युधिष्ठिर शक ते शिवशक, जाणून घेऊया महाराष्ट्राच्या कालगणनेचा प्रवास

०६ एप्रिल २०१९

वाचन वेळ : ६ मिनिटं


जानेवारी, फेब्रुवारी अशा महिन्याचं इसवी सनाचं कॅलेंडर आपल्या भिंतींवर असलं, तरी आपण मराठी माणसं आपुलकीने साजरं करतो, ते गुढीपाडव्यापासून सुरू होणारं नवं वर्षं! पण महाराष्ट्रात ह्याच दोन कालगणनेच्या पद्धती झालेल्या नाहीत. याव्यतिरिक्तही अनेक कालगणना महाराष्ट्राने पाहिल्यात. त्याची ही माहिती.

महाराष्ट्राचा इतिहास म्हटला की आपल्याला फक्त एकच शालिवाहन शक माहीत असत. पण आपल्या कालगणनेच्या इतिहासात हा एकमेव शक नाही. शक हा शब्द कालगणनेला समानार्थी म्हणून वापरला जातो. कधी कधी त्याऐवजी संवत, संवत्सर किंवा शकसंवत्सर असेही शब्द वापरले जातात. 

विशेषतः महाराष्ट्रात असे अनेक शक इतिहासाच्या विविध टप्प्यांवर वापरले जात होते. कोकण इतिहास परिषदेचे अध्यक्ष रवींद्र लाड यांनी आजवर महाराष्ट्रात वापरल्या गेलेल्या शकांचा इतिहास अभ्यासला आहे. ‘महाराष्ट्राच्या इतिहासातला हा एक दुर्लक्षिला गेलेला, पण महत्त्वाचा भाग आहे,’ असं ते सांगतात. साप्ताहिक चित्रलेखात आलेल्या एका लेखाच्या आधारे जमा केलेली ही माहिती. 

हेही वाचाः गुढीपाडवाः शिवपार्वती विवाहाचा वारसा सांगणारा हजारो वर्षं जुना उत्सव

महाराष्ट्रात वापरण्यात आलेले वेगवेगळ्या कालगणना किंवा शक असे आहेत, 

महाराष्ट्राचा अभिमान शालिवाहन शक

आज आपण गुढीपाडवा साजरा करतोय ते प्रामुख्याने शालिवाहन शकाच्या संदर्भात मोजला जातो. फक्त महाराष्ट्रातच नाही तर गोवा, कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशच्या बहुतेक भागांतही हेच नवं वर्ष असतं. आज म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून १९४१वा शालिवाहन शक सुरू झालाय. महाराष्ट्राचे राजे असणाऱ्या सातवाहनांनी दिलेला हा शक आपण इतकी वर्षं अभिमानाने सांभाळलाय.

इसवी सनापूर्वी २५० वर्षांपासून इसवी सनानंतर आणखी दोनशे वर्षं अशी एकूण ४६० वर्षं सातवाहनांचं साम्राज्य महाराष्ट्रासह दख्खन प्रदेशावर होतं. त्यांच्या काळात महाराष्ट्र अत्यंत समृद्ध होता. त्यामुळे हे मराठी इतिहासासाठी अत्यंत अभिमानस्पद पर्व आहे. सालाहन, सातवाहन आणि सातकर्णी अशा तीन नावांनी हे साम्राज्य ओळखलं जातं. सातवाहनांच्या घराण्यातील वेगवेगळ्या टप्प्यात झालेल्या तीन राजांची ही नावं आहेत.

हेही वाचाः गुढीपाडव्याला श्रीखंड पुरी खाताय, पण तुम्हाला त्याविषयी काय माहितीय?

त्या राजांच्या प्रभावामुळे त्यांच्या पुढच्या पिढ्यांनी त्यांचं नाव ओळख म्हणून वापरलं. त्यांच्या शिलालेखातला एक ब्रह्मणस हा शब्द घेऊन त्यांना ब्राह्मण ठरवण्याचा आटापिटा अभ्यासक करतात. पण ते नागवंशीय क्षत्रिय आणि मातृसत्ताक होते. ते आपल्या नावासोबत आईचं नाव लावत असत. उदाहरणार्थ, गौतमीपुत्र सातकर्णी. त्यांनी बौद्ध धर्माबरोबरच पारंपरिक वैदिक धर्मालाही आश्रय दिला होता. मराठी प्राकृत भाषेला दिलेला उदार आश्रय हे सातवाहनांच्या सत्ताकाळाचं एक प्रमुख वैशिष्ट्य आहे. 

आंध्र प्रदेश राज्याची नवी राजधानी जिथे घडवली जातेय, त्या अमरावतीतल्या स्तूपापासून पुणे जिल्ह्यातल्या जुन्नरजवळच्या नाणेघाटापर्यंत सातवाहनांच्या कर्तृत्वाची चिन्हं आहेत. नाणेघाटातले शिलालेख आणि या घाटावरून जाण्यासाठी लागणारा कर जमा करण्यासाठी बनवलेली भलीमोठी दगडी रांजणं सातवाहनकालीन आहेत. सातवाहन घराण्यातल्या तीस राजांची नावं पुराणांमधे आहेत. आपण सध्या वापरत असलेल्या, इसवी सनाच्या ७८व्या वर्षापासून शालिवाहन शकाला सुरुवात झाली. ब्रिटिश काळात इसवी सन प्रचलित झाल्यानंतरही शालिवाहन शक महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य माणसांच्या वापरात होता. 

