सामान्य माणसांना स्वप्न दाखवणाऱ्या टिकटॉकची जागा टँगी घेणार?

०१ फेब्रुवारी २०२०

वाचन वेळ : ३ मिनिटं


सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर नंतर टिकटॉकला तुफान प्रतिसाद मिळतोय. हा प्रतिसाद स्पर्धक कंपन्यांना धडकी भरवणारा आहे. आता टिकटॉकशी स्पर्धा करायला गुगलचं 'टॅंगी' हे नवं अॅप बाजारात येणार आहे. टिकटॉकसारखंच यावरही विडिओ अपलोड करता येतील. टॅंगीचा भरपूर बोलबाला होतोय. पण सामान्य माणसांची मनं जिंकणाऱ्या टिकटॉकची जागा टॅंगी घेऊ शकेल?

‘आय ऍम अ टिकटॉक स्टार’ असं एखाद्याच्या फेसबुक किंवा इंन्टाग्राम बायोमधे आपण वाचलं तरी आता आपल्याला आश्चर्य वाटत नाही. फेसबुक आणि वॉट्सअपसारखंच टिकटॉकही आता आपल्या रोजच्या जगण्याचाच भाग बनलंय. आपल्याला दिवसभरातून एक तरी टिकटॉक विडिओ सोशल मीडियावर दिसतोच. टिकटॉकनं देशातल्या बेरोजगारांना नवा धंदा देऊन सरकारची मदतच केलीय, असंही गमतीनं म्हटलं जातं.

आता टिकटॉकशी स्पर्धा करण्यासाठी गुगलही एक अॅप बाजारात आणतंय. त्याचं नाव आहे टॅंगी. टिकटॉकसारखंच टॅंगीवरही विडिओ असतील. पण टिकटॉकसारखे हे फक्त गाण्यांचे विडिओ नसतील. तर जास्त कलात्मक आणि माहिती देणारे विडिओ असतील.

हेही वाचा : स्मार्टफोनच्या जमान्यातही लोकांना फीचर फोनचा नाद का सोडवत नाही?

टिकटॉकवर बंदीही आली होती

साध्या सोप्या भाषेत सांगायचं तर, टिकटॉक हे विडिओ शेअर करण्यासाठीचं चिनी सोशल मीडिया अॅप आहे. झ्यांग यामिन यांच्या बाईट डान्स या कंपनीनं हे अॅप काढलंय. चिनी लोकांसाठी डोयुइंग नावाचं एक अॅप बाईट डान्स कंपनीनं सप्टेंबर २०१६ मधे काढलं होतं. प्रसिद्ध चिनी गाण्याचे बोल किंवा पिक्चरमधले डायलॉग लिपसिंक करून त्याचे विडिओ पोस्ट करायचे असं हे अॅप होतं. त्याच धर्तीवर चीनबाहेरच्या अँड्रॉईड आणि आयओएस वापरणाऱ्यांसाठी २०१७ मधे टिकटॉक लॉन्च केलं गेलं.

डोयुइंगसारखंच टिकटॉकमधेही गाण्यांचे, सिनेमातल्या सिनचे किंवा एखाद्या प्रसिद्ध डायलॉगचे बोल लिपसिंक करून तो विडिओ पोस्ट करता येतो. फार कमी काळात हे अॅप खूप प्रसिद्ध झालं. तरूण, म्हातारे, मध्यमवयीन सगळेच या अॅपच्या नादाला लागले असं म्हटलं जातं. फक्त लिपसिंकिंवर न थांबता अनेकांनी त्यात क्रिएटिविटिही वापरली. लिपसिंकिंग बरोबर त्या सिनमधला अभिनय करायचा, गाण्याला साजेशी एक घटना विडिओमधे दाखवायची असंही त्यात केलं जाऊ लागलं.

बॅकग्राऊंडला गाणं सुरू असताना बाईकवर स्टंट करायचे असे धोकादायक प्रकारही टिकटॉकवरून केले जाऊ लागले. काही अश्लील विडिओही टिकटॉकवर अपलोड होत असल्याचं बोललं जात होतं. त्यामुळेच मद्रास हायकोर्टाने टिकटॉकवर बंदी घालण्याचे आदेश केंद्राला दिले. नंतर ही बंदी उठवली गेली. पण बंदी घातली तरी टिकटॉकची लोकप्रियता काही कमी झाली नाही. अजूनही टिकटॉकवर दररोज हजारो विडिओ तयार करून अपलोड केले जातात. तिथून ते फेसबुकसारख्या इतर सोशल मीडियावरही फिरतात.

