सरदार उधम: इतिहासातल्या एका काळ्या, दुखर्‍या घटनेची आठवण

०३ नोव्हेंबर २०२१

वाचन वेळ : ६ मिनिटं


भारतातल्या झोपडपट्टीमधलं दर्शन घडवणारा ‘स्लमडॉग मिलेनिअर’ ‘ऑस्कर’मधे चालतो. पण ब्रिटिश साम्राज्यवादाचं हिंसक स्वरूप दाखवणारा ‘सरदार उधम’ का चालत नाही? असा प्रश्न काहीजण उपस्थित करत आहेत. मुळात एखाद्या कलाकृतीकडे आपण व्यापक कलाव्यवहाराच्या दृष्टिकोनातून पाहत नाही, त्यातून काही प्रश्न आणि गुंते निर्माण होत असतात.

एक उत्तम निर्मितीमूल्य असलेला सिनेमा म्हणजे ‘सरदार उधम’. भारतीय स्वातंत्र्य युद्धामधल्या एका दुर्लक्षित योद्ध्याच्या लढ्याचं प्रामाणिक दर्शन घडवणारा सिनेमा. पण या प्रक्रियेदरम्यान तो ब्रिटिशांविरुद्ध द्वेषाची पेरणी करतो आणि आजच्या जागतिकीकरणाच्या युगात त्या द्वेषाला चिकटून राहणं योग्य नाही. ‘ऑस्कर’ पुरस्कारासाठी भारतातून प्रवेशिका पाठवणार्‍या पॅनेलमधल्या एक ज्युरी इंद्रदीप दासगुप्ता यांनी ‘सरदार उधम’ ‘ऑस्कर’ला पाठवण्यासाठी अपात्र का ठरवण्यात आला, याचं स्पष्टीकरण देताना हे असं म्हटलंय.

सुमीत बासू या एका ज्युरी मेंबरनं त्यावर सिनेमाची लांबी प्रदीर्घ असल्याचं कारण दिलं आणि त्यामुळे जालियनवाला बाग हत्याकांडाची वेदना प्रेक्षकांपर्यंत पोचायला वेळ लागतो, असंही आणखी एक कारण दिलं. ज्युरी मेंबरच्या या वादावर प्रतिक्रिया उमटल्या नसत्या तरच आश्चर्य. ‘तुम्हाला बकाल, झोपडपट्टीतल्या भारताचं दर्शन घडवणारा ‘स्लमडॉग मिलेनिअर’ ‘ऑस्कर’मधे चालतो. पण, ब्रिटिश साम्राज्यवादाचं हिंसक स्वरूप दाखवलेलं का खुपावं?’ अशा आशयाच्या या प्रतिक्रिया आहेत.

हेही वाचा: डॉ. जयसिंगराव पवार: इतिहासाला वर्तमानाशी जोडणारे संशोधक

पेरणी द्वेष की वास्तवाची?

मुळात एखाद्या कलाकृतीकडे आपण व्यापक कलाव्यवहाराच्या दृष्टिकोनातून पाहत नाही, म्हणून मग त्यातून असले प्रश्न आणि गुंते निर्माण होतात. ‘सरदार उधम’ हा एका ऐतिहासिक सत्यघटनेवर आधारित बायोपिक आहे आणि तो एका सिनेमाविषयी आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी पाठवत असताना त्याचे निकष हे त्या क्षेत्राशी निगडित असावेत. महत्त्वाचं म्हणजे दिग्दर्शकानं इथं एका क्लेषदायक, विदारक ऐतिहासिक घटनेचं दर्शन घडवलं.

द्वेषभावनेपेक्षाही जे घडलं, ते दाखवण्याचा आणि त्या घटनेचा एका युवकावर कोणता परिणाम झाला आणि अंतिमतः त्याची परिणती काय झाली, या प्रवासाची ती मांडणी आहे. जाऊ द्या ना त्याला आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर. ठरवू द्या आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांना तो वास्तवाचं दर्शन घडवतो की द्वेषाचं!

