नोकरीच्या योग्यतेचे नाहीत भारतातले पदवीधर तरुण

१० मार्च २०२१

वाचन वेळ : ४ मिनिटं


मागच्या महिन्यात इंडिया स्किल रिपोर्ट २०२० जाहीर झालाय. या रिपोर्टमधे अनेक धक्कादायक दावे केलेत. त्यासाठी देशभरातल्या ३ लाख विद्यार्थ्यांचा सॅम्पल सर्वे घेण्यात आलाय. गेल्या ४ वर्षात तरुणांच्या रोजगार क्षमतेत वाढ झाली नसल्याचं रिपोर्ट म्हणतोय. तर दुसरीकडे भारतातले केवळ ४५ टक्के पदवीधर विद्यार्थी नोकरी मिळवण्याच्या योग्यतेचे असल्याचं रिपोर्टची आकडेवारी सांगतेय.

कोरोना वायरसमुळे गेल्या वर्षभरात अनेक उद्योग संकटात सापडले. कंपन्या बंद झाल्यामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. त्याचा लोकांच्या रोजीरोटीवर परिणाम झाला. अशातच वाढती बेरोजगारी भारतासाठी काळजीचा विषय बनली. आपण प्रत्येक वर्षी २ कोटी रोजगार देऊ असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सत्तेत यायच्या आधी म्हटलं होतं. त्यांच्या पारड्यात भरभरून मतं पडली.

तरुणाईने नरेंद्र मोदींच्या या घोषणेकडे आशेनं पाहिलं. पण त्यांच्या पदरी केवळ निराशा आली. रोजगाराची घोषणा निवडणुकीतला जुमला ठरली. पकोडे तळायचं स्वप्न त्यांना दाखवण्यात येतंय. रोजगाराची स्थिती सुमार आहे. त्यामुळेच तरुणाईच्या मनात खदखद आहे. त्यांच्याकडे शिक्षण आहे; पण नोकरी नाही. सोशल मीडियातून त्याविरोधात आवाज उठतोय. रोजगार दो सारख्या हॅशटॅगमधून राग व्यक्त होतोय.

अशातच दरवर्षी येणारा इंडिया स्किल रिपोर्ट - २०२  १८ फेब्रुवारीला प्रकाशित झालाय. त्यातली आकडेवारी धक्कादायक म्हणावी अशीच आहे. गेल्या ४ वर्षात तरुणांच्या रोजगार क्षमतेत वाढ झाली नसल्याचं रिपोर्ट सांगतो. तसंच तरुण पदवीधरांच्या नोकरी मिळवायच्या योग्यतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आलंय.

हेही वाचा: बेरोजगारांकडून साडेतीन टक्केच अपेक्षा ठेवणाऱ्या रवीश कुमारांचं पत्र

आकडेवारीसाठी सॅम्पल सर्वे

इंडिया स्किल रिपोर्टची सुरवात २०१३ - २०१४ ला झाली. सध्याचा हा सातवा रिपोर्ट आहे. हा रिपोर्ट वीबॉक्स, टॅग्ड नावाच्या खाजगी कंपन्यांनी बनवलाय. त्यासाठी भारतीय उद्योग संघ, संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम, अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद आणि भारतीय युनिवर्सिटी संघटना या संस्थांची मदत घेतलीय.

सॅम्पल सर्वेचा आधार घेऊन ही आकडेवारी तयार करण्यात आलीय. २८ राज्य आणि ९ केंद्रशासित प्रदेशांचा यात समावेश आहे. देशातल्या ३,५०० शैक्षणिक संस्थेतल्या ३ लाख विद्यार्थ्यांना या सर्वेत सहभागी करून घेण्यात आलंय. तर एकूण ९ वेगवेगळ्या विभागांचा विचार त्यासाठी करण्यात आलाय.

एवढे विद्यार्थी नोकरीलायक

देशातल्या वेगवेगळ्या भागातल्या विद्यार्थ्यांना यात सहभागी करून घेण्यात आलंय. ३ लाख विद्यार्थ्यांपैकी केवळ ४६ टक्केच विद्यार्थी जॉब देण्याच्या लायक असल्याचं हा रिपोर्ट सांगतो. मागच्या सहा वर्षांमधे या आकडेवारीत चढउतार आलेत. २०१४ ला हा आकडा ३३.९५ टक्के इतका होता. पुढची दोन वर्ष तो ४० टक्क्यांच्या खालीच होता.

