फोकस्ड म्युच्युअल फंडमधली हाय रिस्क गुंतवणूक कुणाच्या फायद्याची?

२० जानेवारी २०२०

वाचन वेळ : ५ मिनिटं


गेल्या वर्षभरातल्या सर्वोत्तम पाच मल्टी कॅप फंडांची यादी पाहिली, तर त्यातले तीन फंड फोकस्ड म्युच्युअल फंड आहेत. गेल्या तीन वर्षांतल्या सर्वोत्तम मल्टी कॅप फंडांची यादी पाहिली, तर त्यामधे सर्वात वरचा फंड फोकस्ड फंडच आहे. फोकस्ड फंडांच्या या दमदार कामगिरीमुळे या श्रेणीतल्या फंडांच्या एसेट अंडर मॅनेजमेंट अर्थात एयूएममधे  लक्षणीय वाढ होऊन तो आकडा ५० हजार कोटींच्या जवळपास आलाय.

सध्याच्या घडीला भारतामधे जवळपास २५ फोकस्ड म्युच्युअल फंड आहेत. फोकस्ड फंड वर्गवारीतील फंडामधील किमान ६५ टक्के गुंतवणूक इक्विटी आणि इक्विटीशी संबंधित साधनांमधे झाली पाहिजे. शिवाय ती जास्तीत जास्त ३० शेअर्समधेच झाली पाहिजे. फंड मॅनेजर ही गुंतवणूक मल्टी कॅप, लार्ज कॅप, मिड कॅप, स्मॉल कॅप यांपैकी कोणत्या स्टॉक्समधे करणार याचीही माहिती देणं अनिवार्य आहे.

फक्त ३० शेअर्सवरच लक्ष

आता आपल्या लक्षात आलं असेल की, फोकस्ड फंडमधे काही मोजक्या कमाल ३० शेअर्सवर लक्ष केंद्रित करून त्यामधे गुंतवणूक करणारा फंड, मग तो मल्टी कॅप असेल, लार्ज कॅप असेल, मिड कॅप असेल किंवा स्मॉल कॅप असेल. पण बहुतेक फोकस्ड फंड  हे मल्टी कॅप आहेत.

सुरक्षिततेच्या द़ृष्टिकोनातून विचार केला, तर फोकस्ड फंड हे हाय रिस्क कॅटेगरीमधे मोडतात. कारण वैविध्य हे जे म्युच्युअल फंडचं अग्रगण्य वैशिष्ट्य आहे. तेच या प्रकारच्या फंडमधे संकोच पावतं. इतर इक्विटी फंडमधे पोर्टफोओमधील शेअर्सची यादी पाहिली, तर ती ५० ते १०० च्या दरम्यान असते. पण इथे सेबीनेच कमाल ३० कंपन्यांची मर्यादा घालून दिलीय. त्यामुळे विविधतेलाही मर्यादा येते.

हेही वाचाः म्युच्युअल फंडातली गुंतवणूक काढून घेताना कोणती काळजी घ्यावी?

तोटा होण्याची शक्यता किती?

२५ ते ३० शेअर्समधे फंडाचा संपूर्ण एयूएम गुंतवला गेल्यामुळे ती फारच मोठ्या नोकरीची गुंतवणूक होते. फंड मॅनेजर कितीही कार्यक्षम, अनुभवी आणि व्यासंगी असला तरी त्याची शेअर्सची निवड १०० टक्के बरोबर असेल याची खात्री देता येत नाही. शिवाय आपण पाहतोच की, कितीतरी बाजारबाह्य घटनांमुळेही खूप वेळा दर्जेदार कंपन्यांच्या शेअर्समधेही पडझड होते.

अशा परिस्थितीत फोकस्ड फंडामधील एक दोन शेअर्समधे घसरण झाली तर संपूर्ण फंडाच्या कामगिरीवर परिणाम होतो. पण तेजीच्या मार्केटमधे फोकस्ड फंड किती उत्तम कामगिरी करतात, ते या श्रेणीतल्या ३० कंपन्यांमधेच गुंतवणूक करण्याचं बंधन आहे. त्यामुळे सर्व वॅल्यू पिक्स  आणि लार्ज कॅप्समधेच बहुतेक फोकस्ड फंडांनी गुंतवणूक केलेली असते.

