नरेंद्र मोदींना इतकं मोठं यश मिळालं, याची सर्वात महत्त्वाची ५ कारणं

२३ मे २०१९

वाचन वेळ : ३ मिनिटं


दुपारी एक वाजेपर्यंतच्या मतांच्या आघाडीचा विचार करता, पंतप्रधान नरेंद्र मोदी एकहाती विजयाच्या दिशेने जोरात घोडदौड सुरू असल्याचं स्पष्टच आहे. अंतिम निकाल येईपर्यंत त्यात आकडे थोडे वरखाली होऊ शकतील. पण निकालांची दिशा साधारणपणे अशीच असेल. या प्रचंड विजयामागची महत्त्वाची कारणं मांडण्याचा हा प्रयत्न.

नरेंद्र मोदी यांची जादू पुन्हा चाललीय. दुपारी एकच्या सुमारास एनडीएने सव्वातीनशेच्या वर उडी घेतलीय. हाच ट्रेंड शेवटपर्यंत चालेल असं स्पष्ट दिसू लागलंय. त्यामुळे हे भाजपचं निर्विवाद यश असेल हे स्पष्टच आहे. भाजपला इतकं मोठं यश म्हणजेच अपेक्षेपेक्षाही अधिक जागा मिळाल्यात. त्याची सर्वात महत्त्वाची पाच कारणं सांगायची, तर ती अशी असू शकतात.

मोदींना एक संधी देण्याची मानसिकता

नरेंद्र मोदी यांचे पंतप्रधान म्हणून सगळेच निर्णय मतदारांना पटलेले नव्हते. अनेक बाबतीत सरकारविषयी असंतुष्टही होते. तसं मतदार वेगवेगळ्या मीडियातून व्यक्तही करत होते. पण हा असंतोष इवीएममधे पोचलाच नाही. कारण मोदींना आणखी एक संधी देण्याची सार्वत्रिक भावना कामाला आली.

काँग्रेसला साठ वर्षं दिली. आता मोदींना आणखी पाच वर्षं देऊन बघुया, असा विचार मतदारांनी केल्याचं दिसतंय. त्यात शहरी आणि पांढरपेशा मतदार प्रामुख्याने होता. त्याचा प्रभाव सर्वच मतदारांवर पडल्याचा दिसतोय. मतदारांनी काँग्रेसला अद्याप माफ केलेलं नाही.

हेही वाचाः काय आहेत मतमोजणीच्या पहिल्या धारेचे अपडेट?

प्रचंड प्रचारातून मोदींची महाप्रतिमा

महाबलाढ्य संघटना बांधून प्रत्येक मतदारापर्यंत वैयक्तिकरित्या पोचण्याची यंत्रणा पक्षाध्यक्ष अमित शहांनी सक्षमपणे चालवली. तिला सतत कार्यक्रम आणि मोठा निधी देऊन कार्यरत ठेवलं. त्यांनी मतं मागितली ती मोदींच्या नावावर. त्यासाठी उपयोगी ठरेल अशी मोदींची लार्जर दॅन लाईफ प्रतिमा तयार करण्यात आली.

सिनेमा, वेबसिरीज, लाईव भाषणं, सोशल मीडिया, छोट्या मोठ्या सभा, स्वतंत्र चॅनल असे सगळे मार्ग त्यासाठी वापरण्यात आले. शिवाय मुख्य प्रवाहातल्या मीडियालाही हाताशी धरलं. त्यातून निर्माण केलेल्या खऱ्याखोट्या महाप्रचंड प्रचाराने मोदींना महाप्रचंड विजय मिळवून दिला. त्यासाठी कोणताही मार्ग चुकीचा मानला नाही. प्रसंगी सरकारी यंत्रणाही वापरली.

हेही वाचाः नथुरामायणः गांधीजी ज्या देशाचे रहिवाशी होते, तो देश नथुरामचा नव्हता

पर्याय देण्यात काँग्रेस, विरोधक असफल

राहुल आणि प्रियांका गांधी यांनी निवडणूक जोरात लढवली. प्रचारात नवनवे मुद्दे दिले. पण मोदींच्या महाप्रतिमेसमोर तितक्यात ताकदीने उभे राहण्यात राहुल तोकडेच पडले. त्यांचा प्रचार पारंपरिकच राहिला. त्यात नावीन्य नव्हतं. एकूण राजकीय परिस्थिती लक्षात येताच भाजपने वेळीच नाराज मित्रपक्षांना सोबत घेतलं, विरोधी पक्ष फोडले, प्रचाराची दिशा बदलली.

पण ते काँग्रेस करू शकलं नाही. विरोधक एकत्रच आले नाहीत. खऱ्या अर्थाने महागठबंधन बनलंच नाही. सपा, बसपा, तृणमूल किंवा डावे, तेलुगू देसम, अशा समविचारी पक्षांना काँग्रेस देशपातळीवर सोबत घेऊ शकला नाही. ते काँग्रेसचं मोठं अपयश ठरलं.

हेही वाचाः २३ मेला कुणाचं सरकार येईल? वाचा पाच शक्यता

लाभार्थ्यांना मतदार बनवण्याची रणनीती

१९ मे ला शेवटच्या टप्प्यातलं मतदान झाल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत भाजप अध्यक्ष अमित शहांनी अपेक्षित यशाचं गुपित सांगितलं. ते होतं, सरकारी योजनांच्या लाभार्थ्यांना भाजपचा मतदार बनवण्यासाठी केलेले प्रयत्न. त्यांच्यामते २०१४ला भाजपला १७ कोटी जणांनी मतदान केलं होतं. गेल्या पाच वर्षांत सरकारी योजनांचे लाभार्थी २१ कोटींहून जास्त होते.

भाजपने लाभार्थ्यांना मतदान केंद्रांपर्यंत आणण्यासाठी उत्तम रणनीती आखली. फोन, पत्रं आणि प्रत्यक्ष भेटीत त्यांच्यावर ते लाभार्थी असल्याचं बिंबवलं. त्यांना मोदींना मतदान करायला लावलं.

मुस्लिम पट्ट्यातून कमी मतदान

मॉब लिंचिंगपासून प्रज्ञा ठाकूरला उमेदवारी देण्यापर्यंत अनेक गोष्टींमुळे मुस्लिम मतदार भाजपवर खूपच नाराज होता. शिवाय तो विचारपूर्वक मतदार करून राजकीय जाण दाखवण्यासाठीही ओळखला जातो. त्यामुळे त्याचं मतदान निवडणुकीत महत्त्वाचं ठरणार होतं. तो आपापल्या पट्ट्यांत मोठ्या संख्येने मतदान करेल अशी अपेक्षा होती.

पण प्रत्यक्षात मात्र मुस्लिमबहुल विधानसभा मतदारसंघांत मतदानाचं प्रमाण अपेक्षेपेक्षा खूपच कमी दिसलं. त्यात मुंबादेवी, भिवंडी, मालेगाव, मालाड या महाराष्ट्रातल्या मतदारसंघांबरोबरच देशातलेही काही भाग होते. प्रशासनाने वेगवेगळी कारणं देऊन मुसलमान मतदारांना मतदान करू दिलं नाही, असे आरोप झालेत. त्याचवेळेस मुस्लिमांविरुद्ध हिंदू मतांचं ध्रुवीकरण करण्यात मात्र भाजप यशस्वी ठरला.

हेही वाचाः विश्वसुंदरी ठरलेल्या महाराणी गायत्री देवींनी संसदही गाजवली