नवनीतभाई शहाः संयुक्त महाराष्ट्र लढ्याला पाठिंबा देणारे गुजराती आमदार

२७ ऑगस्ट २०१९

वाचन वेळ : ६ मिनिटं


ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक, गांधीवादी कार्यकर्ते, पालघरचे पहिले आमदार नवनीतभाई शहा यांचं काल सोमवारी २६ ऑगस्टला निधन झालं. सात दशकांच्या आपल्या कारकिर्दीत त्यांनी पालघर परिसराच्या विकासासाठी अनेक आंदोलनं केली. संस्था उभारल्या. ज्येष्ठ पत्रकार, पालघरचे रहिवासी समीर मणियार यांनी नवनीतभाईंच्या व्यक्तिमत्वाचा वेध घेणारी फेसबूक पोस्ट टाकलीय. त्या पोस्टचा हा संपादित अंश.

जीवनात जन्म मृत्यू अटळ आहे. पण नवनीतभाई यांच्या सामाजिक आणि राजकीय जीवनाची वाटचाल पाहिली तर त्यांचा विनम्र सामाजिक आणि राजकीय जीवनप्रवास हा त्यांच्या चरणी नतमस्तक व्हावा या उच्चकोटीचा आहे. गुजरातमधील बलसाडच्या दशा श्रीमाळी वाणिया जातीत वैष्णव कुटुंबात नवनीतभाईंचा जन्म झाला. त्याच्या कुटुंबाचा घाऊक व्यापाराचा पारंपरिक व्यवसाय आहे. जन्मजात खानदानी श्रीमंत असलेले तरी त्यांचा विनम्र स्वभाव आणि कुबेरालाही लाजवील अशी त्यांची गरीब माणूस, विद्यार्थी, गरजू रुग्ण, शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमाला सढळ हाताने मदत करण्याची दानत वाखाणण्याजोगी होती.

घरातूनच मिळालं देशप्रेमाचं बाळकडू

प्रसिद्धीचा कुठलाही बडेजाव नाही. श्रीमंतीचं ओंगळ प्रदर्शन नाही. गांधीवादी विचारसरणीचे पाईक असलेले नवनीतभाईंच्या कुटुंबाकडे स्वातंत्र्यलढ्याचा समृद्ध वारसा होता. त्यामुळे बालपणीच त्यांना देशप्रेम आणि स्वातंत्र्यलढ्यासाठी त्यागाचं बाळकडू मिळालं.

नवनीतभाई आज आपल्यात नाही ही कल्पनाच सहन होण्यासारखी नाही. पत्रकारितेच्या क्षेत्रात काम करताना १९९५च्या सुमारास त्यांची ओळख झाली. आणि त्यांच्या विनयशील व्यक्तिमत्वाचं गारुड मनावर साम्राज्य करू लागले. गेल्या आठवड्यात प्रकृती बरी नसल्यामुळे त्यांना मुंबईतल्या कोकीळाबेन अंबानी हॉस्पिटलमधे दाखल करण्यात आलं. अखेर नियतीने कार्यभाग साधला. पण त्यांचे विचार आणि सामाजिक कृती नेहमी अजरामर राहील.

जास्त पैसा हाती आला तर भलेभले लोक मानी, गर्विष्ठ आणि अहंकारी बनतात हा इतिहास आहे. पण हा निर्मळ मनाचा हसतमुख माणूस शेवटपर्यंत लोकांच्या हृदयात आपलं अटळ स्थान निर्माण करू शकला हे चिरंतन सत्य आहे. सोमवारी रात्री त्यांच्या निधनाची वार्ता समजली. आणि त्यांच्या नव्या जुन्या आठवणी यायला लागल्या. नवनीतभाईंना कोणती विशेषणं द्यावीत असा संभ्रम पडला. कारण ते कोणत्याही एका व्याख्येत बसणारे नव्हते. रात्रभर त्यांच्या स्मृतींचा जागर सुरु होता.

हेही वाचाः पालघरचा भूकंप... कोट्यवधी वर्षांपासून आजपर्यंत!

समाजकारणातला राजहंस

आजचं राजकारण आणि समाजकारणाचं स्वरूप पाहता ते एका अर्थाने देवमाणूसच होते. समाजकारणातला राजहंस अशी उपमा त्यांच्या जीवितकार्याला द्यावी लागेल. राजहंस म्हटलं की शुभ्र, सुंदर, पवित्र, राजबिंडा अशा अनेक उपमा आपल्या मनात येतात. देवलोकातून राजहंस थेट पृथ्वीवर अवतरला असावा अशी पौराणिक आख्यायिका आहे.

