हिरो बदलणारी यंदाची आयपीयल

०९ ऑक्टोबर २०२०

वाचन वेळ : ७ मिनिटं


यंदाच्या आयपीयलमधे अनेक दमलेले वाघ ही ग्लॅमरस रणभूमी सोडतील. यात काही बॅट्समन असतील तर काही बॉलर. पण, याचबरोबर याच हंगामात संजू सॅमसन सारखे अनेक तरूण खेळाडू या दमलेल्या वाघांकडून भारतीय क्रिकेटची बॅट आपल्या हातात घेवून नव्या जोमानं, नव्या स्टाईलनं वेगात धावताना दिसताहेत. त्यांनी आपणच पुढे भारतीय क्रिकेटमधले हिरो असणार आहोत याची झलक दाखवायला सुरवात केलीय.

यंदाचा हा आयपीयलचा १३ वा हंगाम आहे. आयपीएलची सुरवात धोनीनं भारताला पहिला टी २० वर्ल्डकप जिंकून दिला त्याच्या पुढच्याच वर्षापासून म्हणजे २००८ पासून झाली. त्यावेळी धोनी, युवराज, गंभीर, जडेजा, रैना, अश्विन हे बदलत्या भारतीय क्रिकेटचे उगवते तारे होते. तर सचिन, सेहवाग, गांगुली, द्रविड, कुंबळे हे आपल्या उतरणीला लागले होते. आयपीयलच्या टीमचं कॉम्बिनेशन ठरलं त्यावेळी टीममधे फक्त ४ विदेशी खेळाडू असतील आणि इतर भारतीय खेळाडू असतील असं ठरलं. यामुळे भारतीय तरूण खेळाडूंना अधिक संधी मिळाली. भारताला बुमराह, जडेजा, चहल, कुलदीप यादव अशी क्रिकेटची नवी पिढी मिळाली.

आयपीयलचं एक तप पूर्ण झालं. आता भारतीय क्रिकेटच्या आयपीयलरुपी मंथनातून अजून काही रत्न बाहेर पडत पडताहेत. २०२० च्या आयपीयलमधे जुन्या हिरोंना अखेरचा निरोप देण्याची प्रक्रिया सुरु झाली. याचं उत्तम उदाहरण म्हणजे महेंद्र सिंह धोनी. या पिवळ्या सिंहाला चाहत्यांनी पहिल्यांदाच दमून धापा टाकताना पाहिल्या त्यावेळी आता निरोपाची वेळ आली या भावनेनं त्यांच्या काळजात धस्स झालं. पण, राजस्थान रॉयल्सकडून खेळणाऱ्या संजू सॅमसनची सुधारलेली बॅटिंग आणि चौफेर फटकेबाजी पाहून त्यांच्या चेहऱ्यावर पोकळी भरुन निघणार याचं समाधानही झळकलं. 

यंदाच्या आयपीयलमधे अनेक असे दमलेले वाघ ही ग्लॅमरस रणभूमी सोडतील. यात काही बॅट्समन असतील तर काही बॉलर. पण, याचबरोबर याच हंगामात संजू सॅमसन सारखे अनेक तरूण खेळाडू या दमलेल्या वाघांकडून भारतीय क्रिकेटची बॅट आपल्या हातात घेवून नव्या जोमानं, नव्या स्टाईलनं वेगात धावताना दिसत आहेत. त्यांनी आपणच पुढे भारतीय क्रिकेटमधले हिरो असणार आहोत याची झलक दाखवायला सुरवात केलीय.

हेही वाचा : आयपीएलच्या तपाची कहाणी : थोडी मिठी, जास्त खट्टी

बॅटिंगमधलं भारताचं भविष्य

शुभमन गिल

गेल्या काही वर्षांपासून १९ वर्षाखालच्या वर्ल्डकप टीममधे भारतीय क्रिकेट रसिकांची रुची वाढलीय. कारण त्यांना या  टीममधे भारतीय वरिष्ठ टीमचं भविष्य दिसतं. असंच एक भविष्य म्हणजे शुभमन गिल. त्याने २०१८ च्या १९ वर्षाखालच्या वर्ल्डकपमधे १०४.५० च्या सरासरीने ४१८ धावा केल्या होत्या. त्याचवेळी तो लाईम लाईटमधे आला होता. यंदाच्या आयपीयलमधे हा कोवळा बॅट्समन परिपक्व झाला. 

तो सहसा तिसऱ्या क्रमांकावर बॅटिंग करतो पण, यंदाच्या हंगामात त्याने केकेआरकडून सलामी द्यायला सुरवात केलीय. याचा त्याला फायदाच झाला. त्याने सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध ७० धावांची नाबाद खेळी करत आपण लंबी रेस का घोडा आहोत हे सिद्ध करुन दाखवलं. २१ वर्षाच्या या शैलीदार बॅट्समनने जे टेंप्रामेंट या आयपीयलमधे दाखवलंय, त्यावरुन त्याची मोठ्या धावा करण्याची भूक दिसून येते.

