बायका आंदोलक बनून रस्त्यावर उतरतात, त्याचा अर्थ पुरुष कसा लावणार?

१४ मार्च २०२०

वाचन वेळ : ८ मिनिटं


राजकीय जाणीव प्रगल्भ असेल तर त्या घरादारातल्या पुरुषसत्तेला बायका प्रश्न विचारू शकतात. भारतभर झालेल्या आंदोलनांतल्या, अन्यायाविरुद्ध आवाज उठवणाऱ्या पत्रकारितेतल्या महिला जशा बोलताहेत त्यातून ते दिसून येतं. ही बदललेली भाषा पुरुषांनी लक्षात घेतली पाहिजे, अशी भूमिका मांडणारा ज्येष्ठ स्त्रीवादी कार्यकर्त्या आणि लेखिका वंदना भागवत यांनी मुक्त शब्द मासिकात लिहिलेल्या संपादकीयाचा अंश इथे देत आहोत.

६ फेब्रुवारी २०२० ला दिल्लीतल्या गार्गी वूमन्स कॉलेजमधल्या विद्यार्थिनींशी जाहीरपणे अश्लील वर्तन आणि हस्तमैथुन करणारी पुरुषांची झुंड ही सध्याच्या राजकारणाने चेतवलेल्या ‘पुरुषत्वा’चा आणखी एक परिणाम. सभ्यता, सामाजिक संकेत आणि स्त्री-पुरुष नात्याला हीन गर्तेत नेण्याची मानसिकता पुरुषसत्ताक राजकारणाची निष्पत्ती आहे हे उघडच आहे.

आणि बायका स्वतःचा तिरस्कार करू लागतात

एक सतत उत्तेजित असणारं आणि त्यासाठी अगतिक शरीर शोधणारं पुरुषत्व निर्माण करणं हा आजच्या सत्ताधारी नेत्यांचा कार्यक्रम बनलेला दिसतो. त्यातून बायकाही स्वतःचा तिरस्कार करायला शिकतात. गुजरातमधे ६८ मुलींना त्यांची पाळी सुरू आहे की नाही हे तपासण्यासाठी कॉलेज प्रशासनाने त्यांची अंतर्वस्त्रं काढायला लावली हा त्याचाच नमुना.

मुलींच्या वसतिगृहाचा नियम पाळी सुरू असलेल्या मुलींनी स्वयंपाकघरात न येण्याचा. त्यासाठी वसतिगृहाच्या अधीक्षक अंजलीबेन यांनी प्राचार्यांच्या परवानगीने हा उद्योग केला. स्वतःच्या शरीरधर्माबद्दल इतकी शरम आणि त्यातून निर्माण होणारी हिंस्रता हा बायकांना दहशत बसवण्याच्या कामाचाच भाग आहे. अशी भूमिका घेणाऱ्यांच्या पाठीशी समर्थकांचा ताफा आहे आणि समर्थकांना उन्मत्त भाषा वापरायची मुभा आहे.

हिंसक कृतींना उत्तेजना मिळतेय. मग त्या इंटरनेटवरच्या असोत किंवा प्रत्यक्षातल्या. जोडीनं महिलांवर भीषण अत्याचार होऊन त्यांना संपवण्याचे प्रसंग वाढताना दिसताहेत. कठुआ, उन्नाव, हैदराबाद, सिल्लोड, हिंगणघाट, दिल्ली इथल्या घटना गेल्या काही महिन्यांत महिलांविरुद्धच्या वाढत्या हिंसाचाराची कमान दाखवणाऱ्या आहेत. राजकारणाची भाषा अशाचप्रकारे आक्रमकता चेतवत राहिली तर महिलांचे प्रश्न अधिक बिकट बनतीलच पण त्याचबरोबर पुरुषांचेही बनतील.

हेही वाचा : ‘थप्पड’च्या आरशात दिसणारा पुरुष आपण पाहिलाय का?

