पोरींनो, आम्हाला साथीदार समजा सालगडी नाही...

१४ फेब्रुवारी २०२३

वाचन वेळ : ६ मिनिटं


प्रेमात जरा कुठं खाटखुट झालं की सगळा दोष येतो तो थेट पुरुषावर. मुली म्हणजे सात्विक वगैरे असा आपला गोड गैरसमज कायमच झालेला असतो. अर्थात सगळ्याच मुली यात मोडतात असंही नाही. पण रिलेशनशिपमधे आल्यावर मुलींच्या जशा मुलांकडून अपेक्षा असतात तशा मुलांनी केल्या तर त्यात बिघडलं कुठं?

एक साधा प्रश्न आपण कोणत्याही मुलीला विचारला की तुला कसा मुलगा हवाय? अर्थात तो जोडीदार किंवा बॉयफ्रेंड काहीही असो. तर साधारण उत्तर अशीच असतात की तो टॉल, डार्क आणि हँडसम हवा. चांगला जॉब हवा. मला स्पेस देणारा हवा, मित्रासारखा हवा. त्याने मला एका प्रिन्सेस सारखं ट्रीट केलं पाहिजे. वगैरे वगैरे!

याउलट मुलांच्या अपेक्षा सुद्धा अशाच की सुंदर, समजूतदार आणि स्पेस वगैरे. बरं इथपर्यंत ठीक. मग यात नडतंय काय? अर्थातच प्रेम म्हणजे नक्की काय हे समजून घेणं. आकर्षणाच्या पलिकडलं काहीतरी. खूप लव गोल्सच्या नादात हरवतेय ते म्हणजे मनांचं जुळणं.

हेही वाचा: लवमंत्रः मुलीने दिलेला प्रेमाचा नकार मुलानं कसा पचवावा?

स्पेस, स्पेस की बात

मुलांच्या बाबतीत बोलायचं झालं तर साधारण वरवर बोललं जातं. त्याला काय एक गेली की, दुसरी मिळेल तीचं मात्र खरंच प्रेम होतं. मग माणूस म्हणून आमचंही प्रेम खरं असूच शकतं की! आमचीही मानसिक आणि भावनिक तडजोड आणि वेळ आली तर पडझड होऊच शकते की. सगळीच मुलं जशी सारखी नसतात तशा सगळ्याच मुली सारख्या नसुच शकतात ना!

तुम्हाला स्पेस आणि प्रायवसी हवी असते. दोन तीन वेळा  केलेला फोन मग तुम्हाला 'चिप' वाटू लागतो. काय तर मग तू मला माझा वेळच देत नाहीस. पण कधीतरी असं झालं तर ती काळजी नसू शकते का? याउलट दोन वेळा फोन केला मी आणि तू मला उत्तर दिलं नाहीस. एवढा काय बिझी होतास. कोणासोबत होतास? अशी प्रश्नांची सरबत्ती तर नेहमीच उडवली जाते.

मग दोन चार दिवसाचं रुसणं फुगणं होत. समजूत काढण्याचे गड लढवले जातात. मग पुन्हा तो साधा प्रश्न मुलांनाही पडतो माझी स्पेस कुठेय? नाही उचलला फोन तर माणूस कामात असू शकतो आणि तो नंतर कॉल करणार असतो. मग प्रत्येक वेळी मुलांवर संशय का?

प्रेम हवंच पण निस्वार्थी

तुम्ही सहज म्हणून जातात की तुझा अमुक तमुक मित्र छान आहे, मस्क्युलर अँड ऑल! आणि आम्हीही तर तेवढ्याच सहजतेनं घेतो. पण याउलट एखाद्या तुमच्या मैत्रिणीचं कौतुक तुम्हाला का पचत नाही? मग वादाचा मुद्दा काय तर तुझं लक्ष तिकडेच होतं! माझ्याकडे नाही. आणि असं असेल तर आपलं कसं वर्कआऊट होणार?

आम्हालाही वाटतं मग खरंच कसं वर्कआऊट होणार! यावरून प्रेमचं नाही असा सरसगट निष्कर्ष कसा काढता तुम्ही! साहीर सारखं प्रेम जसं की , 'तूम्हारी रुह का कतरा मिल जाए, तो जिन्दगी को जिन्दगी समझेंगे ' हे दोन्ही बाजूने हवं की नको!

