ज्यामधून एखाद्या जातसमूहाला अपमानित केलं जातं, नायकाची निंदानालस्ती केली जाते, ज्यातून इतिहासाची मोडतोड करून बदनामी केली जाते, ती गोष्ट सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली विकृतीच ठरते. अलिकडच्या काळात युगपुरुष, युगनायक असणार्या छत्रपती शिवाजीराजांवर आधारित चित्रपटांमधून ही विकृती सातत्याने समोर येताना दिसतेय. 'हर हर महादेव’ चित्रपट त्याचं ताजं उदाहरण आहे.
इतिहास हे जसं शास्त्र आहे तसंच ते आता राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक लढ्याचं शस्त्र झालेलं आहे. वर्चस्ववादासाठी इतिहासाचा वापर केला जातो, असं जगद्विख्यात नवमार्क्सवादी इतिहासकार अँतोनिओ ग्राम्सी सांगतात. ते म्हणतात, 'मोठ्या समुदायावर वर्चस्व प्रस्थापित करून त्यांना गुलाम बनवण्यासाठी त्यांच्या इतिहासाची सोयीनुसार मांडणी केली जाते.' त्यालाच ‘ग्राम्सी हेजिमिनी’ अशी संज्ञा वापरली जाते. यालाच प्रचलित भाषेत ‘धुरिणत्व’ असं म्हटलं जातं.
सांस्कृतिक धुरिणत्वातूनच सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक धुरिणत्वाकडे वाटचाल होते. म्हणून इतिहास हे जसं शास्त्र आहे तसंच ते सांस्कृतिक लढ्यातलं शस्त्रही आहे. त्यामुळे जगद्विख्यात विद्वान डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की, जो समाज आपला इतिहास विसरतो तो समाज कधीच आपला इतिहास घडवू शकत नाही. नाहीतर चुकीचा इतिहास सांगून गुलाम बनवलं जातं. त्यामुळे वास्तव इतिहास ज्ञात असणं अत्यावश्यक आहे.
हेही वाचा: लोकशाही मुल्यांमुळेच रयतेला शिवशाही हवीहवीशी
भारतीय परिप्रेक्ष्यात सातत्याने काहींनी सांस्कृतिक वर्चस्वासाठी इतिहासाची मोडतोड केलेली आहे, याबद्दल अनेक वेळा वादही झालेले आहेत. स्वातंत्र्योत्तर भारताने संसदीय लोकशाही स्वीकारली. अर्थातच संविधानिक हक्क, अधिकार आणि कर्तव्याची संधी आपल्याला मिळाली. आपले विचार लेखन, भाषण, वाचन, चित्रकला, तसंच कलाकृतीच्या माध्यमातून व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य आपल्याला मिळालं. त्याचाच एक भाग म्हणजे सिनेमॅटिक लिबर्टी होय.
लोकशाहीवर विश्वास असणारा प्रत्येक नागरिक ‘सिनेमॅटिक लिबर्टीचा’ समर्थकच आहे. आपण सिनेमॅटिक लिबर्टीचं स्वागतच केलं पाहिजे. चित्रपट अधिक प्रभावी होण्यासाठी काही विधायक मूल्य रुजवण्यासाठी सिनेमॅटिक लिबर्टीची गरजच असते. झुंड, जय भीम यांसारख्या चित्रपटांनी सिनेमॅटिक लिबर्टीचा विधायकतेसाठी उपयोग केला आहे.
अक्षय कुमारने भूमिका केलेल्या ‘पृथ्वीराज चौहान’ चित्रपटाबद्दल काही मतभिन्नता असू शकते. पण त्यामध्ये स्त्री स्वातंत्र्याचा पुरस्कार अनैतिहासिक असला तरी तो विधायक आहे. राजपुतांची मध्ययुगीन मानसिकता स्त्री स्वातंत्र्याची नव्हती. पण चित्रपटातला नायक पृथ्वीराज चौहान महाराणीला दरबारात सहभागी करून बोलण्याचं स्वातंत्र्य देतो आणि तो स्त्री स्वातंत्र्याचा पुरस्कार करतो. ही घटना नव्या पिढीला प्रेरणादायक आहे.