ताराबाई शिंदेंपासून सुरूय पुरुषसत्ताक हिंसेची चिकित्सा

ताराबाई शिंदेंपासून भारतातील स्त्रीवाद पुरुषसत्ताक हिंसेची चिकित्सा करतोय. त्याला ८०च्या दशकात जात आणि वर्गनिहाय हिंसेच्या चिकित्सेचे परिमाण मिळाले. मुख्यप्रवाही स्त्रीवाद हा प्रामुख्याने उच्च जातीतील महिलांनी मांडलेला असल्यामुळे पुरुषसत्ताक व्यवस्थेतील जातीयवादी हिंसेचे नीट आकलन त्यांना झालेलं नाही असं म्हटलं गेलं. ते खरंही होते.

खैरलांजीत झालेल्या जातिवादी हिंसेचं स्वरूप तत्कालीन स्त्रीमुक्तीवाल्यांना नीट उमगलं नव्हते. त्या आकलनातून स्त्रीवादी चिकित्सा दोन पावलं पुढे गेली. ब्राह्मणेतर, बहुजन, दलित स्त्रीवादाची वेगळी चर्चाविश्वं तयार होऊ लागली. त्यात केवळ महिलाच नाहीत तर वंचित आणि दलित पुरुषांवरही होणारा अत्याचार लक्षात घेणं आवश्यक आहे हे मांडलं गेलं. त्या अर्थाने स्त्रीवादाला व्यवस्थात्मक हिंसा लक्षात घ्यावी लागली. आज त्याचं महत्त्व सिद्ध होतंय.

शासनव्यवस्था मान्य केली तरी ती कोणत्या मूल्यांवर उभी आहे आणि तिचे आर्थिक वाटण्यांचे निकष काय आहेत यावर तिची भाषा ठरते. त्या दृष्टीने २०१४च्या निवडणुकीतलं भाजपचं यश हा भाषिक सांधा बदलणारी घटना होती. त्यांनी जातिनिहाय विभागल्या गेलेल्या सामूहिकतेला हिंदू राष्ट्रवादाच्या कवेत घेऊन नवीन भारत उभारणीचं स्वप्न दाखवलं. ते धर्मावर आधारित असल्याचं भय तेव्हा वाटलं होतं. पण तोवर आपण मानून चाललेल्या एकसंध राष्ट्रवादातील स्वातंत्र्य चळवळींच्या कथनांच्या आणि त्याला आव्हान देणाऱ्या विद्रोही कथनांच्या पुढे काय? हा प्रश्न जागतिकीकरण स्वीकारल्यानंतर कळीचा ठरला.

२०१९ मधे उलगडला जागतिकीकरणाचा अर्थ

जागतिकीकरण स्वीकारणं अपरिहार्य होतं. पण त्याचा अर्थ नीटपणे उलगडायला २०१९चं सत्तांतर व्हावं लागलं. जागतिकीकरण म्हणजे उच्च तंत्रज्ञान हासिल करून जागतिक उद्योगधंद्यांत सामील होणं असं आपण मानलं. गांधी असते तर त्यांनी त्याच्यापुढे अनेक प्रश्नचिन्हं उभी केली असती. जी आज नव्याने स्पष्ट होत आहेत. जागतिक उद्योगधंदे भारतात मुक्तपणे वावरल्यावर बेरोजगारी दूर होण्यास मदत होईल आणि जागतिक ज्ञान-कौशल्यं हाती येतील एवढय़ाच मर्यादेत ते राहाणार नाही तर त्या उद्योगधंद्यांनी अंगीकारलेली मूल्यं आपण आत्मसात करणार का? हेही ठरवावं लागेल असं त्यांनी सांगितलं असतं.

जागतिकीकरणाने उभ्या केलेल्या निवडक विकास आणि नफाकेंद्रित खासगीकरण या प्रारूपाचं पर्यवसान राजकारणाची भाषा बदलण्यात झालं. अगदी शिक्षणव्यवस्थादेखील ग्राहक विद्यार्थ्यांना शिक्षण नावाची वस्तू विकण्याचे मॉल्स झाले. उलथापालथी सुरू झाल्या. सांस्कृतिक भाषाही बदलली.

