गिरीश कर्नाड: भारतीय कलासंस्कृतीचा अस्सल प्रतिनिधी

११ जून २०१९

वाचन वेळ : ६ मिनिटं


गिरीश कर्नाड. भारतीय रंगभूमीवरचं महत्त्वाचं नावं. कर्नाड जसे साहित्यात होते, नाटकात होते, तसे ते सिनेमातही होते. प्रसंगी रस्त्यावर उतरुन झगडणाऱ्यांमधेही होते. त्यांनी नाटकाची भाषा बदललीच. पण साहित्याची, चित्रपटाची भाषा बदलण्याचा प्रयत्न केला. साहित्य, समाज, संस्कृतीतला एक मोठा पट आज काळाच्या पडद्याआड गेलाय. कोलाजने त्यांच्याविषयी ज्येष्ठ नाटककार जयंत पवार यांना बोलतं केलं. त्याचं हे शब्दांकन.  

खरं तर गिरीश कर्नाड हा स्कॉलर माणूस होता. कर्नाटकातील पुरोगामी बुद्धिवंतांच्या प्रभावळीत त्यांचं स्थान महत्त्वाचं होतं. कर्नाटकातल्या साहित्य चळवळीशी गिरीश मनाने आणि प्रत्यक्ष कामाने जोडलेले होते. मराठीत नवकथेची लाट सुरु झाली, तशीच कर्नाटकात जी नव्य परंपरा सुरू झाली. कर्नाड त्याच्या दुसऱ्या पिढीतले होते. ए.के. रामानुजन, अनंतमूर्ती अशा विद्वानांनी सगळ्यांना एकत्र बांधून ही चळवळ उभी केली.

कर्नाड यांनी मेहनतीने परदेशी शिक्षणासाठी -होड्स स्कॉलरशीप मिळवली होती. त्यांच्यावर युरोपमधल्या उदारमतवादाचा प्रभाव होता. हाच उदारमतवाद त्यांनी स्वत:च्या आयुष्यातही जपला होता. त्यांचं मोठं योगदान म्हणजे त्यांनी लिहीलेली नाटकं. त्यांनी मिथकांचा आधारे ऐतिहासिक नाटकं लिहिली, असं सर्रास म्हटलं जातं. पण मला विचाराल, तर त्यांची नाटकं राजकीय आहेत. ती थेट भारतीय राजकारणाशी संबंधित, भारतीय धार्मिकता, जातीव्यवस्था यांच्यावर भाष्य करणारी आहेत.

राजकीय भाष्य करणारं ‘तुघलक’

त्यांनी ‘तुघलक’ हे नाटकं लिहिलं. अर्थातच ते महम्मद तुघलकावर आहे. हे नाटकं नेहरुयुगातल्या स्वप्नभंगाचा काळाशी संबंधित असल्याचं म्हटलं गेलं. स्वातंत्र्यानंतर पहिल्या दहा वर्षांतच आलेल्या निराशेशी हे जोडलं गेलं. पण हे नाटक त्याच्यापेक्षाही खोल अर्थाने राजकीय आहे. एखादा संवेदनशील माणूस राजकारणात येतो तेव्हा हळूहळू कसा तो क्रूर होत जातो. त्याच्यातली संवेदनशीलता कशी मरत जाते, याचं चित्रण आहे.

हा तुघलक मुळात अनेक कलांची आवड असलेला होता. त्याने घेतलेले निर्णय हे आततायी होतेच. पण त्याला वेडा ठरवणारे लोक त्याच्या जवळचेच होते. राजकारणात माणूस आल्यावर त्याचा सगळ्यांवरचा विश्वास उडत जातो. त्याच्याभोवती असणाऱ्या माणसांतलं कोण आपलं आहे आणि कोण आपला घात करणार आहे, हे त्याला कळत नाही.

‘तुघलक’ मांडणीच्या दृष्टीनेही अत्यंत महत्वाचं आणि मोठं नाटकं आहे. तुघलकाचा राज्याभिषेक होतो. तेव्हा दोन चोर त्याच्या राज्यात घुसतात. बघता बघता थेट तुघलकाच्या राज्यव्यवस्थेचा भाग बनतात. यातला अजीज नावाचा तर थेट तुघलकाच्याच अगदी जवळ जातो. तोच दगाबाज ठरतो. शेवटी तुघलक त्याला पकडतो पण तो त्याला काहीच शिक्षा देत नाही. तुघलक म्हणतो, तुझ्याइतका मला ओळखणारा दुसरा कुणीच नाहीय. एखादा राजकारणी कसा बदलत जातो, हे दाखवणारं हे नाटक आहे.