शिका आणि तुम्हीही शिका

आता अशा लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या टिकटॉकला टक्कर देण्यासाठी गुगलने टँगी नावाचं अॅप काढल्याचं अनेक बातम्यांमधून येताहेत. गुगलच्या एरिया १२० टीमने हे अॅप तयार केलंय.

द लल्लनटॉपच्या एका स्टोरीनुसार, टॅंगीचा अर्थ होतो टीच ऍण्ड लर्न. म्हणजे शिकवा आणि शिका. वेगवेगळ्या गोष्टींवरचे ट्युटोरिअल विडिओ टँगीवर आपण प्रसिद्ध करू शकणार आहोत. टॅंगीवर हाऊ टू चे म्हणजे एखादं अवघड काम सोपं कसं करायचं याचे, डू इट युअरसेल्फ म्हणजेच डिआयवायचे, गोष्टी सोप्या करण्यासाठी काही आयडीआ असे काही  विडिओ असतील. एक विडिओ साधारण ६० सेकंदांचा म्हणजे १ मिनिटाचा असेल.

टॅंगीचं इंटेरिअर हे बहुतांशी इन्स्टाग्राम किंवा पिनइन्टरेस्ट सारखं असेल. यात एक सर्च बारही दिला जाईल. एखादा विषय या सर्च बारवर शोधला तर त्याचे हजारो विडिओ यात दिसतील. फेसबुकसारखी त्यावर कमेंटही करता येईल. विडिओ मोबाईलमधे सेव करता येईल आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअरही होऊ शकेल. शिवाय, आपण स्वतःही आपले विडिओ इथं अपलोड करू शकू.

हेही वाचा : 'वन नेशन वन फास्टटॅग' योजना चांगली, नियोजनाच्या नावाने बोंबाबोंब

टिकटॉक म्हणजे लोकांच्या भावविश्वाचा भाग

टिकटॉक बनवण्यामागचा मूळ हेतू हा मनोरंजन हा होता. सिनेमेतले डायलॉग, त्यातली गाणी यांचा वापर करून विनोदनिर्मिती करायची, लोकांची मनं रिझवायची असा यामागचा उद्देश होता. पण टॅंगी हे अॅप मनोरंजनापेक्षा जास्त काहीतरी नवीन शिकण्यासाठी वापरलं जाईल. एखाद्याकडे काही नवीन आयडिआ असतील, तर त्या जगापर्यंत पोचवण्यासाठी एक व्यासपीठ टँगी अॅपकडून उपलब्ध केलं जातंय.

टिकटॉकने आजवर अनेक लोकांमधल्या अभिनय कौशल्याला वाव दिलाय. बॉलिवूडच्या सिनेमात नाही तर नाही पण निदान एका सोशल मीडियावर तरी आपलं कौशल्य दाखवून वाहवा मिळवण्याची इथल्या सामान्य माणसांची इच्छा टिकटॉकने पुरी केलीय.

सिनेमाच्या झगमगीत जिवनाची स्वप्न टिकटॉकने सामान्य माणसांना दाखवलीयत. काही पातळीवर ती पूर्णही केलीयत. टिकटॉक जणु इथल्या लोकांच्या भावविश्वाचा एक महत्त्वाचा भाग बनलंय. शिवाय, टिकटॉकसारखे सिनेमाचे विडिओ करण्याची सोय टॅंगीमधे नसणार. त्यामुळे टॅंगी हे अॅप टिकटॉकची जागा घेणार की आपलं स्वतंत्र अस्तित्व निर्माण करणार हे लवकरच कळेल.

हेही वाचा : 

'मुंबई आय'मधून ठाकरे सरकार कुठली जत्रा दाखवणार?

नव्याकोऱ्या चार सिनेमांसोबत नेटफ्लिक्स आणतंय नवं कल्चर

आता मोबाईलला रेंज नसलेल्या जागेवरूनही कॉल करता येणार

जीवघेण्या चिनी कोरोना वायरसपासून आपण कसं सुरक्षित राहायचं?