची सजावट करण्याआधी कलर ऑफ द इअर माहीत हवा

(साभार दैनिक पुढारी)