शिवसेनेची संधी हुकल्याने हा असेल सत्तेचा सगळ्यात सोप्पा फॉर्म्युला

१२ नोव्हेंबर २०१९

वाचन वेळ : ५ मिनिटं


महाराष्ट्रातला सत्तापेचाला काल नवी कलाटणी मिळाली. ज्यांच्याकडे कुणी साधा विरोधी पक्ष म्हणूनही बघत नव्हतं त्यांच्यावरच आता किंग होण्याची जबाबदारी आलीय. ही वेळ भाजप, शिवसेनेमुळे आलीय. काँग्रेस, राष्ट्रवादीला सोबत घेऊन सत्तास्थापनेच्या शिवसेनेच्या बोलणीलाही काल खीळ बसली. आता काँग्रेस आघाडीकडे स्वतःहून नव्या काळातलं, नवं राजकारण उभारण्याची संधी आलीय.

गेल्या १९ दिवसांपासून सुरू असलेला महाराष्ट्रातला सत्तापेच काल सोमवारी संपेल असं वाटत होतं. पण सायंकाळी साडेसात वाजले आणि पुन्हा एकदा फिल्मी सस्पेन्स निर्माण झाला. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा पक्ष म्हणून शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी निमंत्रित केलं होतं. शिवसेनेने आपले सारे पत्ते बाहेर काढून आपले कट्टर विरोधक काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याशी बोलणी सुरू केली.

शिवसेना आणि भाजपचा काडीमोड

शिवसेना, भाजप यांनी एकमेकांशी काडीमोड घेतला. त्यामुळे शिवसेनेने पहिल्यांदाच काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे अधिकृतरित्या प्रस्ताव दिला. त्या प्रस्तावावर दोन्ही काँग्रेसकडून राज्यपालांनी शिवसेनेला दिलेल्या २४ तासांच्या मुदतीत कोणताच निर्णय झाला नाही. राष्ट्रवादी काँग्रेसने आपण महाआघाडी म्हणून काँग्रेससोबत निवडणूक लढवलीय. त्यामुळे आम्ही काँग्रेसचा निर्णय झाल्यावरच आम्ही आमचा निर्णय घेणार असल्याचं सांगितलं.

शिवसेनेने सत्तास्थापनेची इच्छा व्यक्त करतानाच आमदारांचं संख्याबळ जुळवण्यासाठी आणखी काही वेळ लागणार आहे. त्यामुळे मुदत आणखी वाढवून देण्याची मागणी राज्यपालांकडे केली. राज्यपालांनी यास नकार दिला. त्याच क्षणाला शिवसेनेचा गेम झाला, सेनेच्या पाठीत खंजीर खुपसल्याच्या ब्रेकिंग न्यूज मीडियात सुरू झाल्या. राज्यपालांनी शिवसेनेला मुदतवाढ नाकारतानाच तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष असलेल्या राष्ट्रवादीला सत्तास्थापनेसाठी आमंत्रित केलं.

शिवसेना ज्या पक्षांना सोबत घेऊन सरकार स्थापनेचा दावा करायला निघाली होती, त्यापैकीच एका पक्षाला निमंत्रण मिळालं. आणि इथेच सत्तास्थापनेचा नवा फॉर्म्युला जन्माला येऊ घातलाय. आणि आताच्या पेचप्रसंगात या फॉर्म्युल्याने सर्वसामान्य तोडगा काढता येऊ शकतो. त्यासाठी आपल्याला गेल्या वीसेक दिवसांपासूनच्या राजकीय गाठीभेटींकडे लक्ष द्यावं लागेल. याच काळात शिवसेनेची आपला मित्रपक्ष भाजपसोबतची बोलणी खरेखोटेपणावरून फिस्कटली.

हेही वाचाः …म्हणून आजच्या पिढीनं शेषन यांचा आदर्श समोर ठेवला पाहिजे!

शरद पवार आणि संजय राऊत यांच्या गाठीभेटी

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे यंदाच्या विधानसभा निवडणुकीतले किंगमेकर म्हणून समोर आलेत. या किंगमेकरसोबतच गेल्या दोन-तीन आठवड्यांपासून शिवसेनेचं मुखपत्र ‘सामना’चे कार्यकारी संपादक, खासदार संजय राऊत यांच्या गाठीभेटी सुरू आहेत. शिवसेनेने राऊत यांच्यावरच पक्षाची अधिकृत भूमिका मांडण्याची जबाबदारी दिली.

भाजपसोबत बोलणी सुरू असतानाच राऊत यांनी आपल्याकडे १७० आमदारांचं पत्र असल्याचा दावा केला होता. तो दावा त्यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीकडून काहीतरी शब्द मिळाल्याच्या जोरावरच केली असेल. पण काल सत्तास्थापनेचा दावा पेश करताना शिवसेनेला बहुमतासाठी आवश्यक असलेलं १४५ आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र सादर करता आलं नाही. राजभवनावर गेल्यावरही शेवटच्या क्षणापर्यंत काँग्रेस, राष्ट्रवादीकडून पाठिंब्याचं पत्र येईल, असं शिवसेनेला वाटत होतं. पण तसा काही झालं नाही.

मी पुन्हा येईन असं ओरडून सांगणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या पक्षाचं सरकारच येणार नसल्याचंही सांगायला मीडियासमोर आले नाहीत. तशीच काहीशी अवस्था शिवसेनेची झाली. निकाल लागल्यापासून पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार असं शिवसेनेकडून सांगितलं जात होतं. पण काल शिवसेना तोंडघशी पडली. काँग्रेस, राष्ट्रवादीच्या भूमिकेमुळेच शिवसेनेचा गेम झाल्याचा मेसेज सर्वसामान्यांमधे गेला.