अशा सिनेमॅटिक लिबर्टीचा पुरस्कार करणं समाजहिताचं असतं. पण ज्यामधून एखाद्या जातसमूहाला अपमानित केलं जातं, नायकाची निंदानालस्ती केली जाते, ज्यातून इतिहासाची मोडतोड करून बदनामी केली जाते, ती गोष्ट सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली विकृतीच ठरते. सध्या चर्चेत असलेल्या ‘हर हर महादेव’ या चित्रपटात सिनेमॅटिक लिबर्टीचा पुरेपूर गैरवापर करून शिवचरित्राची यथेच्छ विटंबना केलेली दिसते.
शिवकाळात म्हणजेच मध्ययुगीन काळात शिवइतिहासाला मराठा कालखंड, मराठा इतिहास असंच संबोधलं जातं. अगदी आधुनिक काळाच्या ऐन भरातही राजारामशास्त्री भागवतांसारखे प्रागतिक विचारांचे अभ्यासक ‘मराठा’ असाच शब्द प्रयोग करतात. अगदी न्या. महादेव गोविंद रानडेही ‘राईज ऑफ दी मराठा पॉवर’ म्हणजेच मराठ्यांच्या सत्तेचा उत्कर्ष असाच उल्लेख करतात.
शिवरायांच्या राज्याभिषेकप्रसंगी जनतेला प्रचंड आनंद झाला. अफगाणिस्तानापासून बांगलादेशपर्यंत आणि जम्मू-काश्मीरपासून तामिळनाडूपर्यंत मोगलांचं राज्य असताना त्यांना प्रतिकार करून शिवरायांनी रयतेचं स्वराज्य निर्माण केलं. याचं वर्णन समकालीन कृष्णाजी अनंत सभासद ‘हा मर्हाटा पातशाहा येवढा छत्रपती झाला. ही गोष्ट काही सामान्य झाली नाही’ असं करतात.
कृष्णाजी अनंत सभासद ‘मराठी पातशाहा ’ म्हणत नाहीत; तर ‘मराठा पातशाहा ’ असं म्हणतात. राजाराम महाराजही सरदारांना पाठवलेल्या पत्रात म्हणतात ‘मराठा राज्याचं रक्षण करणं, हे तो स्वामीकार्य आहे.’ ते मराठी राज्य म्हणत नाहीत. म्हणजे समकालीन ‘मराठा’ राज्य असाच उल्लेख आहे.
हेही वाचा: महात्मा जोतीराव फुलेच पहिले शिवचरित्रकार आणि शिवजयंतीचे उद्गातेही
‘मराठा’ ही संकल्पना व्यापक आहे. ती जातिवाचक नसून ती समूहवाचक आहे. अठरापगड जाती बारा बलुतेदारांना ‘मराठा’ असं संबोधलं जायचं. समूहाला मराठा आणि भाषेला मराठी म्हटलं जायचं. पण ‘हर हर महादेव’ या चित्रपटात आणि अलिकडच्या अनेक चित्रपटात, लेखनात, बोलण्यात मराठी माणूस मराठी मुलूख असा शब्दप्रयोग केला जात आहे. मराठा ही व्यापक संकल्पना नष्ट करण्याचं हे षड्यंत्र आहे.
‘मराठा’ शब्दप्रयोग करण्यासाठी संकोच का? याबाबत न्यूनगंड का? ही समकालीन इतिहासाची मोडतोड आहे. हा मोठा अधिक्षेप आहे. राष्ट्रगीतातही ‘पंजाब सिंध गुजरात मराठा...’ असंच आपण म्हणतो. तिथं ‘मराठा’ हा शब्दप्रयोग जातिवाचक ठरत नाही, मग चित्रपटातच ‘मराठा’ शब्दप्रयोगाबद्दल वावडं का? मराठा शब्दप्रयोग बदलून त्याला मराठी करण्याचा अधिकार निर्माता दिग्दर्शकांना कोणी दिला.
