हिमंता बिस्वा सरमा: सत्तेच्या महत्त्वाकांक्षेनं त्यांना मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर बसवलं

१८ मे २०२१

वाचन वेळ : ६ मिनिटं


सत्तेची पराकोटीची महत्त्वाकांक्षा म्हणजे हिमंता बिस्वा सरमा. वयाच्या २२ व्या वर्षी त्यांनी आपल्या पत्नीला ‘मी आसामचा मुख्यमंत्री होईन’, असं सांगितलं होतं. आज ईशान्य भारतात आठही राज्यं भाजप किंवा भाजप आघाडीच्या ताब्यात आहेत. या यशाचा सूत्रधार सरमा हेच आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी २०१४ पासून देशभर अनेक काँग्रेसचे नेते भाजपमधे आयात केले. त्यांना मंत्रिपदंही दिली. पण मुख्यमंत्रिपद दिलं नव्हतं. आता मात्र काँग्रेमधून भाजपमधे येऊन अवघ्या सहा वर्षांत मुख्यमंत्रिपदावर विराजमान होण्याचा चमत्कार हिमंता बिस्वा सरमा यांनी केलाय.

नुकत्याच झालेल्या आसामच्या विधानसभा निवडणुकीत दुसर्‍यांदा भाजप आघाडीला बहुमत मिळालं. त्यानंतर सरमा यांच्या शिरावर मुख्यमंत्रिपदाचा मुकुट ठेवला गेला. आधीचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल हे लोकप्रिय होते. सीएसडीएस या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणांमधे सोनोवाल यांची सरमा यांच्यापेक्षा दुपटीने अधिक लोकप्रियता दिसली होती.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचंही त्यांना पाठबळ होतं. पण शेवटी मुख्यमंत्रिपदाची माळ ५२ वर्षीय सरमा यांच्याच गळ्यात पडली. ते विजय रूपानी किंवा मनोहरलाल खट्टर यांच्यासारखे अंगठ्याखाली राहणारे व्यक्तिमत्त्व आहेत म्हणून ही निवड झाली नाही. तर त्यांना मुख्यमंत्री करण्याशिवाय पर्याय शिल्लक राहिला नव्हता हे खरं कारण आहे.

सरमांमुळे भाजपला यश

गेल्या सहा वर्षांत सरमा यांनी आसामच नाही तर ईशान्य भारतातल्या सर्व राज्यांमधे भाजपला जे राजकीय यश मिळवून दिलंय ते पाहिल्यावर त्यांना मुख्यमंत्री करण्याशिवाय पर्याय का नव्हता याचा उलगडा होतो. सरमा म्हणजे उत्तम संघटन कौशल्य असणारा नेता.

२०११ च्या विधानसभा निवडणुकीत तरुण गोगोई यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसला तिसर्‍यांदा सत्ता मिळाली. त्यामधे सरमा यांचा सिंहाचा वाटा होता. त्यामुळेच तरुण गोगोई यांना हटवून आपल्याला मुख्यमंत्री करावं, अशी मागणी काँग्रेस नेतृत्वाकडे करण्याइतपत त्यांचा आत्मविश्वास वाढला होता.

बंड करून ते २०१५ ला भाजपमधे आले ते काँग्रेसला मोठं भगदाड पाडूनच. त्यामुळे २०१६ ला भाजपला आसाममधे केवळ मोदींच्या करिष्म्यावर विजय मिळाला नसता. त्याला सरमा यांच्या संघटनात्मक ताकदीची आणि त्यांच्या वैयक्तिक लोकप्रियतेची जोड होती. हा ईशान्य भारतात भाजपला मिळालेला पहिला विजय होता, म्हणून भाजपसाठी अत्यंत महत्त्वाचा.

हेही वाचा: एका वायरसने जग कसं हादरवलं?

