डॉ. पांडुरंग सखाराम पिसुर्लेकरः गोव्याचे तपस्वी इतिहास संशोधक

३० मे २०१९

वाचन वेळ : ६ मिनिटं


गोव्यातले थोर इतिहास संशोधक डॉ. पांडुरंग सखाराम पिसुर्लेकर यांची आज १२६ वी जयंती. डॉ. पिसुर्लेकरांमुळेच भारतीय इतिहासात महत्त्वाच्या असलेल्या पोर्तुगीज इतिहासाचं दालन भारतीय संशोधकांना सहज खुलं झालं. त्यामधे विशेषत: मराठ्यांच्या इतिहासाचे छत्रपती शिवाजी महाराज आणि पोर्तुगीज यांच्यातील राजकीय संघर्षाचे संदर्भ इतिहास संशोधकांना सहजपणे उपलब्ध झाले.

एक इतिहास संशोधक म्हणून डॉ. पिसुर्लेकरांचा जीवनप्रवास अत्यंत आश्चर्यकारक आहे. ३० मे १८९४ ला गोव्याच्या नव्या काबीजादीतील सत्तरी तालुक्यातल्या पिसुर्ले गावात डॉ. पिसर्लेकरांचा झाला. या सत्तरी तालुक्याचे वतनदार राणे मंडळींच्या पोर्तुगीजांविरोधी बंडामुळे सतत लढाईची धामधूम असलेला हा भाग. त्यामुळे पोर्तुगीजांनी इथल्या साधनसुविधांकडे साफ दुर्लक्ष केलं.

कोर्स वकिलीचा, पेशा शिक्षकाचा

१८९६ मधे पोर्तुगीजांच्या सैन्यात कॅप्टन असलेल्या दादा राणे यांच्या जोरदार बंडामुळे पुढची चार वर्ष सत्तरी तालुक्यात युद्धाची धामधूम चालू होती. चार वर्ष दादा उर्फ दादाजी राणे यांनी पोर्तुगीजांना सत्तरी तालुक्यात पाय ठेऊ दिला नाही. शेवटी पोर्तुगीजांनी संकेश्वरच्या शंकराचार्यांना गोव्याच्या गवर्नर राजवाड्यात सन्मानाने बोलावून दादा राणेंचं बंड शांत केलं. पोर्तुगीजांविरूद्ध सतत बंड करणाऱ्या सत्तरी तालुक्यातल्या पिसुर्ले गावात मुलांसाठी प्राथमिक शिक्षणाचीही सोय नव्हती. त्यामुळे पिसुर्लेकरांनी राहत्या घरीच मराठीचे धडे गिरवले.

थोडं मोठं झाल्यावर १५ व्या वर्षी पोर्तुगीज प्राथमिक शिक्षणासाठी साखळी या मोठ्या गावात नातेवाईकांकडे गेले. १९१४ मधे लिसेव हा पोर्तुगीज प्राथमिक शिक्षणाचा अभ्यासक्रम पूर्ण केला. पणजी इथे दोन वर्षांचा महाविद्यालयीन अभ्यासक्रम आणि एक वर्षाचा वकिलीचा कोर्स केला. याच काळात त्यांना इतिहासाची आवड निर्माण झाली.

पोर्तुगीज राजवटीत शिक्षण झाल्यावर आयुष्यात दोन मार्ग निवडण्याची संधी त्यांच्यापुढे होती. एक मार्ग वकिली व्यवसायाचा आणि दुसरा शिक्षकी पेशाचा. त्याकाळी गोव्यात वकील हिंदू असणं ही बाब फार प्रतिष्ठेची होती. परंतु इतिहास वाचन आणि संशोधन या आवडीपायी त्यांनी शिक्षकी पेशा पत्करला.