छत्रपती शिवाजी महाराज युगपुरुष आहेत. ते युगनायक आहेत. त्यांनी अशक्य कार्य शक्य करून दाखवलं. औरंगजेबासारख्या कपटी, कारस्थानी बादशहाला न घाबरता त्याविरुद्ध लढा दिला. अफजलखानासारख्या दुष्टाला धडा शिकवला. जीव धोक्यात घालून शायिस्तेखानाला धडा शिकवला. आग्रा कैदेतून मोठ्या धैर्याने, कौशल्याने सुटका करून घेतली. लोककल्याणकारी राज्य निर्माण केलं. शिवाजी महाराज महानायक आहेत, पण अलिकडच्या काळात त्यांना सहनायक ठरवण्याचं षडयंत्र सुरू आहे. चित्रपटांच्या माध्यमातून त्यांना दुय्यम ठरवण्याचा प्रयत्न सुरू आहे.
बाजीप्रभू देशपांडे, तानाजी मालुसरे, हंबीरराव मोहिते, प्रतापराव गुजर, मुराजबाजी, जिवाजी महाले, शिवाजी काशिद, बहिर्जी नाईक, वीर बाजी पासलकर, कान्होजी जेधे महानच आहेत. त्यांच्या शौर्याला, त्यागाला, समर्पणाला तोड नाही, पण ते नायक आणि शिवाजी महाराज सहनायक असं ठरवणं महाअपराध आहे आणि तसा प्रयत्न सुरू आहे. ‘हर हर महादेव’ या चित्रपटात तो महाअपराध केलेला आहे.
बाजीप्रभू देशपांडेंची निष्ठा, शौर्य, त्याग बलिदान प्रेरणादायकच आहे, पण बाजीप्रभू शिवरायांविरूद्ध लढतात, ते सिद्दी जौहरकडे जातात, तेच शिवा काशिदांना घेऊन येतात, तेच शिवाजी महाराज पन्हाळ्यातून निसटण्याचं नियोजन करतात ही सर्व दृष्य जसा शिवरायांचा अवमान करणारी आहेत, तशीच ती बाजीप्रभूंच्या कार्यकर्तृत्वाचं भंजन करणारी आहेत.
बाजीप्रभू एकनिष्ठ होते. त्यांनी घौडखिंडीत शौर्य गाजवलं. ते प्रामाणिक होते. स्वराज्यनिष्ठ होते. पण ते आततायी, उथळ, उर्मट आणि शिवरायांच्या अंगावर धावून जाणारे नव्हते. तसं दाखवून निर्माता-दिग्दर्शकांनी जसा शिवरायांचा उपमर्द केला आहे, तसाच बाजीप्रभूंचाही उपमर्द केलेला आहे. बाजीप्रभूंबद्दल घृणा निर्माण व्हावी, असा हा चित्रपट आहे.
हेही वाचा: शिवरायांचं प्रतीक ही वारसदारांनी गमावलेली संधी
बाजीप्रभू महान होते. पण ते बांदलांचे नेते नव्हते, बांदलांच्या फौजेतले ते एक प्रामाणिक सैनिक होते. समकालीन जेधे शकावलीत अफजलखानाच्या भेटीप्रसंगी उल्लेख येतो की ‘कान्होजी नाईक जेधे जमावाशिंसी आणि बादल यांनी पारावरी चालोन घेऊन लस्करांत मारामारी केली, अगदी लस्कर बुडविले.’ यामधे बाजीप्रभूंचा उल्लेख नाही.
