कोरोना काळात सरकार शाळा, कॉलेज बंद का करतंय?

२० जानेवारी २०२२

वाचन वेळ : ६ मिनिटं


कोरोनाच्या तिसऱ्या लाटेतही सरकार शाळा, कॉलेज बंद करण्यावर भर देतंय. पण त्यामुळे मुलांचं जे शैक्षणिक नुकसान होतंय ते सरकारला समजत नाही का? असे प्रश्नही यातून निर्माण होतायत. या प्रश्नांची उत्तर शोधण्यासाठी आणि लहान मुलांबद्दल आपण इतके संवेदनशील का असतो हे समजून घेण्यासाठी सामाजिक मानसशास्त्राचा आधार घ्यावा लागेल. राजकारणाचा नैतिक पाया या संकल्पनेत त्याचं उत्तर दडलंय.

कोरोनाच्या दोन लाटा येऊन गेल्या आहेत. तिसरी लाट सध्या सुरू आहे. पहिल्या दोन्ही लाटांमधे सरकारने प्राधान्याने कोणता निर्णय घेतला असेल तर तो शाळा आणि कॉलेज बंद करायचा. तिसऱ्या लाटेची सुरवात होतानाही सरकारने काही निर्बंध लादत शाळा आणि कॉलेज तातडीने बंद केली होती.

इतर व्यवसाय, सरकारी आणि सरकारी कार्यालयं जर ५० टक्के क्षमतेनं सुरू राहू शकत असतील, तर शाळा आणि कॉलेज का राहू शकत नाहीत, असा प्रश्न समाजातल्या काही घटकांकडून उपस्थित केला जात आहे. मुलांचं होणारं शैक्षणिक नुकसान, या घटकांना महत्त्वाचं वाटतंय.

मुलांचं जे शैक्षणिक आणि भवितव्याचं जे नुकसान होतंय ते सरकारला समजत नाही का? का समजत असूनही सरकारनं झोपेचं सोंग आणलंय? असे काही प्रश्नही यानिमित्ताने पडतात. पण या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आणि किंबहुना लहान मुलांबद्दल आपण इतके संवेदनशील का असतो हे समजून घेण्यासाठी सामाजिक मानसशास्त्राचा आधार घ्यावा लागेल. 'मोरल फाउंडेशन ऑफ पॉलिटिक्स' अर्थात राजकारणाचा नैतिक पाया ही संकल्पना समजून घेतली तर या प्रश्नाचं उत्तर मिळेल.

मानवी उत्क्रांतीची संकल्पना

आपण दुसऱ्याचा हिताचा विचार का करतो, यावर बरंच मंथन सामाजिक मानसशास्त्रात झालेलं आहे. दुसऱ्यांच्या हिताचा विचार करताना, सभ्य वागताना माणूस एक तरी मूर्ख असतो किंवा स्वार्थी असतो, असाही विचार सामाजिक शास्त्रज्ञांनी मांडलेला होता. होमो सेपियन हा प्रत्यक्षात होमो इकॉनॉमिक आहे, अशी ही मांडणी होती. पण हा विचार अनेकांना तितकासा पटलेला नव्हता.

माणूस सगळ्या गोष्टी स्वार्थासाठी करतो हे मान्य होण्यासारखं नाही. उदाहरणार्थ जर तुम्हाला कुणी १ लाख रुपये देतो पण त्या बदल्यात स्वतःच्या वडलांच्या कानाखाली दे असं सांगितलं तर किती लोक तयार होतील? जे लोक सर्वसामान्य मानसिकतेचे आहेत, ते याला नकारच देतील. म्हणजे माणूस सगळ्याच गोष्टी स्वार्थासाठी करत नसतो. त्यातून मोरल फाउंडेशन ऑफ पॉलिटिक्सची मांडणी झाली.

अमेरिकेतले मानसशास्त्रज्ञ जॉनथन हैडी यांनी 'द राईटस माईंड: वाय गुड पीपल आर डिवाइड बाय पॉलिटिक्स अँड रिलीजन' हे पुस्तक लिहिलंय. यात मोरल फाउंडेशन ऑफ पॉलिटिक्स हा स्वतंत्र लेख आहे. माणसाची उत्क्रांती कशी होत गेली, त्यात माणसाला कोणकोणत्या आव्हानांचा सामना करावा लागला आणि माणसाचं मन आणि एकूण समाज मन कसं घडत गेलं याची मांडणी केलीय.

