फुटबॉलच्या स्पर्धा फिफा वर्ल्डकपची रंगीत तालीमच

१७ जुलै २०२१

वाचन वेळ : ६ मिनिटं


युरो कप आणि दक्षिण अमेरिकेतलं कोपा अमेरिका कप या दोन्ही स्पर्धा म्हणजे फुटबॉल चाहत्यांसाठी खेळाचा निखळ आनंद लुटण्यासाठी असलेली पर्वणीच असते. पुढच्या वर्षी फिफा वर्ल्डकप स्पर्धा आयोजित केली जाणार असल्यामुळे त्याबद्दलचे आडाखे बांधण्यासाठी या दोन्ही स्पर्धा अतिशय महत्त्वाच्या होत्या.

कोपा अमेरिका स्पर्धेत अर्जेंटिना आणि ब्राझील या माजी विश्वविजेत्या टीमच्या तुलनेत इतर टीम फारश्या आव्हानात्मक मानल्या जात नाहीत. एकेकाळी उरुग्वेने या स्पर्धेत आपला दबदबा निर्माण केला होता मात्र आता त्यांचं आव्हान फुसकंच राहिलंय. या तुलनेमधे युरो कप स्पर्धेत विश्वविजेता फ्रान्स, जर्मनी, इटली, इंग्लंड, स्पेन, स्वीडन, पोर्तुगाल या बलाढ्य टीमचा समावेश असल्यामुळे ही स्पर्धा चाहत्यांसाठी रोमांचकारी होती.

पुढच्या वर्षी फिफा वर्ल्डकप स्पर्धा आयोजित केली जाणार असल्यामुळे त्याबद्दलचे आडाखे बांधण्यासाठी या दोन्ही स्पर्धा अतिशय महत्त्वाच्या होत्या. व्यावसायिक लीग स्पर्धांमधे अब्जावधी डॉलर्सची बोली ज्या खेळाडूंबद्दल लावली जाते. रथी-महारथी खेळाडू या दोन्ही स्पर्धांमधे असल्यामुळे त्यांच्या कामगिरीबद्दल एक उत्सुकता होती.

युरो स्पर्धेच्या तुलनेत कोपा अमेरिका स्पर्धेचा आवाका खूप लहान होता. या स्पर्धेत विजेतेपदासाठी अर्जेंटिना आणि ब्राझील या दोन टीमच प्रबळ दावेदार आहेत हे स्पर्धेच्या सुरवातीपासूनच निश्चित झालं होतं. कोलंबिया, पेरू, चिली या टीमकडे अनपेक्षित विजय नोंदवण्याची क्षमता असली तरी सरड्याची धाव कुंपणापर्यंतच असते त्याप्रमाणे या टीम त्यांची एकंदर कामगिरी पाहता अंतिम फेरी गाठणं अशक्य मानलं जात होतं.

ब्राझील टीमला या स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान मिळण्यासाठी संघर्ष करावा लागला. त्यातही सेमी फायनलमधे पेरू टीमविरुद्ध त्यांना नशिबाने विजय मिळाला. पण शेवटच्या मॅचला आपले मातब्बर खेळाडू शंभर टक्के तंदुरुस्त पाहिजेत, या उद्देशाने त्यांनी अगोदरच्या मॅचमधे फारसा धोका न पत्करता खेळ केला.

हेही वाचा: स्पर्श न करता खेळता येतं, म्हणून आपल्याकडे क्रिकेट वाढलं

गाफीलपणामुळे ब्राझीलचा पराभव

ब्राझील टीमच्या तुलनेत अर्जेंटिनाची कामगिरी साखळी गटात चांगली झाली होती, पण सेमी फायनलमधे त्यांनाही कोलंबियाविरुद्ध विजय मिळवण्यासाठी पेनल्टी शूटआऊटचा आधार घ्यायला लागला. ब्राझील आणि अर्जेंटिना यांच्यातला सामना म्हणजे नेमार विरुद्ध लिओनेल मेस्सी अशीच लढत अपेक्षित होती.