हेही वाचा: गिरीश कर्नाड या ग्रेट कलाकाराविषयी इतकं वाचायला हवंच

झगडणाऱ्यांची कुचंबणा दाखवणारी नाटकं

‘हयवदन’ आणि ‘नागमंडल’ ही कर्नाडांची महत्त्वाची नाटकं. या नाटकांतून त्यांनी जो स्त्रीवाद आणला तो अभिव्यक्तीशी जोडला गेला. त्यातली स्त्रीप्रतिमा आजची आहे. म्हणजे ‘हयवदन’मधे एकाचवेळी दोन पुरुषांवर प्रेम करणारी स्त्री. एकाच्या शरीराविषयी आकर्षण तर एकाच्या बुद्धीविषयी. आधुनिक काळातल्या स्त्रीशी हे रिलेट केलंय. तसंच बसवेश्वरांच्या समाजक्रांतीवरही त्यांनी नाटक लिहिलंय. त्यांचा प्रचंड संघर्ष, तेव्हाची  जातिव्यवस्था, धार्मिकता याच्यावर हे भाष्य आहे.

या सगळ्या नाटकांमधून सामाजिक परिस्थिती आणि त्याच्यामधे झगडणाऱ्या माणसाची काय कुचंबणा होते हे त्यांनी दाखवलंय. बाई असो की पुरुष असो. दोघांच्याही समस्या त्यांनी संवेदनशीलपणे मांडल्या. त्यांनी हे ज्या पद्धतीने लिहिलं त्या पद्धतीने अन्य कोणी लिहिलं नाही. चंद्रशेखर कंबार हे कर्नाटकातले नाटककार कर्नाडांचे प्रतिस्पर्धी मानले जातात. एकाच काळात लिहिणारे दोन्ही नाटककार. त्या दोघांनी अनेकदा सारख्या विषयांवर नाटकं लिहिलीत.

हेही वाचा: हेमा मालिनीच्या आईला गिरीश कर्नाडांना जावई करायचं होतं

आता थेट लिहायची वेळ

मिथकांचा वापर करुन नाटक लिहिण्याची आपली पद्धत बदलून त्यांनी गेल्या पंधरा वीस वर्षात सामाजिक नाटकं लिहिली. ते म्हणायचे आता थेट लिहायची गरज आहे. पुरोगामी दृष्टिकोन ठेऊन आधुनिक मुल्यांच्या बाजूने उभं राहणं. अभिव्यक्ती स्वातंत्र्य, व्यक्तिस्वातंत्र्याच्या बाजुने उभं राहणं आणि सामाजिक अन्यायाच्या विरोधात आवाज उठवणं, ही कन्नड साहित्यिकांची परंपरा आहे. ती खरं तर बसवेश्वरांची परंपरा आहे. कर्नाड हे या परंपरेतले अग्रणी होते.

या परंपरेतली एस एल भैरप्पा आणि अनंतमुर्ती ही कर्नाटकातली दोन विरोधी टोकं. भैरप्पा आणि अनंतमूर्ती या दोन साहित्यिकांत तिथला समाज विभागला गेलाय. सनातनी विचारांचे लोक भैरप्पांना उचलून धरतात. गिरीश कर्नाड हे नेहमीच अनंतमूर्ती यांच्या बाजुचे होते. उदारमतवादी, पुरोगामी विचारांचे. 

कर्नाड साहित्यात होते नाटकात होते आणि ते सिनेमातही होते. आणि रस्त्यावर उतरुन झगडणाऱ्यांमधेही होते. कलबुर्गींच्या हत्येनंतर ते थेट रस्त्यावर उतरले होते. बीफ बंदीनंतर त्यांनी विरोधात आवाज उठवला होता. गौरी लंकेश यांच्या हत्येनंतरही ऑक्सिजनची नळी नाकात असूनही ते धरणं द्यायला बसले. गेल्या पाच वर्षांच्या काळात त्यांना खूप धमक्याही मिळत होत्या.

हेही वाचा: विष्णू खरे : कवी गेल्यावर सोबत काय राहिलं?

`संस्कार`मधलाही झगडा तत्त्वांचाच

त्यांनी केलेले सिनेमेही महत्त्वाचे आहेत. त्यांचा पहिला कन्नड सिनेमा ‘संस्कार’ हा तर फारच महत्त्वाचा आहे. कर्नाटकातल्या कर्मठ ब्राम्हणांमधला एक मरतो आणि त्याचा अंत्यसंस्कार कसा करायचा याबद्दल वाद निर्माण होतो. मेलेला अत्यंत व्यसनी, बाहेरख्याली, परागंदा झालेला. गावात एका वेश्येला घेऊन येतो आणि मरतो. त्यामुळे त्याच्यावर अंत्यसंस्कार कसे करणार, असा मोठा वाद होतो. कर्नाडांनी यात ब्राह्मण समाजाच्या प्रमुखाची भूमिका केलीय. त्याला कळत नसतं नेमकं काय करायचं.