‘सरदार उधम’बद्दल ही भावना असेल, तर ‘शिंडलर्स लिस्ट’बद्दल काय मत असेल या ज्युरीचं? अमेरिकेच्या जेम्स बाँडपटांना काय म्हणावं? अद्याप जे एलियन पाहण्यातही आलेले नाहीत, त्यांना पृथ्वीचे शत्रू ठरवून त्यांच्याविरुद्ध संघर्षाचं दर्शन घडवणार्‍या तमाम हॉलीवूडपटांना काय म्हणायचं?

गेल्या काही वर्षांत पाकिस्तानविरुद्ध भारतीय संघर्षाचं दर्शन घडवणार्‍या सिनेमांना आपण देशभक्तीच्या पारड्यात टाकतो. तिथं भारतीय उपखंडातल्या शेजारी देशाविरुद्ध द्वेषाची पेरणी केली जात नाही का? असेही प्रश्न यानिमित्तानं उपस्थित होेतात. ज्युरीच्या या एका प्रश्नानं कलामाध्यमाची आपली जाण किती संकुचित आहे, याचं दर्शन एकवार नव्यानं घडलं, इतकंच!

उधम सिंग यांचा प्रवास

या सर्व पार्श्वभूमीवर ‘सरदार उधम’ या सिनेमाबद्दल मात्र, आपण बोलायला हवं. शुजित सरकार या अत्यंत प्रयोगशील दिग्दर्शकानं गेली २१ वर्ष उराशी बाळगलेलं हे स्वप्न आहे. केवळ निर्मात्यांअभावी तो सामोरा यायला उशीर झाला, हे खरंय ! मात्र, वेळ चुकलेली नाही, हेही खरंय! कारण, त्याच्या कारकिर्दीच्या सुरवातीच्या काळात हा सिनेमा आला असता तर निर्मितीमूल्याच्या बाबतीत तो कदाचित इतका प्रभावी ठरला नसता.

उधम सिंग यांचा प्रवास हा जागतिक कॅनव्हासवर खूप व्यापक आहे. भारतात तसंच भारताबाहेर रशिया, युरोप असा त्यांचा सुमारे २१ वर्षांचा हा अत्यंत नाट्यमय प्रवास आहे. हा सारा प्रवास अत्यंत प्रत्ययकारकतेनं दिग्दर्शकानं मांडला आहे. हा केवळ एक सूडप्रवास आहे, असं म्हणणं हा उधम सिंगांवर आणि एकूणच भारतीय क्रांतिकारकांवर मोठा अन्याय ठरेल.

हेही वाचा: व्यवस्थेनं झोप उडवली असताना ‘निद्रानाश’ अटळ आहे!

१०० वर्षांपूर्वीचं हत्याकांड

सुमारे शंभर वर्षांपूर्वी १३ एप्रिल, १९१९ ला जालियनवाला बाग हत्याकांड घडलं. त्यावेळी ब्रिटिश सरकारनं जुलमी रौलेट कायदा अंमलात आणून भारतीय जनतेला अक्षरशः ढोपरांवर रांगायला लावलं होतं. सभाबंदी, जमावबंदी, कोणत्याही कारणाशिवाय अटक अशा अनेक बाबींनी एतद्देशीयांवर जुलूम सुरू होते. नेत्यांची धरपकड सुरू होती.

पंजाबातले नेते डॉ. सैफुद्दीन किचलू आणि डॉ. सत्य पाल यांच्या अटकेविरुद्ध शांततापूर्ण आंदोलन करण्यासाठी अमृतसरच्या जालियनवाला बाग मैदानात सुमारे वीस हजार नागरिक जमले होते. पंजाब प्रांताचा लेफ्टनंट गवर्नर सर मायकल ओडवायर यानं ब्रिगेडियर जनरल रेजिनाल्ड डायर याला ‘स्थानिकांना अशी अद्दल घडवा की, पुन्हा मान वर उचलता कामा नये,’ असा आदेशच दिलेला.