ईशान्येतल्या यशाचे सूत्रधार

सरमांचं राजकीय कौशल्य पाहून त्यांना ‘ईशान्य लोकशाही आघाडी’ म्हणजे नेडा या ईशान्य भारतातल्या भाजप आणि मित्रपक्षांच्या आघाडीचं संयोजकपद देण्यात आलं. त्यानिमित्ताने सरमा यांनी संपूर्ण ईशान्य भारतावर आपला ठसा उमटवला. ‘काँग्रेसमुक्त भारताचं’ भाजपचं स्वप्न ईशान्य भारतात त्यांनी पूर्ण केलं. त्यासाठी अरुणाचल प्रदेशमधलं काँग्रेस सरकार त्यांनी ‘ऑपरेशन कमळ’ करून पाडलं.

मणिपूरमधे निवडणुकीत सर्वात जास्त जागा काँग्रेसला मिळाल्या असतानाही काँग्रेसला सरकार स्थापन करू दिलं नाही. आज ईशान्य भारतात आठही राज्यं भाजप किंवा भाजप आघाडीच्या ताब्यात आहेत. अशा सत्तासुखाची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने कधी स्वप्नातही कल्पना केलेली नसावी. या यशाचे सूत्रधार हिमंता बिस्वा सरमा हेच आहेत.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ईशान्य भारतातल्या २४ पैकी तब्बल १७ जागा भाजपला मिळाल्या. निवडणुकीच्या काही काळ आधी सीएए म्हणजेच नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधातल्या आंदोलनाची ठिणगी पहिल्यांदा आसाममधेच पडली होती. त्यामुळे त्याचा फटका भाजपला बसेल का अशी शंका होती.

पण हिमंता बिस्वा सरमा यांनी त्यावर मात केली. या निवडणुकीत त्या आंदोलनाचा परिणाम म्हणून निर्माण झालेले पक्ष रिंगणात असतानाही त्याचा फटका भाजपला बसला नाही. याचं श्रेय सरमा यांच्या रणनीतीला जातं.

अव्वल दर्जाचे प्रचारकही

याशिवाय विचारधारेची लवचिकता सरमा यांनी कायम ठेवली आहे. त्यांची राजकीय सुरवात ‘आसू’ या विद्यार्थी संघटनेपासून झाली. ही संघटना १९८० च्या दशकातल्या आसामी अस्मितेच्या आंदोलनात मध्यवर्ती होती. याच आंदोलनातून ‘असोम गण परिषद’ या पक्षाचा उदय झाला. पण सरमांनी मात्र काँग्रेसची वाट धरली.

त्यानंतर भाजपची विचारधारा त्यांनी इतकी सहजगत्या अवगत केली की, २०१४ च्या निवडणुकीत हिंदुत्वाच्या गुजरात मॉडेलची सभांमधून निर्भर्त्सना करणारे हिमंता बिस्वा सरमा, धार्मिक ध्रुवीकरणाचा मंत्र अनेक वर्ष भाजपमधे काढलेल्या नेत्यांपेक्षा अधिक निष्ठेने वापरू लागले.

आसामी अस्मितेचं राजकारण हे बंगाली भाषिक हिंदू तसंच मुस्लिमविरोधी आहे. याला छेद देत सरमा केवळ मुस्लिम विरोध करतात. कारण तेच भाजपच्या राजकारणाला अनुकूल आहे. त्यामुळे साखर दुधात जितक्या सहजपणे विरघळते तितक्याच सहजपणे ते संघ-भाजपचे भाग आहेत. संघ शाखेत प्रशिक्षण घेतलेलं नसतानाही सरमा अव्वल दर्जाचे ‘प्रचारक’ झालेत.

हेही वाचा: नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला का विरोध केला पाहिजे?

