हवेतल्या गाड्या : बदलत्या शहरांचं भविष्य

१५ नोव्हेंबर २०२२

वाचन वेळ : ५ मिनिटं


जर्मनीच्या वोलोकॉप्टर कंपनीने वोलोसिटी नावाची एक हटके टॅक्सी आणलीय. हवेत उडणाऱ्या या टॅक्सीची पॅरिसमधे नुकतीच यशस्वीपणे चाचणी झालीय. २०२४ला पॅरिसमधे ऑलिम्पिक स्पर्धा होतेय. त्यावेळी ड्रोन सारख्या दिसणाऱ्या या टॅक्सीतून लोकांना शहरभर फिरवायचं नियोजन केलं जातंय. अशा कार, बाईकची सध्या जगभरात चलती आहे. आपल्या शहरांचं भविष्य म्हणून त्याकडे पाहिलं जातंय.

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी त्यांच्या हटके घोषणांनी कायम चर्चेत असतात. कधी पाण्यावर चालणारी गाडी, कधी रोपवे केबल कार, तर कधी इतर कुठली तरी घोषणा. त्यांच्या या घोषणा कायम ट्रेंडिंगचा विषय बनतात. पुण्यातल्या वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून त्यांनी दोन महिन्यापूर्वी थेट हवेत उडणाऱ्या बसची घोषणा करून टाकली. या घोषणेनं तेव्हा सोशल मीडियात बराच धुमाकूळ घातला होता.

नितीन गडकरींची ही हटके घोषणा आता तिकडे फ्रान्समधे वेगळ्या अंदाजात प्रत्यक्षात येतेय. फ्रान्सची राजधानी असलेल्या पॅरिसमधे १० नोव्हेंबरला एका उडणाऱ्या टॅक्सीची चाचणी घेण्यात आली. ड्रोनसारख्या दिसणाऱ्या या टॅक्सीनं पॅरिसवासीयांना पुढच्या प्रवासाचं स्वप्न दाखवलंय. २०२४ला होणाऱ्या ऑलिम्पिकदरम्यान ही टॅक्सी लोकांना घेऊन शहरभर भटकंती करेल असा विश्वासही यानिमित्ताने व्यक्त केला जातोय.

अशी असेल उडणारी टॅक्सी

वोलोकॉप्टर ही जर्मनीतली एक विमान बनवणारी कंपनी आहे. याच कंपनीने ही हवेत उडणारी टॅक्सी बनवलीय. या टॅक्सीचं नावही कंपनीने वोलोसिटी असं ठेवलंय. सगळ्याच विमान उड्डाणांमधे महत्वाची ठरणारी 'फ्लाय बाय वायर' ही यंत्रणा वोलोसिटीत कार्यान्वित करण्यात आलीय. तसंच आपल्या नेहमीच्या विमानांसारखीच याची रचना आहे. त्यामुळेच या टॅक्सीला इलेक्ट्रिक विमान असंही म्हटलं जातंय.

१० नोव्हेंबरला पॅरिसमधे या टॅक्सीची चाचणी घेण्यात आली. पॅरिसच्या जवळ असलेल्या पोंटोएज-कॉर्माईल्स या विमानतळावरून तिचं उड्डाण झालं. जवळपास फेरफटका मारून ही वोलोसिटी टॅक्सी यशस्वीपणे पुन्हा विमानतळावर परतलीय. विशेष म्हणजे इतर विमानं हवेत उडत असताना याची चाचणी घेण्यात आलीय. चाचणीवेळी टॅक्सीत एक प्रवासीही होता.

पुढच्या १८ महिन्यांमधे या टॅक्सीचं रजिस्ट्रेशन केलं जाईल. तोपर्यंत याच्या अनेक चाचण्या घेतल्या जातील असं वोलोकॉप्टरचे सीईओ डर्क होक यांनी टॅक्सीच्या चाचणीवेळी म्हटलंय. पुढचे संभाव्य धोके टाकण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ही टॅक्सी पूर्णपणे स्वयंचलित बनवण्याचा कंपनीचा मानस आहे. त्यादृष्टीने आपण प्रयत्न करत असल्याचंही डर्क होक यांनी म्हटलंय.

