गोवा: उंदीरउड्यांच्या खेळात नेमकी कुणाची सरशी?

२२ जानेवारी २०२२

वाचन वेळ : ६ मिनिटं


गोवा विधानसभेच्या ४० जागा आहेत. बहुमताचा जादुई आकडा २१ आहे. काँग्रेस, भाजप, आप असे सगळेच पक्ष कामाला लागलेत. ‘२१ प्लस’च्या गणितात द्रोण लावण्याचा बाजार गरमागरम आहे. त्यामुळेच उंदीर, माकडांना लाजवतील अश्या पक्षांतरांच्या उड्या राज्यभर बघायला मिळतायत. सर्वच पक्षांनी ‘जिंकण्याची क्षमता’ हा उमेदवारीचा एकमेव मापदंड ठरवलाय. त्यामुळे जिंकणार्‍या घोड्यावरच पैसा लावला जातोय.

बन के इक हादसा बाजार में आ जाएगा
जो नहीं होगा वो अखबार में आ जाएगा
चोर उच्चकों की करो कद्र की मालूम नहीं
कौन, कब, कौन सी सरकार में आ जाएगा

डॉ. राहत इंदोरी यांचा हा शेर गोव्यातल्या सध्याच्या राजकीय वातावरणाचं यथार्थ वर्णन करतो.

हेही वाचा: प्रभाकर सिनारीः गोव्यात क्रांतीला मुक्तीकडे नेणारा नायक

जिथं सत्ता तिथं उड्या

जागतिक तापमान वाढीमुळे निसर्गाच्या गंभीर समस्या निर्माण झाल्यात. सकाळी पाऊस, दुपारी ऊन रात्री थंडी. ऋतुचक्र कसंही फिरतंय. मागच्या वर्षी तर बाराही महिने पाऊस होता. यंदा जानेवारीतही कोसळला. ऋतुचक्र आपण बदलवलं. या बदलात अंतर असतं. किमान काही दिवसांचं तरी. गोव्यातले नेते या ऋतुचक्रापेक्षाही गतिमान आहेत.

ते पक्ष बदलतात. विजेच्या गतीने. कधीही, केव्हाही. आज इथं तर उद्या तिथं. पुन्हा नवा पक्ष-नवा घरोबा. कधी पंधरा-वीस दिवसांनी तर कधी एक-दोन महिन्यांनी. हे नेते एकेका पक्षाचा दाबजोर मलिदा गट्टम करतात. नेतेच नाही तर त्यांचे कार्यकर्ते आणि पदाधिकारीही पाळीवच झालेत. उंदीर, माकडांना लाजवतील अश्या पक्षांतरांच्या टणाटण-टणाटण उड्या सध्या राज्यभर बघायला मिळत आहेत. आज लग्न-उद्या काडीमोड, नाहीतर निकालानंतर काडी टाकून मोड!

पुन्हा नवी मांडणी. पक्ष, संघटना, पक्षाची घटना सगळं काही बासनात. पूर्वी नेत्यांमधे विचारभिन्नता असायची, आता विचारशून्यता उरलीय. राजकारणाचा सगळा बाजार झालाय. त्यात सध्या तर गोव्याचा बाजार भलताच गरम आहे. जिथं सत्ता दिसते, तिथं उड्या. पूर्वी निवडणुकीनंतर उड्या मारणारे उडीबहाद्दर आता अगोदरच पकडतात.

गोव्यातला उंदीरउड्यांचा खेळ

गोव्याचे एक नेते आहेत. ते जाहीर समारंभात बोलतात. त्यांचं एक प्रसिद्ध वाक्य- ‘जिथं सत्ता, तिथं बाबू!’ त्यांना बाबू म्हणतात. वयोवृद्ध नको, म्हातारा नको, ते ज्येष्ठ म्हणूया. ते इलेक्ट्रॉनिक नृत्य महोत्सवात नाचतातही. ना धड उजवे, ना धड डावे, सगळेच संधिसाधू झालेत. गोव्यात सध्या हा उंदीरउड्यांचा खेळच मांडलाय.

एका नेत्याला उमेदवार पळवला जाणार, याची कुणकुण लागली. झालं! त्यानं तो मतदारसंघ गाठला. उमेदवाराबरोबर पत्रकार परिषद घेतली. सगळ्या पत्रकारांच्या समोर त्याला प्रश्न विचारला. अगदी लहान मुलाला विचारतात तसा. ‘जाणार नाहीस ना पक्ष सोडून?’ उमेदवारानेही ‘नाही’ या अर्थाने मान हलवली. पत्रकारही धन्य झाले.

नेता त्याला घेऊन तिथल्या मंदिरात गेला. त्याला मूर्तीसमोर डोकं टेकवायला लावलं. गड्याची दुसर्‍या दिवशीच पक्षांतराची उंदीरउडी! हे एक उदाहरण. ‘हिमनगाचे टोक’ हा शब्दप्रयोगही इथं थिटा पडावा. आता बोला? अमक्या-तमक्याची सत्ता येण्याची चिन्हं दिसताच उंदीर पुन्हा बुलेट ट्रेनच्या वेगाने धावतील. ज्याच्या हाती ससा तो पारधी.

