ग्रँड स्लॅम स्पर्धांमधे अव्वल दर्जाचं यश मिळवण्यासाठी वयाचा अडथळा येत नाही, हे ‘जोकोविच’, ‘राफेल नदाल’ यांच्या कामगिरीवरून नेहमीच दिसून येतं. टेनिसच्या दृष्टीने प्रौढत्वाकडे झुकलेल्या या खेळाडूंकडे कदाचित युवा खेळाडूंइतकं चापल्य नसेल. पण पराभवाच्या छायेतून मॅचला कलाटणी कशी द्यायची, आपल्याला अपेक्षित असं यश कसं खेचून आणायचं, हे या खेळाडूंकडून शिकलं पाहिजे.
‘धीर धरी रे धीरापोटी, मिळतील फळे रसाळ गोमटी,’ असं आपण नेहमीच म्हणत असतो. टेनिस मॅचमधे एखादा सेट गमावल्यानंतर संयम, चिकाटी आणि महत्त्वाकांक्षा याला कौशल्याची जोड दिली तर निश्चितपणे विजयश्री खेचून आणता येते, हे ‘नोवाक जोकोविच’ आणि ‘एलिना रिबाकिना’ यांनी दाखवून दिलं. पहिला सेट गमावल्यानंतर शांतचित्ताने आणि संघर्षपूर्ण खेळ करत या खेळाडूंनी विम्बल्डन टेनिस स्पर्धेत अनुक्रमे पुरुष आणि महिलांच्या एकेरीतल्या विजेतेपदावर नाव कोरलं.
विम्बल्डन स्पर्धा ही टेनिस क्षेत्रातली अतिशय प्रतिष्ठेची मानली जाते आणि या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी खेळाडू अतिशय उत्सुक असतात. तसंच ही स्पर्धा म्हणजे चाहत्यांसाठी खेळाचा निखळ आनंद घेण्याची सर्वोच्च पर्वणीच असते.
विम्बल्डन संयोजकांनी रशिया आणि बेलारूस या देशांच्या खेळाडूंना सहभागी व्हायला केलेली मनाई, त्यामुळे काही नामांकित खेळाडूंनी घेतलेली माघार, दुखापतीमुळे मान्यवर खेळाडूंची अनुपस्थिती, मानांकित खेळाडूंचा धक्कादायक पराभव, अव्वल दर्जाच्या खेळाडूंचं बेशिस्त वर्तन तसंच प्रेक्षकांकडून खेळाडूंना होणारा व्यत्यय या कारणांमुळे यंदाची विम्बल्डन स्पर्धा अधिकच गाजली.
हेही वाचा: फूटबॉलपटूच्या किकने बदलला मुस्लिमांकडे बघण्याचा दृष्टिकोन
ग्रँड स्लॅम स्पर्धांमधे अव्वल दर्जाचं यश मिळवण्यासाठी वयाचा अडथळा येत नाही, हे ‘जोकोविच’, ‘राफेल नदाल’ यांच्या कामगिरीवरून नेहमीच दिसून येतं. टेनिसच्या दृष्टीने प्रौढत्वाकडे झुकलेल्या या खेळाडूंकडे कदाचित युवा खेळाडूंइतकं चापल्य नसेल. पण पराभवाच्या छायेतून मॅचला कलाटणी कशी द्यायची, आपल्याला अपेक्षित असं यश कसं खेचून आणायचं, हे या खेळाडूंकडून शिकलं पाहिजे.
फोरहँड आणि बॅक हँडचे परतीचे फटके, क्रॉसकोर्ट आणि जमिनीलगत फटके, अचूक आणि बिनतोड सर्विस, नेटजवळून प्लेसिंग या कौशल्याबाबत त्यांचा खेळ नेहमीच बहारदार आणि चाहत्यांना मंत्रमुग्ध करणारा असतो. ‘जोकोविच’ याच्याकडे संभाव्य विजेता म्हणून पाहिलं जात होतं कारण अगोदरच्या तीनही विम्बल्डन स्पर्धांमधे त्याने अजिंक्यपद पटकावलं होतं. यंदाचं त्याचं हे सलग चौथं आणि एकुणातलं सातवं विम्बल्डन विजेतेपद आहे. तसंच ग्रँड स्लॅम करिअरमधलं त्याचं हे एकविसावं अजिंक्यपद आहे.