असा हा डायर चहूबाजूंनी बंदिस्त आणि केवळ एकच प्रवेशद्वार असलेल्या जालियनवाला बागेत आपल्या पलटणीसह घुसला. प्रवेशद्वार रोखलं आणि जमावाला कोणतीही पूर्वसूचना न देता, पांगण्याची संधी न देता थेट गोळीबाराचं आदेश दिलं. शिपायांकडील गोळ्या संपेपर्यंत हा नृशंस हिंसाचार सुरूच राहिला. ब्रिटिश शिपायांचा गोळीबार, जमावाचा आक्रोश, मृत्यूचं थैमान आणि हे सर्व विचलित न होता, निर्दयीपणे पाहणारा जनरल डायर हेच चित्र जालियानवाला बागेत तेव्हा होतं.

धुमसत राहणारी आग

या घटनेची चौकशी हंटर कमिशननं केली. काँग्रेसनं स्वतंत्रपणे केली. वेगवेगळे आकडे सामोरं आली. ३७८ ते १,५०० मृत्यू आणि १,२०० पेक्षा अधिक जखमी. मैदानातल्या विहिरीतच १२० मृतदेह सापडले होते. हंटर कमिशनसमोर साक्ष देताना जनरल डायर म्हणतो कसा, मृतांचा आकडा २०० ते ३०० असल्याचं ऐकतो. माझ्या शिपायांनी तर १,६५० फैरी झाडल्या होत्या. असा त्याचा उद्दामपणा.

हे प्रकरण दडपण्याचा इतका प्रयत्न त्या काळात झाला की, एप्रिलमधे घडलेल्या या हिंसाचाराची माहिती डिसेंबरपर्यंत ब्रिटनपर्यंत पोचली नव्हती. या घटनेच्या बाबतीत असाच उद्दामपणा ब्रिटिश सरकारनं अगदी २०१९ पर्यंत दाखवला. याप्रकरणी त्यांनी अद्यापही भारत सरकारकडे अधिकृत माफी नोंदवलेली नाही तर २०१९मधे केवळ ‘खेद’ व्यक्त केला. या प्रसंगाचं अनेकांवर परिणाम झाले. रूडयार्ड किपलिंग म्हणाला, डायरनं आदेशाचं पालन करून केवळ त्याचं कर्तव्य बजावलं.

संवेदनशील मनाच्या रवींद्रनाथ टागोरांनी ‘इतक्या निष्पाप लोकांची हत्या करणारं सरकार कुणाला कसलीही पदवी देण्याच्या पात्रतेचं नाही,’ असं म्हणत ब्रिटिश सरकारची ‘सर’ ही पदवी परत केली. महात्मा गांधींनी ब्रिटिश सरकारविरोधात असहकार आंदोलनाची हाक दिली. तर या हत्याकांडाच्या झळा अगदी जवळून पाहिलेल्या, सोसलेल्या सरदार उधम सिंग यांच्यासारख्या युवकांची मनं सूडभावनेनं धगधगू लागली.

हेही वाचा: तंत्रज्ञानाच्या युगात अश्मयुगातल्या मानवी मेंदूचं काय होणार?

हत्याकांडाचा २१ वर्षांनंतर बदला

ही आग मनात धुमसत ठेवून उधम सिंग जनरल डायरला मारण्यासाठी म्हणून इंग्लंडला पोचतो. मात्र, त्याआधीच त्याचा मृत्यू झालेला असतो. मग, त्याला आदेश देणाऱ्या गवर्नर ओड्वायरचा तो माग काढतो. त्याची दैनंदिनी जाणून घेण्यासाठी त्याचा विश्वास मिळवून त्याचा नोकर म्हणूनही काम करतो आणि एका क्षणी कॅक्स्टन हॉलमधल्या त्याच्या भाषणानंतर त्याचं नाव पुकारून त्याच्या छातीत गोळ्या झाडतो.

त्याचा स्टेजवरचा सहकारी लॉर्ड झेटलंड मात्र गोळीबारातून बचावतो. जालियनवाला बाग हत्याकांडाचा बदला घेण्यात २१ वर्षांनंतर उधम सिंग यशस्वी ठरतो. उधमला अटक केलं जातं. अखेरपर्यंत तो गुन्हा कबूल करीत नाही. मात्र, त्याच्याविरुद्ध लुटुपुटुचा खटला चालवून फाशीची शिक्षा सुनावली जाते. आपला मित्र शहीद भगतसिंग याचं चित्र हाती घेऊन उधम सिंगही फासाला कवटाळतो.