पण मॅकडोनल्ड्सा, डॉमिनो पिझ्झा, मॉल्स ही फक्त चिन्हं होती. त्यामागची अर्थव्यवस्था जबरदस्त आक्रमक होती. त्याच्यासमोर नुसते प्राचीन काळात हत्तीचे डोके माणसाच्या धडावर बसवणारी सांस्कृतिक मिथके पुरणार नव्हती. त्या आक्रमणाला तोंड द्यायचे तर सुस्पष्ट राष्ट्रीय उद्दिष्टे आणि व्यापक निर्धार लागला असता. ते तसंही स्वातंत्र्यप्राप्तीनंतर बारगळलं होतं.

हेही वाचा : आंदोलनांमुळे सत्तेला लागलीय 'आर्ट अटॅक’ ची धास्ती

झुंडीनं आक्रमणाची गरज का भासते?

विकोपाला गेलेले सामाजिक भेदभाव आणि सांस्कृतिक पडझड यातून भक्कम राष्ट्र म्हणून उभं राहाण्याची डळमळ उघड झाली. त्याचा परिणाम २०१९च्या भाजपच्या संकुचित राष्ट्रवादी भाषेच्या विजयात झाला. मग ‘अडाण्याचा आला गाडा आणि वाटेवरच्या वेशी तोडा’ अशी गत भारतीय राष्ट्रवादाची झाली.

आज राष्ट्रवादाच्या नावाखाली नेहरू, गांधी, आरक्षण, मुस्लीम, जातीयता, लिंगभाव या सगळ्यांविषयी तिरस्कारातून बोललं जातंय. ही आत्ममग्न अडाणीपणाची आणि सत्तेत राहाण्यासाठी वाट्टेल तेची भाषा आहे. हिंदूराष्ट्र म्हणजे बलशाली आणि संपन्न राष्ट्र असं स्वप्न दाखवताना त्यातल्या मुस्लिमांवर, दलितांवर आणि महिलांवर झुंडीने आक्रमणं करण्याची गरज का भासते? तर दाखवलेली स्वप्नं आणि त्यासाठीच्या संधी याचं गणित कोसळलंय.

आक्रमकता आहे पण संधी नाही या परिस्थितीचे दोन परिणाम होतात. एक तर कोणतातरी शत्रू तयार करून युद्ध घडवून आणणं आणि महिलांना, दुर्बल, वंचित लोकांना मागं रेटणं.

स्त्रीवादी बायका राष्ट्रवादाकडे कसं बघतात?

पुरुषसत्ताकतेचा विरोध म्हणजे आक्रमक मूल्यांचा विरोध असं स्त्रीवाद सांगतो. राष्ट्र, धर्म, जात, वंश यावर आधारित सर्व व्यवस्था पुरुषसत्ताक आहेत आणि त्यात बाईचं आणि वंचित लोकांचं कायमच शोषण होत आलंय, असे स्त्रीवादाचं म्हणणं आहे. स्त्रीवादाचं सिद्धांतन मांडणारे आणि त्याचे प्रत्यक्ष राजकारणात उपयोजन करणारे लोक राष्ट्रवादाचे अर्थ व्यापक करू पाहातात.

पाश्चात्त्य स्त्रीवादी धारेत मेरी वोलस्टोनक्राफ्ट, अबिगेल अॅयडम्सपासून ते आज आक्रमक राष्ट्रवादी नेतृत्वाचा धिक्कार करणाऱ्या गौरेतर आणि गौरवर्णीय स्त्रीवाद्यांपर्यंत आणि राजकारण्यांपर्यंत. अमेरिकेतील सध्याचे लोकप्रिय डेमोक्रॅटिक अध्यक्षीय उमेदवार बर्नी सॅन्डर्स स्वतःला स्त्रीवादी म्हणवून घेतात. आणि आपल्याकडे जोतिबा फुले, ताराबाई शिंदेंपासून ते कन्हैय्याकुमारपर्यंत सर्व स्त्रीवादी लोक पुरुषसत्ताकतेला व्यवस्थात्मक धोका मानतात.