‘नदाल’ याने उपांत्य फेरीपर्यंत मजल गाठली. खरं तर उपांत्यपूर्व फेरीतच त्याला वेगवेगळ्या दुखापतींनी आणि दुखण्यांनी ग्रासलं होतं. ग्रँड स्लॅम आणि त्यातही विम्बल्डनसारखी श्रेष्ठ स्पर्धा असल्यामुळे त्याला मैदानावर राहण्याचा मोह टाळता आला नाही. त्याची अतुलनीय कामगिरीची मालिका पोटातल्या स्नायूंच्या दुखण्यामुळे खंडित झाली आणि त्याला उपांत्य फेरीच्या लढतीपूर्वीच माघार घ्यावी लागली.
नेहमीप्रमाणेच यंदाही या स्पर्धेतल्या पुरुष आणि महिला या दोन्ही गटांत अनेक अनपेक्षित निकाल पाहायला मिळाले. फ्रान्सची खेळाडू ‘हार्मोनि तान’ ही ‘सेरेना विल्यम्स’ हिच्यापेक्षा मानांकनामधे वरचढ आहे. मात्र ग्रँड स्लॅम स्पर्धांचा अनुभव लक्षात घेता, ‘सेरेना’ तिला पराभूत करेल, अशी अपेक्षा होती. वयपरत्वे शारीरिक तंदुरुस्ती आणि क्षमता राहत नाही. ‘सेरेना’ ही खेळाच्या दृष्टीने प्रौढत्वाकडे झुकली आहे. अनुभवापेक्षा तारुण्य श्रेष्ठ ठरलं आणि ‘हार्मोनि’ हिने सेरेनावर मात करण्यात यश मिळवलं. ‘हार्मोनि’ हिने चौथ्या फेरीपर्यंत मजल गाठली; नंतर तिलाही पराभव पत्करावा लागला.
‘सिमोना हॅलेप’ हिने चौथी मानांकित ‘पौला बडोसा’, ‘अमांडा निसिमोवा’ यांच्याविरुद्ध आश्चर्यजनक विजय मिळवला. पण ‘रिबाकिना’ हिने चतुरस्र खेळ करत तिची अनपेक्षित विजयाची मालिका संपुष्टात आणली.
जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या ‘इगा स्विआतेक’ हिच्याकडे संभाव्य विजेती खेळाडू म्हणून पाहिलं जात होतं. यंदाच्या मोसमात फ्रेंच खुल्या स्पर्धेसह सलग सहा स्पर्धा जिंकल्या होत्या. विम्बल्डनच्या ग्रासकोर्टवर तिला हे सातत्य टिकवता आलं नाही. तिची सलग ३७ सामने जिंकण्याची मालिका फ्रान्सच्या ‘एलेजी कॉर्नेट’ हिने खंडित केली. ‘कॉर्नेट’ हिलाही नंतर चौथ्या फेरीत पराभवाची चव चाखावयास मिळाली.
हेही वाचा: दंगल आणि लीगपेक्षा तर राणादादाने कुस्तीला ग्लॅमर दिलं
महिलांच्या फायनल मॅचविषयी कमालीची उत्कंठा निर्माण झाली होती. कारण ‘रिबाकिना’ हिच्याबरोबरच ‘ओन्स जबेर’ पहिल्यांदा ग्रँड स्लॅम स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोचली होती. साहजिकच विम्बल्डनच्या महिला विजेतेपदासाठी नवा चेहरा मिळाला. ग्रँड स्लॅम स्पर्धेत अंतिम फेरी गाठणारी ‘जबेर’ ही पहिलीच अरेबियन खेळाडू ठरली. ऐतिहासिक विजेतेपद मिळवण्याची तिला हुकमी संधी मिळाली होती. पहिल्या सेटमधे सफाईदार खेळ करत तिने त्या दृष्टीने वाटचालही केली. दुसर्या सेटपासून तिला परतीचे फटके, सर्विस आणि प्लेसिंग यावर नियंत्रण ठेवता आलं नाही.