हेही वाचाः प्रभाकर सिनारीः गोव्यात क्रांतीला मुक्तीकडे नेणारा नायक

तरुणपणीच प्रतिष्ठेच्या नियतकालिकात लेख

डॉ. पिसुर्लेकरांनी शिक्षकी पेशा पत्करल्यावर फावल्या वेळात मराठी आणि पोर्तुगीज भाषांचा अभ्यास केला. मराठी ही त्यांची रोजची लिहण्याची, व्यवहाराची भाषा होती. पोर्तुगीज भाषेच्या जुन्या स्वरुपाच्या भाषेचा विशेष अभ्यास त्यांनी स्वत: घरीच केला. तसंच गोव्यात अनेक ठिकाणी फिरून ताम्रपट, शिलालेख, जुनी नाणी, जुनी कागदपत्र शोधण्यास सुरवात केली.

गोव्यात आढळणाऱ्या हळ्ळे कन्नड लिपीतल्या मराठी कागदपत्रांसाठी त्यांनी हळ्ळे कन्नड लिपी आणि प्राचीन ब्राह्मी लिपी स्वत: घरी शिकून घेतली. त्या काळात गोव्यात प्रवासाची फारशी साधनं नव्हती. असं असताना ऐतिहासिक जागांना भेट देऊन त्या जागांचा अभ्यास केला. शंभर वर्षाआधी १९१८ मधे पिसुर्लेकरांनी गोव्यातल्या पोर्तुगीजपूर्व काळाच्या प्राचीन इतिहासावर पहिला लेख लिहिला. हा लेख त्या काळच्या महाराष्ट्रातील मराठी विद्वत् जगात अत्यंत प्रतिष्ठेच्या विविध ज्ञानविस्तार या मासिकात छापून आला.

विसाव्या शतकाच्या सुरवातीला विविध ज्ञानविस्तारमधे लेख छापून येणं हे त्याकाळी बुद्धिवंतांमधे प्रतिष्ठेचे मानले जाई. तरुण पिसुर्लेकरांची इतिहास संशोधनाच्या या चिकाटीला या घटनेने मोठं बळ मिळालं आणि शिक्षकी पेशातून फावला वेळ इतिहास संशोधनाच्या कार्यात शिरून बसण्याच्या कामात जाऊ लागला.

संदर्भ साधनांच्या अभावावर मात

पिसुर्लेकरांसारख्या इतिहास संशोधनाने झपाटलेल्या तरुणाला पोर्तुगीज दप्तर खात्यातल्या संदर्भ साधनांचा अभाव जाणवू लागला. मग स्वत: पोर्तुगीज सरकारच्या वेगवेगळ्या खात्यात जावून जुनी कागद शोधून काढणं, त्याची क्रमवार बांधणी करणं, त्याच्यातील टिपा काढणं ही कामं ते करू लागले. या कामासाठी स्वत:चे पैसे खर्च करू लागले.

या काळात पोर्तुगीज सरकाराच्या सर्व खात्यांतली जुनी कागदपत्रं अत्यंत वाईट अवस्थेत भयंकर धुळीत आणि अत्यंत अस्वच्छ जागेत पडलेली असत. पोर्तुगीज सचिवालयातली कागदपत्रं तर मुतारीच्या खोलीत ठेवलेली असायची. अशा जुन्या कागदपत्रांना नवसंजीवनी देण्याचं काम पिसुर्लेकरांनी स्व:प्रेरणेने आणि स्व:खर्चाने हाती घेतलं.

पिसुर्लेकरांचं हे लष्कराच्या भाकऱ्या भाजण्याचं काम गोव्याचे तत्कालीन गवर्नर काव्हेयरू लोपीस यांच्या ध्यानात आलं. त्यांनी पिसुर्लेकरांना प्राथमिक शिक्षकाच्या जबाबदारीतून मुक्त केली. तसंच ऐतिहासिक दप्तरखाना या नव्या स्वतंत्र खात्याची निर्मिती करून पिसुर्लेकरांना या खात्याचा प्रमुख म्हणून नेमलं. १९३० मधे मिळालेली ही पिसुर्लेकरांच्या आयुष्याचं सोनं करणारी ठरली.

