थोर लेखक जॉर्ज ऑर्वेल यांच्या १९८४ या कादंबरीला पब्लिश होऊन आज ७१ वर्ष झाली. सात दशकांनंतरही या कादंबरीतली एक ना एक पात्र आपल्याला आजचं वाटतं. तत्कालीन राजकारणावर भाष्य करणारी ही कादंबरीला आपल्याला आजची वाटते. या कादंबरीची माहितीपर ओळख करून देणारा हा लेख.
जॉर्ज ऑर्वेल, एक दूरदृष्टी असणारा लेखक, लोकशाही समाजवादाचा पुरस्कर्ता, काळाच्या पुढे जाऊन विचार करणारा विचारवंत. '१९८४' ही त्याची शेवटची साहित्यिक कलाकृती. रशियाच्या स्टँलिनची राजवट आणि जर्मनीची हिटलरच्या एकाधिकारशाहीला सामोरे ठेऊन १९४९ मधे लिहलेल्या या कादंबरीतली पात्रं आपल्याला ७० वर्षांनीही आजचीच वाटतात. अनेक अर्थाने ही कादंबरी आजही समकालीन ठरते.
एकपक्षीय शासन, एकाधिकारशाही टिकवण्यासाठी सत्ताधीशांकडून नागरिकांच्या हरेक हालचालीवर निगराणी ठेवली जाते. त्यातून लोकांच्या आयुष्यातील प्रत्येक खासगी क्षणावर कुणाचं ना कुणाचं सातत्याने लक्ष असतं. ही एकाधिकारशाही लोक कशाचा विचार करतात, कशावर विश्वास ठेवतात अशा बारीकसारीक गोष्ठींची नोंद ठेवत असते.
हेही वाचा : १९४७ मधेच कोरोनासारख्या रोगाचं तंतोतंत वर्णन करणारी कादंबरी
जॉर्ज ऑर्वेल यांनी '१९८४' ही कादंबरी लंडनमधे अशा प्रकारचं एकाधिकारशाही सरकार आहे अशी कल्पना करून लिहलीय. या राज्याचे नाव आहे ओशियानिया स्टेट. इथे अगदीच निराशावादी परिस्थिती आहे. लोकांना ना खायला मिळतं ना प्यायला. चहुबाजूंनी नुसतं युद्ध युद्ध चालू आहे. सर्वसामान्य नागरिकांना हे युद्ध का सुरू आहे याची कल्पनादेखील नाही.
अचानक कुठूनतरी रॉकेट्स येतात, बॉम्बचा वर्षाव होतो. आणि या सगळ्यात कहर म्हणजे सरकारी यंत्रणा नागरिकांवर पाळत ठेऊन आहे. नागरिक काय काय करतात याची नोंद ठेवणं सुरू आहे. सर्वत्र पोस्टर्स लावलेत 'बिग ब्रदर इज वॉचिंग यू.' बिग ब्रदर तुमच्यावर नजर ठेऊन आहे. हा बिग ब्रदर म्हणजे राजकारणातला सर्वोच्च नेता असावा. जसा स्टँलिन किंवा हिटलर.
इथल्या सरकारने सर्वत्र छुपे कॅमेरे आणि माइक्रोफोन लावलेत. नागरिकांची प्रत्येक हालचाल, संभाषण कुठल्या ना कुठल्या यंत्रात कैद करून ठेवलं जातंय. टीवी स्क्रीन्सच्या माध्यमातून नागरिकांच्या घरातल्या हालचालींवरही पाळत ठेवली जातेय. महत्त्वाचं म्हणजे हा टीवी आपण कधीही बंद करू शकत नाही. म्हणजे हरेक क्षण आपल्यावर सरकारी निगराणी राहणार.