संजू सॅमसन

संजू सॅमसन अंडर १९ मधून पुढे आलेला खेळाडू आहे. हे नाव भारतीय क्रिकेट वर्तुळात गेल्या अनेक वर्षापासून चर्चेत असलं तरी त्याच्या बॅटिंगला खरा बहर आला तो २०२० च्याच आयपीयलमधे. एखादं झाड खूप मोठं होतं पण, त्याला फळं लागत नसतील तर आपला हिरमोड होतो. तसंच काही संजूच्या बाबतीत झालं. संजूने २०१२ मधे आयपीयल पदार्पण केलं त्यावेळी तो १८ वर्षांचा होता. पण, त्याच्या बॅटिंगला आता कुठे फळं लागायला सुरवात झालीय. 

यंदाच्या आयपीयलमधे त्याने 'बॅक टू बेसिक' जात पुस्तकातल्या क्रिकेटिंग शॉट्सवर जास्त भर देत त्याच्याच एक्स्टेंशनवर भर दिला. सॅमसनने आपल्या बॅटिंगमधे बदल करत आडवे फटके मारणं बंद केलं. तो आता कवर ड्राईव, स्ट्रेट ड्राईव हेच फटके मारतो फक्त ते फटके तो पुढे एक्स्टेंड करतो त्यामुळे लिलया सिक्स मारला जातो. याचा फायदा म्हणजे बाद होण्याचा धोका कमी आणि इनिंग मोठी होण्याची शक्यता जास्त. याची प्रचिती त्याला यंदाच्या हंगामाच्या पहिल्या दोन मॅचमधे आली. त्यामुळे त्याची भारतीय टीममधली वापसीची चर्चा पुन्हा जोर धरु लागलीय.

देवदत्त पडिक्कल

मुळचा केरळचा असणारा पण कर्नाटकच्या टीमकडून खेळणाऱ्या अवघ्या २० वर्षाच्या या आरसीबीच्या ओपनरने आपल्या पदार्पणाच्या पहिल्याच मॅचमधल्या पहिल्याच फटक्याने आपल्याकडे लक्ष वेधून घेतलं. या डावखुऱ्या बॅट्समनची उंची, अंगकाठी आणि बॅटिंग स्टाईल पाहून अनेकांना युवराजचीच आठवण झाली. त्याने पहिल्याच आयपीयलमधे पहिल्या चार मॅचमधे ३ हाफ सेंच्युरी ठोकत आपली टीममधली जागा पक्की केली. त्याची बॅटिंग पाहताना आत्मा तृप्त होतो. त्याच्या ऑफसाईड आणि लेगसाईड दोन्ही बाजू मजबूत वाटतात. 

तो त्याच्या उंचाचाही पूल मारण्यासाठी चांगला फायदा करुन घेतो. त्यामुळे हा खेळाडू भारताची भविष्यातली ओपनिंगची जागा भरुन काढण्याची क्षमता ठेवतो. तसंही ३४ वर्षाच्या शिखर धवनच्या कारकिर्दीला आता उतरती कळा लागेल. त्याला देवदत्त पडिक्कल हा चांगला पर्याय ठरु शकतो. पण, टीममधे ओपनर म्हणून चांगलीच चुरस आहे. सध्यातरी रोहित शर्मा, मयांक अग्रवाल, केएल राहुल, पृथ्वी शॉ, शिखर धवन असे अनेक पर्याय भारताकडे आहेत. देवदत्त पडिक्कलने सध्यातरी बेंच स्ट्रेंथ अजून तगडी केली आहे.

इशान किशन

झारखंडचा इशान किशन तसा २०१६ पासून आयपीयल वर्तुळात वावरत आहे. पण, त्याचा खेळ यंदाच्या आयपीयलमधे मुंबई इंडियन्स कडून खेळताना खुलला. त्याने आयपीयलमधे आतापर्यंत ४ हाफ सेंच्युरी ठोकली आहेत. इशान किशन हेही अंडर १९ चे फायडिंग आहे. त्यानंतर त्याला आयपीयलमधे संधी मिळाली आणि आता तो आयपीयलच्या अवकाशात चमकत आहे. विशेष म्हणजे धोनीच्या राज्यातून आलेला हा इशान विकेट किपरही आहे. 

