अजूनही भाजपला पर्रीकरांच्या नावावरच मतं मागावी का लागतात?

०४ मे २०१९

वाचन वेळ : ६ मिनिटं


म्हापसा, मांद्रे आणि शिरोडा या विधानसभेच्या तीन मतदारसंघात पोटनिवडणुकांचं मतदान झालंय. तर पणजीचं उरलंय. या चार पोटनिवडणुकांचा निकाल गोव्यातलं भाजप सरकार यापुढे किती स्थिर असेल, हे ठरणार आहे. मात्र या चारही जागांवर चुरशीची लढत दिसतेय. या जागा जिंकणं भाजपसाठी सोपं नसेल. त्यामुळे मनोहर पर्रीकरांच्या मुलाला तिकिट न देणाऱ्या भाजपला पर्किकरांच्या नावावर मतदान मागायची पाळी आलीय.

गोव्यात लोकसभेसोबतच चार मतदारसंघात पोटनिवडणूक होतेय. यामधे विधानसभेच्या तीन जागांसाठी लोकसभेच्या दोन जागांसोबत २३ एप्रिलला मतदान झालं. आता मनोहर पर्रीकर यांच्या पणजीमधे १९ मेला लोकसभेच्या शेवटच्या टप्प्यात मतदान होणार आहे. ही पोटनिवडणूक भाजपसाठी अनेक अर्थांनी महत्वाची आणि प्रतिष्ठेची आहे.

म्हापशात काय होणार?

भाजपचा पहिला अल्पसंख्याक चेहरा म्हणून ओळखले जाणारे माजी उपमुख्यमंत्री अॅड. फ्रान्सिस डिसोझा यांचं काही महिन्यांपूर्वी निधन झालं. त्यामुळे त्यांची जागा रिकामी झाली. म्हापसा हा हिंदूबहूल मतदारसंघ असूनही तिथे फ्रान्सिस डिसोझा पाचवेळा निवडून आले. आता भाजपने तिथल्या जुन्या कार्यकर्त्यांना डावलून डिसोझांचा मुलगा जोशुआ डिसोझा यांना उमेदवारी दिलीय.

जोशुआ हे म्हापसा नगरपालिकेत नगरसेवक आहेत. तरी राजकारणात मात्र ते अजिबात सक्रीय नाहीत. त्यांचं पक्षासाठीही काहीएक योगदान नाही. तरीही भाजपने केवळ अल्पसंख्याक मतदारांमधे चुकीचा संदेश जाऊ नये म्हणून ही काळजी घेतली. याचा परिणाम म्हणून म्हापशाच्या उमेदवारीचे प्रमुख दावेदार असलेले माजी नगराध्यक्ष सुधीर कांदोळकर यांनी काँग्रेसची उमेदवारी घेतली. त्यामुळे आता ही लढत रंगतदार झालीय.

हेही वाचाः गोव्याचा सायबा मोदींच्या बाजूने कौल देणार का?

काँग्रेस फुटल्याने मांद्रे, शिरोड्यात निवडणुका

मांद्रे आणि शिरोडा या अन्य दोन विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीसाठी मतदान झालं. या दोन्ही मतदारसंघातले आमदार मुळात काँग्रेसचे पण राज्यातलं सरकार टिकवण्यासाठी भाजपने या दोन मतदारसंघातल्या काँग्रेस आमदारांना राजीनामे देण्यास भाग पाडून भाजपमधे आणलं. विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक झाली तेव्हा काँग्रेस हा सर्वांत मोठा पक्ष म्हणून समोर आला. तरीही भाजपने आपलं सरकार बनवलं. तो निर्णय कसा बरोबर आहे, हे दाखवण्यासाठी भाजपने फोडाफोडी केलीय. 

मांद्रे मतदारसंघात भाजपचे माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांचा पराभव करून दयानंद सोपटे विजयी झाले होते. शिरोड्यात भाजपचे माजीमंत्री महादेव नाईक यांचा पराभव करून सुभाष शिरोडकर जिंकले. पक्षाच्या कुणालाच विश्वासात न घेता परस्पर हा निर्णय घेतल्याने हे नेते नाराज झाले. त्यातून पक्षांतर्गत रूसवेफुगवे वाढले.

हेही वाचाः 'मुंबई आमचीच', असं आम्ही मुंबईचे मराठी लोक का म्हणतो?