कौशल्याचा लागतो कस

फोकस्ड फंडांच्या बाबतीत एक प्रकर्षाने ध्यानात घेण्यासारखी बाब म्हणजे, या प्रकारच्या फंडांची कामगिरी ही संपूर्णपणे फंड मॅनेजरचे ज्ञान, कौशल्य आणि अनुभव या गोष्टींवर अवलंबून असते. कारण त्याला बंधन असतं. एकाच गोष्टीचं आणि ते म्हणजे पोर्टफोलिओमधील शेअर्सची संख्या ३० च्या वर जाऊ न देणं.

पण ते ३० शेअर्स कोणते निवडावेत यासाठी त्याला कोणतंही बंधन नसतं. त्यामुळे निवड करण्यासाठी त्याला खूप मोठा आणि विविधांगी अवकाश प्राप्त होतो. त्याला सर्व सेक्टर्स आणि लार्ज कॅप, मिड कॅप, स्मॉल कॅप या तिन्ही श्रेणी निवड करण्यासाठी खुल्या असतात आणि इथेच त्याच्या कौशल्याचा कस लागतो.

उदाहरणच द्यायचं तर SBI AMC या SBI Focused Equnity Fund २३ शेअर्समधे करण्यात आलीय. त्यामधील ५८ टक्के लार्ज कॅप शेअर्स आहेत, १८ टक्के मिड कॅप आहेत आणि ११ टक्के स्मॉल कॅप आहेत. थोडी गुंतवणूक कॅश मार्केट आणि डेरीवेटीवजमध्ये करण्यात आलीय. १७ सप्टेंबर २००४ ला हा फंड बाजारात आला. तेव्हापासून आजअखेर या फंडाने सरासरी १९.५५ टक्के दराने घसघशीत परतावा दिलाय.

हेही वाचाः सलग २१ ओवर निर्धाव टाकणाऱ्या बापू नाडकर्णींची लाईफ जर्नी सांगणारी मुलाखत

कुणी करावी गुंतवणूक?

या संपूर्ण लेखाचा सारांश म्हणजे फोकस्ड फंड हा एक उच्च जोखमीचा गुंतवणूक प्रकार आहे. अजिबात जोखीम नको असणार्‍यांनी Canserative वृत्तीच्या लोकांनी, सेवानिवृत्त लोकांनी या फंडांच्या वाटेला जाऊ नये. आर्थिक संपन्न गुंतवणूकदारांनी, जोखीम घेऊ शकणार्‍या लोकांनी आपल्या गुंतवणुकीचा काही भाग या फंडांमधे गुंतवावा. त्यापूर्वी संपूर्ण पोर्टफोलिओची माहिती घ्यावी. फंड मॅनेजर, त्याचा अनुभव, पूर्वीची कामगिरी याचा अभ्यास करावा आणि आपल्या अ‍ॅडवायझरचा सल्ला घेऊन गुंतवणूक करावी.

सध्या बाजारात उपलब्ध असणारे काही आघाडीचे फोकस्ड  फंड असे- 

 १.      IIFL Focused Equity Fund
 २.     DSP Focused Fund
 ३.     AXIS Focused 25 Fund
 ४.     SBI Focused Equity Fund
 ५.     Motilal Oswal Focused 25 Fund
 ६.     BNP Paribas Focused 25 Fund
 ७.     Sundaram Select Focus Fund
 ८.     ABSL Focused Equity Fund
 ९.     Principal Focused Multic cap Fund

हेही वाचाः 

आपण आपले म्युच्युअल फंड्स कधी विकले पाहिजेत?

तर शेतकरी आत्महत्येचा आलेख दिवसेंदिवस वाढतच जाईल!

आत्महत्येत शेतकऱ्यांनाही मागं टाकणाऱ्या तरूणाईला कसं थांबवायचं?

म्युच्युअल फंडमधली एसआयपी गुंतवणूक थांबवण्याची वेळ आलीय का?

अडचणीच्या काळात म्युच्युअल फंड प्लॅन थांबवायचा की कर्ज काढायचं?

(दैनिक पुढारीतून साभार.)