आग विझवण्यात मुंबईतला रोबोट अपयशी, मग जगभरात काय होतंय?

२३ जुलै २०१९

वाचन वेळ : ३ मिनिटं


काल मुंबईतल्या वांद्रे इथल्या सरकारी टेलिकॉम कंपनी एमटीएनएल एसीमधे शॉर्टसर्किट झालं. आगीत अडकलेल्यांना अग्निशमन जवानांनी सुखरुप बाहेर काढलं. पण या कामासाठी मुंबई महापालिकेने १ कोटी खर्च करून आणलेल्या रोबोटनं काहीच केलं नाही. इतर देशांमधे मात्र हे फायर फायटिंग रोबोट यशस्वीरीत्या काम करतायत.

मुंबईत काल २२ जुलैला दुपारी वांद्रे इथे एमटीएनएलच्या बिल्डिंगला आग लागली. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान, अधिकारी पोचले. आणि बरोबर फायर फायटिंग यंत्रणा, फायर इंजिन्स इत्यादी गोष्टी आणल्या. पण त्यात एक खास गोष्ट होती ती म्हणजे फायर फायटिंग रोबोट.

अतिज्वलनशील आणि मोठा अपघात घडला की जवानांच्या सहकार्यासाठी आणि मुंबईकरांचे प्राण वाचवण्यासाठी या रोबोला अग्निशमन दलानं नुकतंच सामील करून घेतलंय. पण ऐनवेळी रोबोटने टांग दिली. यंत्रानं दगा दिल्याने शेवटी माणूसच कामाला आला. आपल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी सगळ्या ८५ जणांना वाचवलं.

रोबोटचा जिन्यावरच गोंधळ

काही दिवसांपूर्वी युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी या रोबोटचं लोकार्पण केलं. हा रोबोट आगीच्या ज्वाळा, धुराचे लोळ सहज सहन करू शकतो. तसंच चिंचोळ्या गल्ल्या, अडगळीच्या ठिकाणी, बेसमेंटची आग अशा ठिकाणी थेट जाऊन आगीवर नियंत्रण मिळवू शकतो. यातला थर्मल कॅमेरा धुरातही स्पष्ट चित्र दाखवतो. आणि पाण्याचे पाईप ओढणं, ५५ मीटर उंचीपर्यंत पाण्याचा मारा करणं अशी कामसुद्धा करतो.

विमान बांधणीच्या साहित्यापासून हा रोबोट तयार करण्यात आलाय. महत्त्वाचं म्हणजे हा रोबो ७०० अंश सेल्सिअसच्या तापमानातही काम करू शकतो. अंदाजे ४०० ते ५०० किलो वजन असलेल्या या रोबोला ३०० मीटरपर्यंत रिमोटने नियंत्रित करता येतं. तर कॉम्प्युटरने कोणत्याही अंतरावरुन सूचना देऊन काम करवून घेता येतं.

या रोबोला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी टाटा एस सुपरमिंट बनावटीची १ टन वजन उचलण्याची क्षमता असलेली गाडी आहे. रोबोला वाहनावर चढवण्यासाठी आणि उतरवण्यासाठी एक हायड्रोलिक लिफ्टसुद्धा आहे.

हेही वाचा: पावसाळ्यात पुण्या-मुंबईतल्या इमारती पत्त्याच्या डावासारख्या का कोसळतात?

देशातला पहिलावहिला प्रयोग

रोबोवर मुंबई महापालिकेनं १ कोटी १२ लाख रुपये खर्च केलाय. रोबोमधे आगीच्या ठिकाणी प्रत्यक्ष प्रवेश करुन आग विझवण्याची यंत्रणा आहे, असं अग्निशमन दलाने लोकार्पण सोहळ्यावेळी सांगितलं. पण प्रत्यक्षात रोबो जिन्याच्या चार पायऱ्यासुद्धा व्यवस्थित चढू शकला नाही.

खरंतर हा फायर फायटर रोबोचा प्रयोग भारतात पहिल्यांदाच करण्यात आलाय. मुंबईत पेट्रोकेमिकल कारखाने आणि अणुऊर्जा संशोधन केंद्र या ठिकाणी आगीच्या दुर्घटना होण्याचा मोठा धोका आहे.

मुंबईत गेल्या दशकभरात ५० हजार आगीच्या दुर्घटना झाल्याचं एनडीटीवीने आपल्या एका रिपोर्टमधे सांगितलं. अशा अतिज्वलनशील ठिकाणी हा रोबो उपयोगी ठरू शकतो. म्हणून मुंबईत हा प्रकल्प राबवण्यात येतोय. पण याचा पहिलाच प्रयत्न अयशस्वी ठरलाय.