सत्तेची महत्त्वाकांक्षा

काँग्रेसमधे असताना मुख्यमंत्रिपदासाठी बंड करणारा नेता, त्याच्या आकांक्षा पूर्ण केल्या नाहीत तर भाजपमधे दीर्घकाळ शांत राहणार नाही, हे स्वतः पराकोटीच्या महत्त्वाकांक्षी असणार्‍या मोदी-शहांना चांगलं माहीत आहे. या निवडणुकीत कोणालाही मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून पुढे आणण्यात आलं नव्हतं. तेव्हाच स्पष्ट झालं होतं की, पुन्हा सत्ता आली तर हिमंता बिस्वा सरमा हेच मुख्यमंत्री असतील.

सत्तेची पराकोटीची महत्त्वाकांक्षा म्हणजे हिमंता बिस्वा सरमा. वयाच्या २२ व्या वर्षी त्यांनी आपल्या पत्नीला ‘मी आसामचा मुख्यमंत्री होईन’, असं सांगितलं होतं. १९९६ ला पहिल्या निवडणुकीत ते पराभूत झाले. तीही निवडणूक त्या काळी मोठं नाव असणारे भृगूकुमार फुकन या ‘असोम गण परिषद’च्या नेत्याविरुद्ध काँग्रेसचा उमेदवार म्हणून ते लढले.

त्यांची राजकीय कारकीर्द मात्र त्यापूर्वीच १९९४ ला सुरू झाली होती. तेव्हाचे काँग्रेसचे मुख्यमंत्री हितेश्वर सैकिया यांनी ते अध्यक्ष असलेल्या विद्यार्थी आणि युवकांच्या संदर्भातल्या समितीवर सरमा यांना सचिव म्हणून घेतलं होतं. २००१ ला ते ज्या जालूकबारी मतदारसंघातून पराभूत झाले होते, तिथूनच फुकन यांना पराभूत करून ते विजयी झाले. तेव्हापासून आजपर्यंत या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत आहेत.

मुख्यमंत्रिसाठी काँग्रेस सोडली

लगेचच २००२ ला मुख्यमंत्री तरुण गोगोई यांनी त्यांना मंत्रिपद दिलं. त्यांचा कामाचा आवाका पाहून त्यांना उत्तरोत्तर महत्त्वाची मंत्रिपदं दिली गेली. गोगोई यांची सावली म्हणूनच त्यांचा वावर होता. ते गोगोईंचे अत्यंत विश्वासू सहकारी होते. पण तरुण गोगोई यांनी आपले चिरंजीव गौरव गोगोई यांना पुढे आणायला सुरवात केली. त्यामुळे सरमा अस्वस्थ झाले असं सांगितलं जातं. पण ते अर्धसत्य आहे.

सरमांचा डोळा मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर होता. आणि ते त्यांनी कधी लपवून ठेवलं नव्हतं. २०१३ ला गोगोई यांना मुख्यमंत्रिपदावरून हटवावं, अशी मागणी करणार्‍या ७९ पैकी ३१ आमदारांच्या सहीचं पत्र त्यांनी काँग्रेस नेतृत्वाकडे दिलं होतं. हा दोघांमधला वाद सोडवणं दिसतं तेवढं सोपं काम नव्हतं.

नेतृत्वाचा गोगोई यांच्याकडे असलेला कल आणि २०१४ मधे राष्ट्रीय राजकारणातलं परिवर्तन पाहून बदलणार्‍या वार्‍याचा वेध सरमा यांनी घेतला आणि ते भाजपवासी झाले. त्यांच्या भाजप प्रवेशाला सर्बानंद सोनोवाल आणि केंद्रीय मंत्री किरेन रिजीजूू यांचा विरोध होता. पण सरमा यांची उपयुक्तता आणि उपद्रवमूल्य पाहून सरमांचं भाजप नेतृत्वानं स्वागत केलं.