हेही वाचा: आयपॉड क्रांतीची सतरा वर्षं

वैशिष्ट्यपूर्ण असलेली वोलोसिटी

दोन सीटर असलेल्या या वोलोसिटीत आठ मोठे पंखे बसवले गेलेत. त्यामुळे यावर नजर पडताच एखादा मोठा ड्रोन बघितल्याचा फील येतो. आपली नेहमीची विमानं कन्ट्रोल करणं हे तांत्रिकदृष्ट्याही तितकंसं सोपं नाही. पण वोलोसिटीतलं तंत्रज्ञान त्या तुलनेत अधिक सोपं असल्याचं कंपनीने जाहीर केलंय. तशी स्पष्टताही कंपनीकडून करण्यात आलीय.

पॅरिसमधल्या अंतर्गत आणि कमी उंचीचा प्रवास समोर ठेवून वोलोसिटीची रचना करण्यात आलीय. त्यादृष्टीने केवळ प्रवासीच असलेली ही वोलोसिटी पूर्णपणे स्वयंचलित बनवायचा प्लॅन सध्या वोलोकॉप्टर कंपनी करतेय. सध्याच्या ट्रॅफिम जामच्या काळात लोकांचा प्रवास अधिक सुखकर आणि आनंदी व्हावा म्हणून वोलोकॉप्टरकडून हे पाऊल उचललं गेल्याचं  कंपनीचे सीईओ डर्क होक यांनी आपल्या एका ट्विटमधे म्हटलं होतं. त्यासाठी लोकांना प्रोत्साहन दिलं जातंय.

व्यावसायिक दृष्टिकोनातून याचं पहिलं उड्डाण हे २०२४ला होईल. याचवर्षी पॅरिसमधे ऑलिम्पिक स्पर्धा होतेय. त्यावेळी जगाला एक आगळंवेगळं तंत्रज्ञान देण्याचा आपला प्रयत्न असल्याचं मत फ्रान्सच्या प्रादेशिक परिषदेच्या अध्यक्षा वॅलेरि पेक्रिझ यांनी मांडलंय. पॅरिसमधल्या पायाभूत सुविधांना बळकटी देणाऱ्या या परिषदेनं वोलोसिटीचा आर्थिक भार उचललाय. त्यामुळे याकडे एक वेगळा प्रयोग म्हणून फ्रान्स सरकार पाहतंय.

जपानच्या बाईकनं वाढवली स्पर्धा

एलएलआय टेक्नॉलॉजी ही ड्रोन बनवणारी जपानमधली कंपनी आहे. या कंपनीने गेल्यावर्षी हवेत उडणारी बाईक बाजारात आणली होती. तिचं नाव 'एक्स टुरिस्मो लिमिटेड एडिशन' असं ठेवण्यात आलं. तिची जगभरात खूप चर्चा झाली. ही बाईक प्रति तास १०० किलोमीटर या वेगाने ४० मिनिटापर्यंत उडू शकेल असं कंपनीचे सीईओ डेसुके कातानो यांनी बाईक लॉंच करताना म्हटलं होतं.

२०१७पासून या बाईकवर काम सुरू झालं होतं. गेल्यावर्षी या बाईकचा उडणारा एक वीडियो आला आणि बघता बघता तो वायरलही झाला. तेव्हापासून या बाईकची उत्सुकता लागलेली होती. त्याआधी ही बाईक टोकियो इथल्या एका प्रदर्शनात ठेवण्यात आली होती. गेल्यावर्षी २६ ऑक्टोबर २०२१पासून या बाईकचं बुकिंगही सुरू झालंय.

सध्यातरी ही बाईक पेट्रोलवर चालते. पण २०२५पर्यंत कंपनीला त्याचं इलेक्ट्रिक वर्जन बाजारात आणायचंय. या बाईकचं सध्याचं वजन ३०० किलो इतकं आहे. तर लांबी ३.७ मीटर, रुंदी २.४ मीटर तर उंची १.५ मीटर इतकी आहे. बाईकची किंमत ५.१० कोटी असून कंपनीकडून केवळ २०० बाईक बाजारात आणल्या गेल्यात. ही एक्स टुरिस्मो बाजार आल्यामुळे इतर कंपन्यांमधे स्पर्धा वाढली.

हेही वाचा: ई-सिगारेटवर बंदी व्यसन रोखण्यासाठी की तंबाखू लॉबीमुळे?