सर्वात जुनं युधिष्ठिर शक

हा सगळ्यात जुना शक मानायला हवा. चालुक्य राजा सत्याश्रय पुलकेशी याने आयहोळ येथील एका शिलालेखात युधिष्ठिरापासून कालगणना होत असल्याचा उल्लेख केलेला आहे. हा शिलालेख इ.स. ६३४ सालचा आहे. त्यात महाभारताच्या युद्धानंतर म्हणजे ३७३५ वर्षांपूर्वी युधिष्ठिराच्या नावाने शक सुरू झाल्याची नोंद केली आहे. या शिलालेखाच्या आधारे महाभारताचा काळ ठरवण्याचा प्रयत्न इतिहासकारांनी केला आहे. 

अहिर राजांचा चेदी शक

शक हा शब्द युधिष्ठिरकालीन नाही. आजच्या अफगाणिस्तान ते इराण या प्रदेशातून आलेल्या शक, हूण या आक्रमकांनी देशाच्या उत्तरेत मथुरेपर्यंत कुशाण साम्राज्य स्थापन केलं होतं. पराक्रमी कुशाणांच्या नावाशी कालगणना जोडल्यामुळे शक हे नाव रूढ झाल्याचं दिसतं.

कुशाण राजांनी देशभर आपले गव्हर्नर म्हणजे क्षत्रप नेले होते. त्यापैकी नहपान याचं सौराष्ट्र, माळवा आणि महाराष्ट्रावर वर्चस्व होतं. कुशाण साम्राज्य कमकुवत झाल्यानंतर नहपानासारखे क्षत्रप प्रभावी झाले होते. त्याच्याच काळात महाराष्ट्राच्या उत्तर भागात अहिर राजांची सत्ता होती. नहपानाची मुलगी दक्षमित्रा हिचं लग्न अहिर राजा उषवदत्त याच्याशी झालं होतं. 

हेही वाचाः गुढीपाडवा FAQs: आपल्या मनात असणाऱ्या प्रश्नांची साधीसरळ उत्तरं

या अहिरांच्या विविध शाखा महाराष्ट्रात राज्य करत होत्या. त्या घराण्याचे दहा राजे होऊन गेल्याचं पुराणं सांगतात. विविध ठिकाणचे अहिर राजे सर्वत्र एक शक वापरत. ते चेदी शक म्हणून ओळखलं जातं. शालिवाहन शकाच्या २३८व्या वर्षापासून सुरू होणाऱ्या या शकाचा वापर अहिराचं प्रभाव ओसरल्यानंतर कलचुरी राजघराण्याने वापरल्याचं आढळतं.

विक्रम संवतातला विक्रमादित्य कोणता?

आजही उत्तर भारतात सर्रास वापरलं जाणारं विक्रम संवत हे शक मात्र त्याच्याही आधीचं आहे. विक्रम संवत हे शालिवाहन शकाच्या साधारणपणे १३५ वर्षं जुनं आहे. सातवाहनांमधल्या शालिवाहन राजाच्या समकालीन असणार्या उज्जैनीचा राजा विक्रमादित्य याने हे शक सुरू केलं. विक्रमादित्य ही एक पदवी असल्यामुळे आपल्याला माहीत असलेल्या इतिहासात स्वतःला विक्रमादित्य म्हणवून घेणारे २५ पेक्षा अधिक राजे झालेत. त्यापैकी भर्तृहरीचा भाऊ असणाऱ्या भिल्ल कुळातल्या विक्रमादित्यान हा शक सुरू केला आहे. 

गुप्त राजघराण्याचा स्वतंत्र शक

गुप्त साम्राज्यातील महापराक्रमी राजा चंद्रगुप्त हा आहे. तो ‘विक्रमादित्य’ म्हणून सर्वाधिक प्रसिद्ध आहे. सम्राट चंद्रगुप्त मौर्य आणि विक्रमादित्य चंद्रगुप्त या दोघांमधे नेहमी गोंधळ घातला जातो. गुप्त सम्राट चंद्रगुप्ताच्याही पराक्रमाचे अनेक दाखले इतिहासात आहेत. विक्रमादित्य चंद्रगुप्ताचा काळ इ.स. चौथं शतक असल्यामुळे त्याने त्याआधीच ४०० वर्षांपेक्षा जास्त काळ प्रचलित असणारं विक्रम संवत सुरू करणं शक्य नाही. पण या गुप्त राजांनी सुरू केलेलं स्वतंत्र गुप्त संवत त्यांच्या साम्राज्यात वापरलं जात होतं. 

हेही वाचाः गुढीपाडव्याला गुढीपाडवाच राहू दे, त्याला हिंदू नववर्ष कशाला बनवताय?