हेही वाचाः तुम्हाला कोरोना फेक न्यूज रोगाची लागण झालेली नाही ना?

प्राणी, माणसांमधलं मातृत्व

मोरल फाउंडेशन ऑफ पॉलिटिक्स याला आपण राजकारणाचा नैतिक पाया असं मराठीत म्हणू. राजकारण हा शब्द इथं विस्तृत अर्थाने वापरलेला आहे, हे लक्षात घेऊ. या लेखात एकूण पाच फाऊंडेशन दिलेले आहेत. त्यातला पहिला पाया म्हणजे केअर फाउंडेशन. मानसिकतेचा हा पाया आपल्याला लहान मुलं आणि समाजातल्या दुबळ्या घटकांबद्दल संवेदनशील बनवतो.

उत्क्रांतीच्या प्रक्रियेत मनुष्यप्राणी उच्चस्थानावर आहे. प्रायमेट्स, सस्तन प्राणी, सरपटणारे प्राणी असा उतरता क्रम लावता येतो. या क्रमानुसार मातृत्त्वाचं मूल्यही बदलत जातं. बहुतांश सरपटणारे प्राणी पिलांना जन्म देऊन दूर होतात. पिलांना स्वतःच स्वतःची काळजी घ्यावी लागते.

सरपटणाऱ्या प्राण्यांतल्या मादी अनेक पिलांना जन्म देते, कारण त्यात फार कमी पिलं प्रौढ होऊ शकणार असतात. सस्तन आणि प्रायमेट्समधे मातृत्त्वाचं मूल्य अधिकच वाढतं. इथं मातेला पिलांचा बरेच दिवस सांभाळ करावा लागतो.

माणसातलं केअर फाऊंडेशन

माणसांत ही स्थिती पूर्ण बदलते. मनुष्यप्राण्यात मातृत्वावरचं मूल्य फारच जास्त आहे. गरोदरपणात लागणारी काळजी, त्यानंतर करावा लागणारा मुलाचा सांभाळ हे तितकचं किचकट असतं. आपण अशा मुलाला जन्म दिलेला असतो, की जे जन्मानंतर अनेक आठवडे चालूही शकणार नसतं.

अशा प्रकारे मनुष्यप्राण्यात मूल हे अमूल्य असतं आणि ते सुरवातीला बरीच वर्षं दुर्बलही असतं. अशा मौल्यवान आणि दुर्बल बाळाला संकटापासून दूर ठेवायचं असतं. उत्पत्तीच्या प्रक्रियेत दुबळ्या मुलांना वाचवण्यासाठी, त्यांना वाढवण्यासाठी ज्या बदलांना माणसाला तोंड द्यावं लागेल त्यातून माणसाच्या केअर फाऊंडेशनची निर्मिती होत गेलेली आहे, असं या लेखात म्हटलंय.

त्यामुळे बाळाला होणारी पीडा किंवा वेदना हा या फाऊंडेशनला ट्रिगर देण्याचं काम करतो. एखाद्या लहान मुलाचा फोटो पाहूनही आपल्या मनात ‘किती क्युट’ अशी भावना तयार होते. ही मुलं दुसऱ्यांची असली तरी आणि अगदी इतर प्राण्यांची पिलं पाहूनही आपली प्रतिक्रिया अशीच असते. याच्या मुळाशी हेच फाऊंडेशन आहे. सर्वसामान्य माणसांच्या मनात दुर्बल घटकांबद्दलची जी कणव असते, त्याच्या तळातही केअर फाऊंडेशन आहे.

हेही वाचाः कोरोना कुटुंबातलं सातवं पोरच इतकं वात्रट कसं निघालं?

राजकारण कसं चालतं?

राजकीय सत्ता मिळवण्यासाठी राजकीय पक्ष या ५ पैकी एखाद्या फाऊंडेशनला ट्रिगर देण्याचं काम करतात. त्यात ते त्यांच्या दृष्टीने सकारात्मपणे यशस्वी ठरले तर त्यांचा कार्यभाग साधला जातो.

