यल्लम्मा देवीची यात्रा अनुभवायलाच हवी अशी आहे

०३ जानेवारी २०२०

वाचन वेळ : १२ मिनिटं


कर्नाटकातल्या कोकूटनूर इथं दरवर्षी यल्लम्मा देवीची यात्रा भरते. यात्रेसाठी भाविक फार दूरवरून गावात येतात. या यात्रेत नग्न होऊन पूजा करण्याची प्रथा होती. देवदासीही सोडल्या जात असत. आज त्यावर बंदी आहे. पशूहत्येवरही बंदी आहे, पण बोकडांचे बळी तर दिले जातातच. पण अंधश्रद्धेचे बळी असलेले लोक हजारोंनी भेटतात. त्यावर कशी बंदी घालायची?

कर्नाटकातल्या बेळगाव जिल्ह्यातला अथणी तालुका. गाव कोकूटनूर. इथं यल्लम्मा देवीची यात्रा भरते. सात दिवसांची ही यात्रा. यात्रेचे पहिले चार दिवस गर्दीचे, आणि भाविकांच्या दृष्टीने अगदी महत्वाचे. हजारोंच्या संख्येने कर्नाटक, महाराष्ट्र, आंध्रप्रदेश या भागातून माणसं आपापली कुटुंबं घेऊन यात्रेला येतात. मोकळ्या जागेवर भरलेली ही यात्रा, आजूबाजूला ऊसाची, गव्हाची हिरवीगार शेती. घरं अगदी तुरळक. जी घरं होती त्यातली काही कच्ची.  अगदी थोडी घरं एकदम आधुनिक होती.

गाडीतून उतरल्यावर समोर जे दृश्य होतं, ते खूपच वेगळं होतं. नजर जाईल तिथं माणसं होती. काही एकमेकांशी बोलत होती, तर काही रस्त्याच्या दोन्ही बाजूला मांडलेल्या दुकानांवर काहीतरी खरेदी करू पाहत होती. आणि काहीजण गर्दीत वाट दिसेल तशी चालत निघाली होती. काही रस्त्यावर कांबळं किंवा प्लास्टिक अंथरून निजली होती, ठिकठिकाणी चुली मांडल्या होत्या. तात्पुरते बांबू आणि प्लास्टीकच्या झोपड्या अनेक ठिकाणी उभ्या केल्या होत्या.

रस्त्यावर थाटलेले हजारो संसार

संध्याकाळ होत आल्यामुळे चांगलंच अंधारून यायला लागलं होतं. थंडीपण वाढायला लागली होती. अनेक खेड्यापाड्यातून, शहरातून माणसं यल्लम्मादेवीच्या यात्रेला यायला लागली होती. यात्रेला नुकतीच सुरुवात झाली होती, त्यामुळे लोकांच्यात खूपच उत्साह संचारला होता.

आलेली माणसं जागा दिसेल तिथे, स्वतःचा आणलेला पसारा मांडत होती. काहीजण तर गाडीतच मुक्काम करत होती. स्वतःची चारचाकी आणि त्याच्या समोर अंथरलेली चटई आणि एका बाजूला मांडलेली चूल. घरातून आणलेली काही भांडी आणि स्वयंपाकासाठी आणलेला ऐवज.

उशी म्हणून स्वतःच्या कपड्यांच्या बॅग लोक वापरत होते. आम्हालाही कदाचित रात्रीचा मुक्काम रानातच करावा लागेल या तयारीने आम्ही सगळं सामान घेऊन गेलो होतो. पण मंदिरापाशी चौकशी केल्यावर काही खोल्या राहण्यासाठी भाड्यानं मिळत होत्या. एका हार-फुले विकणाऱ्या साळुंखे मावशींशी बोलणं झालं, आणि त्यांनी आमची एका घरात राहायची सोय केली. रुममधे फक्त रहायची सोय होती. अंघोळ आणि टॉयलेटची सोय नव्हती.

