दीडशे वर्षांनंतरही मराठी कवितेत गालिब जिवंत

१५ फेब्रुवारी २०१९

वाचन वेळ : ७ मिनिटं


प्रसिद्ध फारसी आणि उर्दू कवी मिर्झा असदुल्लाखान गालिब यांची आज पुण्यतिथी. गालिब जाऊन आता दीडेकशे वर्ष झाली. आपल्याला आजही आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी गालिब यांच्याच अनेक गझला आणि शेर मदतीला धावून येतात. मराठी कवितेतूनही गालिब जिवंत आहेत. म्हणूनच सौमित्र, लोकनाथ यशवंत आणि चं. प्र. देशपांडे यांच्या गालिबवरच्या कविता आपण समजून घ्यायला हव्यात.

मिर्झा असदुल्लाखान म्हणजेच आपल्या सगळ्यांचे लाडके गालिब. आज त्यांची पुण्यतिथी. वयाच्या ११ व्या वर्षापासून गालिब शेर लिहायचे. आयुष्यातलं सगळं दुखः त्यांनी सोसलं. पण आपल्यासाठी ते त्यांनी गझलेतून सुंदर करून मांडलं. त्यांनी फारसी भाषेमधे १८ हजाराहून अधिक शेर रचले. मग मित्रांच्या आग्रहाखातर त्यातलेच हजार, बाराशे शेर त्यांनी उर्दूत लिहिले.

खूप कमी जणांना गालिबसारखं आयुष्य लाभतं. म्हणजे हेच बघा ना, गालिब यांनी जितके शेर, गझला लिहिल्या नाहीत तेवढे शेर, गझला त्यांच्यावर लिहिल्या गेल्यात. हे सगळं त्यांच्यावरच्या, त्यांच्या साहित्यावरच्या प्रेमातून घडलंय. मराठीनेही त्यांच्यावर भरभरून प्रेम केलंय.

हेही वाचाः नागपाड्यातल्या भिंतीवरचा गालिब पाहिलाय का?

आत्महत्या करावी वाटली तेव्हा गालिब आठवला - सौमित्र

निराशेच्या काळात कवी, अभिनेते किशोर कदम उर्फ सौमित्र यांच्या मदतीलाही गालिब धावून आला. गालिबवर त्यांनी कविताच केलीय. याविषयी ते सांगतात, ‘प्रत्येक कलावंताच्या आयुष्यामधे एकटेपणा हा कधी ना कधी येतो. आणि हा एकटेपणा फार मोठ्या प्रमाणात त्याच्या आयुष्यात येतो तेव्हा त्याला आत्महत्या करावीशी वाटते. एखाद्या तरुण कलावंताला आत्महत्या करावी वाटते, तेव्हा एवढं सगळं दुःख आणि संकट सहन करुनही म्हातारपणी मरण येईपर्यंत जगणारे म्हातारे त्याला आठवत राहतात. तशी मला गालिबची आठवण येते आणि म्हणून मी ही कविता लिहिलीय. आपल्यातली क्रिएटिविटी संपलीय आणि आपण आत्महत्या करावी, असं मला वाटायचं. त्यावेळी मला क्रिएटिविटीच्या या आजोबांची आठवण आली.’

‘आधी जे मुस्लिमांचं राज्य होत त्यात मराठीसुद्धा आनंदाने राहत होते. शिवाजी महाराजांच्या राज्यात मुस्लिम आनंदाने राहत होते. शिवाजींचे अनेक मंत्री आणि महत्वाची माणसं मुस्लिम होती. औरंगजेबाच्या पदरी अनेक मराठी ब्राम्हण महत्वाच्या पदांवर होती. पण आताच्या धार्मिक वातावरणामधे मुस्लिम आणि हिंदू यांच्यामधे तेढ वाढण्याचं काम राजकारणी करताहेत. त्यातच मुस्लिम कलावंत, मराठी कलावंत, वेगवेगळ्या जातीधर्माचे कलावंत यामधे फूट पाडली जातेय. पण गालिबची पिढी यापासून बचावलीय,’ असं सौमित्र सांगतात.