माझी आई छान स्वयंपाक करते. तिच्या हाताला चव आहे. किंवा माझ्या बहिणीचा फॅशन सेन्स छान आहे. यासारखी अनेक स्वतंत्र मत मुलांची असतात. म्हणून आम्ही तू माझ्या आईसारखाच स्वयंपाक कर किंवा ताईसारखी राहा असं सांगणं चुकीचं ठरेल.

प्रत्येक माणूस थोड्याबहुत फरकाने निराळा आहेच. म्हणून आम्ही पुरुष सुध्दा! मग आम्ही तुमच्या भावासारखे किंवा वडलांसारखे कसे काय होऊ शकतो? आम्ही कदाचित तुम्ही सांगितल्यावर प्रत्येक वेळी नाही बाहेर खाऊ शकतं, फिरायला जाऊ शकतं. आणि असं झालं की मग आमचं प्रेमच नाही असं कसं?

कदाचित कधी कुठे अडचण असेल आणि तिथं आमची मदत कामी येईल. कदाचित तुमच्या भावाला किंवा बाबांना नसेल जमणार. एखाद गोष्टीबद्दल तुम्हाला समजून सांगितलं तर ती गोष्ट करायला, समजायला तुम्हाला वेळ हवा असतो. तसं नाही झालं तर काय ते आम्ही समजून घेत नाही, पण हेच आमच्या बाबतीत पण होऊच शकतं ना.

तुम्ही आम्हाला कधी समजून घेणार? आमच्या बाबतीत चटकन अंदाज लावून तुम्हाला आमच्यासोबत असणारं आयुष्य इन्सेक्युर इतक्या पटकन कसं जाणवतं. मग राहून राहून आम्हाला बशीर बद्र यांची आठवण येते - 'आँखों में रहा दिल में उतर कर नहीं देखा कश्ती के मुसाफ़िर ने समुंदर नहीं देखा!'

हेही वाचा: आपण स्वतःवर प्रेम करायला कधी आणि कसं शिकणार?

अव्यक्त गोष्टींमधेही मजा

आपण दोघे जसं तासन् तास फोन वर बोलतो तसं तुमचं बोलणं तुमच्या मित्र-मैत्रिणी, आई किंवा इतर कोणाशी होत असेल तर तुमचा तो बाँड असतो. आणि तुम्हाला ती व्यक्ती, ते नातं अतिशय उबदार आणि हवं हवसं वाटतं. हेच माणूस म्हणून आम्हालाही लागू होत नाही का?

तुम्हाला अशा वेळी मधेच बोलताना थांबवलं तर ते इंटरफेअर वाटतं तुमच्या पर्सनल लाईफमधे. मग आमचंही थोडफार लाईफ पर्सनल नसू शकत का? ॲट लिस्ट माणूस म्हणून. जरा थोडफार लक्ष दुर्लक्ष होऊ शकतं ना. सगळ्याच गोष्टी व्यक्त होऊनच प्रेम फुलतं असं नाही, अव्यक्त गोष्टींची आपली एक मजा आहे. ती प्रेमाचा भाग म्हणून घ्या की जरा समजून.

नातं म्हणजे तुझी, माझी गुंतागुंत

तुम्ही रडत असाल तर अर्थात काहीतरी झालेलं असणार. मग दहा वेळा विचारलं तरी तुमचं ठरलेलं उत्तर असतं 'काहीच नाही'. अपेक्षेनुसार ते आम्हाला आमचं आमचं कळलं पाहिजे. कळतंही कदाचित. कळलं नसतं तर मग आम्ही तुम्हाला समजू शकलो नसतो.

एखादी स्ट्रेट फॉरवर्ड बोललेली गोष्ट पटकन तुमच्या मनाला लागते. याउलट जर आमच्या मनाला तुमची एखादी गोष्ट लागली तर मग तुम्ही सुद्धा प्रयत्न करा की, जरा न बोललेली गोष्ट समजून घेण्याची. आपण दोघेही सारखेच संवेदनशील असू शकतो. नाजूक मनाचा माणूस नेमळट असावा असं गरजेचं नाही. आणि म्हणून हे कोणावर प्रेम करण्याचं किंवा न करण्याचं कारण होऊ शकत नाही.