या सरकारची वेगवेगळी मंत्रालयं आहेत. मिनिस्ट्री ऑफ पीस अर्थात शांतता मंत्रालयाला युद्धाचे सर्वाधिकार आहेत. मिनिस्ट्री ऑफ लव हे कायदा आणि सुव्यवस्था राखते. प्रसंगी बंडखोरांचा छळ करते. मिनिस्ट्री ऑफ प्लेंटी हे रेशनिंग व्यवस्था सांभाळतं. मिनिस्ट्री ऑफ ट्रूथ अर्थात सत्य मंत्रालय हे शासकीय प्रचार करतं. इथे सरकार सांगेल तेच सत्य आहे. कारण मीडियावर सरकारचं संपूर्ण नियंत्रण आहे.
नागरिक अनेक गोष्टी स्वतःच्या मनाप्रमाणे करू शकत नाहीत. कारण तसं केल्यास मिनिस्ट्री ऑफ लवकडून त्यांचा प्रचंड छळ केला जातो. या राज्यात आपण कोणालाही मित्र बनवू शकत नाही. कोणासोबत फिरूही शकत नाही. कुणावर प्रेम करू शकत नाही. कुणाशी सेक्स करू शकत नाही. कारण बिग ब्रदर इज वॉचिंग यू.
तुमच्याकडे जितकी भावनिक ऊर्जा आहे, ती तुम्हाला सरकारसाठी खर्च करावी लागेल. तुम्हाला सरकारचे सर्व कार्यक्रम टीवीवरून बघावेच लागतील. सरकारच्या धोरणांना पाठिंबा द्यावा लागेल. सहभाग घ्यावा लागेल. आता एवढं सगळं केल्यावर तुम्हाला स्वतंत्र विचार करायला वेळ कुठं मिळणार?
हेही वाचा : पाचवीला पुजलेल्या प्लेग लॉकडाऊनमुळेच जगाला शेक्सपिअर मिळाला!
या कादंबरीचा नायक ३९ वर्षाचा विन्स्टन स्मिथ, जो सरकारसाठी काम करत असतो. इतरांप्रमाणे बेकार जीवन जगत असतो. स्मिथ बिग ब्रदरची नजर चुकवून रोज डायरी लिहतो. त्यामधे तो कशाप्रकारे या बेकार जीवनाचा तिरस्कार करतोय याची नोंद असते. तत्कालीन समाजव्यवस्थेचा पुरावा म्हणजे ही डायरी आहे. त्यातून बंडखोरी होऊ शकते. त्याअर्थी तो गुन्हा करतोय. स्मिथला हा अधिकार नाही. कारण सरकारने सर्व इतिहासाची पुस्तकं, नोंदी जाळून टाकल्यात. आता सरकार स्वतःचा नवीन इतिहास त्याच्या नवीन कार्यालयीन भाषेत लिहीत आहे.
स्मिथशिवाय अजून दोन पात्रं आहेत. स्मिथला या दोघांचं थोडे आकर्षण आहे. पण तो त्यांना ओळखत नाही. कारण इथे मित्र बनवण्यास बंदी आहे. ज्युलिया ही आकर्षक तरूणी स्मिथच्या बिल्डिंगमधेच मॅकेनिकचं काम करते. स्मिथला ती आवडत असते. पण प्रेम व्यक्त करायला तो घाबरतो. कारण त्यांना प्रेम करायचा अधिकार नाही.
दुसरं पात्र आहे अब्राहम. हा इनर पार्टीचा सदस्य. म्हणजे स्मिथपेक्षा हुद्द्याने मोठा. अब्राहम हुशार आहे. स्मिथला त्याच्यात बंडखोरीची लक्षण दिसतात. त्यामुळे अब्राहम आपली भावना समजू शकतो असा स्मिथचा समज आहे. पण तो त्याला मित्र बनवू शकत नाही.