हेही वाचा: स्वर्गातल्या वडलांना येस पप्पा म्हणणाऱ्या, जॉनी बिअरस्टोची गोष्ट

उत्तम प्रशासन, मीडिया नरेटिवही

हिमंता बिस्वा सरमा यांनी मुख्यमंत्री होण्याआधीच राज्याच्या राजकारणावर मजबूत पकड बसवली. किंबहुना त्यामुळेच ते मुख्यमंत्रिपदी बसलेत. २००२ पासूनच आरोग्य, शिक्षण, नियोजन आणि अर्थ अशा महत्त्वाच्या खात्यांचा त्यांनी कारभार सांभाळला आहे. आसाममधे आपल्या कारकिर्दीत तब्बल आठ मेडिकल कॉलेज त्यांनी सुरू केली.

निवडणुकीदरम्यान ‘मास्क घालायची गरज नाही, कोरोना संपला आहे’, असं वादग्रस्त विधान त्यांनी केलं होतं. पण आरोग्यमंत्री म्हणून मागच्या वर्षी कोरोनावरच्या उपाययोजनांचं अत्यंत उत्तम नियोजन त्यांनी केलं. त्यांचा सल्ला केंद्र सरकारने घेतला असता तर कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने जो हाहाकार माजवला आहे तो कदाचित टाळला गेला असता.

महिलांसाठी त्यांनी प्रभावी कल्याणकारी योजना राबवल्या आहेत. नीतिशकुमार यांनी महिला मतदारवर्ग आपल्या पाठीशी उभा केला, तेच मॉडेल सरमा आसाममधे राबवत आहेत. २००२ पासून मंत्रिपदी असल्यामुळे त्यांची प्रशासनावर पकड आणि वचक आहे.

दिल्ली आणि आसामधल्या मीडियाने त्यांची लार्जर दॅन लाईफ प्रतिमा तयार केली आहे. आसाममधला एक मीडिया ग्रुप त्यांच्या पत्नीच्याच मालकीचा आहे. त्यामुळे उत्तम प्रशासन आणि त्याला साजेसं मीडिया ‘नरेटिव’ याचा प्रभावी मेळ त्यांनी घातलाय.

ईशान्येकडच्या राजकारणावर छाप

भारतातले अनेक प्रभावी राजकारणी क्रिकेट मॅनेजमेंटमधे दिसतात. सरमा त्याला अपवाद नाहीत. २००२ पासून ते आसाम क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष आहेत. बॅडमिंटन असोसिएशनचेही अध्यक्ष आहेत. आसाममधे सत्तेचं असं एकही केंद्र नाही, जिथे हिमंता बिस्वा सरमा यांचा प्रभाव नाही.

भाजप अंतर्गत गवर्नन्स आणि राजकारणाचं स्वतःचं एक मॉडेल हिमंता बिस्वा सरमा उभे करतील हे निश्चित. भाजपमधे त्यांना शह देऊ शकेल, असा सोनोवालसह एकही नेता नाही. तो तेे निर्माण होऊ देणार नाहीत.

राजकारणात पोकळी राहत नाही. त्यामुळे विरोधी पक्षातून त्यांना विरोध करणारा चेहरा भविष्यात पुढे येईलही. पण येत्या २०-३० वर्षांत केवळ आसामच नाही तर ईशान्य भारताच्या राजकारणावर बरी-वाईट अशी अमिट छाप हिमंता बिस्वा सरमा निर्माण करतील यात शंका नाही.

हेही वाचा: 

राजकारणाची भाषा आणि भाषेचं राजकारण

हिंदी पत्रकारितेनं हिंदी भाषिक प्रदेशांना अंधारात ठेवलंय!

कर्नाटकच्या निकालाचा महाराष्ट्रातल्या ठाकरे सरकारसाठी धडा काय?

लोक म्हणतील पोलिस असे असतात, वकील तसे असतात. पण मुद्दा तो नाहीच

'तुम्हीच आहात बलात्कारी' असं सांगणारं गाणं जगाचं बलात्कार विरोधी गीत झालंय!