१९५१ च्या निवडणुकीत कसा होता जवाहरलाल नेहरूंचा प्रचार?

१४ नोव्हेंबर २०१९

वाचन वेळ : ५ मिनिटं


आज १४ नोव्हेंबर. अर्थातच, देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांची जयंती. १९५१ साली देशात पहिल्यांदा निवडणूक घेण्यात आली. तेव्हा नेहरू पुन्हा एकदा पंतप्रधानपदासाठी दावेदार झाले. या निवडणुकीसाठी त्यांनी कसा प्रचार केला याची माहिती देणारा रामचंद्र गुहा यांचा हा लेख 

आज १४ नोव्हेंबर. अर्थातच, देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांची जयंती. पहिले पंतप्रधान म्हणून वावरताना देशाचा पंतप्रधान कसा असावा याचा पायंडाच नेहरूंनी घालून दिला असं अनेक अभ्यासक म्हणतात. १९५१ मधे भारतात पहिली निवडणूक झाली. तेव्हा नेहरूंनी कसा प्रचार केला याची माहिती देणारा एक लेख रामचंद्र गुहा यांनी साधना या साप्ताहिकाच्या ‘कालपरवा’ या सदरात छापून आला होता. त्या लेखाचा संपादित अंश पुढे देत आहोत - 

भारतात १९५१-५२ साली पहिल्या सार्वत्रिक निवडणुका घेण्यात आल्या. जवाहरलाल नेहरूंना देशाचे पंतप्रधान होऊन तोवर पाच वर्ष झाली होती. सत्ताधारी पक्ष आणि सरकारही त्यांच्या नावानेच ओळखलं जात असे. मतं मिळवून देण्यात आणि प्रचारात त्यांची भूमिका सर्वात महत्त्वाची होती. या एकाच बाबतीत त्यांच्यात आणि पुनर्निवडीसाठी प्रयत्नशील असलेल्या सध्याच्या पंतप्रधानांमधे साम्य आहे. त्यामुळे आपल्या पक्षासाठी मतं मागताना नेहरूंनी केलेल्या प्रचाराची पुन्हा आठवण करून देणं महत्त्वाचं ठरेल.

धर्माच्या नावाखाली मेंदू गहाण टाकू नका

लुधियानामधुन आपल्या प्रचाराचा शुभारंभ करत नेहरूंनी जमातवादाविरुद्ध सर्व शक्तिनिशी ‘युद्ध छेडण्याची घोषणा’ केली होती. ‘देशाला मृत्युपंथाला लावणाऱ्या विघातक जमातवादी शक्तींपासून सावध रहावं’ असं आवाहन त्यांनी समोरील श्रोत्यांना केलं होतं. ‘आपल्या मनाची कवाडं उघडी ठेवा आणि जगाच्या कानाकोपऱ्यातून थंड हवेची झुळूक आत येऊ द्या.’ असंही आवाहन ते या निवडणुकीत करत होते.

पुढे दि. २ ऑक्टोबरला गांधीजींच्या जयंतीनिमित्त दिल्लीमधे केलेल्या भाषणात नेहरू म्हणाले होते, ‘धर्माच्या नावानं किंवा अन्य कारणांनी आपला मेंदू गहाण टाकला की, संकुचितपणा वाढत जातो आणि अंतिमतः राष्ट्राची वाढ खुंटते.’ पुढे नेहरू इशारा देतात,  ‘धर्माच्या आधारे जर कुणी व्यक्ती इतरांना जमीनदोस्त करत असेल तर सरकारचा प्रमुख म्हणून आणि त्याशिवायही अशा व्यक्तीविरुद्ध मी अंतिम श्वासापर्यंत लढेन.’

हेही वाचा : नेहरूंशी लढता लढता मोदी हरताहेत

धर्माच्या नावानं स्वतःला जोखडात अडकवून घेणाऱ्या पाकिस्तानातील जनतेची दशा नेहरूंनी पाहिली होती. जमातवादामधे स्पर्धा करताना भारत आणि भारतीय नागरिक पाकिस्तानच्या पावलांवर पाऊल ठेवतील याची तीव्र चिंता नेहरूंना वाटत असे. त्यामुळेच आंतरधर्मीय सुसंवाद हा त्यांच्या निवडणूक प्रचारातील महत्त्वाचा विषय असायचा आणि ते वारंवार याविषयी बोलायचे. 