ही आहे सौमित्रची कविता,

तू कुठे आहेस गालिब?

गालिब!
मला काहीतरी झालंय...
समुद्र पाहून काहीतरी व्हायचं माझ्या छातीत...
शहरातल्या गर्दीत उगाच फिरतानाही
दिशाहीन वाटायचं मला...
संध्याकाळी सैरभैर व्हायचं तळं मनाचं...
पण आता,
साधे तरंगही उठत नाहीत त्यावर.
ऋतू बदलताना उदास हलायचं माझ्यातलं झाड...
आता,
झाडावरल्या पक्षांनाही कळत नाही झाडाचं हलणं...
रात्री बेरात्री ऊर उगाच भरून यायचा...
आता,
नीरव शांतता पांघरून
डोळ्यांच्या बाहुल्या टक्क जाग्या असतात,
अंधार पुसत राहतात,
इकडून तिकडे
तिकडून इकडे.
एवढंच काय गालिब
कविता लिहून झाल्यावर
साधा कागद जरी पाहिला
की चक्कं दिसायचं की रे झुळझुळताना पाणी...
आता,
कोरड्या पात्रातून पोचतो मी
समोरच्यापर्यंत.
एकमेकांची तहान पाहत कसं जगायचं असतं
हे एकदा तरी सांग गालिब!
आता मला तुझ्या वेदनांवर
माझ्या जखमांची मेणबत्ती पेटवू दे...
माझं बोट धरून
घेऊन चल मला कवितेच्या जंगलात पडणारा
पाऊस पाहायला...
तुझ्या गझलांची हरणं
माझ्या डोळ्यातून मनापर्यंत
उधाण खेळायला सोड...
मधली कोरडी जमीन
शिंगांनी उकरून काढायला सांग त्यांना मात्र...
गालिब!
मला दु:खाएवढं मोठं व्हायचंय...
भोवतालच्या अंधाराला वणवा नाही लागला तरी चालेल
माझ्या शब्दांचे दिवे तरंगताहेत त्यावर
एवढंच मला पाहायचंय...
माझ्या जीवावर पडत चाललेल्या
आत्महत्यांच्या गाठी पार करत करत...
मला मरेपर्यंत जगायचंय...
तुझ्यासारखंच...!
मी तुला कधीचा शोधतो आहे
तू कुठे आहेस गालिब?
नव्या शरीरातून
तू कदाचित ऐकत असशील तुझंच गाणं...
तुझ्याच दु:खाची
तुला कदाचित ओळख नसेल राहिली...
'खुदा ऐसे एहसास का नाम है
रहे सामने और दिखाई न दे...'
तसा तू मला भेटतही असशील रोज...
कदाचित,
मी बारमधे दारू पिताना
प्रत्येकवेळी माझ्यासमोर झिंगून बसलेला
तूच असशील कदाचित...
कदाचित तू स्वतःच
दारू होऊन रोज पोटात जात असशील माझ्या...
गालिब!
कुणीतरी तुझा शेर ऐकवला
आणि माझ्या तोंडून 'व्वा' निघालीच नाही...
मी इतका कोरडा होण्याआधी भेट...
अन् भेटल्यावर
नेहमीप्रमाणे माझ्याकडे उधार माग...
मी तुला काहीच देऊ शकणार नाही
म्हणजे मी किती कोरडा झालोय
याची तुला कल्पना येईल...
आता
तू माझा आधार व्हायचंस
मी तुझा नाही...
आणखी कितीतरी शतकं पुरेल
एवढा झंझावात तू ठेवून गेलायस या जगात...
त्यातली फक्त एक झुळूक पुरेल मला
हे संपूर्ण आयुष्य जगायला...
मी तुला कधीचा शोधतोय
तू कुठे आहेस गालिब?