पोटनिवडणुकांवर ठरणार सरकारचं भवितव्य

त्यामुळे मांद्रेत आता भाजपच्या तिकीटावर दयानंद सोपटे विरुद्ध काँग्रेसचे बागी बागकर अशी लढत आहे. तिथे अपक्ष उमेदवार जित अरोलकर यांनीही ताकद उभी केलीय. त्यामुळे आयात उमेदवाराला समर्थन देण्यापेक्षा मांद्रेकरांनी जित अरोलकर यांच्या पारड्यात मतं टाकलेली असू शकतात. शिवाय महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षानेही अरोलकरांनाच पाठिंबा दिलाय. या तिरंगी लढतीत कोण जिंकेल हे कळत नाहीय. 

मगो सध्या अस्वस्थ आहे. कारण त्याच्या तीन आमदारांपैकी दोघांना भाजपने आपल्याकडे वळवून घेतलंय. त्यामुळे पक्षाचे सर्वेसर्वा ढवळीकर बंधू दुखावले गेलेत. त्यांनी लोकसभा निवडणुकांत आणि काँग्रेसला पाठिंबा दिला होता. तर त्यांनी शिरोड्यात दीपक ढवळीकर यांना उमेदवारी दिली. तिथे काँग्रेसचा उमेदवार असला तरी तो फारसा सक्रीय नाही. त्यामुळे म्हापसा आणि शिरोडा इथे जणू प्रमुख विरोधकांचे एकास एक उमेदवार उभे झालेत. 

या जागा जिंकल्यास राज्यातलं भाजप सरकार स्थिर बनेल. अन्यथा राज्यात राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता अधिक आहे. गोवा विधानसभेत भाजप आणि काँग्रेसकडे प्रत्येकी १४ आमदार आहेत. भाजपला गोवा फॉरवर्ड, अपक्ष यांचा पाठिंबा असल्यामुळे त्यांचं बहुमत होतं. आता या चार जागा भाजपला मिळाल्या तर भाजपची ताकद वाढेल. दुसरीकडे सरकारमधल्या घटकपक्षांचं महत्व कमी होईल. तसंच घटकपक्षांच्या मतदारसंघात लोकसभेसाठी भाजपला कसा पाठिंबा मिळाला, हेही मतमोजणीअंती स्पष्ट होणार आहे.

पर्रीकरांच्या मुलाला संधी का नाकारली?

म्हापसा, मांद्रे आणि शिरोडा इथे २३ एप्रिल ला मतदान झालं. आता पणजीत १९ मे या दिवशी मतदान होईल. पणजी हा मनोहर पर्रीकर यांचा मतदारसंघ. इथून पर्रीकर सहा वेळा विधानसभेवर निवडून आले. पणजीत ते शेवटपर्यंत अपराजित राहिले. म्हापशात जोशुआ डिसोझा यांना उमेदवारी मिळाली. तसंच पणजीतही पर्रीकर यांचा मोठा मुलगा उत्पल पर्रीकर यांच्या नावाची चर्चा सुरू झाली. प्रारंभी राजकीय प्रवेशाबाबत काहीसे उदासीन असलेल्या उत्पल यांनी अचानक राजकारणात एंट्री घेत सर्वांनाच चकीत केलं.

आपल्या वडिलांच्या निधनाला महिनाही उलटला नसेल पण उत्पल लोकसभेच्या प्रचारात सक्रीय झाले. त्यांनी म्हापशातल्या एका सभेत आपलं पहिलंवहिलं राजकीय भाषण करून आपल्या वडिलांच्या राजकीय वारशाच्या गुणांचीही झलक मतदारांना दाखवली. पर्रीकरांनी आपल्या कारकिर्दीत आपल्या मुलांना कधीच प्रकाशझोतात आणलं नाही.

हेही वाचाः गोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं

सिद्धार्थ कुंकळ्येकर ठरले भाजपचे उमेदवार

पर्रीकरांची मुलांनी राजकारणात येण्यास पसंती नव्हती. पण तरीही पणजीतल्या एका विशिष्ट गटाला उत्पल यांनाच उमेदवारी हवी होती. त्यासाठी त्यांनी जोरदार लॉबिंग केलं. या सगळ्यात पर्रीकरांचे राजकीय वारसदार म्हणून उमेदवारी मिळालेले सिद्धार्थ कुंकळ्येकर यांची मात्र कोंडी झाली. २०१४ मधे पर्रीकर यांची सरंक्षणमंत्रीपदी नियुक्ती झाली. त्यानंतरच्या पोटनिवडणुकीत सिद्धार्थ कुंकळ्येकर निवडून आले. 