तिच्या तुलनेमधे ‘रिबाकिना’ हिने नियंत्रण मिळवलं. वेगवान सर्विस, परतीचे खणखणीत फटके आणि नेटजवळून प्लेसिंग असा खेळ करत विजयश्री खेचून आणली. पहिला सेट गमावल्यानंतरही तिने आपला संयम ढळू दिला नाही. कोणतंही मानसिक दडपण न घेता तिने शेवटपर्यंत आत्मविश्वास ठेवत स्वप्नवत कामगिरी केली.
‘रिबाकिना’ ही मूळची रशियन खेळाडू आहे. मात्र गेली चार वर्ष ती कझाकिस्तानकडून खेळत आहे. दुसर्या देशाकडून खेळणं ही काही सोपी गोष्ट नसते. त्या देशातल्या संस्कृती, हवामान आणि इतर अनेक गोष्टींशी एकरूप होणं हे आव्हान असतं. हे लक्षात घेता, तिच्या विजेतेपदाबद्दल सोशल मीडियावर भरभरून कौतुकच केलं पाहिजे; मात्र ती मूळची रशियन असल्यामुळे आणि यंदा रशियन खेळाडूंवर बंदी असल्यामुळे सोशल मीडियात तिच्यावर टीका झाली, ही अतिशय दुर्दैवाचीच गोष्ट आहे.
ऑस्ट्रेलियन खेळाडू ‘निक किर्गीओस’ याने या स्पर्धेत आश्चर्यजनक कामगिरी करत अंतिम फेरी गाठली; पण स्वतःच्या हाताने त्याने पायावर धोंडा मारून घेतला, असंच म्हणावं लागेल. ‘जोकोविच’ याच्याविरुद्ध त्याने प्रभावी खेळ करत पहिला सेट जिंकला. दुसर्या सेटमधे त्याच्याकडून चुका होत गेल्यानंतर त्याच्या मनाचा तोल ढासळला.
अनेक वेळेला तो मोठमोठ्यांनी बडबडत होता, पंचांशी हुज्जत घालत होता. एवढंच नाही, तर प्रेक्षकांच्या शेरेबाजीवरही तो खवळला. त्याच्या या ढळलेल्या मानसिक स्थितीचा ‘जोकोविच’ याने फायदा घेतला नाहीतर नवलच! त्याने स्वतःच्या खेळावर अतिशय चांगल्या रितीने नियंत्रण ठेवलं होतं.
पारितोषिक वितरणावेळी ‘किर्गीओस’ने लाल रंगाची टोपी घालत स्पर्धेच्या नियमांचा भंग केला आणि परिणामी त्याला आर्थिक दंडाच्या कारवाईला सामोरं जावं लागलं. ‘किर्गीओस’ याने अगोदरच्या फेर्यांमधेही अनेक वेळेला बेशिस्त वर्तन केलंय. त्याचा आणि ग्रीक खेळाडू ‘स्टीफनोस त्सित्सिपास’ यांच्यातला सामना हा खेळापेक्षाही बेशिस्त वर्तनामुळे अधिक गाजला.
हेही वाचा: पुरुषांनी रडायला हवं असं सचिन तेंडूलकर का म्हणाला?
ज्येष्ठ खेळाडूंनी या दोन्ही खेळाडूंच्या वागणुकीबद्दल अतिशय कडाडून टीका केली. क्रिकेटप्रमाणेच टेनिस हादेखील सभ्य गृहस्थांचा खेळ मानला जातो. विशेषतः ग्रँड स्लॅम स्पर्धांना जागतिक स्तरावर मोठं वलय प्राप्त झालंय. ‘बियोर्न बोर्ग’, ‘पीट सॅम्प्रास’, ‘रॉजर फेडरर’ अशा श्रेष्ठ खेळाडूंचा आदर्श डोळ्यासमोर ठेवत या युवा खेळाडूंनी आपलं वर्तन कसं चांगलं राहील, यावरही भर दिला पाहिजे.
आधुनिक ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांचे संस्थापक ‘बॅरन डी कुंबर्टिन’ यांनी क्रीडा स्पर्धा ही जात, रंग, धर्म, राजकीय मतभेद यांपासून नेहमीच दूर असायला पाहिजे, असं प्रकर्षाने मत मांडलं होतं. रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यामुळे या दोन्ही देशांमधे युद्ध सुरू झालं आहे. रशियाच्या या कृतीचा निषेध म्हणूनच विम्बल्डनच्या संयोजकांनी रशिया आणि बेलारूसच्या खेळाडूंना विम्बल्डनमधे भाग घ्यायला मनाई केली आहे.