व्यावसायिक उत्पादनाच्या दिशेनं

लिलियम, जॉबी एविएशन, एअरबस या विमान बनवणाऱ्या प्रतिष्ठित कंपन्यांमधे आता जर्मनीच्या वोलोकॉप्टरची एण्ट्री झालीय. या कंपन्यांमधे आता पहिली उडणारी टॅक्सी, कार नेमकी कुणाची येतेय याची स्पर्धा लागलीय. पण पॅरिसच्या आधीच जगभरात उडणाऱ्या टॅक्सीनं हवा केलीय. याआधी बर्लिन, मेलबर्न, बीजिंग, टोकियो, दुबई या शहरांमधे उडणाऱ्या टॅक्सीची चाचणी होऊन गेल्याचं रॉयटर न्यूज एजन्सीच्या एका बातमीत वाचायला मिळतं.

चीनची विमान कंपनी असलेल्या एक्सपेंगनं आपल्या हवेतल्या पहिल्या टॅक्सीच्या उड्डाणासाठी दुबई या शहराची निवड केली. तर क्लाइनविजन नावाच्या कंपनीच्या कारला स्लोवाकिया देशानं आपल्या देशात उड्डाणासाठी परवानगीही दिलीय. एकएक करून अशा कंपन्या आता पुढे येतायत. एकदा का त्यांना बाईक, कार, टॅक्सीच्या उड्डाणासाठी परवानगी मिळाली की या कंपन्या व्यावसायिक स्पर्धेत उतरतील. त्यांच्यात अंतर्गत स्पर्धा वाढेल. त्याला सुरवातही झालीय.

धावत्या शहरांचं भविष्य

जगभरातली लोकसंख्या आता ८०० कोटींवर पोचलीय. त्याचा परिणाम आपल्या पायाभूत सुविधांवर होतोय. संयुक्त राष्ट्राच्या असा अंदाज आहे की, २०५०पर्यंत जगातली दोन तृतीयांश लोकसंख्या ही शहरी भागात राहील. ही वाढती लोकसंख्या शहरावर अधिकचा ताण निर्माण करणारी असेल. त्यावेळी साहजिकच वाहतुकीचं नियोजन करणंही अवघड होईल. अशावेळी या उडणाऱ्या टॅक्सी या आपल्या पारंपरिक वाहतूक सेवांना एक उत्तम पर्याय ठरू शकेल.

वाढणाऱ्या गाड्या, ट्राफिक जामची समस्या आपल्या रोजच्या जगण्याचा भाग झालीय. त्यातून सुटका करून घेण्यासाठी या उडणाऱ्या टॅक्सी नक्कीच काम करतील. सुरवातीला या टॅक्सीचा खर्च नक्कीच परवडणारा नसेल. पण जसजसं हे तंत्रज्ञान लोकांना माहिती होईल, लोकांपर्यंत पोचेल, ते वापरणाऱ्यांची संख्या वाढेल तसं त्याच्या उत्पादनातही वाढ होईल. त्यामुळे आपला भविष्यातला प्रवासही अधिक स्वस्त आणि सुखकर होऊ शकेल.

आपली शहरं धावतायत. तिथली गर्दी हा आजचा कळीचा मुद्दा आहे. या धावत्या शहरांचा वेध घेऊन नव्या तंत्रज्ञानातून त्याला दिलासा देणं काळाची गरज बनलीय. त्यातून या हवेतल्या गाड्यांची कल्पना पुढे येतेय. सध्या या हवेतल्या कार, टॅक्सी अगदीच प्रायोगिक तत्वावर उभ्या राहतायत. पण जग ज्या दिशेनं जातंय तिथं उभं राहून आपण या बदलाचं नक्कीच स्वागत करायला हवं.

हेही वाचा: 

 आहे रे, नाही रे, हीच डिजिटल युगाचीही भाषा

लोकांनी सध्या गाड्या विकत घेणं का थांबवलंय?

मानसिक ताणतणावांकडे दुर्लक्ष करणं आपल्याला परवडणारं नाही

नोबेल मिळालेल्या लिथियम आयन बॅटरीचा वापर आपण कुठे करतो?

आकाश निळंच असतं असं वाटत असेल, तर 'द स्काय इज पिंक' बघाच