हेही वाचा: विष्णू सूर्या वाघः जखमांचे चर्च बांधणारा आनंदभोगी

आकडेशाहीच्या नावानं चांगभलं

विधानसभेच्या जागा ४० आहेत. बहुमतासाठीचा जादुई आकडा २१ आहे. प्रत्येक मतदारसंघातली मतदारसंख्या २५ हजारांच्या आसपास आहे. राज्यात सगळ्यात जुना पक्ष मगोप म्हणजेच महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष. गोव्याचे पहिले मुख्यमंत्री, बहुजनवादी नेते दिवंगत भाऊसाहेब बांदोडकर यांनी स्थापन केलेला हा पक्ष. आता मात्र या पक्षाची प्रायवेट लिमिटेड कंपनी झालीय. या कंपनीचे मालक असलेले दोघेही भाऊ राजकारणी आहेत.

आम आदमी पक्ष २०१२ला आला. तो प्रामाणिकणे राबतोय. तृणमूल काँग्रेसने डांगोरा पिटत आत्ता कुठे प्रवेश केलाय. गोवा फॉरवर्ड, रिवोल्यूशनरी गोवन हे स्थानिक पक्ष. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेनं खातं खोललं तरी खूप झालं. बाकी इटुकले-पिटुकले उंदीरमामा. जिथं निवडणुकीचा बाजार तिथं अपक्षवाले आलेच. कुंपणावरचे, दर वाढवून घेणारे अपक्ष.

भाजप, काँग्रेसही तसे जुनेच आणि मोठेच पक्ष आहेत. त्यांची धडपड आहे ती ‘२१ प्लस’साठी. जे सध्यातरी अशक्य दिसतंय. त्यामुळे ‘२१ प्लस’च्या गणितात द्रोण लावण्याचा बाजार गरमागरम आहे. त्यामुळे आत्ताही आणि नंतरही उड्या दिसतीलच. लोकशाही नाही तर आकडेशाहीच्या नावानं चांगभलं चालूय सध्या. सर्वच पक्षांनी ‘जिंकण्याची क्षमता’ हा उमेदवारीचा एकमेव मापदंड ठरवलाय. फक्त जिंकणार्‍या घोड्यावरच पैसा लावला जातोय.

याचा परिणाम काय, तर सत्ता आणि अर्थकारणामुळे प्रचंड राजकीय अनिश्चितता आणि अस्थिरता निर्माण झालीय. काय होईल हे सांगता येत नाही. हा खेळ बघत बसण्याशिवाय आपल्या हातात काहीच नाही आणि दुसरं काही करायची तयारीही नाही. २०१७च्या निवडणुकीसारखं जादुई आकड्यासाठी यातायात करावी लागू नये म्हणून ही सगळी लढाई आहे. ज्याची जिंकण्याची क्षमता, त्याला उचला, पक्षात घ्या, येत नसेल तर पाठिंबा घ्या. सत्तांतुरा ना भय ना लज्जा!

तृणमूल काँग्रेसच्या प्रचाराचा दणका

गोव्यात आमदारांची खरेदी केली जाते, असं गोव्यात लोक बोलतात, असं देवेंद्र फडणवीस गुरुवारी म्हणाले. ते गोवा निवडणूक प्रभारी आहेत. त्यांनी भाजपची पहिली यादी जाहीर केली. त्यांनी सांगितल्याप्रमाणे खरेदी व्यवहारात तथ्य आहेच. अर्थातच, आग आहे तर धूर निघणारच. त्यांचा रोख खरंतर तृणमूलकडे आहे.

राज्यात तृणमूल काँग्रेसचा प्रचाराचा दंगा दणक्यात चालू आहे. जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी, राज्याच्या कानाकोपर्‍यात तृणमूलचा प्रचार सुरु आहे. नेटफ्लिक्सवर सिनेमा मधेच थांबतो. तिथं टीएमसीचं प्रचार गाणं सुरू होतं. ‘दीदी ओ दीदी.’ यू ट्यूबवर जा- दीदी भेटते. इंटरनेटवर कुठेही जा- दीदीच दीदी. काही पक्षांचा कारभार हा जागतिक कंपन्यांसारखा असतो.

उमेदवाराचा खर्च नावापुरता. बाकी खर्च कितीही आला तरी कंपनीच बघणार. उमेदवाराने सूचना द्यायच्या, कंपनी नियोजन करणार. उमेदवार लढणार, काय बोलायचं ते कंपनी लिहून देऊ. तेवढंच बोलायचं. टीएमसीच्या जाळ्यात ओढले गेलेले माजी मुख्यमंत्री लुईझिन फालेरो हे याचंच उदाहरण. या बेरकी, चतुर नेत्याला खासदारकी आणि पक्षाचं उपाध्यक्षपद दिलं. पण ‘आवाज’ नाही दिला. त्यांच्या वतीने महुआ मोईत्रा बोलतात. त्यांच्या बोलण्यातून गोव्याचा दांडगा अभ्यास, आवाका आणि विलक्षण आव दिसतो.

