आज आपण भारतातल्या कानाकोपऱ्यात जातीवाद पाहतो. बाबासाहेब आंबेडकरांनी तर या जातीवादाविषयी भरपूर काही लिहून ठेवलंय. ते वाचताना जातव्यवस्था निर्माण होण्यापूर्वी जात नसलेली अशी समाजाची घडी या देशात होती का? असा प्रश्न भाषातज्ञ गणेश देवी यांना पडला. त्यातूनच त्यांनी जातव्यवस्थेची सविस्तर गोष्ट मांडलीय.
कार्यक्रमः सत्यशोधक व्याख्यानमाला, समता प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग
ठिकाणः फेसबुक लाइव
वेळः २३ एप्रिल, २०२०
वक्ते: गणेश देवी
विषयः जात अस्पृश्यता आणि आजचे वर्तमान
कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे सार्वजनिक कार्यक्रम रद्द करावे, पुढे ढकलावे लागलेत. पण लॉकडाऊन काही एवढ्यात संपणारी गोष्ट नसल्याचं ओळखून काही संस्था, संघटनांनी आपल्या वार्षिक कार्यक्रमांसाठी नवा मार्ग शोधलाय. कणकवलीच्या समता प्रतिष्ठाननं आपल्या व्याख्यानमालेचं फेसबूक लाईवच्या माध्यमातून आयोजन केलं. यंदा चौथं वर्ष असलेल्या या व्याख्यानमालेत जगप्रसिद्ध भाषातज्ञ आणि विचारवंत गणेश देवी यांचं पहिलं व्याख्यान झालं. त्यांनी भारतातली जातीव्यवस्थेची कुळकथा उलगडून दाखवली.
जातव्यवस्था समाजातून जात नाही, याची चिंता आपल्या सगळ्यांनाच लागलीय. आणि ही व्यवस्था अशीच राहूनही चालणार नाही. गेले हजार - दोन हजार वर्ष ही व्यवस्था इथे पसरलेली आहे. त्यात भरडून निघालेल्या समाजातल्या लोकांना पाहुन आपलं हृदय द्रवतं.
१९३५ मधे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘जातीचे समूळ उच्चाटन’ याविषयावर भाषण तयार केलं होतं. ते भाषण देऊ शकले नाहीत. म्हणून त्या भाषणाच्या लिखित सामुग्रीची पुस्तिका झाली. नंतर त्यात अनेक नोंदींची भर घालून त्याचं 'Annihilation of caste' हे पुस्तक तयार झालं. या पुस्तकात डॉ. आंबेडकरांनी जात का निर्माण झाली? त्याचे फायदे-तोटे काय झाले? सनातन धर्माच्या एकंदर स्वरूपामुळे ही जातव्यवस्था सतत आपल्या डोक्यावर टांगत्या तलवारीसारखी का राहिली? याचं फार चांगलं स्पष्टीकरण दिलंय.
हेही वाचा : आंबेडकरांनी नाकारलेला शब्द पंतप्रधानांनी वापरू नये
हे पुस्तक प्रत्येक भारतीयाने किंबहुना जगात ज्याला माणुसकी हे मूल्य वाटतं त्या प्रत्येकाने वाचलंच पाहिजे. ते मी वाचलं तेव्हा माझ्या मनात अनेक नवीन प्रश्न निर्माण झाले. त्यातला एक प्रश्न म्हणजे या देशात माणूस केव्हापासून राहतो? आणि जातव्यवस्था निर्माण होण्याआधी जात नसलेली अशी समाजाची काही घडी या देशात होती का? या प्रश्नाचं उत्तर मी बरेच वर्ष शोधत होतो.
त्यातून समोर आलेल्या संशोधनाच्या आधाराने या प्रश्नाचं उत्तर मिळू शकलेलं नाही. कारण प्राचीन भारताचा लिहिला गेलेला इतिहास साधारणपणे आजपासून ३५०० वर्षापूर्वीपर्यंतचा आहे. त्याच्या आधीचा मोहेंजोदडो, हडप्पा, सिंधू संस्कृती याचा इतिहास आपल्याला फारसा माहीत नाही. तिथलं लिखाण झालं चित्ररूपाने, चिन्हरूपाने. त्याचं वाचन आजपर्यंत झालेलं नाही. पण तिथल्या तीन गोष्टी आपण स्वीकारल्या आहेत.