उत्तर प्रदेशात २०१७ला ऑक्सिजनअभावी हॉस्पिटलमधे मुलांचा मृत्यू झाला तेव्हा राज्य सरकारपासून ते केंद्र सरकारपर्यंत सर्वांनाच बॅकफूटवर जायची वेळ आली होती. तर गेल्या वर्षी भंडाऱ्यात हॉस्पिटलला आग लागून मुलांचा मृत्यू झाला तेव्हाही राज्यातल्या सरकारला मोठ्या नामुष्कीला तोंड द्यावं लागलं होतं.

एक उदाहरण मॅगीचं देता येईल. सर्वसाधारण भारतात अनेक मातांनी आपल्या लहान मुलांना मॅगी खायला दिलेली आहे. २०१४ला मॅगीत शिसं असल्याचं पुढे आलं. हा केअर फाऊंडेशनला मोठा धक्का होता. आपण आपल्या मुलांना विषारी खायला दिल्याची पश्चातापाची भावना त्यांच्या मनात तयार होणं कंपनीसाठी धोकदायक ठरणार होतं. याचा फार मोठा फटका या कंपनीला बसला होता. मॅगी बाजारातून मागे घेण्यात आली आणि नव्याने लाँच करण्यात आली. नव्या मॅगीच्या जाहिराती पाहिल्या तर त्यात आई आणि मूल यांच्या नात्यांच्या आधाराने या जाहिराती बनलेल्या आहेत.

समजा कोरोनाचा संसर्ग मुलांना होऊ लागला आणि त्यातून मुलांचे मृत्यू होऊ लागले तर केअर फाऊंडेशनला मिळणारा ट्रिगर हा पूर्णपणे नकारात्मक असेल आणि त्याची फार मोठी किंमत राजकीय पक्षांना चुकवावी लागू शकते. ही किंमत इतकी मोठी असू शकेल की सत्ता गमावण्याची वेळही राजकीय पक्षांवर येऊ शकते. म्हणून सरकार शाळा, कॉलेज सुरू करायचा धोका पत्करण्याचं धाडस करू शकत नाही.

इतर काही फाऊंडेशन

निष्पक्षता, फसवणूक: याचा विकास सहकार्याच्या भावनेतून झालेला आहे. इतरांना मदत करत असताना आपली पिळवणूक होऊ नये अशा स्वरूपाची सर्वसामान्य मानसिकता असते. त्यामुळे फसवणूक करणाऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे, असं आपल्याला वाटतं.

निष्ठा, विश्वासघात: परस्पर सहकार्याची गरज यातून या फाऊंडेशनचा विकास झाला आहे. एखादा व्यक्ती आपल्या टीमचा भाग आहे का यावरून आपण त्या व्यक्तीबद्दल संवेदनशील होतो, त्याचं हे कारण. जे आपल्या टीमशी गद्दारी करतात, त्यांना शिक्षा देण्याची जी मानसिकता असते, त्याचं मूळ यात आहे.

प्राधिकरण, उपद्व्याप: समाजाच्या एकूण रचनेत आपल्याला फायदा मिळावा अशा प्रकारे नातेसंबंध विकसित होण्याची गरज माणसाला वाटू लागली. त्यातून या फाऊंडेशनचा विकास झालेला आहे. त्यामुळे एखाद्या व्यक्तीचा हुद्दा, पद यामुळे आपण त्या व्यक्तीबद्दल संवेदनशील असतो.

पावित्र्य, अधःपतन: मनुष्य हा सर्वभक्षी आहे. त्यामुळे काय खायचं आणि काय नाही, याबद्दल माणसाला बऱ्याच बदलांना समोर जावं लागलंय. शिवाय वेगवेगळे जीवजंतू, कीटक यांच्यापासून स्वतःला दूर ठेवणं यातून या फाऊंडेशनचा विकास होत गेलाय. त्यातूनच निव्वळ प्रतिकात्मक मूल्य असणाऱ्या वस्तू आणि संकट याबद्दलही माणसाला घृणा वाटते.

हेही वाचाः 

कोरोनानंतर आपण वेगळ्याच जगात असणार आहोत

एकदा बरं झाल्यानंतर पुन्हा कोरोनाचा संसर्ग होतो का?

कोविड-१९ आजारावर औषध नसताना पेशन्ट बरं कसं होतात?

कोरोना वायरसः मोदींनी कुणाकडून घेतली जनता कर्फ्यूची आयडिया

विलगीकरण कक्षात डॉक्टर काय करतात, मुंबईची पत्रकार सांगतेय स्वानुभव