२०१५ नंतर या आकडेवारीत थोडी वाढ झाली. त्यानंतर ३ वर्ष हा आकडा ४६ टक्क्यांच्या आसपास फिरतोय. २०१८ - २०१९ ला आकडा ४७.३८ टक्के होता. तर २०१९ - २०२० ला ४६.२१ टक्के होता. मागच्या वर्षीच्या तुलनेत आताच्या आकडेवारीत १ टक्क्यांची घट झालीय. मागच्या तीन वर्षात हा आकडा वर गेला आणि तसाच खाली आल्याचं रिपोर्टच्या आकडेवारीवरून दिसतंय.

हेही वाचा: मध्यम वर्गाला आर्थिक पॅकेज नाही, तर थाळी वाजवण्याचा टास्क पाहिजे

बीई, एमबीए विद्यार्थ्यांची आघाडी

भारतातले एकूण ९ कोर्स देशात सगळ्यात जास्त लोकप्रिय असल्याचं इंडिया स्किलचा रिपोर्ट सांगतोय. यात बीई, बीटेक, पॉलिटेक्निक, आयटीआय, बीए बीकॉम, बीफार्मा, बीएससी या कोर्सेसचा यात समावेश आहे. बीटेक, एमबीए केलेल्या पदवीधरांना सगळ्यात जास्त 'एम्प्लॉयबिलिटी' म्हणजे नोकऱ्यांची संधी उपलब्ध झाल्यात. या दोन फॅकल्टीचे विद्यार्थी सगळ्यात जास्त नोकरीच्या लायक असल्याचं म्हटलंय.

सध्या बीई, बीटेकचे ४६.८२ टक्के विद्यार्थी रोजगार मिळवण्यात आघाडीवर आहेत. २०१५ मधे हे प्रमाण ५४ टक्के होतं. त्यानंतर एमबीए करणाऱ्यांचा नंबर लागतोय. २०१९ ला एमबीएचे विद्यार्थी यात आघाडीवर होते. तेच २०२१ मधे हेच प्रमाण ४६.५९ टक्के झालंय. या दोघांमधे कट टू कट स्पर्धा असल्याचं आकडेवारीवरून दिसतंय.

बीएचे विद्यार्थीही तिसऱ्या नंबरला आहेत. दुसऱ्या बाजूला एमसीए करणाऱ्या विद्यार्थांच्या हाती थोडी निराशाच पडलीय. एमसीए करणाऱ्या विद्यार्थ्यांची २२.४२ टक्केवारीत असून रोजगार मिळवण्याच्या बाबतीत हे विद्यार्थी पिछाडीवर असल्याचं आकडेवारी म्हणतेय.

रोजगारासाठी आवडीची शहरं

इंडिया स्किल रिपोर्टमधे राज्या, राज्यांची आकडेवारीही देण्यात आलीय. कोणतं राज्य यात आघाडीवर आहे हे आकडेवारीवरून समजतंय. त्यात महाराष्ट्र, तामिळनाडू, उत्तरप्रदेश आणि कर्नाटक राज्यातले पदवीधर विद्यार्थी सगळ्यात जास्त नोकरीच्या योग्यतेचे असल्याचं हा सर्वे सांगतो. तर पाचव्या क्रमांकावर आंध्रप्रदेशला स्थान मिळालंय.

शहरांचा विचार केला तर रोजगार देण्यात आघाडीची शहरं म्हणून मुंबई, हैद्राबाद, पुणे, बंगळुरू यांचा समावेश करण्यात आलाय. तर रोजगारासाठी आवडीच्या टॉप शहरात बेंगलोर शहराला अधिक आवडीचं शहर म्हणून पसंती दिसतेय. मात्र, यावर्षी देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळख असणाऱ्या मुंबई शहर या टॉप दहा मधून बाहेर आहे.