एक म्हणजे लोटा. लोट्याचा जो आकार आहे तो हडप्पा संस्कृतीतून आलेला आहे. तेव्हा हा लोटा मातीचा बनलेला होता. दुसरं म्हणजे त्यांच्याकडून आपण कावळ्याची गोष्ट घेतलेली आहे. तहान लागली म्हणून माठात खडे टाकणारा कावळा हडप्पा संस्कृतीत चित्र रूपाने नोंदवला आहे. आणि तिसरी गोष्ट स्वस्तिक. या गोष्टी आजपर्यंत आपल्याकडे चालत आलेल्या असल्या तरी मोहेजोदाडोमधले लोक, हडप्पामधले लोक कोण होते? त्यांचे विचार काय होते? त्यांची मूल्यं काय होती ? याविषयी आपल्याला फारशी माहिती नाही.
गेल्या काही दशकांत दोन अत्यंत उपयोगी असे संशोधनाचे धागे निर्माण झाले. त्यातला पहिला म्हणजे आपल्या देशात उपलब्ध असणाऱ्या तांदळाच्या प्रजातींचा इतिहास. आपल्या देशात दोन प्रकारची पिकं घेतली जातात. ही दोन पिकं घेण्याची पद्धत भारताचं वैशिष्ट्य दाखवते. पहिल्या प्रकारचं पीक मुख्यत्वे उत्तर पश्चिमेकडे म्हणजे हरयाणा, पंजाब आणि काश्मिरच्या वरच्या भागात घेतलं जात होतं. याच प्रकारचं पीक मध्य आशिया, दक्षिण युरोप आणि रशियाच्या काही भागातंही घेतलं जात असे.
तर दुसऱ्या प्रकारचं पीक आपल्याकडे आलं ते ३ ते ४ हजार वर्षापूर्वी. ते पूर्वेकडच्या देशांमधून आपल्याकडे आलं असावं. अशाप्रकारे एक पूर्वेकडून तर दुसरं पश्चिमेकडून आलेल्या पिकांची प्रथा आपल्या बळीराजाने आजतागायत टिकवून ठेवलीय. या पीकांच्या आधारे आपल्याला आपल्या देशाचा इतिहास लिहिणं शक्य झालं.
दुसरा संशोधनाचा धागा म्हणजे २०१८मधे प्रकाशित झालेलं ‘Who we are? How we got here?’ हे पुस्तक. एका ज्युईश संशोधकाने हैद्राबादमधल्या इंडियन सेन्ट्रल फॉर सेल्युलर मॉलिक्युलर बायोलॉजी सीसीएमडी इथं देशातल्या १० हजाराहून जास्त लोकांची जीन कल्चर जमवलेली होती. या पुस्तकाच्या लेखकाला या जीन्सचा अभ्यास करण्याची संधी मिळाली.
या संशोधनातून सुमारे ४० हजार वर्षापूर्वी अंदमानमधून दक्षिण भारतात काही लोक आले, असं सिद्ध होतं. पण नंतर एक मोठं शीतयुग आलं. ख्रिस्तांची १८ हजार ते १२ हजार वर्ष म्हणजे आपल्या २० ते १४ हजार वर्षापूर्वी हे शीतयुग आलं असावं. त्यात बरीचशी माणसं नाहीशी झाली. पण दक्षिण भारतातली काही माणसं शिल्लक राहीली. आणि तिथून ती हळूहळू उत्तरेकडे पसरली.
हेही वाचा : क्वारंटाईनमधेही लोकांना जातीची माती खाण्याची अक्कल कुठून येते?
दक्षिण भारतामधले हे लोक आणि हडप्पा आणि सिंधू संस्कृती विकसित करून राहणारे लोक यांचा एकमेकांशी काही संबंध होता का? असल्यास काय संबंध होता? यावर अजून संशोधन झालेलं नाही. त्यांची भाषा तामिळशी जुळते की नाही हेही कळालेलं नाही. तर भारतात दक्षिण भारतातले आणि सिंधू, हडप्पा संस्कृतीतले असे दोन प्रकारचे लोक होते. आणि तिसऱ्या प्रकारचे लोक सुमारे २५०० वर्षापूर्वी इथं आले. आता या लोकांविषयी थोडीशी माहिती सांगतो आणि जातीच्या मुद्यावर येतो.