ब्राझील टीमला घरचं मैदान आणि वातावरणाचा फायदा होता. त्यांच्या खेळाडूंनी मेस्सीकडे जास्त वेळा चेंडू जाणार नाही अशीच योजना आखली होती. पण मेस्सीचा सहकारी एंजल डी मारिओ हा गोल करण्यात खूप माहीर खेळाडू आहे हे त्यांच्या बचाव फळीतल्या खेळाडूंना लक्षात आलं नाही आणि नेमकी हीच चूक त्यांच्या पराभवाला कारणीभूत ठरली.

मारिओने २२ व्या मिनिटालाच गोल करत टीमच्या विजयाचा पाया रचला. त्यानंतर अर्जेंटिनाच्या खेळाडूंनी बचाव तंत्रावरच जास्त भर दिला. मॅचच्या बाकीच्या वेळेत नेमार आणि त्याच्या इतर सहकार्‍यांनी केलेली धारदार आक्रमणं अर्जेंटिनाच्या बचाव रक्षकांनी थोपवली. अर्जेंटिनाचा गोलरक्षक एमिलिओ मार्टिनेझ याने गोलरक्षण किती भक्कमरीत्या करायचं असतं याचा प्रत्यय घडवला आणि स्पर्धेतल्या सर्वोत्कृष्ट गोलरक्षकाचं पारितोषिकही पटकावलं.

सर्वाधिक गोलचे मानकरी

मेस्सी हा व्यावसायिक फुटबॉल क्षेत्रातला श्रेष्ठ खेळाडू मानला गेला असला तरीही आपल्या देशाला त्याने मिळवून दिलेलं हे आंतरराष्ट्रीय स्तरावरचं पहिलंच मोठं विजेतेपद आहे. शेवटच्या मॅचनंतर नेमार याने मेस्सी याला आलिंगन देत खिलाडू वृत्तीचं उत्तम दर्शन दिलं. मेस्सी आणि कोलंबियाचा लुईस दियाज यांनी प्रत्येकी चार गोल नोंदवत स्पर्धेत सर्वाधिक गोल करण्याचा मान मिळवला.

कोलंबियाने पेरू टीमवर पूर्ण वेळेत ३-२ अशी मात करत तिसर्‍या क्रमांकाचं बक्षीस मिळवलं. त्यांच्यासाठी ही समाधानाची गोष्ट असली तरीही पुढच्या वर्षी होणार्‍या वर्ल्डकप स्पर्धेसाठी त्यांना बरीच तयारी करावी लागणार आहे. एकेकाळी फुटबॉलमधे मक्तेदारी गाजवणार्‍या उरुग्वे, पॅराग्वे, चिली या टीमनाही वर्ल्डकपसाठी आत्तापासूनच खूप कष्ट घ्यावे लागणार आहेत.

हेही वाचा: लेजंड धोनीचा अखेरचा 'षटकार'

टीमच्या कौशल्यामुळे यश

युरो कप स्पर्धेत विजेतेपदासाठी इटलीचं पारडं जड मानलं जात होतं आणि पहिल्या मॅचपासूनच त्यांच्या खेळात सातत्य दिसून आलं. खेळाडूंमधला समन्वय, पासेस देण्याची शैली, भक्कम बचाव आणि गोल करण्यासाठी आवश्यक असणारी अचूकता यात त्यांच्या खेळाडूंनी टीम व्यवस्थापनाने ठेवलेला विश्वास सार्थ ठरवला.

सेमी फायनलमधे स्पेनविरुद्ध अंतिम फेरीत यजमान इंग्लंडविरुद्ध त्यांनी पेनल्टी शूटआऊटने विजय मिळवला. पेनल्टी शूटआऊट म्हणजे नशिबाचाच एक भाग असतो असं म्हटलं जात असलं तरीही पेनल्टी शूटआऊटमधे गोल करणार्‍यांचं अचूक कौशल्य आणि गोलरक्षकाचं गोल अडवण्यासाठी असणारं चापल्य या दोन्हींची कसोटी असतं.