हेही वाचाः मिर्झा गालिबना समजून घेताना

गालिबचं ग्रेटनेस सांगण्यासाठी कविता - चंप्र देशपांडे

मराठीतले नाटककार चं. प्र. देशपांडे यांनी गालिब यांच्यावर दीर्घकविता केलीय. या कवितेविषयी ते सांगतात, ‘गालिब हा भारतातला मोठा कवी. मराठीमधे तुकाराम, ज्ञानेश्वर हे आहेत, तसं उर्दूमधे आपले गालिब. गालिब हा नुसता प्रेमाचा किंवा स्त्री पुरुष नातेसंबंधाचा कवी नाहीय. तो मधुरा भक्तीचा प्रकार आहे. त्याला आध्यात्मिक फिलॉसॉफीचा मोठा आवाका आहे. त्या काळात कवींना राजाची स्तुती करावी लागायची. गालिबने ती केली म्हणून काही गालिब कमी दर्जाचा कवी होत नाही.

उपजिवीकेचं साधन म्हणून त्यांनी या गोष्टी केल्या असतील. परंतु त्यांचं काव्य सर्वश्रेष्ठ दर्जाचं आहे. जगातले नोबेल प्राईज विजेते जे कवी आहेत अशा कवींच्या तोडीची त्याची कविता आहे. सेतू माधवराव पगडींच्या पुस्तकावरुन मी गालिब समजून घेतला. मला गालिब कसा समजला हे व्यक्त करण्यासाठी मी गझलेचा ढोबळ फॉरमॅट घेतला. बाकी गझलेचे कुठलेही नियम पाळले नाहीत. गालिबचा ग्रेटनेस जो मला जाणवला तो व्यक्त करण्यावर कवितेत माझा भर राहिला.’

मराठी आणि उर्दू साहित्याबद्दल ते म्हणाले, की मराठीत गालिब कितपत पोचलेत याची मला शंका आहे. तुकारामांनंतर मराठी कवितेत तसं फारसं तत्वज्ञानावर लिहिलं गेलं नाही. मराठीत कलेतल्या अभिरुचीचं दारिद्र्य आहे. चंप्रंची गालिबवरची ही कविता

गालिबची कविता

गालिब, काय चमत्कार आहे, माणसाचे
आयुष्य कसे जात असते निरनिराळया शरीरांतून.
तुला छळणाऱ्या स्त्रिया अनेक नव्हत्या गालिब
निरनिराळया रूपांत ती एकच स्त्री होती.
तोच अतोनात छळ कायमच चालणार काय?
या सगळयाचा सूड घेणाऱ्या मानवाची सुरवात कुठे होणार?
सूडभावनेनेही आपण कचराच होतो गालिब
आणि फूल झाल्याशिवाय तिच्या जवळपास फिरकताच येत नाही.

तुझे प्रेत तुझ्या प्रियेनेच उचलले गालिब,
आता आमच्या प्रेतांचे काय होते ते पाहू. 

साध्यासोप्या भाषेतला कवी- लोकनाथ यशवंत

कवी लोकनाथ यशवंत यांनीही चचा गालिबांवर कविता लिहिलीय. या कवितेबद्दल ते सांगतात, ‘गालिब यांनी सगळ्याच विषयांना स्पर्श केला आणि तो ही अगदी सोप्या भाषेत. म्हणून मला गालिब खूप आवडतो. कोणत्याच भाषेत इतका मोठा कवी झाला नाही.  भारतातला हा एकच सर्वात मोठा कवी. १९८५ मधे मी गालिब यांच्यावर कविता लिहली. तेव्हा मी गालिबचा अभ्यास करत होतो. भारतात जागतिक लेवलच साहित्य राहिलेलं नाही. आणि जे काही थोड्याफार प्रमाणात आहे ते दलित साहित्यात.’ 