शिक्षणाची अधिष्ठात्री देवी सरस्वतीचं वाहन म्हणून राजहंस ओळखला जातो. नीरक्षीरविवेक म्हणजे राजहंस पक्ष्यासमोर दूध आणि पाणी मिसळून एकत्र ठेवलं की दूध आणि पाणी वेगवेगळे करण्याची क्षमता राजहंसामधे आहे. याचा शब्दशः अर्थ न घेता समाजातील चांगले आणि वाईट यांच्यातून नेहमी चांगले विचार देण्याचे काम त्यांनी निरपेक्ष भावनेतून केले.

पालघरच्या नव्या पिढीतील लोकांना त्यांच्या कार्याची हवी तशी माहिती नाही. व्यापक विशाल कॅनवास असलेला हा माणूस आपल्यातून निघून गेल्यानंतर तो किती मोठा होता याची प्रचिती येत राहील.

आमदार, खासदार निधीला विरोध

महाराष्ट्रासह देशभरातल्या राजकारणाचं सध्याचं ओंगळवणं स्वरूप पाहता ते त्याबाबत असमाधानी दिसत होते. संसदीय लोकशाहीत निवडणूक हा त्या व्यवस्थेचा आत्मा आहे. प्रत्येक नागरिकाला मताधिकार आणि त्यातून त्याला हवे असलेले लोकप्रतिनिधी निवडण्याचा अधिकार आहे. स्वच्छ, पारदर्शक, निर्भय वातावरणात निवडणुका व्हायला हव्यात. सध्याच्या काळातील साम, दाम, दंड, भेद निती वापरली जात असून, त्याबाबत ते चिंता व्यक्त करायचे.

दलबदलू पिलावळ आणि आयाराम गयाराम संस्कृतीला जोपासणारी मंडळी आणि वैयक्तिक स्वार्थासाठी वाटेल ते करणारी आजची राजकारणी जातीतल्या विचारशून्य मंडळीबाबत ते संताप व्यक्त करायचे. राजकीय पक्षांना देणगी आणि तीसुद्धा कायद्याच्या चौकटीत देण्यासाठी इलेक्शन बाँड विक्रीस काढण्याची कल्पना त्यांना मान्य नव्हती. यात कुणीही व्यक्ती इलेक्शन बाँड खरेदी करून आपल्या आवडीच्या ती राजकीय पक्षाला देऊ शकते. पण बाँड खरेदी करणाऱ्या व्यक्तीला करसवलत असली तरी, बाँड खरेदी करून तो अमुक एका पक्षाला देणाऱ्या व्यक्तीचं नाव रेकॉर्डवर कुठंच न येण्याची या व्यवस्थेतील तरतूद त्यांना मान्य नव्हती.

लोकशाही खऱ्या अर्थाने रुजायची असेल तर लोकसहभाग वाढला पाहिजे. सत्तेचं विकेंद्रीकरण व्हायला पाहिजे. यासाठी ७३ व्या घटनादुरुस्तीचे ते खंदे पुरस्कर्ते होते. आमदार आणि खासदार निधी सुरु करण्याची प्रथा त्यांना मान्य नव्हती. कारण या निधीच्या माध्यमातून स्थानिक राजकारणात ढवळाढवळ करण्याची आणि स्थानिक लोकप्रतिनिधींची जनतेशी असलेली नाळ तुटेल अशी भीती ते व्यक्त करायचे.

मोरारजीभाईंशी घरोबा आणि धोरणांवर टीकाही

उच्च आणि व्यावसायिक अभ्यासक्रमातलं बाजारीकरण त्यांना मान्य नव्हतं. उच्च शिक्षण ही ठराविक धनिकांच्या मुलांची मक्तेदारी असता कामा नये. सर्व स्तरातील लोकांच्या मुलामुलींना शिक्षण मिळायला हवं यासाठी ते आग्रही असायचे. खासगी कोचिंग क्लासेस आणि त्यांच्याकडून आकारल्या जाणाऱ्या अवाच्या सवा फीज याबद्दल ते अस्वस्थ होत. शाळा, कॉलेजचा अध्यापन आणि शिक्षणाचा दर्जा उत्तम टिकवला तर खासगी क्लासेसला जाण्याची वेळ कोणावर येणार नाही असं ते म्हणायचे.