हे बाहेरून आलेले तिसऱ्या प्रकारचे लोक स्टेप्स या भागातून, अर्मेनिया, टर्की या देशामधून इकडे आले होते. त्यांनी त्यांची विशिष्ट भाषा तोपर्यंत विकसित केली होती. त्या भाषेला इंडो इराणीयन असं नाव देण्यात येतं. त्या इंडो इराणीयनच्या दोन शाखा बनल्या एक पश्चिमेच्या अरब देशांकडे गेली आणि दुसरी अर्मेनियाच्या पूर्व दक्षिण दिशेला भारताकडे आली. त्याला इंडोआर्यन हे नाव देण्यात आलं. हे नाव १८व्या शतकाच्या अखेरीस देण्यात आलं.
या लोकांकडे एक विशिष्ट गोष्ट होती ती म्हणजे त्यांनी घोडे कसे पाळायचे याचं शिक्षण घेतलं होतं. चाकाचा वापर आणि घोड्याचा वापर एकत्र करून त्यांनी सैन्यासाठी शस्त्र बनवलं होतं. त्या शस्त्राचं नाव होतं रथ. घोड्यांनी खेचली जाणारी गाडी. या गाडीत बसून बाण फेकले तर जास्त प्रभावीरित्या युद्ध करता येतं ही किमया त्यांनी साध्य केली. त्यामुळे त्यांचा प्रसार, विस्तार, त्याचं स्थलांतर फार प्रभावी रितीने झालं.
हा काळ होता आजपासून सुमारे २९०० वर्षांपूर्वीचा. पुढच्या ३०० ते ४०० वर्षांमधे ऋग्वेदाचा विकास झाला. या आर्य लोकांकडे लिपी नव्हती. फक्त स्मृती परंपरेवर म्हणजे लक्षात आहेत तेवढी होम हवनाची गाणी ते म्हणत असतं. पुढे ही गाणी मंत्राच्या स्वरूपात आपल्यासमोर आली. केवळ स्मृतीच्या आधारावर रचलेल्या या कवणाच्या ओळी लक्षात ठेवण्याचं अवघड काम ते करत राहीले. हे काम करणाऱ्या लोकांना शिक्षण देण्यासाठी त्यांनी नवीन ज्ञान पद्धतीची, शिक्षण पद्धतीची संरचना केली. ट्रेनिंगची मेथड बनवली. तीही मौखिक होती.
थोडक्यात सिंधू संस्कृतीचा नाश झाल्यानंतर हे लोक इथे येऊन पोचले होते. दक्षिणेकडचे काही लोक इथे होतेच. आता सिंधू संस्कृतीचा विलय झाला तरी त्यातला प्रत्येक व्यक्ती संपूर्णपणे नाहीसा झाला असं शक्य नाही. फक्त त्या संस्कृतीचं महत्त्व ५०० वर्षाच्या काळामधे कमी होत गेलं. असे ३ प्रकारचे लोक भारतात आल्यावर उत्तरेकडच्या काही भागांत म्हणजे पंजाब, हरियाणा आणि आत्ताच्या उत्तर प्रदेशात त्यांचे संघर्ष सुरू झाले.
या संघर्षात एका वर्गाला शेतीविषयी अत्यंत सुक्ष्म माहिती होती. दुसरा वर्ग असा होता, ज्यांना शहर कशी वसवतात, विटा कशा बनवतात, वस्त्र कशी बनवतात, याची माहिती होती. आजच्या भाषेत, ते टेक्नॉलॉजीत पारंगत होते. तर तिसऱ्या वर्गातल्या लोकांना, शब्द कसे लक्षात ठेवले जातात आणि ते लक्षात ठेवण्यासाठी कशाप्रकारचं शिक्षण नव्या पिढीला द्यावं लागतं, याची माहिती होती. हे तिन्ही एकत्र आले तेव्हा शब्द लक्षात ठेवणारे आणि त्यासाठी नव्या पिढीला शिक्षण देणारे अशा लोकांनी दोन प्रकारच्या लोकांना दावणीला बांधण्याचं काम चालू एक. एक, त्यांचे शब्द वापरत नव्हते त्यांना आणि ज्यांच्या टेक्नोलॉजीची त्यांना गरज होती त्यांनाही. हे काम इसवीसन पूर्व ११०० ते ८०० या ४०० वर्षामधे झालं.
हे कोरोना स्पेशलही वाचा :
लस सापडल्यावर तरी कोरोना संपेल का?