किन्नरांची विशेष वर्दळ

यात्रेत खाण्याची अजिबात कमतरता नव्हती. जिथं दिसेल तिथे खाण्याची दुकानं होती. चायनीजपासून ते भेळपुरी पर्यंत सगळे पदार्थ मिळत होते. इडली, डोसा, शेजवान राईस, ऑमलेटची गाडी अशी पदार्थांची भरगच्च रेलचेल होती. चिकनचं दुकान पण होतं. काही माणसं पिण्याचं पाणी विकत होती. काहीजण वापरायचं पाणी प्लास्टिकच्या हंड्यात विकत होती. ज्यांनी रानातच चूल मांडली होती, त्यांच्या प्रत्येकाकडे प्लास्टीकचे हंडे आणि तांब्या होता. वापरण्याचे पाणी तसं कमीच होतं. शेताच्या एका कडेला एक पाईप फुटला होता, आणि त्यातून शेतात जाणारे पाणी लोक भरून घेत होते. काही बायका तर भांडी घेऊन तिथं घासायला बसल्या होत्या. 

यात्रेचं वातावरण खूपच झगमगीत होतं. खूप प्रकारची माणसं यात्रेत आली होती. इरकल साडी नेसलेल्या तरुण बायका, वृद्ध बायका, मध्यमवयीन बायका आपल्या बाळांना घेऊन थंडीत कुडकुडत बसल्या होत्या. काहीजणी चुलीवर भात शिजवत होत्या. काहीजणी चक्क पोळ्या करत होत्या. त्यांच्या घरातली सगळी मंडळी चुलीची उब घेत बसली होती. एका गाडीने मोठ्याने कानडी भाषेतून गाणी लावली होती. आजुबाजूची लहान मुले त्या गाण्याच्या तालावर नाचत होती. 

विशेषकरून या यात्रेत किन्नर समाजातले अनेक लोक होते. सुंदर सुंदर साड्या घालून, मेकअप करून भारदस्त व्यक्तिमत्व असलेली किन्नर मंडळी एकमेकांचा हात हातात घेऊन, हसत-खिदळत यात्रेत फिरत होती. गप्पा-गोष्टी करत देवीच्या दारी येऊन आपली सेवा देत होती.

हेही वाचा: यल्लमाच्या भाविकांची ओढाताण सरकारला दिसत नाही का?

सोळाव्या वर्षी जोगतिण होणारे किन्नर

साळुंखे मावशीच्या कुटुंबाची आणि आमची ओळख झाली. त्यांच्या दोन्ही मुली आमच्याशी बोलल्या. त्या दरवर्षी आईला मदत करायला यात्रेत येतात. त्यांच्या मते, एरवी या भागात कुणीच फिरकत नाही, फक्त यात्रेच्या वेळीच त्यांचा धंदा चांगला होतो. हा एवढाच काळ  पैसे कमावण्याचा असतो. 

यल्लम्माच्या देवळाला 'रेणुका देवस्थान' नावाची पाटी होती. तिथल्या एका पोलिसांना मी विचारलं, 'या देवीचे नाव रेणुका आहे की यल्लम्मा?' तर ते म्हणाले, 'दोन्ही नाव एकाच देवीचे आहे. यल्लम्मा देवीलाच रेणुका देवी म्हणतात.' 

रात्री आठ वाजता अनेक माणसं, किन्नर आणि बायका देवीच्या देवळापाशी त्यांच्या कुटुंबाचा 'देवीचा जग' म्हणजे देवीची टोपली मंदिर आणि इतर परिसरात मिरवत होते. गाणी म्हणत आणि ढोल वाजवत होते. तेव्हा देवीची आरती करून, पालखी मिरवणूक काढली होती. सगळीकडे लोक नाचत, गात भंडारा उधळत देवीचा गजर करत होते. संपूर्ण यात्रेत फिरत होते. 'देवीच्या जगा' भोवती किन्नर नटून-थटून नाचत होते. सगळ्यांनी आपापल्या परीने त्यांचं 'जग' सजवलं होतं. देवीला सजवलं होतं. 