त्याने भारतीय टीममधे स्थान पक्कं करण्यासाठी धडपडणाऱ्या ऋषभ पंत आणि संजू सॅमसनला चांगलीच टक्कर देत त्यांची झोप उडवलीय. त्याने यंदाच्या हंगामात टीममधे क्विंटन डिकॉक सारखा आंतरराष्ट्रीय दर्जाचा विकेटकिपर असतानाही अंतिम ११ च्या टीममधे स्थान मिळवलं. त्याने आरसीबी विरुद्ध ९९ धावांची तुफानी खेळी करत या संधीचं सोनं केलं. त्याची ही खेळी पाहून भारताला अजून एक आक्रमक डावखुऱ्या फलंदाजाचा पर्याय उपलब्ध झाला आहे असे म्हणायला हरकत नाही.

हेही वाचा : जगातल्या सगळ्यात मोठ्या दुर्गुणाविरुद्ध क्रिकेटनं एका हत्यारासारखं काम केलं

२०२० मधे फिरकी अष्टपैलूंचा उदय

भारताकडे गेल्या काही वर्षांपासून बॅट्समन जो जोरदार बॉलिंगही करु शकतो असे बरेच अष्टपैलू खेळाडू होऊन गेले. पण, फिरकीची खाण असलेल्या भारताला स्पिनर जो चांगली बॅटिंग करु शकतो असे त्या तुलनेने कमी अष्टपैलू मिळाले. पण, यंदाची आयपीयल त्याला अपवाद ठरलीय. यंदाच्या आयपीयलमधे अभिषेक शर्मा आणि अब्दुल समद यासारखे काही उद्योन्मुख खेळाडू आपली चमक दाखवत आहेत.

अब्दुल समद

जम्मू काश्मीरचं हे तरूण रक्त अवघ्या १८ वर्षांचं आहे. पण, त्याने कमी वयातच सर्वांचं आपल्याकडे लक्ष वेधलं. त्याने मुंबई इंडियन्सची शान असलेल्या बुमराहला दोन सिक्स मारलेले पाहिल्यानंतर हा पोरगा मोठी झेप घेणार अशी खात्री पटते. या स्फोटक बॅटिंगच्या जोडीला त्याच्याकडे लेग स्पिनचं अस्त्रही आहे. हा उंचपुरा लेग स्पिनर पाहिला की, अनिल कुंबळेचीच आठवण होते.

या उंचीचा त्याला आपल्या बॅटिंग आणि बॉलिंगमधेही चांगला फायदा होण्याची शक्यता आहे. त्याच्या कोचच्या म्हणण्यानुसार त्याची शैली क्रिकेटच्या सगळ्या फॉरमॅटमधे फिट होईल अशी आहे. आता त्याने आयपीयलच्या फक्त ३ मॅच खेळल्या आहेत. पण, या तीन मॅचमधे त्याने आपल्यातल्या गुणवत्तेची झलक दाखवून दिली.

अभिषेक शर्मा

भारताकडे डावखुरा स्पिन बॉलर जो बॅटिंग करु शकतो असा एक अष्टपैलू खेळाडू आहे. रविंद्र जडेजा जो भारतीय टीममधे आपलं स्थान टिकवून आहे. भारतीय टीममधे त्याचा प्रामुख्याने रोल हा बॉलिंगचा आहे पण त्याची बॅटिंग आता कुठे बहरत आहे. याचा टीमला वेळोवेळी फायदा झालाय. असाच एक जडेजा सध्या आयपीयलमधे आपलं नाणं खणखणीत वाजवून दाखवतोय.

सनराईजर्स हैदराबादकडून खेळणाऱ्या या डावखुऱ्या बॅट्समनने प्रियम गर्गबरोबर दमदार भागिदारी करत आपल्या बॅटिंगची झलक दाखवली. याचबरोबर सनरायझर्सच्या फूल पॅक फिरकी विभागात त्याने आपल्या डावखुऱ्या बॉलिंगने वैविध्य आणलंय. २० वर्षाचा हा अष्टपैलू २०१८ पासून आयपीयलमधे खेळतो. हाही अंडर १९ च्या भारताच्या टीममधून चमकलेला तारा आहे. त्याच्याकडेही भविष्यातला अष्टपैलू खेळाडू म्हणून पाहिलं जातंय.

फिरकीच्या परंपरेची नेक्स्ट जनरेशन

भारताला फिरकीची समृद्ध परंपरा आहे. याच परंपरेचा वारसा पुढे नेण्यासाठी आपल्याला २०२० च्या आयपीयलमधे काही स्पिनर मिळाले आहेत. सध्या क्रिकेट जगतात लेग स्पिनर्सची चलती आहे. त्यामुळेच प्रत्येक टीममधे लेग स्पिनर्सचा सुळसुळाट झालाय. यातून आपली छाप पाडून लोकांचं लक्ष वेधनं हे कठिण काम. पण, हे करुन दाखवलं ते रवी बिष्णोई आणि वरुण चक्रवर्ती या दोन लेगींनी. पण, वरुण चक्रवर्तीचा हा आयपीयलचा पदार्पणाचा हंगाम असला तरी त्याचं २९ हे वय त्याला भारतीय टीममधे स्थान मिळवून देण्यासाठी आडकाठी करेल असं वाटतं त्यामुळे भविष्यासाठी रवी बिष्णोईवरच फोकस राहील असं दिसतं.