हा चंद्रगुप्त स्वतःला शकारि म्हणजे शकांचा शत्रू म्हणवून घेत असे. त्याने खऱ्या अर्थाने शकांचं पारिपत्य केलं. त्याची मुलगी प्रभावती गुप्त वाकाटकांकडे दिली होती. तिचा पती राजा प्रवरसेन लवकर मृत्यू पावल्यामुळे क्षत्रपांनी तिचं राज्य हडपण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे रागावून चंद्रगुप्ताने सर्व शक क्षत्रपांविरुद्ध मोहीम चालवून त्यांना संपवलं. 

मुस्लिम राज्यसत्तेची ओळख हिजरी सन

मुस्लीम राज्यकर्त्यांनी शेकडो वर्षं महाराष्ट्रावर राज्य केलं. अल्लाउद्दीन खिलजीने तेराव्या शतकाच्या शेवटी यादवांना हरवलं. तेव्हापासून वेगवेगळे मुस्लिम राजे महाराष्ट्रात राज्य करत होते. ते अगदी देशाला स्वातंत्र्य मिळेपर्यंत म्हणजे हैदराबादच्या निजामाचं मराठवाड्यावरचं वर्चस्व संपेपर्यंत इस्लामचा प्रभाव महाराष्ट्रातल्या प्रशासनावर होता. त्यामुळेच  हिजरी कालगणनेचा वापर महाराष्ट्रातल्या सरकारी कामकाजात होतच राहिलाय.  

हेही वाचाः गुढीपाडव्याला साजरा करुया महाराष्ट्राचा पहिला स्वातंत्र्यदिन

महंमद पैगंबर यांनी मक्का इथून मदिनाला स्थलांतर केलं. त्याला हिजरा असं म्हणतात. ते झालं इसवीसन ६२२मधे. तेव्हापासून हिजरी कालगणना सुरू झाली. तिचा वापर महाराष्ट्रभर होत राहिला. अगदी शंभर वर्षांपूर्वीपर्यंत महाराष्ट्रभर शालिवाहन शकाबरोबरच हिजरी सनाचाही माहिती असणारे लोक मोठ्या संख्येने होते. इंग्रजांच्या प्रभावात महाराष्ट्रात इसवी सन प्रचलित झाला. आज आपण तेच वापरतो. शिवाय भारत सरकारचंही एक सरकारी कॅलेंडर आहे. 

शककर्ते शिवरायांचा इतिहास घडवणारा शिवशक

सातवाहनांच्या नंतर गुप्त आणि अहिरांचे शक आले आणि गेले. तसे इतरही काही शक कोणतीही नोंद न ठेवता नामशेष झाले असतील. पण सातवाहनांनंतर राष्ट्रकूट, कदंब, शिलाहार अशी मोठी राजघराणी झाली. जवळपास सोळाशे वर्षं कोणत्याही राजाने स्वतःचा शक निर्माण करण्याची दूरदृष्टी दाखवलेली दिसत नाही. त्याला अपवाद ठरले, ते शककर्ते छत्रपती शिवाजी महाराज. 

हेही वाचाः गुढीपाडव्याला श्रीखंड पुरी खाताय, पण तुम्हाला त्याविषयी काय माहितीय?

राज्याभिषेक घडवून शिवरायांनी फक्त महाराष्ट्राच्याच नाही, तर देशाच्या इतिहासावर स्वतःची नाममुद्रा उमटवली. त्यामुळे देशाच्या इतिहासाला नवं वळण मिळाल्याचं मानलं जातं. स्वतः योजना आखून जवळपास हजार वर्षं न झालेला राज्याभिषेक छत्रपती शिवरायांनी घडवून आणला होता. राज्याभिषेकातून त्यांनी राम, नल, युधिष्ठिर, विक्रमादित्य या परंपरेशी सांधा जोडल्याचं सभासद बखरीत म्हटलं आहे. ते शकनिर्मितीशीही जोडून पाहता येईल.

आपल्या कार्याचं हे महत्त्व छत्रपती शिवरायांना माहीत होतं. त्यामुळेच त्यांनी शिवराज्याभिषेकानंतर स्वतंत्र शक निर्माण केला. त्याला शिवशक म्हटलं जातं. सध्या ३४५वा शिवशक सुरू आहे. दरवर्षी ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी या शिवराज्याभिषेकाच्या तिथीपासून या शकाचं नवं वर्ष सुरू होतं. शिवशकाचा वापर महाराष्ट्राच्या इतिहासात कोणी कोणी केला, तो वापर कधीपर्यंत चालला आणि तो वापर कोणी बंद केला, याचा अभ्यास मराठी दप्तरं धुंडाळून करायला हवा. कारण त्यातून शिवाजी महारांजांच्या कार्याप्रती असणार्या निष्ठेचा एक आलेख समोर येऊ शकेल.

हेही वाचाः 

गुढीपाडव्याला वाचुयाचः राज ठाकरेंनी शरद पवारांची घेतलेली मुलाखत

गुढीपाडवाः शिवपार्वती विवाहाचा वारसा सांगणारा हजारो वर्षं जुना उत्सव