वर्जिनिया वूल्फने दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेस ‘बाई म्हणून मला देश नाही, बाई म्हणून संपूर्ण जग हाच माझा देश आहे,’ असं म्हणण्याचे धाडस केलं होतं. १९३८मधे पुरुषसत्ताक राष्ट्रवादाची चिकित्सा करणारं तिचं ‘थ्री गिनीज’ हे पुस्तक स्त्रीवादासाठी महत्त्वाची संहिता आहे. हिटलर-मुसोलिनीच्या विरोधात लढणारे इंग्रज स्वतःच्या देशात बायकांशी कसं वागतात आणि त्यांना किती स्वातंत्र्य देतात हा प्रश्न तिने विचारला होता.

‘पुरुषसत्ताक राष्ट्रवादाच्या डामडौल, अधिकाराच्या उतरंडी, फिती, उत्सव, फुशारक्या, स्फुरणं या सगळ्यात बाई बाहेरचीच असते. पुरुषांनी केलेले कायदे वा समाजव्यवस्था कधी बाईला स्वतंत्र माणूस म्हणून जगण्यासाठी संसाधनं देऊ करत नाही. ती कायमच बाहेरची असते. आणि तरीही, बालपणी कानावर पडलेली पाखराची शीळ किंवा किनाऱ्यावर उभं राहून ऐकलेली लाटांची गाज किंवा कोवळ्या आवाजातली बडबडगीते आठवून इंग्लंडबद्दल निखळ भावना दाटून आलीच तर एक बाई म्हणून मी इंग्लंडला म्हणेन की मला हवी असलेली शांतता आणि मला हवे असलेले स्वातंत्र्य इंग्लंडने सगळ्या जगाला देऊ करावं. [Virginia Woolf, Three Guineas, Harcourt, NY 1938, p166]

साम्राज्यवादी पुरुषसत्ताकतेची ही चिकित्सा आहे. आज सगळीकडेच पुरुषसत्ताकता आक्रमक होत असताना ही चिकित्सा आठवणं बरं राहील.

हेही वाचा : सिमोन द बोव्हुआर: महिलांनो, आपण हिचं फार मोठं देणं लागतो!

हिंसा मान्य करणाऱ्या बायका असतात

पुरुष हिंसक असतो आणि स्त्री अहिंसक असते असं सरसकट म्हणता येणार नाही हे खरंच. फक्त स्त्रियांच्या शरीराला सातत्याने हिंसक होणं शक्य नसतं. कदाचित मातृत्वाच्या अनुभवातून स्त्री शरीराची वेदना आणि मर्यादा कळणं त्यांना अधिक शक्य असतं असे म्हणता येईल. शिवाय अनेक वर्षे सातत्याने विविध प्रकारच्या हिंसा आणि दडपणूक सोसल्यामुळे हिंसा-अहिंसेतील विवेक करण्याच्या परिस्थितीत बायका नसाव्यात.

त्यामुळे त्यांना कणखर रक्षणकर्त्याची गरज वाटत असणंही शक्य आहे. अशा वेळेस बायका हिंसा करायला भाग पाडू शकतात किंवा हिंसा मान्य असणाऱ्या बायका असतात हे गुजरात दंगलींपासून ते आज भोवताली निडरपणे हिंसेचे समर्थन करत वावरणाऱ्या साध्व्या आणि धार्मिक स्त्री नेत्यांवरून समोर येतंय.