इटलीचा गोलरक्षक गियानलुकी दोनारुमा याने या स्पर्धेत गोलरक्षणाची सुरेख कामगिरी केली. त्याचे सहकारी डोमिनिको बेरार्दी, लिओनार्दो बोनुकी, फेडरिको बनादेशी यांनी पेनल्टी शूटआऊटचं दाखवलेलं कौशल्य अतुलनीय होतं.

अंतिम फेरीत इंग्लंडचे व्यवस्थापक गॅरेथ साऊथगेट यांनी पेनल्टी शूटआऊटच्या वेळी तीन युवा खेळाडूंना संधी देण्याचा धोका पत्करला. मात्र हा निर्णय त्यांच्या अंगलटी आला. या तीनही खेळाडूंनी संपूर्ण मॅचमधे फारसा भाग घेतला नव्हता. साहजिकच अंतिम मॅचसाठी आवश्यक असणारा आत्मविश्वास त्यांच्यात नव्हता. त्यामुळे त्यांनी गोल करण्याच्या संधी वाया घालवल्या.

समन्वयाचा अभाव, मानसिक दडपणही

फुटबॉलसारख्या खेळात टीमचं कौशल्य हीच यशाची गुरुकिल्ली मानली जाते. सेमी फायनलमधे नैपुण्यवान खेळाडू असूनही डेन्मार्कच्या खेळाडूंमधे समन्वयाचा अभाव दिसून आला. त्याचप्रमाणे प्रतिस्पर्धी इंग्लंडच्या टीमला स्थानिक वातावरण आणि प्रेक्षकांचा पाठिंबा असल्याचं दडपणही त्यांनी घेतलं. त्यामुळेच गुणवत्ता असूनही ते अंतिम फेरीत पोचू शकले नाहीत.

वर्ल्डकपवर अनेक वेळा नाव कोरणार्‍या जर्मनी, फ्रान्स आणि स्पेन या टीमच्या खेळाडूंमधेही अपेक्षित असं टीम म्हणून कौशल्य दिसलं नाही. फाजील आत्मविश्वासामुळेही त्यांना अनेक वेळेला खेळावर नियंत्रण मिळवता आलं नाही. गोल करण्याच्या अनेक संधी त्यांच्या खेळाडूंनी अचूकतेच्या अभावी गमावल्या. स्वयंगोलसारखी चूक जर्मनीच्या संघाकडून अपेक्षित नव्हती. स्वित्झर्लंडचा गोलरक्षक यान सोमेर याने या स्पर्धेत किमान ५० हून अधिक गोल वाचवले असतील. पण त्याच्या अन्य सहकार्‍यांनी केलेल्या चुकांमुळेच त्याच्या टीमला उपांत्यपूर्व फेरीत पराभव पत्करावा लागला.

फुटबॉल खेळाडूंसाठी फिफा वर्ल्डकप स्पर्धा अतिशय प्रतिष्ठेची मानली जाते. पुढच्या वर्षी होणार्‍या या स्पर्धेचे आत्तापासूनच पडघम सुरू झालेत. युरो कप आणि कोपा अमेरिका कप स्पर्धांमधे ज्या देशांना अपेक्षेइतकं यश मिळालं नाही, त्यांना जागतिक स्तरावर पुन्हा गौरवास्पद स्थान मिळवण्यासाठी वर्ल्डकप स्पर्धा ही सोनेरी संधी असणार आहे. त्यासाठी त्यांनी आतापासूनच नियोजनपूर्वक सराव केला पाहिजे.

हेही वाचा: ख्रिश्चनांच्या पंढरीत अवतरलीय धर्मगुरूंची क्रिकेट टीम

इंग्लंडच्या चाहत्यांची अखिलाडू वृत्ती

इंग्लंडच्या चाहत्यांच्या अखिलाडूपणाचं युरो स्पर्धेत अनेक वेळा दर्शन घडलं. जर्मनी, डेन्मार्कविरुद्धच्या मॅचवेळी प्रतिस्पर्धी देशाचं राष्ट्रगीत वाजत असताना इंग्लंडच्या प्रेक्षकांनी आरडाओरड करत निंदनीय कृत्य केलं. डेन्मार्कविरुद्धच्या मॅचमधे अलाहिदा डावात इंग्लंडला पेनल्टीची संधी मिळाली. त्यावेळी इंग्लंडच्या काही चाहत्यांनी लेसर किरणाच्या सहाय्याने डेन्मार्कचा गोलरक्षक कॅस्पर मिश्चेल याचं लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न केला. त्याबद्दल इंग्लंडला दंड करण्यात आला.