हेही वाचा: बेरोजगारीतही भारतातल्या मध्यमवर्गानं सांप्रदायिकतेला रोजगार बनवलं

महिलाच सरस पण

भारतात पुरुषांच्या तुलनेत स्त्रिया नोकरी देण्यासाठी अधिक योग्य असल्याचं आकडेवारी सांगते. त्यामुळे महिलांना सगळ्यात जास्त संधी आणि पहिली पसंती आहे. २०१८ च्या तुलनेत २०१९ आणि २०२० ला महिलांनी नोकरीत पुरुषांना मागे टाकलंय. २०१८ मधे ही आकडेवारी पुरुष ४८ टक्के आणि महिला ४६ टक्के अशी होती. २०२० ला ही आकडेवारी पुरुष ४५ टक्के तर महिला ४६ टक्के झालीय.

पण पण उपलब्ध असलेल्या नोकरीच्या संधी मात्र पुरुषांना जास्त आहेत. कंपन्या त्यांचाच प्राधान्याने विचार करतात असं आकडेवारीतुन समोर आलंय. महिलांचा टक्का बँकिंग आणि फायनान्स सेक्टरमधे वाढलाय. ४६ टक्के महिला यात आहेत. तर ७९ टक्के पुरुष ऑटोमोटिव, ७५ टक्के लॉजीस्टिक आणि ७२ टक्के ऊर्जा क्षेत्रात असल्याचं दिसतंय.

२०२० मधे हे पुरुष, महिलांचं प्रमाण ७१:२९ इतकं आहे. त्यामुळे नोकरी करणाऱ्यांमधे ६४ टक्के पुरुष तर ३६ टक्के महिला आहेत. महिलांना नोकरी देण्याची मानसिकता मोठ्या कंपन्यांची नसल्याचं यावरून स्पष्ट दिसतं.

नोकऱ्या कुठल्या क्षेत्रात?

इंडिया स्किलच्या रिपोर्टनुसार, वीबॉक्सचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी निर्मल सिंग यांच्या मते, भारतात येत्या वर्षांत सगळ्यात जास्त नोकर भरती बँकिंग आणि फायनान्ससारख्या सर्विस सेक्टरमधे होईल. तसंच आयटी, आयटीइएस सारख्या उद्योग क्षेत्रातही नोकऱ्या मिळू शकतील. त्यानंतर आरोग्य, ऑटोमोटिव, रिटेल आणि  लॉजिस्टिक या क्षेत्रात संधी निर्माण होतील.

तर इतर ठिकाणांपेक्षा दिल्ली एनसीआर, कर्नाटक आणि महाराष्ट्रासारख्या राज्यात रोजगाराच्या संधीची उपलब्धता अधिक असल्याचं निर्मल सिंग यांनी या रिपोर्टमधे म्हटलंय. सर्वात मोठा बदल म्हणजे गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत महिलांचा सहभाग यंदाच्या वर्षी जास्त आहे. हाच ट्रेंड भविष्याच्या दृष्टीनं, खास करून 'वर्क फॉर्म होम'सारख्या शक्यतांना प्रोत्साहन देणारा ठरेल असं त्यांना वाटतय.

२०२१ मधे वर्क फ्रॉम होमसारखं काम करता येणाऱ्या संगणकीय क्षेत्राशी निघडीत जास्त नोकऱ्या निर्माण होण्याची शक्यता आहे. तसंच सॉफ्टवेअर, हार्डवेअर आणि इंटरनेट बिजनेससारख्या क्षेत्रांमधे जास्तीत जास्त संधी निर्माण होतील. रिपोर्टमध्ये या रोजगार मिळवणाऱ्यांच्या जोरावर भारत ५ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेच लक्ष आगामी ४ वर्षात पूर्ण करू शकतो, असं या रिपोर्टमधे सांगण्यात आलंय.

हेही वाचा: 

बाई आणि तंत्रज्ञान : जमाना बदल गया है बॉस

स्त्रिया कोर्टाचा अपमान करतात की कोर्ट स्त्रियांचा?

महिला दिन विशेष : आईंना हमे देखके हैरान सा क्यूँ हैं?

साहिर लुधियानवी : जीवनाचं तत्त्वज्ञान मांडणारा जादूगार