यानंतर कादंबरीला एक वेगळं वळण मिळतं. ज्युलिया स्मिथकडे एक चिठ्ठी सोडते. त्यामधे तिने आय लव यू असं लिहलेलं असतं. मुळातच स्मिथला ती आवडत असते. त्यामुळे स्मिथचं जीवनच बदलतं. आता तो तिच्याशिवाय राहू शकत नाही. परंतू त्या दोघांना एकमेकांशी खासगीमधे भेटणं, बोलणं शक्य नाही. कारण सर्वत्र छुपे कॅमेरे आणि माईक्रोफोन असतात.
शेवटी काहीतरी जुगाड़ करून ते एकमेकांच्या सहवासात येतात आणि आपलं प्रेम व्यक्त करतात. त्यांचे प्रेम आता लपुन छपुन फुलत असतं. ते दोघंही खुश असतात. त्यांनी खूप मोठा धोका पत्करलाय. पण त्यांना त्याची पर्वा नाही. आता या सर्वव्यापी बिग ब्रदरपासून आपण मुक्त आहोत आणि या एकाधिकारशाही विरोधात आपण लढू अशी भावना त्यांच्यात निर्माण होते. अर्थातच हे बंडखोरीचं लक्षण असतं.
हे कोरोना स्पेशलही वाचा :
लस सापडल्यावर तरी कोरोना संपेल का?
कोरोनाग्रस्त मृतदेह जाळायचा की पुरायचा?
कोरोनाचा पेशंट वेंटिलेटरवर किती काळ जिवंत राहतो?
कोविड-१९ आजारावर औषध नसताना पेशन्ट बरं कसं होतात?
एकदा बरं झाल्यावरही पेशंटला का होतेय पुन्हा कोरोनाची लागण?
साथरोग आला म्हणून मासिक पाळी थांबत नाही, उलट गुंतागुंतीची बनते!
पाठीत खंजीर खुपसण्याचं राजकारण
एकादिवशी अब्राहमने स्मिथला घरी भेटायला येण्याचं निमंत्रण दिलं. या राज्यात कुणालाच कुणाच्या घरी भेट देण्यास बंदी असते. म्हणजे आता अब्राहमही बंडखोरीच्या पवित्र्यात आहे हे स्मिथला समजतं. स्मिथ ज्युलियाला घेऊन अब्राहमच्या घरी जातो. तो अब्राहमला त्याच्या आणि ज्युलियाच्या संबंधाबद्द्ल सांगतो.
स्वतः बंडखोरीच्या तयारीत असल्याचं सांगत अब्राहमने स्मिथला एक पुस्तक वाचायला दिलं. त्यामधे ही व्यवस्था अशी का आहे याची माहिती असते. ते पुस्तक घेऊन स्मिथ आणि ज्युलिया स्मिथच्या घरी जातात. स्मिथ ते पुस्तक वाचायला घेतो इतक्यात पोलिस येतात. ते त्याला आणि ज्युलियाला मिनिस्ट्री ऑफ लवमधे घेऊन जातात. अब्राहम हा बंडखोर नसतो. तो सरकारचा माणूस असतो. त्याला स्मिथला पुराव्यानिशी पकडायचं असते. म्हणून हा बनाव रचलेला असतो.
मिनिस्ट्री ऑफ लवमधे आता स्मिथचा छळ सुरू होतो. तिथे त्याची हाडं मोडतात, त्याला उपाशी ठेवलं जातं. इलेक्ट्रिक शॉक दिला जातो. हे असह्य झाल्याने स्मिथ त्याच्या सर्व गुन्ह्यांची कबुली देतो. ज्युलियाबद्द्लही सर्व सांगतो. एवढा छळ करून शेवटी स्मिथला सांगितलं जातं, ‘बिग ब्रदर सर्व नागरिकांच्या मनावर नियंत्रण प्रस्थापित करू इच्छितो, नागरिकांनी त्याच्या मर्जीप्रमाणे वागणं अपेक्षित आहे. बिग ब्रदर दोन अधिक दोन बरोबर पाच म्हणेल तर नागरिकांनी तेच अंतिम सत्य मानायला हवे.’