आपल्यातल्या हळव्या देशभक्ताला साद

शुजित सरकार यांनी उधम सिंगांबद्दल केलेलं संशोधन फारच महत्त्वाचं. जागतिक धागेदोरे जोडत जोडत त्यांनी उधम सिंगांच्या चरित्राला पडद्यावर आकार दिलाय. अविक मुखोपाध्याय यांची सिनेमॅटोग्राफी इतकी अप्रतिम की, हा सिनेमा मोठ्या पडद्यावर पाहताना अधिक मजा आली असती. मात्र, त्याहूनही संकलनाच्या पातळीवर चंद्रशेखर प्रजापती यांची कामगिरी अधिक सरस आहे. उधम सिंगांच्या चरित्रापासून अनभिज्ञ असलेल्या दर्शकाला टप्प्याटप्प्यानं त्याची माहिती करून देत हळुवारपणे त्याला माहिती असलेल्या जालियनवाला बाग हत्याकांडाच्या क्लायमॅक्सकडे ते घेऊन जातात.

काही ठिकाणी काटछाट करून विशेषतः जालियनवाला बाग हत्याकांडानंतर उधम सिंग लोकांना वाचवण्यासाठी जी धावपळ करतो, त्या प्रसंगांतही काही गोष्टी कमी करून सिनेमाची लांबी आणखीन दहा-पंधरा मिनिटांनी सहज कमी करता येऊ शकली असती; पण त्याउलट विचार करताना एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की, या हत्याकांडाची तीव्रता, गांभीर्य प्रेक्षकांच्या मनावर खोल बिंबावं, यासाठी दिग्दर्शक-संकलक जोडीनं हा प्रसंग मुद्दाम लांबवला असावा. उधम सिंगांच्या यातना अनुभवल्याशिवाय त्यांनी स्वीकारलेल्या मार्गाची यथायोग्यता लक्षात येणार नाही, हा त्यामागचा हेतू.

सरतेशेवटी विकी कौशलविषयी. इरफान खान पहिली पसंती असलेल्या उधम सिंगांच्या भूमिकेमधे विकीनं अभिनयाची कमाल केली आहे. ‘उरी’मधे ‘हाऊज् द जोश?’ असं उच्चरवानं विचारणार्‍या अधिकार्‍याच्या तुलनेत त्यानं इथं केलेला अंडरप्ले खणखणीत आहे. शुजितच्या अपेक्षांचं सोनं करत त्यानं उधम सिंग साकारलेत.

अलीकडे आलेले सिनेमे जणू काही देशभक्तीचा, अस्मितेचा एक मोठा भावनिक डोस देऊन एक विशिष्ट ग्लानी, उन्माद पैदा करण्यासाठीच निर्माण केलेत, हे अक्षरशः जाणवतं. ‘सरदार उधम’ मात्र देशभक्तीचा आक्रोश, कोलाहल मांडत नाही, तर आपल्या इतिहासातल्या एका काळ्या, दुखर्‍या घटनेची वस्तुनिष्ठ आठवण करून देतो आणि तसं करता करताच आपल्यातल्या हळव्या देशभक्ताला साद घालतो. त्यात द्वेषाचा लवलेशही नाही.

हेही वाचा: 

एक कवी दुसऱ्या कवीला पत्र लिहितो तेव्हा

'लाल श्याम शाह' हे पुस्तक मी का लिहिलं?

नदीष्ट : माणूस आणि नदी यांचा समांतर प्रवास

गांधी का मरत नाही: खरा इतिहास बघण्याचा चष्मा!

सरकारच्या झटक्यात निर्णय घेण्यामुळे थंडावलेत गुंतवणूकदार

दाढी वाढवून गुरुदेव होता येत नाही आणि खादी वापरून महात्मा

(दैनिक पुढारीच्या बहार पुरवणीतून साभार)