पुरुषसत्ताक राजकारणातला बायकांचा आंधळा वावर

हैदराबादमधे बलात्कार केलेल्यांना जाहीर ठार मारावं अशी मागणी करणाऱ्या आणि त्यांना पोलिसांनी मारल्यावर मिठाई वाटणाऱ्या बायकांमधूनही समोर आली. मात्र त्या बोलत असलेली भाषा कोणत्या सत्ताकारणातून येते हे बघितले म्हणजे त्यातली पुरुषसत्ताकता उघड होते. पुरुषांना मारेकऱ्याच्या भूमिकेत त्या ढकलत आहेत, एका अर्थाने बलात्कारालाच वैधता देत आहेत याचं भान त्यातून निसटतंय.

स्त्रियांचा पुरुषसत्ताक राजकारणातील असा आंधळा वावर धोक्याचा आहे. बायकांनी प्रचलित पुरुषसत्ता आत्मसात केल्याचे हे नमुने आहेत. स्त्रियांना अशाप्रकारे सत्ताव्यूहात सामावून घेण्याची नीती हिंस्रतेची व्याप्ती वाढवण्यात मदत करतेय. पुरुषांच्या जोडीने त्या वापरत असलेली तिरस्काराची भाषा शेवटी पुरुषसत्ताक व्यवस्थाच घट्ट करत जाते.

सर्व नातेसंबंध, सत्ताकारण या ना त्या प्रकारे वापरत असते हा विचार मान्य करायचं म्हटलं तरी सर्व सत्ताकारण मानवी संबंधांच्या आकांक्षेतून होत असतं असंही म्हणता येईल. या संबंधांचे शुभंकर प्रारूप बघण्याची गरज दिवसेंदिवस कमी होत चाललीय ही चिंतेची गोष्ट आहे.

पुरुषाला हे नातं जपता येणं शक्य आहे का?

स्त्री-पुरुष नात्याचं आदर्श प्रारूप कसं बघायचं? याचे उत्तर ते प्रारूप सभोवतालच्या आव्हानांच्या संदर्भात स्वतःकडे कसं बघतं. अर्थात सामाजिक जबाबदारी खासगी नात्याचा अविभाज्य भाग मानते का? या मानसिकतेत आहे. इथे गांधींची आठवण येते.

फाळणीच्या काळात नौखालीतल्या धार्मिक दंगलींमधे स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचारांचं मूळ पुरुषाला स्त्रीवर सत्ता गाजवायच्या अनिवार इच्छेत गांधी शोधत होते. शेजारी नग्न स्त्री शरीर असलं तरी पुरुषाचा स्त्री-पुरुष नात्याच्या शुचितेवर इतका विश्वास असायला लागेल की त्यातून त्याच्या लिंगाला ताठरपणा येणार नाही. वात्सल्यभावातून पुरुषाला हे नातं जपता येणं शक्य आहे का? हा तो प्रयोग होता.

गांधींची स्त्री-पुरुष नात्याच्या शुचितेची व्याख्या त्यांच्या जडणघडणीच्या आणि त्या वेळेस दंगलींमधे झालेल्या बेफाम अत्याचारांच्या संदर्भात बघता येईल. पण योनिशुचितेच्या पलीकडे जाऊन स्त्री-पुरुषांमधे मैत्री, उन्नत मूल्यांशी बांधिलकी असली पाहिजे हा आग्रह स्त्रीवादानंही धरलाय. केवळ लैंगिक संबंध म्हणजे स्त्री-पुरुष नातं हे समीकरण दोघांनाही खुजं करणारं आहे. म्हणूनच मग बलात्काराला वैधता कशाप्रकारच्या मानसिकतेतून मिळते हे बघावं लागतं.