हे गैरकृत्य इंग्लंडकडून झाल्यानंतरही पेनल्टी किक पुन्हा घेण्याची डेन्मार्कची मागणी मान्य केली गेली नाही. ही मागणी मान्य झाली असती तर ते अधिक योग्य ठरलं असतं. फायनमधे इटलीकडून पराभूत झाल्यानंतर आणि वेम्बले स्टेडियम परिसरात इंग्लंडच्या पाठीराख्यांनी इटलीच्या अनेक चाहत्यांना मारहाण केली.

कोरोनाच्या नियमांची पायमल्ली

एकीकडे कोरोनाच्या महामारीमुळे पेशंटची संख्या वाढत असल्याबद्दल चिंता व्यक्त करायची. पण त्याच वेळी युरो कप मॅचना प्रेक्षकांना मोकळेपणाने प्रवेश द्यायचा, असं दुटप्पी धोरण इंग्लंडकडून दिसून आलं. बहुसंख्य प्रेक्षकांनी मास्क लावला नव्हता आणि सोशल डिस्टन्सिंगचा नियमही पाळला नव्हता.

ब्राझीलमधल्या कोपा अमेरिका स्पर्धेच्या अंतिम मॅचला मॅराकाना स्टेडियमची क्षमता ७८ हजार असतानाही फक्त ७ हजार ८०० प्रेक्षकांनाच प्रवेश देण्यात आला होता आणि सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळूनच त्यांची बसण्याची व्यवस्था करण्यात आली होती.

खरं तर ब्राझीलची टीम अंतिम फेरीत असताना या स्टेडियमवर सर्वांनाच प्रवेश देण्याची हुकमी संधी संयोजकांना मिळाली होती. मात्र त्यांनी कोरोनाचे नियम व्यवस्थितपणे पाळले. इंग्लंडमधे मात्र विरोधाभास पाहायला मिळाला. सेमी फायनल आणि फायनलच्या लढतीवेळी वेंबले स्टेडियम खचाखच भरलं होतं.

वर्णद्वेषाच्या टिप्पणीमुळे गालबोट

इंग्लंडच्या टीममधे मार्कोस रॅशफोर्ड, जेडन सँचो आणि बुकायो साका या तीन कृष्णवर्णीय खेळाडूंचा समावेश होता. या तीनही खेळाडूंनी अंतिम सामन्यात पेनल्टी शूटआऊटच्या वेळी गोल करण्याची संधी घालवली. त्यामुळे इंग्लंडच्या असंख्य चाहत्यांनी ऑनलाईनद्वारे या तीनही खेळाडूंबद्दल वर्णद्वेषी टिप्पणी केल्यामुळे स्पर्धेला गालबोट लागलं.

आफ्रिका आणि इतर खंडांमधल्या अनेक कृष्णवर्णीय खेळाडू फुटबॉल आणि इतर अनेक खेळांमधे युरोपियन तसंच आशियाई देशांकडून वेगवेगळ्या स्पर्धांमधे भाग घेत असतात. इंग्लंडच्या चाहत्यांनी केलेल्या अयोग्य टिप्पणीमुळे या खेळाडूंच्या चांगल्या प्रतिमेला तडा गेला आहे.

हेही वाचा: 

क्रिकेटचे लघुउद्योग सुटलेत सुसाट

महेंद्र सिंग धोनी: वनडेतला ‘ग्रेट फिनिशर’

आयपीएलच्या तपाची कहाणी : थोडी मिठी, जास्त खट्टी

अपघाताने जन्माला आलेल्या वनडे क्रिकेटची आज पन्नाशी