शेवटी ते प्रेत कुजायला लागतं आणि त्याच्या सोबत आलेली वेश्या बाई ते प्रेत जाळते. कर्नाडांनी साकार केलेला प्रमुख शुद्ध चारित्र्याचा आणि सन्मान असलेला असतो. तो ध्यान करायला देवळात जातो. तिथं ती बाई आलेली असते. त्या दोघांचा शारिरीक संबंध येतो. त्याला कळत नाही की पाप काय आणि पुण्य काय? शेवटी तो गाव सोडून जातो. असा एक खूप तात्विक झगडा त्यात आहे. या सिनेमाची पटकथा कर्नाडांनी लिहिलीय.

मराठी मातीशी नाळ

गिरीश कर्नाड यांचं शिक्षण महाराष्ट्रात झालं. वडील डॉक्टर. त्यामुळे घर सुखवस्तू होतं. `खेळता खेळता आयुष्य` या आत्मचरित्रात हे त्यांनी छान मांडलंय. आई शिकलेली होती. महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या आईला नाटकाची खूप आवड होती. त्यामुळे त्यांच्यावरचा पहिला प्रभाव हा मराठी संगीत नाटकांचा होता. ते मराठी उत्तम बोलायचे. मराठीतल्या लोकांशी त्याचा चांगला संबंध होता. मराठीत ‘उंबरठा’ नावाचा सिनेमाही त्यांनी केला. विजय तेंडुलकर, महेश एलकुंचवार, सतीश आळेकर या नाटककारांच्या ते खूप जवळचे होते.

तेंडुलकरांचं सखाराम बाईंडर हे नाटक भारतातलं सगळ्यात सर्वोत्कृष्ट नाटक आहे असं ते म्हणाले होते. या नाटकाविषयी बोलताना कर्नाड म्हणतात, भारतीय नाटकांची परंपरा ही २५०० वर्षांची आहे असं आपण म्हणतो. पण खरं म्हणजे ती गेल्या दीडशे वर्षातली आहे. इंग्रज आल्यानंतरच्या काळातली. आणि आपण दीडशे वर्षांची म्हणतो तरी ती ती ४० वर्षांची परंपरा आहे. हे त्यांनी २००० च्या आसपास केलेलं विधान आहे. त्यांच्यामते त्या ४० वर्षातलं सर्वोत्कृष्ट नाटक होतं सखाराम बाईंडर.

हेही वाचा: स्मिताने नव्या नवरीसारखं नटून घेतला जगाचा निरोप

भारतीय रंगभूमीला नवा चेहरा दिला

अहमदनगरच्या साहित्य संमेलनात ते उद्घाटक होते. तेव्हा त्यांनी आणीबाणीच्या पार्श्वभुमीवर भाषण केलं होतं. ते अतिशय गाजलंही होतं. गिरीश कर्नाड यांना भारतीय कलासंस्कृतीचा प्रतिनिधी म्हणता येईल. उदारमतवादी कलासंस्कृती जी १९६०च्या नंतर जन्माला आली. त्याच्या आधी ती तशी होती, असं म्हणता येणार नाही. ती खूप ब्राह्मणी होती. १९६० च्या नंतर ज्या चार नाटककारांनी भारतीय रंगभूमीला एक वेगळा चेहरा दिला. त्यात विजय तेंडुलकर, बादल सरकार, गिरीश कर्नाड आणि मोहन राकेश यांचा समावेश होतो. हे चौघेही होते कथित उच्च जातींचे. पण त्यांचा सगळ्यांचा ब्राह्मणी व्यवस्थेला विरोध होता.

त्या भूमिकेतून त्यांनी वेगळ्या पद्धतीची रंगभाषा आणली. नाटकं आणली. जसं मराठी साहित्यात नवीन वारं आलं किंवा हिंदीत, कन्नडमधे जशी एक नवी परंपरा आली. या साठोत्तरी काळातले गिरीश कर्नाड एक मोठे साहित्यिक होते. त्यांनी साहित्याची, चित्रपटाची भाषा बदलण्याचा प्रयत्न केला. नाटकात त्यांना खूप यश आलं. मुळात ते नाटककार होते. त्यांनी काही कथा, कादंबऱ्या लिहिल्या नाहीत.

पण नाटकात त्यांनी स्वत:ची एक वेगळी भाषा निर्माण केली. पुराणकथा, पंचतंत्रातल्या कथा, असं घेऊन त्यांनी हे सगळं तयार केलं. सत्ताधाऱ्यांच्या मागचा मानवी चेहरा त्यांनी आधी तुघलक किंवा मग टिपू सुलतानावरच्या नाटकातून पुढे आणला. त्यांचं हे राजकीय नाटककार असणं त्यांना वेगळं ठरवत गेलं. इतरांनी नंतर राजकीय नाटकं लिहिलं. पण कर्नाड सुरवातीपासूनच राजकीय नाटकं लिहित राहिले.

हेही वाचा: लेखक, कवींनी बहिष्कार टाकला, संमेलनाध्यक्ष काय करणार?

( शब्दांकनः अक्षय शारदा शरद )