शेवटी स्मिथचं तोंड उंदीरांनी भरलेल्या एका बॉक्समधे घातलं जातं. त्यावेळी स्मिथ स्वतः निर्दोष असल्याचं रडून, ओरडून सांगतो. खरी दोषी ज्युलिया आहे. तिच्यासोबत हे सर्व करा अशी विनवणी तो करतो. तिकडे ज्युलियाचाही छळ होतो.
मिनिस्ट्री ऑफ लव अशा प्रकारे स्मिथ आणि ज्युलियाला वेगळं करते. आता दोघंही आतून खचलेत. ते एकमेकांना भेटतात पण केवळ कामापुरते. बंडखोरीचा विचारदेखील त्यांच्या मनाला शिवत नाही. कारण दोन अधिक दोन बरोबर पाच हे स्मिथने सत्य मानलंय.
जॉर्ज ऑर्वेलची '१९८४' ही साहित्यिक कलाकृती निव्वळ अप्रतिम आणि असामान्य आहे. साहित्य आणि राजकारणाशी संबधित प्रत्येकाने ही कादंबरी आवर्जून वाचली पाहिजे. यातून वर्ग संघर्ष, स्वातंत्र विरुद्ध दडपशाही, भीती विरुध्द तिरस्कार, विचार स्वातंत्र्य विरुध्द मनावर नियंत्रण अशा अनेक कल्पना समोर येतात. 'सर्वेलन्स स्टेट' अर्थात नागरिकांवर पाळत ठेवणारं राज्य म्हणजे नेमकं काय हे समजतं. एकाधिकारशाही राज्याला 'ऑर्वेलीयन स्टेट'किंवा 'ऑर्वेलचे राज्य' का म्हणतात हेदेखील समजतं.
ऑर्वेलच्या या राज्यात एकाधिकारशाही टिकवण्यासाठी ‘डबलथिंक’ या पध्दतीचा उपयोग केला जातो. लोकांचा विश्वास बसण्यासाठी परस्परविरोधी कल्पनांचा वापर केला जातो.
हेही वाचा : महाराष्ट्राचं राजकारण समजून घेण्यासाठी ही आत्मचरित्रं वाचायला हवीत
'वॉर इज पीस' म्हणजे शांतता कायम ठेवण्यासाठी युद्धाची गरज असल्याचा भास निर्माण केला जातो. ‘फ्रिडम इज स्लेवरी’ या कल्पनेच्या मध्यमातून लोकांच्या बारीकसारीक गोष्ठींवर बंधनं आणून त्यांना गुलामीत टाकलं जातं. आणि त्यातच ते अधिक स्वतंत्र आणि मुक्त असल्याचं भासवलं जातं. 'इग्नोरन्स इज स्ट्रेंथ'च्या माध्यमातून लोक कसं तथ्यांकडे, सत्याकडे दुर्लक्ष करतील हे पाहिलं जातं.
कारण त्यामुळे त्यांची प्रश्न विचारण्याची क्षमता नाहीशी होते. लोकांच्या दुर्लक्ष करण्याच्या वृत्तीमुळे बिग ब्रदरची सत्ता अधिक प्रबळ होते. म्हणून ही त्रिसूत्री बिग ब्रदरकडून नागरिकांवर सतत बिंबवली जाते.
ऑर्वेलच्या या राज्यात पक्ष कार्यकर्ता हा संपूर्ण नियंत्रित असतो. तो कुठलाच विचार करत नाही, प्रश्न विचारत नाही. तो फक्त बिग ब्रदरचा आदेश शिरसावंद्य मानून पळत असतो. या राज्यात उपासमार आणि दारिद्रयाकडे दुर्लक्ष करून युद्धावर प्रचंड खर्च केला जातो. म्हणून ऑर्वेल म्हणतो, ‘युद्ध ही जिंकण्यासाठी केली जात नाहीत तर ती चिरंतन राहण्यासाठी केली जातात.’