कोरोनाग्रस्त मृतदेह जाळायचा की पुरायचा?
जगाच्या तुलनेत भारत कसा लढतोय कोरोनाशी?
कोरोनाचा पेशंट वेंटिलेटरवर किती काळ जिवंत राहतो?
कोरोनाचं युद्ध लढणाऱ्या आणि जिंकणाऱ्या महिला लीडर
कोविड-१९ आजारावर औषध नसताना पेशन्ट बरं कसं होतात?
तर भारताच्या या समाज व्यवस्थेत एक बोलणारा, दुसरा वस्तू तयार करणारा आणि तिसरा पीक तयार करणारा अशा प्रकारचे लोक एकत्र आले. त्यांच्यात अर्थातच तेढ होता, तणाव होता. या तेढ आणि तणाव यांना विरोध करण्यासाठी दोन प्रकारचे विचार पुढे आले. एक होता ते वापरत असलेली हिंसा अमान्य करणारा विचार आणि दुसरा होता ते वापरत असलेले देव अमान्य करणारा विचार. त्यांच्या देवांना अमान्य केलं त्यांचा आर्यांनी नरसंहार केला आणि संपूर्णपणे तो विचार गाडून टाकण्यात आला.
त्याचा लवलेशही आपल्या इतिहासात शिल्लक नाही. फक्त त्याच्या विषयीचे रिपोर्ट आहेत. ते एका बंगाली चिंतकांनी एकत्र केल्यामुळे आता आपल्याला निरीश्वरवादी भारतीय विचार लोकायत म्हणून थोडेफार माहिती आहेत. दुसरा विरोध झाला तो हिंसेच्या प्रश्नावर. तो दोन प्रकारच्या चिंतकांनी केला. एक जैन महावीर आणि त्यांचे अनुयायी. त्यांनी कुठल्याही स्थितीत हिंसा अमान्य करणं हे तत्त्व पुढे आणलं.
दुसरं चिंतन होतं गौतम बुद्धाचं. गौतम बुद्धांनीही हिंसा अमान्य केली. त्याचबरोबर या बोलणाऱ्या आणि बोलण्याची स्मृती असलेल्या लोकांची लॉजिकल बैठकही अमान्य केली. गौतम बुद्धांनी याच जगात ईश्वराचा ध्यास न घेता दुःखाला कसं सामोरं जाता येईल, दुःख कसं पचवता येईल याची संपूर्ण मांडणी केली. आता हा काळ आजपासून सुमारे २६०० वर्षापूर्वीचा असावा.
तोपर्यंत भारतातल्या लोकांच्यात तणाव आणि वैमनस्य असलं तरी जुलमी जातव्यवस्था अजूनही निर्माण झालेली नव्हती. त्यानंतरच्या काळात बुद्धाला मानणारे सम्राट होऊ शकले. अशोक याचं धम्मचक्र आपण आजही स्वीकारलंय. जैन इतरांसारखं आपलं महाभारत लिहू शकले. इतरांप्रमाणे आपल्या तीर्थकरांचा इतिहास सांगू शकले. इतरांप्रमाणे आपली मंदिर आणि मठ बांधू शकले.
इसवीसनापूर्व ३०० ते इसवीसनानंतर १०० वर्ष या ४०० वर्षामधे अनेक जणांनी या बाहेरून आलेल्या, केवळ भाषा बोलणाऱ्या आणि आठवणीत ठेवणाऱ्या लोकांच्या भाषेत काही ग्रंथ रचले. त्यातले चार ग्रंथ त्यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे होते. त्याला ते धर्म-शास्त्र किंवा धर्म-सूत्र या नावाने ओळखायचे. त्यातला सगळ्यात रसातळाला गेलेला ग्रंथ होता तो म्हणजे मनुस्मृती. या धर्मसूत्रात काय होतं? वेगवेगळे विधी कसे करायचे याचे नियम. माणसांनी हिंडण्या-फिराण्याचे, पुरुष आणि स्त्री यांच्यातले संबंध कसे पाळायचे याचे काही नियम. हे नियम मोडले तर केलेल्या पापाला काय शिक्षा असावी हे आणि पाळले तर त्यांना पुढच्या जन्मात काय फळं मिळतील याचं वर्णन.
हेही वाचा : बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती तीनवेळा का जाळली?