२०१७ च्या विधानसभा निवडणुकीत कुंकळ्येकर त्यांनी बाबूश मोन्सेरात यांचा पराभव करून आपली राजकीय ताकद दाखवून दिली. २०१७ मधे पर्रीकर पुन्हा गोव्यात येऊन मुख्यमंत्री झाले. त्यावेळी कुंकळ्येकर यांनी कुठलीही कुरबुर न करता पर्रीकरांसाठी आपली जागा खाली करून दिली. त्यामुळे पर्रीकरांनंतर आता पणजी पोटनिवडणुकीत कुंकळ्येकरांना तिकीट मिळालंय. उत्पल यांचा दावा डावलून कुकळ्येकरांना कौल देण्यात आला. 

पणजीच्या राजकारणातले शक्तिशाली नेते बाबूश मोन्सेरात हे भाजप आघाडीचा घटकपक्ष असणाऱ्या गोवा फॉरवर्ड पक्षातून राजीनामा देऊन काँग्रेसमधे आलेत. त्यांनी उमेदवारी मिळवून अर्जही भरला. गोव्याचे माजी संघचालक आणि प्राथमिक शिक्षणाच्या माध्यम प्रश्नावरून सरकारविरोधात बंडाचं निशाण फडकावणाऱ्या सुभाष वेलिंगकर यांनी गोवा सुरक्षा मंचतर्फे पणजीच्या रिंगणात उतरलेत.

हेही वाचाः डॉ. प्रमोद सावंत आहेत कोण आणि ते कसे बनले गोव्याचे मुख्यमंत्री?

भाजप मागतोय पर्रीकरांच्या नावावर मतं

वेलिंगकर हे भाजपच्या सर्व धुरीणांचे गुरू. आज त्यांच्यासमोर या शिष्यांची दुसरी पिढी उभी आहे. पण शत्रू म्हणून. पर्रीकर विरुद्ध वेलिंगकर या भांडणात संघाने पर्रीकरांची बाजू उचलून धरली होती. तेव्हापासून वेलिंगकर यांनी या अपमानाचा सूड उगवण्यासाठी राजकीय मार्ग स्वीकारला. तोपर्यंत वेलिंगकर भाजपच्या राजकीय नियोजन आणि डावपेचाचं पडद्याआड नेतृत्व करायचे. आज ते त्यांच्याच मुशीत तयार झालेल्या नेत्यांशी दोन हात करणार आहेत. इथे गुरू श्रेष्ठ की शिष्य श्रेष्ठ हे सिद्ध होणार आहे. 

सुभाष वेलिंगकर आणि बाबूश मोन्सेरात हे मातब्बर नेते रिंगणात असल्यामुळे उत्पल यांना उमेदवारी देणं कितपत सुरक्षित ठरेल, याचा विचार करणं भाजपला भाग पडलं. पण वेलिंगकर भाजपची मतं खातील हे स्पष्ट आहे. अर्ध्या पणजी मतदारसंघावर बाबूश यांची घट्ट पकड आहे. त्यामुळे पर्रीकरांची पणजी वाचवणं भाजपसाठी सोपं राहिलेलं नाही. 

पणजी राखण्यात भाजपने यश मिळवलं तरच ती पर्रीकरांना खरी श्रद्धांजली ठरेल. पण त्यासाठी त्यांना पर्रीकरांच्या निधनावरून सहानुभूतीची हवा निर्माण करावी लागेल. तशी आता तरी दिसत नाही. पण भाजप मतदान मागतंय ते पर्रीकरांच्याच नावावर. कारण फक्त भाजपला मतदान करायला पणजीकर काही उत्सुक दिसत नाहीत.

हेही वाचाः 

मधु मंगेश कर्णिक लोकसभेची निवडणूक लढवणार होते, त्याचा किस्सा

एक्झिट अंदाजः मुंबईसह चौथ्या टप्प्यावर राज्य कुणाचं?

साधंसरळः राफेल ऑडियो टेपचं गोवा कनेक्शन काय?

विष्णू सूर्या वाघः जखमांचे चर्च बांधणारा आनंदभोगी