गांधीवादी विचारसरणी प्रत्यक्ष कृतीतून जगणारे नवनीतभाई हे आचार्य विनोबा भावे यांच्या कार्याबद्दल आदराने बोलत असत. गुजरातमधे विनोबा भावे यांच्या विचारांचं मोठं कार्य आहे. माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांचा आणि त्यांच्या कुटुंबाचा बलसाडमधे घरोबा होता. तथापि मोरारजीभाई देसाई यांच्या धोरण आणि कृतीबद्दल नवनीतभाई मृद शब्दात टीका करायचे.

हेही वाचाः शाहिरांनी महाराष्ट्राचा इतिहास फक्त गायला नाही तर घडवलायही

मराठी माणसाच्या बाजूने रस्त्यावर

मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे या लढ्यात ते मराठी माणसांच्या बाजूने उतरले होते. याचा अर्थ त्यांनी गुजराती भाषिकांविरोधात तत्व आणि विचारांच्या पातळीवर भूमिका घेतली होती. आंदोलनाच्या काळात गुजराती लोक मुंबई सोडून चालले आहेत अशी आवई उठवण्यात आली होती. पण त्याकाळात राष्ट्र सेवा दलाच्या माध्यमातून कांदेवाडीतील कल्याणजी मोती चाळीतील गुजराती बांधवांना चार रात्र जागून संरक्षण देण्याचे काम त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलं.

नवनीतभाई संयुक्त महाराष्ट्र समितीचे सरचिटणीस होते. इतकेच नाही तर भाषावार प्रांतरचना केंद्रीभूत ठेवून झालेल्या आंदोलनाच्या काळात पालघरमधून ते विधानसभेवर निवडून गेले. महाराष्ट्राच्या विधानसभेत एकमेव गुजराती भाषिक निवडून आला कसा याचं आश्चर्य महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांना वाटलं. गुजराती माणसांना तुम्ही आपल्याकडे कसं वळवू शकता, असा विचारलं गेलं. पण याचं श्रेय सेवा दलास आहे, असं ज्येष्ठ समाजवादी नेते आणि संयुक्त महाराष्ट्र लढ्याचे एक अग्रणी एस. एम. जोशी यांनी नमूद केलंय.

पालघरचा पहिला लोकप्रतिनिधी

भारतीय स्वातंत्र्य लढ्यात सक्रीय सहभाग, त्यासाठी कारवास, स्वातंत्र्य आंदोलनातील विचारांचा प्रचार प्रसार करण्यासाठी तत्कालीन नियतकालिकांमधे काम, मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे या लढ्यात सहभाग, १९५७ ते १९६२ या काळात संयुक्त महाराष्ट्र समितीतर्फे विधानसभेच्या द्वैवार्षिक निवडणुकीत पालघरचे पहिले आमदार होण्याचा त्यांनी मान मिळवला. संयुक्त महाराष्ट्र स्थापन झाल्यानंतर १९६७ ते १९७२ अशा काळातही ते विधानसभेत आमदार होते.

पालघर ग्रामपंचायतीचा पहिला सरपंच होण्याचा मानही त्यांना मिळाला. पालघर पंचायत समितीचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवलं. जिल्हा परिषद सदस्य म्हणूनही त्यांनी मोठं काम केलं. कोकणात पाटबंधारे प्रकल्प होऊ शकत नाहीत, असा प्रतिकूल अहवाल बर्वे समितीने दिला. पण नवनीतभाईंनी नेटाने या भागातील पाण्याचा प्रश्न लावून धरला. पाणीप्रश्न कायमचा सोडवण्यासाठी सूर्या प्रकल्पाचा पाठपुरावा करून तो यशस्वी करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे.

या भागातील औद्योगिक विकासासाठी आग्रही असतानाच, रासायनिक कारखान्यांच्या प्रदुषणाच्या विरोधात त्यांनी पर्यावरणविषयक लढा दिला. सूर्याचे पाणी आदिवासी आणि शेतकऱ्यांना मिळायला हवं यासाठी प्रदीर्घ लढा दिला. वंचित आदिवासींच्या विकासासाठी त्यांनी काळूराम दोधडे आणि अन्य संघटनांना वाढवण्याचं काम केलं. मच्छिमार आणि मासेमारी व्यवसायाचे अनेक प्रश्न आग्रहाने मांडून त्यांचं निराकरण केलं.

हेही वाचाः संयुक्त महाराष्ट्रासाठी आपण गुजरातला किती कोटी दिले?