राजस्थानचा रवी बिष्णोई हा आयपीयलमधे दिल्ली कॅपिटलकडून खेळतो. त्याचा हा पहिलाच आयपीयल हंगाम आहे. तसं बघायला गेलं तर आजकाल प्रत्येक टीममधे लेग स्पिनर्सचा भरणा आहे. पण, रवी बिष्णोईने आपलं वेगळेपण पदार्पणातच दाखवून दिलंय. सहसा लेग स्पिनर्स बॉलवर नियंत्रण ठेवता यावं यासाठी क्रिजकडे हळूवार धावत येतात पण, रवी बिष्णोई क्रिजकडे वेगात धावत येतो तरीही त्याचं बॉलवरचं नियंत्रण कमालीचं चांगलं आहे. याचा त्याला स्पिन होण्यात फायदा होतोच. पण, त्याचा गुगली या रन अप मुळे जास्त घातक ठरतो कारण हा गुगली कधी आत घुसतो याचा पत्ताच लागत नाही. हा लेग स्पिनर आपला फिटनेस चांगला राखू शकला तर भारतासाठी मोठं योगदान देण्याची क्षमता त्याच्याकडे आहे.

हेही वाचा : लेडी सेहवाग शफालीचा सिक्सर पुरुषांनाही तोंडात बोट घालायला लावतो!

त्यागी, नागरकोट्टी, मावी एक्सप्रेस सुसाट

मुंबई इंडियन्स विरुद्ध खेळताना राजस्थान टीमकडून एका तरूण तेज बॉलरनं पदार्पण केलं. तो १८ वर्षाचा तरूण बॉलर म्हणजे कार्तिक त्यागी. या कार्तिकने आपल्या पहिल्याच सामन्यात बाऊन्सरवर यंदाच्या हंगामात भरात असलेल्या क्विंटन डिकॉकला बाद केलं. बाऊन्सरवरची ती आयडीयल विकेट होती. त्यामुळे हा बॉलर आपल्या पहिल्याच मॅचमधे चर्चेत आला. १९ वर्षाखालच्या भारतीय टीममधे चमक दाखवणाऱ्या या तरूण तेज बॉलरला आयपीयलची दारं लगेच उघडली. त्यानेही या संधीचा फायदा घेत आपल्या क्षमतेची चुणूक दाखवली.

कार्तिक बरोबरच केकेआरचे दोन तरूण बॉलर कमलेश नारकोटी आणि शिवम मावी हेही या आयपीयलच्या हंगामात चर्चेत आले. या दोघांनी यंदाच्या हंगामात केकेआरच्या विजयात निर्णयाक भुमिका बजावली. अंडर १९ च्या वर्ल्डकपमधे चमक दाखवणाऱ्या या तरूण जोडगोळीला केकेआरने २०१८ लाच आपल्या चमूत सामील करुन घेतलं. आता ही जोडगोळी केकेआरला त्याचे रिझल्ट देतेय. दोघांची बॉलिंगची शैली ही एकमेकांना पूरक आहे. 

कमलेशकडे वेग आहे तर शिवम मावीकडे स्विंग आणि वेरिएशन आहेत. त्याचा टप्पाही अचूक आहे. यामुळे ते दोघेही जोडीने शिकार करणे पसंत करतात. याची प्रचिती आपल्याला यंदाच्या आयपीयलमधे केकेआरच्या कामगिरीत येत आहे. यंदाच्या आयपीयलच्या पहिल्या सत्रात तरी या तरूण खेळाडूंनी आपली छाप पाडत आपणच भारताचे उगवते तारे आहोत हे दाखवून दिलंय. पण, ही आयपीयल आहे. इथे एका रात्रीत स्टार बदलतात, हिरोचा झिरो होतो आणि झिरोचा हिरो होतो. त्यामुळे आयपीयलच्या उत्तरार्धात या यादीत अजून काही नावं अॅड करावी लागतील हे नक्की.

हेही वाचा : 

टीम इंडियाच्या पराभवाला भारतीय चाहतेही जबाबदार

सिंगल-डबलची स्ट्रॅटेजी फेल आणि भारत वर्ल्डकप बाहेर

अपघाताने जन्माला आलेल्या वनडे क्रिकेटची आज पन्नाशी 

स्पर्श न करता खेळता येतं, म्हणून आपल्याकडे क्रिकेट वाढलं

महात्मा गांधींचं क्रिकेटशी नातं सांगणारे हे किस्से आपल्याला माहीत आहेत का?