नेहरू करतता सलोख्याचं आवाहन

अमृतसरला बोलताना एकदा नेहरू म्हणाले होते, ‘एका धर्माने दुसऱ्या धर्माची गळचेपी करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. असा प्रयत्न करणारी मंडळी मूर्ख असतात. ती देशाचं मोठं नुकसान करतायत.’

धार्मिक संघर्षामुळे आर्थिक विकास थांबतो, असं नेहरूंचं मत होतं. याबाबत बोलताना ते म्हणायचे, ‘सर्व भारतीयांनी आपला व्यवसाय, प्रदेश किंवा धर्म आदींच्या बंधनात न अडकता, एक दुसऱ्याशी सलोखा प्रास्थापित करत मार्गक्रमण करत राहणं हा देशाच्या प्रगतीचा एकमेव मार्ग आहे. आपली मतं आणि विचारधारा वेगवेगळ्या असल्या तरी त्यांनी राजकीय आणि इतर दृष्ट्या बंदिस्त राहता कामा नये.’

आपल्या दुसऱ्या एका भाषणात नेहरू म्हणतात, ‘जमातवादी मानसिकतेचा मनुष्य हा संकुचित विचारांचा असतो, कुठलंही मोठं, चांगलं काम त्याच्या हातून होत नाही आणि क्षुल्लक तत्त्वांवर आधारलेलं राष्ट्रसुद्धा क्षुल्लक होऊन जातं.’ आपलं निरीक्षण नोंदवतानाच ते इशारा देतात, ‘सातत्यानं दुष्प्रचार करून जमातवादी मंडळी प्रचंड मोठे नुकसान करत आहेत. ते केवळ राष्ट्रीय कार्यात बाधा आणतात असं नाही. जनसंघ किंवा हिंदू महासभेच्या माध्यमातून हिंदू लोक स्वतःची प्रगती करतील अशी अपेक्षा ठेवता येणार नाही. त्यांचे धोरण भारतातील इतरांना मागे ठेवायचे आहे. हा अतिशय बालिश विचार असून यामुळे इतरच नव्हे तर खुद्द हिंदूही मागे राहणार आहेत.’

स्त्री-पुरूष समतेवर बोलून हिंदू धर्माची सेवा केली

आपल्या प्रचारादरम्यान नेहरूंनी स्त्री-पुरुष समानतेचं महत्वही वारंवार पटवून दिलं. कायदा आणि परंपरा या दोन्हींच्या दृष्टीनं या देशातील महिलांची स्थिती अतिशय दयनीय आहे. त्यामुळे भारतातील महिलांचं सशक्तीकरण होणं आवश्यक आहे. एखाद्या देशाचं मूल्यमापन त्या देशातील स्त्रियांच्या स्थितीवरून होतं असं मला वाटतं.’ नेहरू पुढे म्हणतात, ‘या देशात पुरुषांचा प्रभाव आजही तितकाच प्रभावशाली आहे. या देशातील कायदे आणि परंपरा स्त्रियांची मुस्कटदाबी करतात आणि त्यांची प्रगती होऊ देत नाही. हे चुकीचं असून, या पद्धती काढून टाकायला हव्यात. केवळ कायद्यात बदल करूनच असं करता येणं शक्य आहे.’

स्त्री-पुरुष समानतेसाठी हिंदू व्यक्तिगत कायद्यात बदल करण्याच्या नेहरू सरकारच्या प्रयत्नांना ‘हिंदू धर्माला नष्ट केलं जात आहे’ अशा आशयाच्या अपप्रचाराचा सामना करावा लागला. पण नेहरूंच्या मते या सुधारणांमुळे हिंदू धर्म नष्ट होणार नाही. उलट यामुळे हिंदू धर्माची विशेष सेवा होणार आहे. या सुधारणांमुळे कमकुवत होत चालेल्या हिंदू समाजाची प्रगतीच होणार आहे.

हेही वाचा : पंतप्रधानांना देशातल्या तिन्ही सैन्यदलांचा एकच प्रमुख का हवाय?