मंदिरात रांगेत उभ्या असलेल्या किन्नरांशी आम्ही बोललो. त्यातल्या काही बाळ जोगतीणी होत्या. ज्या वयाच्या सोळाव्या वर्षीच घरदार सोडून देऊन या मार्गाला लागल्या होत्या. त्यातली गौरी पाटील ही चांगलीच लक्षात राहिली. एकदम उंच आणि धिप्पाड आणि दणकट. टीशर्ट आणि खाली स्कर्ट घातलेली गौरी खूप गोड हसून उत्तम मराठी बोलत होती. मुंबईला तिचा बिझनेस होता. देवीच्या जत्रेला पहिले तीन दिवस ती न चुकता येते. अनेक किन्नर मैत्रिणी तिच्या सोबत होत्या. 

हैदराबादवरूनही आली होती माणसं

रात्री खूपवेळ 'जग' मिरवणूक चालू होती. अनेकजण आपापला 'जग' घेऊन जात होते, त्यात जोगतिणी होत्या, नाचणाऱ्या बायका होत्या. रात्री दहा नंतर सुपाऱ्या घेऊन सांस्कृतिक कार्यक्रम चालू होते. ठिकठिकाणी स्टेज बांधलेले होते. स्टेजवर पारंपारिक पद्धतीने किन्नर आणि त्यांचा समूह कन्नड भाषेतून नाटिका सादर करत होते. रात्री दहा वाजता सुरु झालेला नाच-गाणी आणि नाटकांचा कार्यक्रम अगदी पहाटेपर्यंत चालू होता. 

रस्त्यावर बायका, लहान मुले, माणसे थंडीत कुडकुडत कार्यक्रम पाहत होती. विनोद झाला की हसत होती. सगळ्यात जास्त प्रेक्षक म्हणून बायकाच बसलेल्या दिसत होत्या. यात्रेत रात्रीही खाण्याच्या, पानांच्या आणि मुख्य म्हणजे दारूच्या दुकानावर प्रचंड गर्दी होती. प्लास्टिकच्या ग्लासात दारू घेऊन, त्यातले काही थेंब यल्लम्मा देवीच्या नावाने बाजूला शिंपडून मंडळी मनसोक्त दारू पीत होती.

रात्री प्रवासामुळे थकून गेल्यामुळे आम्ही फार जागरण केलं नाही. पण पाठ टेकल्यावर आजूबाजूचा आवाज कानात शिरत राहिल्यामुळे झोपही लवकर लागली नाही. तिथं राहून एक गोष्ट लक्षात आली होती. यात्रेला आलेल्या लोकांची देवीवर अतीव श्रद्धा होती. खेड्यापाड्यातूनच नाही तर मुंबई, पुणे, हैदराबाद यांसारख्या शहरातून देवीची परडी भरायला अनेकजण आले होते. देवीला आणि यात्रेला आलं नाही तर कुटुंबावर संकट येतं, घराचा कुळाचार आणि धर्म पाळावाच लागतो. या विचाराने येणारी असंख्य माणसं आजूबाजूला दिसली.

हेही वाचा: यल्लम्माची यात्रा हे जोगतिणींचं, तृतीयपंथीयांचं माहेरघरच

 

पुरण आणि मटणाचा नैवेद्य

त्या दिवशी देवीला खारी अर्थात मटणाचा नैवेद्य होता. त्यामुळे सगळीकडे चुलीवर मटण शिजत होतं. मटणाचा दरवळ सगळीकडे पसरला होता. माणसं जिथं राहत होती, शिजवत होती, खात होती, तिथंच आसपासच शौचाला जात होती. त्याची दुर्गंधी पसरली होती. टॉयलेटला बाहेर जाण्याशिवाय पर्याय नव्हता. अंधारात, कोपऱ्यात पुरुष माणसं नाहीत अशी जागा शोधण्यात खूप वेळ घालवावा लागे.

दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही साळुंखे मावशींच्या ओळखीने एका घरी सकाळची आन्हिके उरकण्यासाठी गेलो. ज्या घरात आम्ही गेलो तिथं अंघोळीसाठी गरम पाण्याची सोय होती. वीस रुपयाला एक स्टीलची बादली भरून गरम पाणी तिथला एक मुलगा आलेल्या यात्रेकरूंना देत होता. तिथल्या सगळ्याच घरांच्या बाहेर बाथरूम आणि टॉयलेटची सोय होती. पण काहीच घरांनी इतरांना ती सोय उपलब्ध करून दिली होती.

त्या घरासमोरची मोकळी जागा एका मराठी कुटुंबाला भाड्याने दिली होती. तिथेच त्या कुटुंबातल्या बायका पुरणाचा स्वयंपाक करत होत्या. ते कुटुंब सांगलीहून आलं होतं.  देवीला दरवर्षी न चुकता येतात. दोन दिवस का होईना, पण देवीला मोठा आणि छोटा, पुरणाचा आणि मटणाचा नैवेद्य दाखवतात. थोडी हौस करतात आणि जातात. त्यांच्या घरातल्या म्हाताऱ्या बायका आणि एक वर्षाची लहान मुलगीही त्यांच्यासोबत होती.

जिथे तिथे ‘रेणुका’च!

तिथेच अगदी रस्त्याला लागून एक कर्नाटकी कुटुंबं देवीची पूजा करत होतं. त्यांनी देवीच्या परड्या भरल्या होत्या. त्यात भाकरी, मेथी आणि कांद्याची पात, पुरणाच्या कानवल्या, आमटी, केळी असा नैवेद्य भरून 'देवीच्या जगा' समोर मांडला होता. सकाळीभल्या पहाटे उठून बायका अंघोळ, पुरणाचा स्वयंपाक करून देवीची पूजा करत होत्या.

तसं म्हटलं तर तिथं अंघोळीची सोय अजिबातच नव्हती. खूप कमी ठिकाणी लोकांनी पैसे घेऊन सोय केली होती. तिच तऱ्हा शौचाची होती. ज्यांना परवडत होतं, ते लोक ती सुविधा घेत होते. देवीला नैवेद्य दाखवायचा, स्वयंपाक करायचा तर शुचिर्भूत होऊनच करायचा यावर लोकांची श्रद्धा होती. त्यामुळे बऱ्याच लोकांनी एका बाजूला आडोसा करून तात्पुरती सोय केली होती. काही ठिकाणी थंड पाण्यानेच लोक आंघोळी उरकत होते. तर काहीजण मंदिरापाशी सरकारने उघड्या नळांची सोय केली होती. त्या पाण्यामुळे साचलेल्या डबक्यात पुरुषमाणसं उघड्या अंगाने अंघोळ करत होती.

एखादं कुटुंब रस्त्यावर कसं राहील? आणि राहिलं तर काय काय करेल? हे उघड्या डोळ्यांनी तिथं बघायला मिळत होतं. देवीला नैवेद्य दाखवल्यावर प्रत्येक कुटुंब आरती करत होतं. आणि आरती झाल्यावर आधी सगळे पुरुष जेवायला बसत होते. आणि मग बायका, मुले जेवत होती.  सगळ्या चुलींवर त्या दिवशी पुरण शिजत होतं. गुळवणी केली जात होती, आणि आमटीचा घमघमाट सुटला होता. जागोजागी चुलीसाठी काहीलोक सरपण विकत होती, खाण्याची दुकानं चालू होतीच. रात्री बघितलेल्या वाईन शॉपचं नाव 'रेणुका वाईन शॉप' आहे हे पाहिल्यावर देवस्थानावर लावलेल्या 'रेणुका देवस्थानाची' पाटी आठवली. अनेक हॉटेलांची नावं रेणुका देवीवरूनच होती. रेणुकाप्रसाद, रेणुकालक्ष्मी, रेणू, अशी कैक नावे देवीच्या नावाने जोडलेली दिसत होती.