धर्मसूत्रामधे धर्म सोडून बाकी सगळ्या गोष्टी होत्या. धर्मसूत्रात एखाद्या बोर्डिंगचे नियम असतात तशी, नियमावली होती. यात कुठल्याही नीतिमत्तेचा, कुठल्याही मानवी मूल्याचा विचार केला गेलेला नव्हता. पण हे धर्मसूत्र यजुर्वेदाच्या मांडीला मांडी लावून बसवून नेलेलं होतं. संस्कृत भाषेत लिहिलेलं होतं. यात लिहिलेले नियम वेदोक्ती ऋग्वेद आठवणीत जपण्यासाठी जे अनेक वर्षांचा अभ्यास करायचे त्यांच्या आयुष्याला धरून लिहिलेले असल्यामुळे त्या सगळ्यांनी हे नियम डोक्यावरती उचलून धरले.
देशामधे तोपर्यंत 'शेतीची मालकी राजाची' ही पद्धती निर्माण झाली होती. सम्राट होते आणि राज्याराज्यांच्या जमिनीवरून युद्ध झाली होती. त्यामुळे शेतीची मालकी धर्म स्थळांना वाटून देण्याची प्रथा निर्माण झाली. त्यामुळे शेतीची मालकी असलेल्यांचा पण यजुर्वेदी आयुष्य जगून मनुस्मृतीचे नियम पाळणाऱ्यांचा वर्ग राज्यावर वचक ठेवू पाहत होता.
इसवी सनानंतर १०० वर्ष ते इसवी सनानंतर ७०० या ६०० वर्षामधे या भाषेनी आणि या जात पद्धतींनी आपल्या देशाच्या संपूर्ण समाजावर प्रचंड पकड मिळवली. त्या ६०० वर्षामधे वापरली जाणारी संस्कृत भाषा वैदिक संस्कृत भाषेपेक्षा वेगळी होती. या जुन्या संस्कृतला ‘अभिजन संस्कृत’ असं नाव देण्यात आलंय. या ६०० वर्षात शिक्षणपद्धतीनं या वेगवेगळ्या विचारांना मारून टाकण्याचं काम केलं.
उदाहरणार्थ, मीमांसा पद्धत आली, त्याचवेळेस न्यायपद्धत आली, न्याय आणि मिमांसा हा वाद चालला. पण त्यात बुद्धाच्या अंगानी मांडणी करणाऱ्या कुमारीलला ढकलण्यात आलं.
७व्या शतकानंतर आपल्या देशामधे या पद्धतीच्या विरोधात आंदोलनं सुरू झाली आणि ती खास करून दक्षिणेत सुरू झाली. त्याला इतिहासकार सेक्ट फॉर्मेशनचा इतिहास असं म्हणतात. या आंदोलनात वैदिक विचाराच्या विरोधात वेगवेगळ्या लोकांनी आपापल्या समित्या बनवल्या, आपापली दैवतं बनवली आणि आपापल्या भाषेत ते बोलायला लागले. या संपूर्ण आंदोलनाचा एक परिणाम म्हणजे देशभर १०व्या शतकापासून नव्या भाषा निर्माण होऊ लागल्या. कश्मीरी, बंगाली, आसामी, ओरिया, मराठी, गुजराथी या संस्कृतपासून दूर गेलेल्या पाली आणि प्राकृतच्या पूर्व परंपरा सांभाळून ठेवणाऱ्या भाषा होत्या. त्यांनी संस्कृतमधून आलेल्या देव कल्पनेला आव्हान दिलं.
त्यानंतर १४ व्या शतकात संस्कृत जर देवाने केली तर, मराठी काय गाढवाने केलेली भाषा आहे का हे संत एकनाथांनी विचारलं. नव्या भाषांमधला देव हा सखा, सांगाती, सखी, बंधू अशा स्वरुपात यायला लागला. त्याला माणसावळण्यात आलं. देवाला माणसाच्या थोडं जवळ खेचून घेण्यात आलं.
इसवी सनानंतर २००० वर्षाचा इतिहास आणि त्या आधीचा सुमारे हजार वर्षाचा इतिहास आपल्याला बऱ्यायापैकी माहिती आहे. पण त्या आधीचा दीड हजार वर्षाचा इतिहास आपल्याला माहिती नाहीय. या चार साडेचार हजार वर्षाच्या इतिहासामधे आपल्या देशात जात व्यवस्थेचा अत्यंत प्रभावी पगडा असलेली ६०० ते ७०० वर्ष गेलीत. आणि त्याच्याशी झगडण्यामधे आपल्या देशानं सुमारे १५०० वर्ष घालवली.