मग ब्रेकअप आणि मुव ऑन असं करून तुम्ही पुन्हा नॉर्मल आयुष्य जगू पाहता तसंच मुलांचंही होत ना! मुळात आपलं ते नातंच एक तुझी नी माझी गुंतागुंत असते. म्हणून आमचं तुमच्यावर कधीच प्रेम नव्हतं असं होत नाही.. जे होत ते साहिरच्या शब्दांसारखं होतं.. 'वो अफ़्साना जिसे अंजाम तक लाना न हो मुमकिन.. उसे इक ख़ूब-सूरत मोड़ दे कर छोड़ना अच्छा...'

हेही वाचा: कुणाला फासावर न चढवताही प्रेमाशी संबंधित गुन्हे रोखता येतात!

प्रेम तर शाश्वत आहे ना!

जगणं आलं म्हणून व्यवहार आला आणि व्यवहार आला म्हणून पैसे आले. जसे तुमच्याकडे नसतात तसे आमच्याकडेही नसू शकतात. तुम्हाला जसा जास्त पगार नसतो तसा आम्हालाही नसू शकतो. मग हॉटेलमधे कोणता मेनू मागवला यावरून तुम्ही कशी काय माणसाची किंमत ठरवता?

आजचं असं आहे तर पुढे कसं होणार? हा तर कंजूस आहे यावर शिक्कामोर्तब होतो. हा करेल का माझी हौस मौज? कपल गोल्स पूर्ण करणारा दिसत नाही. नको बाबा.. लेट्स मुव ऑन.

पण तुम्हीही एक विचार करून बघा तुमच्या किंवा आमच्या आईवडलांचा. आपल्या बाबांना कदाचित आपल्या आईला महागडी साडी घ्यायला किंवा फिरायला न्यायला कित्येक वर्ष लागलेले असतात. म्हणून आई बाबांना सोडून जात नाही किंवा बाबा आईला सोडत नाही. म्हणून त्याचं प्रेम नसतं का!

तुम्ही म्हणाल पिढी बदललीय, काळ बदलला आहे. मान्य! पण प्रेम तर शाश्वत आहे ना! ते असलं तर असतंच म्हणून तडजोड ओझी वाटत नाही. मग आम्हालाही वाटतं -

'आप ने कहा तो चलो मान लिया,
की हम में कोई बात खास नहीं!
लिबास तो बदलते रहते हैं, इंसान हैं,
शायद आप को धडकते दिल का एहसास नही!'

पोरींना प्रेमाचा 'संशयकल्लोळ' नको

मुलगा असो किंवा मुलगी, एकमेकांना शारीरिक किंवा मानसिकरित्या दुखावणं चुकीचं आहेच. पण दोन्ही बाजूने समजून घ्या. तुम्ही रागात असल्यावर जर आमच्या एक कानामागे दिली किंवा आमच्या समस्त हयातीचा उद्धार केला तर ते जसं रागारागात असेल तसंच आमचंही होऊ शकतं. मग सुरवातीला कोण बोललं हे दुय्यम ठरतं.

तुमच्या सोशल मीडियावर फक्त मित्र मैत्रिणी असतात की नाही, तसंच आमचेही मित्र-मैत्रिणीच. तुमचं लाईक-शेअर तसंच आमचंही. म्हणून आमच्या प्रेमाचा सरळ सरळ 'संशयकल्लोळ' करू नका! तुमचं आमचं सेम असतं. तुमचं कुटुंब तसंच आमचंही कुटुंबच!

इतके वर्ष होऊन तुमच्या किंवा आमच्या आई वडलांचे काही स्वभाव विशेष जसे बदलत नाहीत. तसेच आमचाही स्वभाव असतो. त्यामुळे आम्हालाही जरा वेळ द्या. अगदी तसाच जसा तुम्हालाही हवा असतो. अगदी तसाच जो तुमच्या आमच्या आई बाबांनी एकमेकांना दिला. शाश्वत!

शेवटी सगळं आपलं मानुया, एक दुसऱ्याची  मनं आणि एकमेकांची माणसंसुद्धा!  वसीम बरेलवी यांचे शब्द लक्षात ठेवूया... कदाचित ते आपलं प्रेम असेल, शाश्वत! 'रात तो वक़्त की पाबंद है.. ढल जाएगी..
देखना ये है चराग़ों का सफ़र कितना है!'

हेही वाचा: 

वो सुबह कभी तो आयेगी!

तुमचं आमचं सेमच असतं

प्रेमासाठी खावाच लागतो एखादा धक्का 

प्रेमाच्या नावाखाली कागदी फुलांना पाणी घालणं सुरूय