हेही वाचा: सरकारी कर्मचाऱ्यांची संख्या कमी करणं ही खरंच मिरवण्याची गोष्ट आहे?

सिडनीत पहिल्यांदा रोबोचा वापर

आपल्याला रोबोटबद्दल नेहमीच कुतुहल वाटतं. पण रोबोट हा प्रकार फार जुना नाही. १९५४ पासून रोबोज आपल्या समोर आलेत. त्यामुळे फायर फायटर रोबो अगदी २०१४ पासून वापरात आहेत. म्हणूनही कदाचित रोबोटमधे त्रुटी राहिलेल्या असू शकतात.

जर्मनी आणि मेक्सिकोमधे फायर फायटरला रिमोटच्या माध्यमातून वापरलं गेलं होतं. यालाचं फायर फायटर रोबोटचा मूलभूत प्रयोग म्हटलं जातं. तर २०१५ मधे ऑस्ट्रेलियाच्या सिडनीत वापरल्या गेलेल्या रोबोला पहिल्या फायर फायटर रोबोचा मान मिळतो.

आपण रोबोट म्हणजे माणसासारखं शरीर असलेलं मशिन असा विचार करतो. पण रोबोट हा प्रत्येकवेळी माणसाच्या शरीरासारखा असतो असं नाही. सिडनी कंपनीने बनवलेला पहिला रोबो हा फायर फायटर मशिनला रोबोचं तंत्रज्ञान जोडलेला होता. आणि बाहेरच्या आकारापेक्षा आतलं तंत्रज्ञानच महत्त्वाचं असतं. म्हणूनच हे रोबोट कामगिरी फत्ते करतंय.

नव्या फायर फायटर रोबोटमधे काय आहे?

गेल्यावर्षी म्हणजे एप्रिल २०१८ मधे पॅरिसमधल्या ८०० वर्षं जुन्या कॅथेड्रलमधे आग लागली होती. त्यावेळी या पुरातन वास्तुचे अवशेष वाचवणं हे महत्त्वाचं काम होतं. अशावेळी फायर फायटर रोबोचा वापर करून आग विझवण्यात यश आलं आणि कॅथेड्रलचा जास्तीत जास्त भाग सुरक्षित राहिला. सध्याच्या रोबोमधे बराच बदल झालाय. आणि ते यशस्वीरीत्या आग विझवण्याचं काम करतायत. हे या घटनेवरुन दिसतं.

नव्या रोबोटमधे आग, धूर आणि तापमानाचं सेन्सर लावलंय. तसंच आगीच्या जागेची परिस्थिती समजण्यासाठी उच्च दर्जाचे ऑडियो आणि विज्युअल कॅमेरा, सेल्फ मोटर ड्राईव्हर तंत्र, पाण्याचे पंप वापरण्याचं तंत्र इत्यादी गोष्टी बसवण्यात आल्यात. भविष्यात मायक्रो कंट्रोलर फायर फायटिंग रोबोट बनवण्याच्या दृष्टीने काम सुरु आहे.

हे रोबोट नैसर्गिक आपत्ती, बॉम्ब निकामी करणं आणि आग विझवण्याच्या कामांमधे पारंगत असेल. जेणेकरून अशावेळी माणसाला जीव धोक्यात टाकून करावी लागणारी कामं रोबोट स्वत: करेल. आणि अचूकपणे करेल, असं मलेशियन युनिवर्सिटीच्या इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक विभागाच्या एम एस हसीमी, हमिर्युस झुबा यांनी आपल्या अॅन ऑटोनॉमस फायर फायटींग रोबोट या जानेवारी २०१९ मधे प्रसिद्ध झालेल्या रिसर्च पेपरमधे म्हटलंय.

हेही वाचा: 

टिळकांच्या हरवलेल्या पुतळ्याचा शोध कुठं घ्यायचा?

ती १५ मिनिटं ठरवणार आपल्या चांद्रयानाचं भवितव्य

चंद्रावर पहिलं पाऊल कोण ठेवणार यावरुन वाद झाला होता

स्वर्गातल्या वडलांना येस पप्पा म्हणणाऱ्या जॉनी बिअरस्टोची गोष्ट

गोल्डन गर्ल हिमा दासकडे धावण्यासाठी शूज नव्हते, आज तिच्या नावाची शूज रेंज आहे