आंतरधर्मीय सुसंवाद आणि स्त्री-पुरुष समानता या विषयांवर लक्ष केंद्रित करून, अधिक न्याय्य आणि संवेदनशील समाजाची निर्मिती करावी असं आवाहन नेहरू भारतीयांना करत होते. अब्राहम लिंकन यांनी आपल्या भाषणात एकदा सांगितल्याप्रमाणे आपल्या सर्वांमधील नैसर्गिक चांगुलपणाला आवाहन करण्याचा प्रयत्नच नेहरू करत राहिले.

स्वतःच्या अपयशाचं खापर दुसऱ्यावर फोडलं नाही

आपल्या एक भाषणात नेहरू म्हणतात, ‘मी इतर पक्षांचा उल्लेख करतो तो केवळ तत्त्वांच्या प्रश्नांवरच. व्यक्तिगत दृष्टिकोनातून मी त्यांच्याकडे सहसा पाहत नाही.’ दुसरीकडे विरोधी पक्षांनी त्यांच्यावर बरेचदा व्यक्तिगत हल्ले केले. नेहरूंसाठी ही सामान्य गोष्ट होती.

त्यांनी म्हटल्याप्रमाणे, ‘मला माझी जबाबदारी झटकायची नाही. मी स्वतः सर्व गोष्टी करत नाही. या कार्यात माझ्यासोबत हजारो सहकारी असले तरी त्यांच्या जबाबदारीचा भार अंतिमत: मलाच वाहावा लागणार आहे. मला तुम्ही इतकं जबाबदारीचं पद दिलं असताना, मी पडद्यामागे लपत जबाबदारी का नाकारावी? भारत सरकारनं जे काही चांगलं-वाईट केलं असेल त्या सर्वांची जबाबदारी ही अंतिमत: माझीच आहे’ नेहरूंना आपल्या सरकारच्या अपयशाचे खापर देशावर दोनशे वर्षे राज्य करणाऱ्या वसाहतवादी साम्राज्यावर किंवा आपल्या शेजाऱ्यांच्या घातक हेतूंवर फोडता आलं असतं; पण नेहरूंनी तसं करण्याचं टाळलं.

उल्लेखनीय बाब म्हणजे ‘आपल्या विरोधकांचे म्हणणं लक्षपूर्वक ऐका,’ असं आवाहन नेहरू आपल्या मतदारांना करायचे. समाजवादी नेते जयप्रकाश नारायण आपल्यानंतर पंजाबच्या दौर्यावर येणार आहेत अशी माहिती मिळताच, नेहरूंनी श्रोत्यांना सांगितलं की, ‘तुम्ही जाऊन त्यांना ऐकावे असा सल्ला मी तुम्हाला देईन. काही मुद्यांवर माझी त्यांच्याशी सहमती नसेलही. मात्र ते अव्वल दर्जाचे व्यक्ती आहेत. तुम्ही इतरांनाही ऐका, त्यांचा युक्तिवाद समजावून घ्या आणि मग शेवटी तुमचा निर्णय घ्या.’

नेहरूंच्या निवडणूक प्रचारातील भाषणांचा रोख आणि त्यातील भावार्थाची तुलना, नुकत्याच संपलेल्या निवडणूक प्रचारात विविध नेत्यांद्वारे करण्यात आलेल्या भाषणांशी करण्याचा मोह वाचकांना होऊ शकेल. माझ्यापरीने मी अंदाज लावू शकतो की, पन्नास किंवा साठ वर्षांनंतर कोणताही इतिहासकार मोदी अथवा राहुल किंवा ममता अथवा मायावती आदींनी २०१९ च्या निवडणूक प्रचारात केलेल्या भाषणांविषयी कौतुकाने लिहिणार नाही.

हेही वाचा : 

आपण बाल दिन साजरा करतोय की बाल दीन?

अफवांच्या बाजारात वाचा सुभाषबाबूंची खरी कहाणी

संचारबंदीतही साताऱ्यात सर्वधर्म भाईचारा सभा झाली, कारण

जवाहरलाल, विजयालक्ष्मीः भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढणारे बहीणभाऊ

(अनुवाद : समीर दि. शेख)