आपल्या भोवतालच्या बदलत्या वास्तवाचं आणि बदलत्या सामाजिक जाणिवांचं भान ठेवून साहित्यप्रकार जन्म घेतो. तो त्या त्या समाजाच्या जनमानसाची पकड घेतो. या सगळ्या वस्तुस्थितीचं उत्तम उदाहरण म्हणजे अण्णा भाऊ साठेंची लोकनाट्य. लोकांचं जगणं हे साहित्याचं केंद्र मानणाऱ्या अण्णा भाऊंचा आज पन्नासावा स्मृतिदिन.
भाऊ मांगाच्या घरात १ ऑगस्ट १९२० ला जन्मलेल्या अण्णा भाऊंनी दारिद्र्य फार कोवळ्या वयात अनुभवलं. सांगलीतलं वाळवा तालुक्यातलं लहानसं वाटेगाव. इथंच अण्णांनी समाजाच्या उपेक्षांचे चटके सहन केले. पुढे वेठबिगारीतली अमानुष पिळवणूक भोगली. गिरणीकामगारांच्या हालअपेष्टा आणि शोषण सोसलं. झोपडपट्टीतल्या बकालपणाची सोबतही केली. इतकं अपार दुख भोगलेल्या अण्णांच्या साहित्यात कुठेही आक्रस्ताळा तळतळाट, समाजाला शिव्याशाप किंवा अन्याय करणाऱ्यांना खलास करण्याची भाषा आढळत नाही. हे त्यांच वैशिष्ट्य प्रकर्षानं जाणवणारं आहे.
प्रतिभेचं लेणं कुणा भाग्यवंताला लाभेल हे सांगता येणं कठीण आहे. वाटेगावच्या गावकुसाबाहेर मातंग समाजात जन्मलेला अण्णा भाऊ साठे नावाचा मुलगा, ज्याला वयाच्या १५ - १६ व्या वर्षापर्यंत धड अक्षरओळखही नव्हती. आणि पुढे जाऊन तो मराठी साहित्यातला मानसन्मान मिळवतो. ‘फकिरा’ या त्याच्या बावनकशी कादंबरीच्या अनेक आवृत्त्या निघतात. मराठीशिवाय दुसरी भाषा माहीत नसलेला हा अभिजात कलाकार रशियाला जाऊन येतो. तसंच त्यांच्या साहित्यकृतींची भाषांतरं केवळ भारतीय नाही तर भारताबाहेरच्या भाषांमधेही होतात. हे खरंतर प्रतिभेचं लेणं होतं.
समाजाकडून ज्यांच्यावर अन्याय होतो, त्यांच्याकडून दोन प्रकारच्या प्रतिक्रिया नेहमीच आलेल्या दिसतात. अन्यायाचा प्रतिकार करताना जशास तसं उत्तर देऊन अद्दल घडवणं. तर दुसऱ्या प्रतिक्रियेत अन्यायाबद्दल चीड असते, त्याचा प्रतिकार करण्याची जिद्दही असते. अपार करुणा आणि संपूर्ण मानवजातीच्या हिताची मनीषा तिथं सामावलेली असते. येशू ख्रिस्त, भगवान बुद्ध, ज्ञानोबा माऊली यांच्या डोळ्यांतून पाझरणाऱ्या करुणेचा आणि मनात दाटलेल्या मानवहिताच्या मनीषेचा अंश ज्यांना लाभतो त्यांच्या कृतीत, उक्तीत, साहित्यात सृजनाची बीजं आढळतात, संहाराची नाही. अण्णा भाऊंच्या साहित्यात हेच दिसून येतं.
दलित, शोषित, पीडित यांनी आपल्यावरच्या अन्यायाचा प्रतिकार करावा. तो स्वत: सुशिक्षित होऊन, सुसंस्कृत होऊन, संघटितरीत्या समर्थ होऊन, ही अण्णा भाऊंची प्रामाणिक इच्छा त्यांच्या साहित्यातून उमटलेली आढळते.
२ मार्च १९५८ मधे महाराष्ट्र साहित्य संघाचं साहित्य संमेलनं भरलं होतं. उद्घाटनाच्या भाषणात अण्णा भाऊ म्हणतात, ‘आम्हाला गंगेसारखे निर्मळ साहित्य हवे आहे. आम्हाला मांगल्य हवे आहे. आम्हाला मराठी साहित्याच्या थोर परंपरेचा अभिमान आहे. कारण मराठी साहित्याची नांदी आमच्याच जीवन-संघर्षाने झडली आहे. जेव्हा दलितांची सावली असह्य होती तेव्हा महानुभावपंथीय साहित्यिकांनी सर्वांना ज्ञान मिळाले पाहिजे, ज्ञान हे मोक्ष असे समजून त्यांनी बंड केले. ते आमचे साहित्यिक. माणसाला माणूस म्हणून जगता आले पाहिजे असा दावा मांडून ज्यांनी दलितांच्या भाषेत महाराष्ट्राला सुंदर ज्ञानेश्वरी दिली ते आमचे साहित्यिक. चुकलेले महाराचे मूल कडेवर घेऊन जाणारे ते एकनाथ, ते आमचे साहित्यिक. आम्ही आपल्या वर्गाचे इमान पटवून त्याचा उपमर्द होणार नाही याची काळजी करूया.’