पन्हाळा सुटकेच्या प्रसंगी जेधे शकावलीत उल्लेख येतो ‘पनालिस यावरुन राजश्री स्वामी उतरोन खळवियांस गेले ते समई सिद्दी जोहार यांची फौज पाठीवरी आली। युद्धाची दाटी बहुत जाली तेव्हा बांदलाच्या लोकांनी युद्धाची शर्त केली. लोक स्वस्त झाले. बाजीप्रभु देश कुळकर्णी ठार झाला’ असा उल्लेख येतो.
बांदलाच्या फौजेने लढा दिला. अनेक बांदल सैनिक ठार झाले. त्यामधे बाजीप्रभू ठार झाले, असा उल्लेख आहे. या चित्रपटात जिजाऊंच्या तोंडी असं एक वाक्य घातलं आहे की जे अनैतिहासिक आहे ते म्हणजे ‘प्रभू रामाला जसे हनुमंत होते तसे शिवबाला हा बाजी.’ जेधे शकावलीमधे असं म्हटलेलं नाही. तर ‘हनुमंत अंगद रघुनाथाला जेधे बांदल सिवाजीला’ असं म्हटलं आहे.
जेधे-बांदल हटवून केवळ बाजीप्रभूला आणणं हा ‘हर हर महादेव’ चित्रपट निर्माता-दिग्दर्शकाचा संकुचितपणा, जातीयवादी दृष्टीकोन नाही का? शिवरायांनी अफजलखानाला ठार मारलं त्यावेळी कृष्णाजी भास्कर कुलकर्णीने शिवरायांवर वार केला. हा भाग या चित्रपटातून वगळलेला आहे. याउलट अफजलखान शिवरायांच्या डोक्यात वार करतो असं दाखवलेलं आहे. शिवाजीराजे अफजलखानाला मांडीवर आडवे बसवून हिरण्यकशपूप्रमाणे त्याचं पोट फाडतात असं दाखवून शिवरायांना नृसिंह अवताराशी जोडलं आहे, की जे अनैतिहासिक आहे.
चित्रपटातल्या भाषेचं, कलेचं, कलाकारांचं सौंदर्यशास्त्र सनातनी आहे. बाजीप्रभू बलदंड, राकट, पिळदार, भारदस्त दाखवले आणि शिवाजीराजांची भूमिका दुय्यम दर्जाच्या कलाकाराला देणं, मावळे राकट, दणकट, पिळदार, दुय्यम दर्जाचं दाखवणं ही गोष्ट शिवकालीन भाषा, पेहराव, शरीरयष्टी याला काळिमा फासणारी आहे.
चित्रपट हे समाज प्रबोधनाचं महत्त्वाचं माध्यम आहे. समाजात धैर्य, शौर्य, राष्ट्रभक्ती, समता, स्त्रियांचा सन्मान, प्रागतिक विचार रुजवण्याचं प्रभावी माध्यम आहे. पण ‘हर हर महादेव’ सारखे चित्रपट समाजात दुही निर्माण करण्याचं काम करत आहेत. शिवाजी महाराज आणि त्यांच्या सवंगड्यांचा अर्थात शिवचरित्राचा अवमान करत आहे.
छत्रपती शिवाजी महाराज हा महामानव कलेच्या कवेत मावण्याएवढा लहान नाही, पण त्यांचा भव्य चित्रपट निर्माण करणार्या हॉलिवूड टॉलिवूड सारख्या निर्मात्या-दिग्दर्शकाची आज गरज आहे. अत्यंत दु:खाने म्हणावं वाटतं की, काही अपवाद वगळता शिवाजी महाराज आणि त्यांच्या सहकार्यांवर चित्रपट काढायची आज तर कित्येक मराठी चित्रपट निर्मात्या दिग्दर्शकांची लायकी नाही.
हेही वाचा:
शिवरायांच्या डच चित्राच्या दंतकथांचा पर्दाफाश
तान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं?
शंभूराजांना औरंगजेबाच्या कैदेतून सोडवण्याचे प्रयत्न का झाले नाहीत?
(लेखक इतिहास संशोधक असून त्यांचा लेख दैनिक पुढारीतून घेतलाय)