हेही वाचाः हैदर अली आणि टिपू सुलतान यांना न्याय देणारा इतिहास

पोर्तुगीजकालीन अस्सल कागदपत्रांचा शोध

स्वत:चं तन-मन-धन गुंतवून काम करणारे पिसुर्लेकर आता कायदेशीररित्या पोर्तुगीज दप्तरात आणि गोव्यातल्या इतिहासाच्या साधनात स्वत:ला बुडवून घेतलं. पोर्तुगीज सरकारचे फाझेंद (महसूल), रेलासांव (न्याय खाते), कोमुनिदाद (गावकारी), पोलीस खाते, महापालिका इत्यादी खात्यांत विखुरलेल्या धुळखात पडलेल्या जुन्या कागदपत्रांची मांडणी व्यवस्थित लावू लागले.

पोर्तुगीज कागदपत्रांच्या सागरात त्यांनी शिवाजी महाराज, संभाजी महाराज ते पेशवाई अखेरपर्यंतच्या काळातल्या अनेक राजकीय घडामोडींचा अस्सल पत्राचा खजिना शोधला. या कागदपत्रांची अत्यंत तटस्थरित्या छाननी करून त्यांची वर्गवारी केली. त्यांची टिपणं काढणं, नकला करणं तसंच या कागदपत्राचं आयुष्य वाढावं म्हणून रासायनिक प्रक्रिया करून घेतली. या अस्सल साधनांवरून ते प्रसिद्ध पोर्तुगीज मासिकात लेख लिहू लागले.

पिसुर्लेकरांची पोर्तुगीज गवर्नरने स्वत: पोर्तुगेजांच्या ऐतिहासिक दप्तरखात्यावर नेमणूक केली. तरीही पिसुर्लेकर पोर्तुगीजांचे मिंधेपणा केला नाही. त्यांच्या मनातला राष्ट्रवादी कायम जागरूक राहिला. डॉ. फ्रांगाझा नावाच्या तथाकथित विद्वानाने शिवाजी महाराजांच्या बदनामीची पुस्तिका लिहिली. तेव्हा पिसुर्लेकरांनी ऐतिहासिक अस्सल पुराव्यानिशी पुस्तिका लिहून डॉ. फ्रांगाझाचे सर्व मुद्दे खोडून काढले.

गोव्याच्या मालकीविषयीचे पुरावे

इतिहास संशोधक डॉ. जदूनाथ सरकार, प्रा. सुरेंद्रनाथ सेन, रियासतकार सरदेसाई, दत्तो वामन पोतदार या संशोधकांबरोबर त्यांची विशेष मैत्री होती. या सर्व ज्येष्ठ आणि श्रेष्ठ संशोधकांना पिसुर्लेकरांनी पोर्तुगीज दप्तरातल्या अनेक अस्सल संदर्भ सढळ हाताने उपलब्ध करून दिली. या शिवाय कोलकात्यातली रॉयल एशियाटिक सोसायटी, पुण्यातलं भारत इतिहास संशोधक मंडळ यांच्या विविध प्रकाशनात फार मोठ्या प्रमाणात लेख लिहिले.

गोव्यातल्या पोर्तुगीज सरकारविरूद्धच्या असंतोषाचे जनक आणि टिळकांच्या विचाराचे अनुयायी भारतकार हेगडे देसाई यांच्या भारत मासिकातही गोवा आणि शिवाजी महाराज या विषयावर पिसुर्लेकरांनी लेख लिहिले. पोर्तुगीज सरकारने गोव्याच्या मालकीविषयी आंतराष्ट्रीय हेग न्यायालयात भारत सरकारविरूद्ध दावा केला. तेव्हा पिसुर्लेकरांनी आपल्या राष्ट्रीय प्रवृत्तीला जागून अत्यंत तटस्थ वृत्तीने पोर्तुगीजांविरूद्धचे पुरावे देऊन भारतभूमीशी इमान राखलं.