हेही वाचा: स्पर्श न करता खेळता येतं, म्हणून आपल्याकडे क्रिकेट वाढलं

लोटांगण घालण्याऱ्या फक्त बायकाच का?

दुपार पर्यंत सगळीकडे पुरणाचा नैवेद्य दाखवण्याचा घाट सुरु होता. तो झाल्यावर पुन्हा देवीचा 'जग' घेऊन लोक मिरवणुका काढत होते. रस्त्यावर तुफान गर्दी झाली होती. थंडी एकदम कमी होऊन सूर्य चांगलाच तापला होता. त्या उन्हातही माणसं देवीच्या दर्शनला येत होती. ठिकठिकाणी थांबून कुटुंबासाठी काहीबाही खरेदी करत होती. काही माणसं पुरणाच्या जेवणामुळे सुस्तावली होती. त्यामुळे त्यांनी जिथं मुक्काम केला तिथंच अंग टाकून आराम करत होती.

यात्रेतली दुपार तशी बरीच शांत होती. वर्दळ तशी कमी झाली होती. पण मंदिराच्या ओढ्यापाशी मात्र खूप बायका, बापडे, लहान मुले उघडी होवून आंघोळ करत होते. त्या ठिकाणी एक छोटासा पाण्याचा वाहता पूल होता. काही ठिकाणी नळ लावले होते. त्यातच सगळी माणसे आनंदाने पाण्यात जात होती. काही लोकांनी अंघोळ झाल्यावर लिंब लावली होती. लिंबाचा पाला कमरेला लावून ते देवीच्या दर्शनाला जात होते. लिंब नेसून देवीला नवस बोलत होते. तिच्या आवारात नारळ फोडत होते. काहींचा नवस फेडण्यासाठी लोक ओल्या अंगाने देवीला साष्टांग नमस्कार घालून ओढ्यापासून ते मंदिरापर्यंत लोटांगण घालून जात होते. त्यात फक्त बायकाच लोटांगण घालताना दिसल्या.

देवीला महानैवेद्य दाखवायचा होता. संपूर्ण दिवसभर लोक दर्शनाला येत होते आणि जात होते. काही लोक गाड्या करून नैवेद्य दाखवून परतीचा प्रवास करत होते. त्यातल्या काही मराठी कुटुंबांशी संवाद साधायचा प्रयत्न केला. तर त्यातले एक काका सोलापूर  जिल्ह्यातल्या सांगोला इथून आले होते.

ते म्हणाले, 'आधी आम्ही तीन-तीन दिवस मुक्काम करायचो. तेव्हा खूप चांगलं वाटायचं. पण आता तसं राहिलं नाही. आमच्या कुटुंबाचे विचार बदलले. मंडळी रस्त्यावर राहायला नको म्हणतात. चुलीवर स्वयंपाक पण करत नाही. आणि बाहेर परसाला जायचा विचारच मनात येत नाही. इथं सोयीचं नसतं, मग घरातूनच नैवेद्य करून आणतो आणि इथं पूजा करतो, मग संध्याकाळी घरी परततो. पण दरवर्षी आम्ही यल्लम्माला न चुकता येतो. इथं राहणं परवडत नाही. एकेका खोलीला दहा माणसांसाठी सहा हजार रुपये भाडं आहे. एकतर अपुरी सोय आणि महागाई. यामुळे आम्ही गाडी करून येतो आणि दर्शन आणि नैवेद्य दाखवून जातो.'