असदउल्लाखां उर्फ मिर्झा गालिब

काय गोष्ट आहे गालिब,
तुझ्या गझलांचा अभ्यास सुरु केलाहे
तेव्हापास्नं शहरातल्या सुरेख स्त्रिया
सारख्या माझ्याकडेच वळून बघतात.

प्रियेच्या घरुन किंवा मद्यालयातून येताना
तुझ्याच गझला रेंगाळतात या ओठांवर
गालिब, ही काय बात आहे?

आजकालची शराब कशी निकामी गालिब
पोटभर पिऊनसुध्दा चढत नाही
तुझ्या चषकात एखादा तरी थेंब आहे का अडकून?

काय गोष्ट आहे गालिब,
प्रियेला तुझी गझल समजावून दिल्यापास्नं
ती माझ्या दाढीकडेच बघत असते सारखी.
तुझ्या शायरीचा हा एवढा लळा कसा गालिब
प्रिया माझी कविता ऐकण्याच्या मनस्थितीतच नाही.

प्रिया आजकाल माझ्याजवळ
तुझ्याच आयुष्याची चौकशी करते गालिब
मी जसा कुणीच नाही.

परवा ताजमहल बघताना
सारखी तुझीच आठवण होत होती.
पूर्वी तिथं मद्यालय तर नव्हतं?

शहाजहान चुकला की काय गालिब, तूच सांग?
‘ताज’ या सुरेख वास्तूंच्या सान्निध्यात राहूनही
मन उदासच असतं.

प्रियेच्या विरहात आपणही
अद्वितीय महाल बांधलेत गालिब,
ते जगाचं कुठलंही आश्चर्य ठरले नाहीत
याचं तुला नवल नाही का वाटत?

ताजमहाल बांधणारे हात रक्तबंबाळ होऊन
माझ्या स्वप्नात आक्रोशतात-
गालिब,
तुझी सामाजिक विषमतेवर लिहिलेली एखादी गझल आहे का?

तुझा पत्ता तुलाच विचारणारा
तो खुशनसीब कोण होता गालिब!
मला एकदा त्याला ‘आदाब अर्ज’ करावयाचा आहे.

इथल्या राजपथावरुन चालताना देखील
असंतुष्टांचेच विषमतेचेच विचार
मेंदूत असतात गालिब,
तू निश्चल मनाने गझला गुणगुणत तुडविलेल्या वाटा
मला दाखवशील काय?

तुझ्या शब्दांनी तर
आमचा फारच मानसिक छळ केलाहे गालिब,
आणि आता बेगम अख्तरच्या
रक्ताळलेल्या स्वरांतूनही आविष्कारतोस
गालिब,
आम्हाला जगू द्यायचा तुझा इरादा आहे अथवा नाही?

नारायण सुर्वे यांनीही आपल्या पोष्टर नावाच्या कवितेत गालिबचा उल्लेख केलाय. आपल्या कवितेतल्या एका कडव्यात ते सांगतात,

देखरे शिंदे उपर में चांद का टुकडा
गालिब की गजल सताती है
’बेकार जिंदगी ने इसल्या को निकम्मा कर दिया,
वर्ना इसल्या भी आदमी था, इश्क के काम आता’

मराठीच्याच नाहीतर जगभरातल्या अनेक भाषांमधे गालिब यांच्यावर कविता लिहिल्या गेल्यात. त्यांच्या गझलांचं भाषांतर केलं गेलंय. तर असा हा दुखाचा महाकवी गालिब. गझलेतून दुखःला बघण्याची सुखमई दृष्टी देणारा.

हेही वाचाः 

मोमीनच्या या शेरावर खुद्द गालिबही फिदा

विष्णू खरे : कवी गेल्यावर सोबत काय राहिलं?

`मी तुले सांगून ठेवतो, येणारा काळ मराठी गझलचाच आहे`

सेल्फी विथ कुंभ: इथे ४१ सेकंदाच्या डुबकीने स्वर्ग मिळतो

सफदर हाश्मीः नाटक थांबवत नाही म्हणून त्याचा भररस्त्यात खून केला