हेही वाचा: मनोहर पर्रीकरः शून्यातून विश्व उभं करणारा नेता

निवडणुकीपूर्वी आश्वासनांची खैरात

सर्वच पक्षांनी निसर्गालाही लाजवेल असा आश्वासनांचा पाऊस पाडलाय. आता केवळ मतदारांच्या प्लेटमधे सूर्य, चंद्र, तारे आणून देऊ इतकंच आश्वासन बाकी उरलंय. खाणी सुरू करू, अमूक प्रकल्प बंद पाडू अशी वचनं दिलीत. वीज, पाणी, रस्ते, प्लॅट, शिक्षण, महिलांना सुरक्षा हे सगळंच अगदी फुकट देऊ केलंय. काम-धंदा, नोकरीची गरजच नाही. खा, प्या, मजा करा.

सध्याच्या योजनांचा कागदावर विस्तारही केलाय. त्यातली एक महिलांसाठी ‘गृहआधार’ योजना. यात महिन्याला दीड हजार मिळतात. दुसरा पक्ष म्हणाला, ‘आम्ही पाच हजार देऊ. तुमचा ‘गृहआधार’ तर आमची ‘गृहलक्ष्मी’! सत्तेचा अजून पत्ताही नाही, पण नावनोंदणीही सुरू झालीय. मतदारही हावरटच झालेत. बाजारात तुरीच्या नोंदणीसाठी हाणामारी होतेय.

आणखी एक आश्वासन म्हणजे प्रत्येक घरात एक नोकरी देणार. राज्याची लोकसंख्या सुमारे पंधरा लाख आहे. त्यात मतदार सुमारे अकरा लाख. सध्याचे सरकारी नोकर सुमारे साठ हजार. जे आहेत तेच अतिरिक्त आहेत. त्यात पुन्हा नव्याने भरती सुरू करणार. पुन्हा घरटी एका सरकारी नोकरीची ग्वाही देणार. खोटे बोल, रेटून बोल! ‘वचनेनं किं दरिद्रता?’ ही तर बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात. खावा हवा तेवढा!

हुकमी कार्डांची चलती

राज्यात सध्या जात, देव, धर्म यांसारख्या कार्डांचीही चलती आहे. याची निर्मिती माणसांनीच केलीय. सगळ्याच धर्मांची शिकवण मानवतेची आहे. जो धारणा करतो तो धर्म ही एक साधी, सोपी व्याख्या. पण नेत्यांना मतदारांची धारणाच बिघडवायची आहे. सगळ्याच पक्षांचा हा उद्योग सुरू आहे. त्याला अपवाद नसावा ही व्यवस्थेची शोकांतिका आहे. प्रत्येकाचं कूळ-मूळ शोधून कुंडल्या मांडल्या जात आहेत. अमूक उमेदवार तमक्या जातीचा, अमक्या धर्माचा. टीएमसी म्हणजे मंदिर-मशीद-चर्च, असा जाहीर डंका घुमतोय.

सोशल मीडियातला हा दंगा राजकारणाची चव सांगतो. यात आणखी संतापजनक एक कार्ड वापरलं जातंय - ‘स्त्री’! ऐन निवडणुकीच्या तोंडावर हाही ‘उद्योग’ राज्यभर सुरू आहे. जुनी-नवी प्रकरणं शोधली जात आहेत. जुन्या खटल्यांवरही झोत टाकला जातोय. ‘आत’ कुणी जायची शक्यता कमीच. खेळ मात्र मांडलाय. जिथं बाजार तिथं नफेखोरी आलीच. ही बाभळ मतदारांनीच पेरलीय. तो काट्यांऐवजी आंब्याची अपेक्षा कशी करू शकतो? मतदारच अगोदर उंदीर होतो. त्यामुळे त्याच्यावर उंदीरउड्या पाहण्याची वेळ येते.

या उड्या कायद्याने कशा बंद होतील हे पाहायला हवं. आम आदमी पक्षही हेच सांगू पाहतोय. आम्ही तसं शपथपत्रच उमेदवाराकडून लिहून घेणार आहोत, असं हा पक्ष म्हणतोय. चला, एक पक्ष तरी या विषयावर गंभीर बोलतोय. कृतीची वाट पाहूयात. किर्तनाने समाज सुधारत नसतो तसा कायदा केला म्हणून पक्षांतर बंद होईल असं नाही. ‘कौन, कब, कौन सी सरकार में आ जाएगा’ हे आपण ठरवू तो दिन सुदिन असेल.

हेही वाचा: 

इफ्फी : देशविदेशांच्या सिनेमांचा कॅलिडोस्कोप

अजय देवगण बड्डे स्पेशलः नैंटीजची लवइष्टोरी

गोव्याला जाण्याआधी निवडा आपल्या आवडीचा बीच

गोमंतकीय साहित्याचा ओला दुष्काळ आता दूर करायला हवा!

पाचवीला पुजलेल्या प्लेग लॉकडाऊनमुळेच जगाला शेक्सपिअर मिळाला!