मनुस्मृतीच्या आधीची, बुद्धापासून मनुस्मृतीपर्यंतची ४०० वर्ष आणि ८व्या शतकापासून ते १९ व्या शतकापर्यंतची संत, कवींची वर्ष ही याच्या विरोधात झगडण्यात गेलेली आहेत. याचा अर्थ आपल्या देशामधे जातीव्यवस्थेच्या विरोधात झगडण्याचा इतिहास फार जबरदस्त आहे.
हेही वाचा : मनातल्या, व्यवहारातल्या जातीला मारण्याची दिशा दाखवणारं पुस्तक
बाबासाहेब आंबेडकररांनी हा इतिहास, पुन्हा एकदा आपल्यासाठी उजागर केला. फुलेंनी, शाहुंनी आणि दक्षिणेकडे, तामिळनाडूकडे पेरियारनी हा इतिहास आपल्यासाठी उजागर केला. त्यांच्या आधीचे पूर्वसुरी म्हणजे बसवेश्वरांनी कर्नाटकमधे, गुजरातमधे नरसी मेहता, महाराष्ट्रात तुकारामांनी या इतिहासाला एक जीवदान दिलं आणि आपल्यासाठी हा विचार जिवंत ठेवला.
आजपर्यंत अस्पृश्य मानल्या गेलेल्या दलितांना, इंग्रजांच्या काळात भटके विमुक्त म्हणजे क्रिमिनल ट्राइब म्हटल्या गेलेल्यांना, अल्पसंख्यांक मुसलमानांना ईशान्य भारतातल्या मणिपूर, मिझोरमच्या लोकांना, हा धर्म मानतच नाहीत, दुसराच धर्म मानतात त्यांना, फक्त मजुरी करणाऱ्यांना आणि यातून पूर्णपणे अलग राहिलेल्या आदिवास्यांना, आज अशा सगळ्यांना पुन्हा एकदा मनुस्मृतीच ओझं वहायला लावण्याचा कट रचला जातोय.
कोरोना चालू झाल्यापासून सोशल डिस्टन्स हा शब्द रोज सकाळपासून रात्रीपर्यंत २० वेळा रेडीओ आणि टीवीवर ऐकायला मिळतो. ‘हिंदुस्थान को बचाने के लिये सोशल डिस्टनस यही एक रास्ता है’ अशी जाहिरात ते करतात. हे वाक्य आपल्याला फार काळजीत टाकणारं वाटायला पाहिजे. कारण सोशल डिस्टन्स हा अस्पृश्यतेचा पाया आहे. आणि त्या अस्पृश्यतेच्या विरोधात आपल्या देशात अनेक महान विचावंतांनी, समाजसुधारकांनी १५०० ते १६०० वर्ष युद्ध चालवलेलं आहे.
कोरोना हा आपल्या शरीर संपत्तीला आव्हान देणारा प्रसंग नाहीय. तर समाजाला आपण समानतेवर आणून ठेवू शकतो की विषमतेला थारा देतो? हा प्रश्न निर्माण करणारा प्रसंग आहे. तो प्रश्न आपण विसरलो आणि केवळ शरीराचंच संगोपन करत राहिलो तर समाज म्हणून आपण तुटून पडू. माणूस म्हणूनही आपण अपयशी झालेले असू.
हेही वाचा :
संविधानाची भीती कोणाला आणि कशासाठी?
नेशन वॉन्ट्स टू नो अर्णब, ये जबां किसकी हैं?
कलयुगातल्या राक्षसांची ओळख करून देणारा 'असूर'
इरफान खान: त्याला जातानाही चमेलीचा सुगंध हवा होता!
बॉलिवूडच्या सिनेमात कधी आनंदी दलित पाहिलाय का?
स्पर्श न करता खेळता येतं, म्हणून आपल्याकडे क्रिकेट वाढलं
जनजागृतीमुळे कंडोम स्वीकारला, तशीच जातही संपवता येऊ शकेल
मराठ्यांना रोखण्याचा प्रस्ताव मांडणाऱ्या गोळवलकरांना बाबासाहेबांनी काय उत्तर दिलं?
(लेखक कणकवली येथील पत्रकार आहेत.)