काँग्रेस आघाडीची विश्वासार्हता धोक्यात

आता विरोधक संपणार, निवडणुकीच्या मैदानात समोर पैलवानच नाही, काँग्रेस-राष्ट्रवादीला वीसेक जागा मिळतील अशा चर्चा सुरू असताना सर्वसामान्य मतदारांनी या चर्चाच निकालात काढल्या. वीसेक जागांवर गुंडाळले जातील असं वाटत असताना काँग्रेस, राष्ट्रवादीला शंभरच्या घरात जागा मिळाल्या. या निकालाने शरद पवार, काँग्रेस यांनी मतदारांचा विश्वास कमावल्याचं दिसलं.

त्यामुळे शिवसेना, भाजपमधे मुख्यमंत्रीपदावरून कलगीतुरा रंगलेला असताना दोन्ही काँग्रेसकडे सावध पावल टाकली जात होती. मतदारांनी आम्हाला विरोधात बसण्यासाठी कौल दिलाय, असं सांगितलं जातं होतं. निकालातून कमावलेल्या मतदारांच्या विश्वासाला तडा जाऊ द्याचा नाही, अशीच पावलं काँग्रेस आघाडीकडून टाकली जात असल्याचं दिसलं. पण कालच्या प्रसंगामुळे काँग्रेस आघाडीच्या या सगळ्या सावध भुमिकेलाच तडा बसताना दिसतोय.

शरद पवार बोलतात एक आणि करतात दुसरं ही त्यांची कात्रजचा घाट दाखवण्याची प्रतिमा खरी असल्याचा मेसेज गेला. मोठ्या कष्टाने मिळवलेल्या यशाला एका झटक्यात गालबोट लागलं. आता या प्रसंगातून सावरण्यासाठीच काँग्रेस आणि राष्ट्रवादीला एक संधी मिळालीय. ती संधी म्हणजे राज्यपालांकडून मिळालेलं सत्तास्थापनेचं आमंत्रण.

हेही वाचाः शिवसेना-भाजपमधला सध्याचा पेच निव्वळ सत्तेपुरता नाही, तर

आता विन विन फॉर्म्युला काय?

लोकांनी भाजप आणि शिवसेना महायुतीला बहुमत दिलं. पण त्यांच्यातच फिफ्टी फिफ्टी सत्तावाटपावरून मतभेद झाले. कोण खरं, कोण खोटं या नैतिकेच्या मुद्दयावरून दोघांनाही कुठलाच मध्यममार्गी तोडगा काढता आला नाही. दोघांनीही विन विन फॉर्म्युला शोधला नाही, असं आपल्याला त्यांचं ३० वर्षांपासून रिलेशन एका झटक्यात तोडण्यावर म्हणता येतं.

सध्याची राजकीय परिस्थिती भाजप आणि शिवसेनेने मुख्यमंत्रीपदावरून तोडत ‘तुला ना मला, घाल कुत्र्याला’ या म्हणीसारखी झालीय. अशा परिस्थितीत लोकांनी विरोधी पक्ष म्हणून कौल दिलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादीकडे नव्याने विश्वासार्हता कमावण्याची संधी आहे. राजकारण हा अनैतिकतेचा व्यवहार असल्याचं आपल्याला वेळोवेळच्या घटनांवरून दिसतं. पण आता काँग्रेस आघाडीला राजकारण हा नैतिकतेचा व्यवहार असल्याचं सांगण्याची संधी स्वतःहून चालून आलीय.

नवं राजकारण उभारण्याची संधी

अडचणीत सापडलेल्या राज्यासाठी, लोककल्याणासाठी आम्ही शिवसेनेला पाठिंबा दिलाय. आमच्याकडे शिवसेनेने तसा प्रस्ताव दिला होता. त्यावर दोन्ही पक्षांत चर्चा सुरू असतानाच मुदत संपली. असं असलं तरी आता राष्ट्रवादी काँग्रेसला मिळालेल्या सत्तास्थापनेच्या दाव्यामुळे आम्ही तिन्ही पक्षांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतलाय. आम्हाला शिवसेनेनं प्रस्ताव दिला होता. त्यामुळे शिवसेनेच्या नेतृत्वात आम्ही सरकार स्थापन करणार असल्याचा प्रस्ताव काँग्रेस आघाडीने मांडायला हवा.

आणि हाच तिन्ही पक्षांसाठीचा विन विन फॉर्म्युला असू शकतो. काँग्रेस, राष्ट्रवादीने स्वतःच्या सत्तेसाठी प्रयत्न केल्यास त्यातून मतदारांमधे चुकीचे मेसेज जाऊ शकतात. कालपर्यंत शिवसेनेला पाठिंबा देण्याच्या तयारीत असणारे दोन्ही पक्ष आता स्वतःच सत्तास्थापन करायला निघालेत. शिवसेनेचा गेम करून ते असं करताहेत, हा मेसेज जनतेतं जाणं काँग्रेस, राष्ट्रवादीला नव्या काळातलं नवं राजकारण करण्यासाठी खूपच धोक्याच आहे.

भाजपकडून नव्या भारताची बांधणी सुरू असताना काळाने काँग्रेस, राष्ट्रवादीला नव्या काळातलं नवं नैतिक राजकारण उभारण्याची संधी दिलीय.

हेही वाचाः 

तर नितीन गडकरीच होतील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री!

तर वंचितला विधानसभा निवडणुकीत प्रचंड यश मिळालं असतं

मुख्यमंत्री कोणः राज्यपाल फक्त घोड्याला विहिरीपर्यंत नेऊ शकतात

शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार म्हणजे ‘तीन पायांचा तमाशा’