अनेक ज्येष्ठ खेळाडू आणि संघटनांनी या बंदीबाबत कडाडून टीका केली. क्रीडा स्पर्धा बंदीविरहित असली पाहिजे, असं सातत्याने त्यांनी मतही मांडलं; पण संयोजकांनी त्यांची ही मागणी फेटाळून लावली. त्यामुळे अनेक मानांकित आणि माजी विजेत्या खेळाडूंना या स्पर्धेपासून वंचित राहावं लागलं.
विम्बल्डन संयोजकांनी कामगिरीच्या जोरावर दिलं जाणारं मानांकन गुण यंदा ठेवलं नव्हतं. मानांकन गुण नसतील तर स्पर्धेला काहीच अर्थ नाही, असा आक्षेप घेत ‘नाओमी ओसाका’, ‘एवगेनी बुचार्ड’ यांच्यासह अनेक खेळाडूंनी संयोजकांवर कडाडून टीका केली होती. त्यातल्या काही खेळाडूंनी दुखापती किंवा आजारपणाची कारणं देत स्पर्धेतून माघार घेतली.
टेनिस हा जरी ताकदवान खेळ मानला जात असला, तरीही नीटनेटका संसार थाटलेल्या आणि एक-दोन मुलांची आई असलेल्या खेळाडू अजूनही खेळाचा निखळ आनंद घेण्यासाठी सहभागी होत असतात. भारताची सुपरमॉम असलेली ‘सानिया मिर्झा’ ही यंदा स्पर्धात्मक टेनिसमधून रिटायर होणार आहे. विम्बल्डन स्पर्धेत तिने मिश्र दुहेरीत उपांत्य फेरीपर्यंत मजल गाठली होती.
दोन मुलं असलेली ‘तातजाना मारिया’ हिने एकेरीत उपांत्य फेरीपर्यंत धडक मारली होती. उपांत्य फेरीत चिवट लढतीनंतर तिला ‘जबेर’कडून पराभव स्वीकारावा लागला. जर जिद्दीला कष्टाची जोड दिली, तर आई झाल्यावरही टेनिससारख्या आव्हानात्मक खेळात प्रभावी कामगिरी करता येते, हे ‘सानिया’ आणि ‘मारिया’ यांनी युवा महिला खेळाडूंना दाखवून दिलंय.
सानियाकडून स्फूर्ती घेत कोल्हापूरच्या ऐश्वर्या जाधव या तेरावर्षीय खेळाडूने विम्बल्डन स्पर्धेच्या कनिष्ठ गटात आपल्या देशाचं प्रतिनिधित्व केलं, ही खूपच कौतुकास्पद कामगिरी आहे. भलेही तिला कनिष्ठ गटात पराभव स्वीकारावा लागला असला, तरीही तिला उज्ज्वल भवितव्य लाभलंय, असं म्हणावं लागेल.
ग्रँड स्लॅम स्पर्धांच्या मालिकेत अमेरिकन खुली ही अखेरची स्पर्धा पुढच्या महिन्यात होणार आहे. दुखापती आणि दुखण्यामुळे तंदुरुस्त नसलेले खेळाडू तोपर्यंत तंदुरुस्त होतील आणि अमेरिकन स्पर्धेत पुन्हा बहारदार आणि अनपेक्षित निकाल पाहायला मिळतील, हीच अपेक्षा आहे.
हेही वाचा:
सोनाली बेंद्रेः कॅन्सरशी पंगा घेणारी लढवय्यी
आपण वापरत असलेल्या कॅलेंडरला आहे हजारो वर्षांचा इतिहास
ऑलम्पिकमधे उत्तेजक घेऊन खेळणाऱ्या खेळाडूंचं काय करायचं?
तरुणांनो, आपण आईवडलांना वॉट्सअप युनिवर्सिटीतून बाहेर काढू शकतो?
पाकिस्तानी सत्तेला ‘हम देखेंगे’ म्हणणारी नज्म हिंदूविरोधी का ठरवली जातेय?