संस्थात्मक पायाभरणी

एकेकाळी पालघरमधे महाविद्यालयीन शिक्षण घेणं खूप गैरसोयीचं होतं. हे बाब ध्यानात घेऊने सर्वपक्षीय मंडळींना सोबत घेत त्यांनी १९७० मधे सोनोपंत दांडेकर शिक्षण मंडळी स्थापन केली. वारकरी संप्रदायातील मोठं प्रस्थ असलेल्या हभप सोनोपंत दांडेकर यांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेल्या दांडेकर शिक्षण मंडळीच्या कामाचा आज वटवृक्ष झालाय. या संस्थेचे ते विश्वस्त आहेत.

मुंबई युनिवर्सिटीत ग्रामीण विकास हा विषय सुरु करण्यात त्यांचा वाटा आहे. निरीड या सामाजिक चळवळीचे ते विश्वस्त होते. मुंबईतील पी. वी. मंडलिक ट्रस्टचे ते विश्वस्त आहेत. 

विधानसभा हे कायदेमंडळ आहे. सहकार, शिक्षण, ग्रामीण विकास, आदिवासी संरक्षण, कुळ कायदा अशा अनेक विधेयकांवर त्यांनी विधानसभेत अभ्यासपूर्ण भाषणं केली. तत्कालीन आमदार प्रा. सदानंद वर्टी, दत्ताजी ताम्हाणे, श्यामकांत मोरे, कृष्णराव धुळूप, उद्धवराव पाटील, रामभाऊ म्हाळगी, प्रा. ग. प्र. प्रधान यांच्यासोबत त्यांनी सभागृहात नेमस्तपणे विधायक भूमिका मांडली. तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक तसेच विधानसभीध्यक्ष सीलम, बाळासाहेब भारदे आणि मंत्री बाळासाहेब देसाई, नाशिकराव तिरपुडे यांनीही त्यांच्या विधिमंडळातील कामकाजाची दखल घेतली.

पालघरच्या विकासात सिंहाचा वाटा

जन्मभूमी, प्रवासी या गुजराती दैनिकात आणि विविध चळवळीतील नियतकालिकांमधे काम केल्यानंतर त्यांनी पालघर मित्र वृत्तपत्र सुरु केलं. आणि हे वृत्तपत्र आजही यशस्वीरित्या सुरु आहे. सफाळे, पालघर ते डहाणू भागातील रेल्वे प्रवाशांच्या सुविधेसाठी त्यांनी अनेकदा आंदोलने आणि संघर्ष केला. दिल्ली दरबारी जाऊन रेल्वे प्रवाशांची व्यथा मांडून न्याय मिळवून दिला. आजची उपनगरी लोकल सेवा आणि पाच डझनाहून अधिक दीर्घ पल्ला रेल्वे थांबा पालघरला मिळण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे.

मराठी आणि गुजराती भाषेतील साहित्य, या दोन भाषांमधील साधर्म्य याविषयी ते अधिकारवाणीने बोलत. त्यांच्याशी अनेकदा गप्पा व्हायचा. त्यांच्याकडील संचित, विधायक विचारधन ते मुक्तहस्ताने देत असत. त्यांच्या सात दशकांच्या जीवनप्रवासात त्यांच्या पत्नी हिरालक्ष्मी पारेख उर्फ हिराबेन यांचा मोठा वाटा आहे. नवनीतभाई यांच्यासारख्या प्रचंड व्यक्तिमत्वाच्या पाठीशी त्या सावलीसारख्या उभ्या राहिल्या यात वादच नाही. त्यांच्याविषयी अनेक आठवणी आहेत. 

पालघर जिल्ह्याचीच नाही तर सुसंस्कृत महाराष्ट्र घडवणाऱ्या मांदियाळीतल्या एका नेत्याचं निघून जाणं वेदनादायी आहे. त्यांचे विचार आणि कार्य पुढं नेणं हीच त्यांना आदरांजली ठरेल. त्यांच्या कुटुंबियांना हे दुख सहन करण्याची परमेश्वर शक्ती देवो. नवनीतभाई आपल्या स्मृतीस विनम्र अभिवादन.

हेही वाचाः 

'फँड्री'च्या दानपेटीने गणपती बाप्पा होतो प्रसन्न

भाई उद्धवराव पाटलांचा वारसा कोण चालवणार?

कम्युनिस्ट झालो, म्हणून अस्पृश्यांसाठी अस्पृश्य झालो

'मुंबई आमचीच', असं आम्ही मुंबईचे मराठी लोक का म्हणतो?

अँग्री बर्ड्स मोबाईलवरच नाही, तर मोठ्या पडद्यावरही सुपरहिट