हेही वाचा : आजच्या किती लेखिका आजूबाजूच्या घटनांवर भूमिका घेतात? : अरुणा सबाने

तर बलात्कार हाच धर्म बनतो

बलात्कार आणि युद्धखोर राष्ट्रवाद आणि मूलत्तत्ववादी धर्मनिष्ठा यांच्यातला एक समान धागा म्हणजे उघडीवाघडी सत्ता प्रस्थापित करणं. सत्ताकारण मानवी मूल्यांसाठी केलं पाहिजे ही जबाबदारी स्वीकारली तर मग राष्ट्र आणि धर्म या दोन्हीही संकल्पना व्यापक स्वीकारावर आणि करुणेवर उभ्या राहू शकतील.  

जगभरातली आजची परिस्थिती कमालीची स्फोटक झालीय. कारण कोणत्याही स्वरूपाची नफेखोरी हेच उद्दिष्ट असेल तर बलात्कार हाच धर्म बनतो.  मग तो स्त्री शरीरावर केलेला असेल किंवा वेगळ्या जाती, जमाती, राष्ट्रे यांच्यावर केलेला हल्ला असेल. त्यातून प्रेम / मैत्री या शब्दाची नियत संपवली जातेय.

बलात्काराची पूर्वअट दुसऱ्याचा तिरस्कार ही आहे. वेगळ्या विचाराचे अस्तित्व नाकारणे याचा अर्थ तो विचार सांगणारं शरीर नष्ट करणं किंवा अवमानित करणं. मग तो जातीच्या अथवा वंशाच्या श्रेष्ठत्वाचा मामला असो, संकुचित राष्ट्रवाद असो किंवा जिहादी धर्मवाद. यात सामायिक असणारं एक वास्तव म्हणजे स्त्रीशरीराची विटंबना. स्त्रीशरीर ही सत्ताप्रस्थापनेची भूमी असते. तिथे कोणताच अपवाद नाही.

आर्थिक आणि राजकीय बळातून आणि वंचित असण्याच्या अगतिकतेतून पुरुषसत्ताक व्यवस्थांमधले उन्माद वाढीस लागतात तसं स्त्रियांवरचे अत्याचार वाढतात. त्याला सगळ्या यंत्रणांचा पाठिंबा मिळतो. आजही पीडित स्त्रियांना न्याय मिळेल याची खात्री नाही. कठुआपासून ते हैदराबाद, उन्नाव, सिल्लोड, हिंगणघाट आणि दिल्लीमधे केल्या गेलेल्या स्त्रियांच्या बलात्कारांपर्यंत, स्त्रीशरीरावर अत्याचार केले गेले आणि ते थेट उघडपणे नष्ट केलं गेलं.

अत्याचारात सगळे धर्मवाले सारखेच

कठुआमधे ८ वर्षांच्या मुलीवर तीन दिवस अत्याचार करून मारून टाकणाऱ्या पुरुषांना हिंदू संघटनांनी जाहीर पाठिंबा दिला. उन्नावमधला बलात्कार प्रत्यक्ष सत्ताधारी आमदारानेच केला. हिंगणघाटमधे पुरुषाला नकार देणाऱ्या उच्चशिक्षित बाईचा पाठलाग करून तिला भररस्त्यात जिवंत जाळलं गेलं. सिल्लोडमधे घरात घुसून मातंग स्त्रीला जाळलं गेलं. पण पुरुषसत्ताक अन्यायाला कोणत्याही धर्माचा अथवा राष्ट्राचा अपवाद नाही.

पाकिस्तानात अल्पवयीन हिंदू आणि ख्रिश्चन मुलींना पळवून नेऊन त्यांचे धर्मांतर करून जबरदस्तीने लग्न करण्याच्या अलीकडील घटना पाकिस्तानी न्यायालयाने धार्मिक नियम दाखवून पाठीशी घातल्या आहेत, अशी बातमी इंडियन एक्स्प्रेसमधे ८ फेब्रुवारी २०२० ला आली होती. जिहादी मुस्लीम गटांनी बायकांवर केलेले अत्याचार, शरिया कायद्याच्या नावाखाली स्त्रियांना दुय्यमत्व देण्याची मानसिकता किंवा कोवळ्या मुलींच्या लैंगिक शोषणाचा बाजार मांडणाऱ्या उच्चवर्गीय/उच्चवंशीय अमेरिकन व्यावसायिक एपस्टिनसारख्याशी असणारे जगभरातील राजकीय नेत्यांचे संबंध हीच भीषणता समोर आणत आहेत.