पिसुर्लेकरांचं अधिकाधिक लिखाण हे पोर्तुगीज भाषेमधे आहे. त्यांनी पुणे युनिवर्सिटीत पोर्तुगीज-मराठा संबंध या विषयावर सात व्याख्यानं दिली. नंतरच्या काळात युनिवर्सिटीने या व्याख्यानांचं एक पुस्तक काढलं. या महत्त्वपूर्ण ग्रंथात जी साधनाची व्याप्ती दिली आहे त्यात पिसुर्लेकरांची इतिहास साधनाची ग्रंथसंपदा किती मोठी आहे हे दिसून येतं.

हेही वाचाः गुढीपाडव्याला साजरा करुया महाराष्ट्राचा पहिला स्वातंत्र्यदिन

इतिहास एक शास्त्र मानून संशोधन

पिसुर्लेकरांनी गोव्याच्या दप्तरखान्यात ऐतिहासिक कागदपत्राचे सात हजारांच्या आसपास खंड एकत्र करून लावले. त्यात गोव्याच्या इतिहासाचा भूगोल, व्यापार, कला, शास्त्र, वैद्यकीय, राजकारण, पुरातत्व या विषयांच्या साधनांचा समावेश आहे. पिसुर्लेकर हे इतिहास हे शास्त्र मानून शास्त्रज्ञाप्रमाणे संशोधन करत राहिले. त्यांच्या लिखानात अत्यंत तटस्थपणा आहे. ते कधीच कोणत्या डाव्या-उजव्या राजकीय विचारसरणीकडे झुकले नाहीत आणि अस्सल संदर्भाशिवाय त्यांनी कधी कोणतं विधानही केलं नाही. ही बाब आजच्या घडीला सर्व इतिहास अभ्यासकांनी मुद्दाम लक्षात घेण्याची गरज आहे.

डॉ. पिसुर्लेकरांच्या कामाचा व्याप डोंगराएवढा असला तरी त्यांची खरी ओळख आहे ती त्यांच्या पोर्तुगीज-मराठा संबंध या पुणे विद्यापीठाच्या प्रकाशित पुस्तकावरून. हे सात व्याख्यानांचं पुस्तक हजारो संदर्भनोंदीनी भरलेलंय. मराठ्यांच्या इतिहासाविषयीच्ये फार कमी संदर्भग्रंथापैकी असा हा उत्कृष्ट भरदार संदर्भग्रंथ म्हणून सर्व इतिहास अभ्यासक त्याची नोंद घेतात.

शिवाजी महाराजांच्या नौदलाचे आणि पोर्तुगीजांविरूद्ध संघर्षाचे अस्सल कागदपत्रांच्या पुराव्याचे दालन पिसुर्लेकरांमुळेच आज खुलं झालंय. अशा या थोर संशोधकाला अनेक मान सन्मान मिळाले. कोलकाताच्या रॉयल एशियाटीक सोसायटीचं सुवर्णपदक, मुंबई युनिवर्सिटीचं सन्माननीय सदस्यपद, गोवा युनिवर्सिटीचं सदस्यपद, पोर्तुगीज युनिवर्सिटीचं सदस्यपद असे अनेक मानसन्मान त्यांना मिळाले. अशा थोर इतिहास संशोधक शास्त्रज्ञाला त्यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त मानाचा मुजरा.

हेही वाचाः 

विष्णू सूर्या वाघः जखमांचे चर्च बांधणारा आनंदभोगी

आजपासून क्रिकेट वर्ल्डकप, ‘या’ बॅट्समनवर असणार सगळ्यांची नजर

अजूनही भाजपला पर्रीकरांच्या नावावरच मतं मागावी का लागतात?

डॉ. प्रमोद सावंत आहेत कोण आणि ते कसे बनले गोव्याचे मुख्यमंत्री?

भाई माधवराव बागलः कोल्हापुरात उभारला आंबेडकरांचा देशातला पहिला पुतळा

(लेखक गोव्यातले आघाडीचे शिल्पकार आणि इतिहास संशोधक आहेत.)