भेद विसरून माणसं एकत्र येतात

मंदिराच्या मुख्य समितीच्या एका पुजाऱ्याशी बोलण्याचा प्रयत्न आम्ही केला. त्यांच्या घरी जाऊन थांबलो. त्यांच्या घराच्या दारातच देवीची पालखी ठेवली होती. खूपवेळ झाला तरी ते आले नाहीत. शेवटी दोन शहरातल्या सुशिक्षित मुली पुजारींना भेटायला आल्या आहेत हे साळुंखे मावशींच्या माध्यमातून सांगितल्यावर ते आम्हाला भेटायला आले. आम्ही त्यांच्याकडून माहिती काढायचा प्रयत्न केला. 'आत्ता खूप गडबड चालू आहे. यात्रेत सांगण्यापेक्षा तुम्ही निवांत आमच्याकडे या, मग तेव्हा सविस्तर बोलू'. असं म्हणून त्यांनी आम्हाला पिटवलं. 

भर दुपारी, दारूच्या दुकानात प्रचंड गर्दी होती. जिथं काहींनी पाले ठोकले होते, तिथे किन्नरांचे कुटुंब आराम करत होतं. काहीजण एकमेकींशी गप्पा मारत होते. तर काहीजण यात्रेत मजा करत फिरत होते. दुपारी पुन्हा अनेकजण 'देवीचा जग' घेऊन नाचत मिरवणूक काढत होते. गर्दी मंदिराजवळ जास्त होती. उन्हं कमी झाली तसा गारवा वाढू लागला. 

यात्रेत गरीब, श्रीमंत, सगळ्या धर्माची माणसं एकत्र जमली होती. यल्लम्मा देवीवर आलेल्या भाविकांची खूप श्रद्धा होती. जास्तकरून किन्नर समाजाची माणसं यात्रेत खूप होती. त्यांना लहानपणीच देवाला समर्पित केल्यामुळे त्यांचं लग्नच देवाशी झालेलं होतं. कोकूटनूर आणि सौंदत्तीची यात्रा ते कधीच चुकवत नाहीत असं काहींच्या बोलण्यातून आलं. काहीजणीतर प्रत्येक अमावास्येला देवीला येतात. त्यांची देवाबद्दल असलेली आत्मीयता मनाला भारावून गेली.

हेही वाचा: पाकिस्तानी सत्तेला ‘हम देखेंगे’ म्हणणारं गाणं हिंदूविरोधी का ठरवलं जातंय?

जीवावर बेतणारा ‘मौत का कुआ’

रात्री आम्ही पाळणे, खेळणी ज्या ठिकाणी लावले होते तिथं गेलो. पाळण्यातून संपूर्ण यात्रा खूपच सुंदर दिसत होती. तिथं दिल्लीवरून 'मौत का कुवा' हा खेळप्रकार आणलेल्या माणसांशी बोललो. त्यांचा खेळ पाहिला. त्या खेळाला 'मौत का कुवा' हे नाव का दिलं हे पाहूनच समजलं. गाडी चालवणारी चार माणसं अक्षरश: जीवावर बेतेल अशाप्रकारे लाकडी वर्तुळात गाडी चालवत होते. ते चारही भाऊ मुस्लीम कुटुंबातले होते. गेल्या वीस वर्षापासून ते हा व्यवसाय करत होते.

त्यातला एक भाऊ आम्हाला म्हणाला, 'आधीसारखे दिवस आता राहिले नाहीत या खेळाला. आम्ही देशभर फिरत असतो. अनेक जत्रांमधे शो लावत असतो. आधी खूप गर्दी व्हायची, तीन-चार शो मधून सगळे पैसे वसूल व्हायचे. आता दिवसभर शो करावे लागतात, मग कुठं सगळा खर्च भागतो.'

खरंच पशुबळी बंद झाला का?