स्त्रीवादाने हे अगोदरचं सांगितलंय

स्त्रीवादी चिकित्सेने या धोक्याच्या घंटा या पूर्वीच वाजवल्या होत्या. खासगीत या आक्रमकतेचा आघात स्त्रिया गेली कित्येक वर्षे सोसत आल्यात. त्यामुळे या सर्वव्यापी  पुरुषसत्ताक मानसिकतेचा विरोध करायचा तर स्त्रीवादाने देऊ केलेल्या मर्मदृष्टी गांभीर्याने बघाव्या लागतील. प्रत्येक आक्रमक कृतीचा निषेध करायचं बळ त्यातून मिळतं.

उदाहरण द्यायचं तर आपल्याकडे सध्या आणलेला नागरिकता कायदा हा पुरुषसत्ताक मानसिकतेचा आविष्कार आहे आणि त्याला विरोध करणाऱ्या स्त्रियांना त्याचा अर्थ चटकन समजलाय. अवमानित केलं जाण्याचा, टाकून दिलं जाण्याचा, आर्थिक कोंडीत ढकलण्याचा, बेघर केलं जाण्याचा, खाजगी हिंसा सोसण्याचा, जाहीर अप्रतिष्ठा होण्याचा, सामूहिक हिंसेचा, बलात्कार होण्याचा, जाळून मारून टाकलं जाण्याचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यामुळे अशा कायद्याच्या अंतःस्थ हेतूंबाबत वैध शंका त्या घेऊ शकतात.

स्त्रियांची राजकीय जाणीव प्रगल्भ असेल तर त्या घरादारातल्या पुरुषसत्तेला प्रश्न विचारू शकतात. जामिया मिलिया, जेएनयू, शाहीनबाग, लखनौतील घंटाघर आणि भारतभर झालेल्या आंदोलनांतील, अन्यायाविरुद्ध आवाज उठवणाऱ्या पत्रकारितेतील स्त्रिया ज्याप्रकारे बोलत आहेत त्यातून ते दिसून येते.

ही बदललेली भाषा पुरुषांनी लक्षात घेतली पाहिजे. आपली भाषा अजूनही पुरुषसत्ताक राजकारणाची भाषा आहे. तितकीच संकुचित आणि तितकीच हिंसक. अत्याचारांचे वाढते प्रमाण आणि हिंसक भाषेची चढती कमान हे कोणत्या राष्ट्रवादाचं आश्वासन आहे? कोणत्या भाषेतून या झुंडी बेफाम होतात?

कोणत्या मानसिकतेतून अशा वागण्याला वैधता मिळते? किती प्रकारचे तिरस्कार आपण आत्मसात केलेत? आणि किती काळ त्यांचे परिणाम स्त्रीशरीरावर होत राहाणार आहेत? कोणती सामाजिक व्यवस्था हे तिरस्कार घट्ट करत नेते आहे? आपल्या पुढच्या पिढीसमोर आपण काय वाढून ठेवतो आहोत हा विचार आता सगळ्यांनीच करायची गरज आहे.

हेही वाचा : 

या तीन लेखिका जग गाजवत आहेत

आई होण्याचं आदर्श वय सरकार कसं ठरवणार?

लोक आपापल्या सोयीपुरता स्त्रीवाद का मांडतात?

आता बायकांचा लढा युद्धभूमीवरच्या समानतेसाठी!

अरुणा सबानेः एकटेपणाचा खंबीरपणे सामना करण्यासाठीची प्रेरणा

(वंदना भागवत यांचा हा लेख शब्द मासिकाच्या मार्च २०२० च्या अंकात छापून आलाय. त्याचा हा संपादित अंश आहे.)