या राज्यात मीडियाचं सगळे नियंत्रण राज्याकडे असते. त्यामुळे राज्य जे मानेल तेच सत्य आणि त्याचाच प्रचार केला जातो. मिनिस्ट्री ऑफ ट्रूथकडून जुना इतिहास नष्ट केला जातो आणि आपल्याला हवा तसा इतिहास लिहिला जातो. कारण लोकांना नष्ट करण्याचा सर्वात परिणामकारक मार्ग म्हणजे त्यांची इतिहासाबद्द्लची समज नाकारणं किंवा खोडून काढणं होय.
भीती हाच ऑर्वेलच्या राज्याचा पाया आहे. नागरिकांमधे भीतीचं वातवरण निर्माण व्हावं म्हणून स्वतःच्याच नागरिकांवर बॉंबहल्ले घडवले जातात. आणि ते आभासी शत्रूने घडवल्याचं भासवलं जातं. या भीतीतून नागरिकांमधे शत्रूविषयी तिरस्कार निर्माण केला जातो. अशा परिस्थितीत नागरिक कमी विचार करतात. कारण त्यावेळी भावनेला प्राधान्य दिलं जातं. मग त्यांच्या मनावर आणि विचारांवर नियंत्रण मिळवणं सोपं जातं.
मिनिस्ट्री ऑफ ट्रूथमधुन जो खोटा प्रचार केला जातो तेच सत्य आहे यावर नागरिकांचा विश्वास बसतो. मग बिग ब्रदरची सत्ता अजून बळकट होते. शेवटी बिग ब्रदर जाहीर करतो, दोन अधिक दोन बरोबर पाच. आणि तेच सत्य मानलं जातं.
हेही वाचा : शॉशांक रिडीम्पशन: कारागृहातल्या घुसमटीचं अस्वस्थ करणारं चित्रण
ऑर्वेलच्या या सर्वेलन्स स्टेटमधे बिग ब्रदर जी काही आकडेवारी मांडली जाते त्यावर नागरिकांनी कोणताही प्रश्न न विचारता विश्वास ठेवायचा. मग ती आकडेवारी विकासाची असो किंवा युद्ध बळींची. प्रश्न विचारला तर तुम्ही देशद्रोही असाल.
अशा या सर्वेलन्स स्टेटचं भयंकर चित्र ऑर्वेलने सात दशकांआधी '१९८४' मधून मांडलंय. जगभरात सर्वत्र ही परिस्थिती कमी अधिक प्रमाणात आहे. नागरिकांची सगळी बारीकसारीक माहिती आता सरकारकडे जमा आहे. मग ती फ़ेसबुकच्या माध्यमातून असो किंवा आधार कार्डच्या. यापुढे तुम्ही कधी सर्वेलन्स स्टेट, ऑर्वेलीयन स्टेट किंवा सेंसॉरशिप असे शब्द कुठेही वाचाल, ऐकाल तर जॉर्ज ऑर्वेलची '१९८४' ही कादंबरी नक्की आठवा.
हेही वाचाः
चीन कधीच जगावर सत्ता गाजवू शकत नाही, कारण
खरंच, भारतात कोरोनाची दुसरी लाट जूनमधे येणार आहे?
वाङ्मयचौर्य अर्थात उचलेगिरीमागे आहे सुरस कथेचा इतिहास
अमेरिकेतल्या ब्लॅक लाईव्ज मॅटर आंदोलनाचं काळंगोरं वास्तव
कुणी खुलेपणाने तर कुणी निनावी पण बोलतोय, गुजरात बोलू लागलाय
अखिल भारतीय बहिष्कृत परिषद शताब्दी : अस्मितेच्या नेतृत्वाचा युगारंभ
‘बारकुल्या बारकुल्या ष्टोऱ्या’ने मराठी कादंबरीला साचलेपणातून बाहेर काढलं