कर्नाटक सरकारने तिथं पशुबळी द्यायची बंदी केली होती. पण यात्रेच्या कोपऱ्यात काही माणसे बोकड घेऊन अंधारात उभी होती. देवीला बळी देण्यासाठी काहीजण गपचूप बोकड विकत होती. असंच फिरता फिरता आम्ही बरेच आत गेल्यावर एका माणसाने आम्हाला हटकलं. तो हिंदीतून म्हणाला, 'आपको जानवर चाहिये क्या?' आम्ही लगेच म्हणालो, ' कुठं मिळेल?' मग तो माणूस मराठीतून बोलायला लागला, 'सरकारने या वर्षी पशुहत्या बंद केलीय. त्यामुळे खुलेआम कुणीही तुम्हाला देणार नाही. आता रात्र होऊन गेलीय. तुम्ही सकाळी लवकर या. इथून दोन-एक किलोमीटर शेतात लांब जाऊन बळी द्यावा लागतो. इथेच सकाळी लवकर या.'
मी लगेच त्यांना पुढे म्हणाले, ' आज किती विकले तुम्ही?' 
तर तो माणूस म्हणाला, ' चार-पाचशे तरी विकल्या गेल्या असतील.'  
आम्ही त्यावर त्याला काही बोलणार तितक्यात तो तिथून गर्दीत गायब झाला. आम्ही तिथं बराच वेळ थांबलो. पण तो माणूस काही पुन्हा दिसला नाही.

मंदिरासारखीच दारूच्या दुकानाबाहेरही रांग

नग्न लिंब नेसून जायची प्रथा, देवदासी सोडून द्यायची प्रथा केंद्र सरकारने बंद केल्यामुळे, या प्रथा करणारं तिथं कुणीच आढळलं नाही. तसंच दरवर्षी होणारी बैलगाडी स्पर्धापण सरकारने बंद केली होती. बंदोबस्तासाठी फक्त मंदिरापाशी तीन-चार पोलीस दिसले. बाकी संपूर्ण परिसरात पोलीस बंदोबस्त दिसला नाही. ना कुठे सार्वजनिक पिण्याच्या पाण्याची सोय होती, ना सार्वजनिक शौचालयाची सोय होती. तीनही दिवस आम्ही पैसे देऊन एका घरात जात होतो.
 
भंडाऱ्याची विक्री करणाऱ्या दहा - बारा शेड्स तिथं होत्या. मोठ्या मोठ्या पिशव्यात मुरमुरे, भडंग, आणि शेव, रेवडी, फरसाण अगदी आकर्षकपणे विक्रीला ठेवलं होतं. लहान मुलींच्या कपड्यांपासून ते घोंगड्यापर्यंत तिथं विक्रीला वस्तू प्रदर्शन केल्यासारख्या मांडल्या होत्या. तिन्ही दिवस दारूच्या दुकानाभोवती, देवळात जशी दर्शनासाठी रांग होती तशी रांग दिसली. रस्त्याच्याकडेला रिकाम्या गुटख्याच्या, तंबाखूच्या पुड्या पडलेल्या दिसल्या. रस्त्यावरच जेवण, स्वच्छता चालू असल्यामुळे खरगटं, शिळा झालेला नैवेद्य, पूजा करून झाल्यावर रिकाम्या झालेल्या परड्या कचरा म्हणून बाजूला पडलेल्या दिसत होत्या.

यात्रेचा दुसरा, तिसरा आणि चौथा दिवस भाविकांच्या दृष्टीने खूप महत्वाचा असतो. धूळदर्शन,  छोटा आणि मोठा नैवेद्य झाल्यावर चौथ्या दिवशी देवीची ओटी भरली जाते. त्या दिवशी देवीची पालखी भल्या पहाटे गावाबाहेर असलेल्या जोगुळभावी सत्यावाचे दर्शन घेऊन पुन्हा गावात प्रवेश करते आणि मग देवीचा ओटी भरण्याचा कार्यक्रम होतो. यात किन्नर सामाजाला मानाचं स्थान असतं. याला काहीजण कीस म्हणतात किंवा काहीजण किच्चचा कार्यक्रम म्हणतात. यात देवीच्या पालखीची मिरवणूक निघते, नाचत, वाजवत, गात गावातल्या परिसरातून पालखी फिरते.

हेही वाचा: तरुणांनो, आपण आईवडलांना वॉट्सअप युनिवर्सिटीतून बाहेर काढू शकतो?

इतकी वर्ष यात्रा होते तरी सुविधा का दिल्या जात नाहीत?

तिथल्या काही भाविकांच्या बोलण्यातून आम्हाला किच्च बद्दल थोडी माहिती मिळाली. देवीच्या किच्च किंवा कीसमधे तिची सौभाग्यवती म्हणून ओटी भरतात. त्यानंतर बांगड्या फोडतात. अग्नीवरून भाविक चालत जातात. स्वतःला शारीरिक वेदना करून घेतात. देवीच्या नावाचा गजर करतात. जर एकदा किच्चचा सोहळा पाहिला तर सलग पुढच्या तीन वर्षी यात्रेला यावं लागतं, असा देवीचा नियम आहे.
 
अनेक वर्षांपासून इथं यात्रा होतेय तर भाविकांना राहण्याची, झोपण्याची, शौचाची कुठलीच सोय इथं का नाही?  काही खाजगी रूम, घरासमोरच्या अंगणात लोक भाडी देऊन राहतात. रस्त्यावर शौचाला बसतात. आडोसा टाकून अंघोळ करतात, अंधारात बसतात. तर मग किमान या सुविधा इथं का नसाव्यात?

देवीचा प्रसाद नेमका किती रुपयाला?

यात्रेतून निघताना माझ्याकडे पाहून एक फाटकी साडी घातलेली जोगतीण हातात देवीची मूर्ती घेऊन आली, 'निघालीस तर काहीतरी दे माय. तुझं चांगलं व्हईल' असं म्हणाली.

मी तिला म्हंटले, 'माझ्याकडे काही नाही तुला द्यायला.' 

तर त्यावर ती म्हणाली, 'असं देवीच्या दारातून जावू नको, काहीतरी टाक.'

तिच्या विनंतीने मी जरा पाघळले, आणि माझ्या खिशातली एक वीसची नोट तिच्या ताटात टाकली. त्यावर ती पुन्हा मला म्हणाली, ' तुझं भलं होईल, तू खूप उदार आहे, अजून एक नोट काढ, ती मला देऊ नको, फक्त देवीचा प्रसाद त्यात घे.' असं म्हणून तिनं तिच्या हाताच्या चिमटीत चिमुटभर भंडारा घेतला आणि माझ्या कपाळाला लावला.

मी क्षणभर काही बोलले नाही. पण काय झालं, मला समजलं नाही, माझा हात पुन्हा खिशात गेला आणि एक शंभरची आणि एक विसाची नोट हातात आली. मी तिच्या हातात अजून एक विसाची नोट दिली. 

ती तिनं इतक्या शिताफीने घेतली, आणि पुन्हा मला म्हणाली, ' आता शंभराची नोट दे, तू करोडपती व्हशील, हा आशीर्वाद घे.' तिने माझ्या डोक्याला भंडारा लावला. आधीच तिनं दोन नोटा इतक्या चलाखीने माझ्याकडून घेतल्या. मला समजलं, आता हिचा मोर्चा हिरव्या नोटेकडे वळतो आहे. मी तिला जोरात 'नको नको' म्हणाले आणि हातातली नोट पटकन खिशात टाकली आणि जोरात चालू लागले.

एकदाही पाठीमागे वळून पाहिलं नाही. 'ताई थांब, थांब, देवीचा प्रसाद घेऊन जा, अशी जावू नको.' हा तिचा आवाज ऐकू आला. पण मी काही मागे वळून पाहिलं नाही. थोडं दूर गेल्यावर ती बाई दिसेनाशी झाली.

हेही वाचा: 

सोनाली बेंद्रेः कॅन्सरशी पंगा घेणारी लढवय्यी

कॅलेंडर माणसाला वर्तमानात राहायला शिकवतं!

कोलाजचा पहिला बड्डेः अभिनंदन नहीं करोगे हमारा!

लोकांना एकत्र येण्यापासून रोखणारं कलम १४४ नेमकं आहे तरी काय?