आपल्या दलित, पीडित, शोषित समाजबांधवांचे आयुष्य हा एक उन्नतीचा प्रवास ठरावा, सूडाचा प्रवास ठरू नये ही अण्णा भाऊंची तीव्र इच्छा होती. ती त्यांच्या पोवाड्यांमधे, गाण्यांमधे, लोकनाट्यांमधे आणि कथा, नाटक, कादंबऱ्यांमधेही सातत्याने दिसते.
हेही वाचा: मी बंडखोर कसा झालो, सांगतायत राजा ढाले
१९४२ ला संपूर्ण बंगाल प्रांतात भीषण दुष्काळ पडला. लाखो भूकबळी पडू लागले. दुष्काळग्रस्तांसाठी मदतनिधी गोळा करण्यासाठी मुंबईतले साम्यावादाचा प्रभाव असलेले कलावंत एकत्र आले. त्यांनी इप्टा नावाची संस्था काढली. कार्यक्रमांची एक मालिका सादर करण्याची योजना आखली. या कार्यक्रमासाठी बंगालच्या आपत्तीवर एक पोवाडा रचून तो सादर करावा असं अण्णा भाऊंना वाटलं आणि त्यांच्यातला ‘अभिजात शाहीर’ प्रकट झाला. बंगालची हाक ह्या त्यांच्या पहिल्या पोवाड्यापासून पुढे सुमारे १४-१५ पोवाडे या अण्णा भाऊंच्या कविमनाने अन्यायाविरूद्ध नोंदवलेल्या प्रखर प्रतिक्रियाच होत्या.
अण्णा भाऊंचं साहित्य, मुख्यत: पोवाडे वाचताना जाणवतं की, अण्णा भाऊंनी हिंसाचार, अत्याचार यांचा नेहमीच धिक्कार केलाय. फाळणीच्या पार्श्वभूमीवर पंजाब-दिल्लीत भडकलेल्या जातीय दंग्यावर रचलेल्या पोवाड्यात ते म्हणतात,
माणुसकी पळाली पार | होऊनी बेजार | पंजाबातून ||
सूडाची निशा चढून | लोक पशुहून | बनले हैवान ||
माणुसकीच्या या हत्येनं विषण्ण झालेले अण्णा भाऊ कळवळून सांगतात,
द्या फेकून जातीयतेला | करा बंद रक्तपाताला | आवरोनि हात आपुला |
भारतीयांनो इभ्रत तुमची ईर्षेला पडली | काढा बाहेर नौका देशाची वादळात शिरली |
धरा सावरुन एकजुटीने दुभंगली दिल्ली | काढा बाहेर राष्ट्रनौका ही वादळात गेली |
शेवटी भारतीयांना आवाहन करतात,
तू उठ आता सत्वर | हे तुडवून दंगेखोर | म्हणे अण्णा साठे शाहीर |
सावरुन धर | तुझी तू शांतिध्वजा सत्वर |
‘शाहिरांनो’ या गीतातही शेवटी अण्णा म्हणतात,
सुखशांतीचा पोवाडा, गांजल्यांना ऐकवा | जाऊ द्या ती खोल खाली दामिनीसम शाहिरी |
म्हणूनच ‘खून का बदला खून’ हे तत्वज्ञान अण्णा भाऊंना कधीच मानवलं नाही. ‘जग बदल घालुनी घाव | सांगून गेले मला भिमराव’ म्हणणाऱ्या अण्णा भाऊंना घाव पडायला हवे होते ते दुष्ट रुढींवर आणि त्यातून नवमहाराष्ट्राची निर्मिती व्हायला हवी होती.
हेही वाचा: शाहिरांनी महाराष्ट्राचा इतिहास फक्त गायला नाही तर घडवलायही
शेतकरी आणि गिरणी कामगारांची दु:खं पाहिलेल्या, भोगलेल्या अण्णा भाऊंना साम्यवादी विचार आपलासा वाटणं स्वाभाविकच होतं. दलित-शोषित-पीडितांना माणूस म्हणून ताठ मानेनं जगायला शिकवणारं हे तत्वज्ञान अण्णा भाऊंना इतकं भावलं की, अखेरपर्यंत त्यांनी त्याची कास सोडली नाही. स्तालिनग्राडचा पोवाडा, बर्लिनचा पोवाडा, चिनीजनांची मुक्तिसेना, लेनिन शुभनामाचे गाऊ गान या साऱ्यांमधून त्यांनी साम्यवादाची मुक्त आणि मन:पूर्वक स्तुती केली. आपली प्रतिभा त्यांनी साम्यवादाच्या प्रचारासाठी राबवली अशी टीका अण्णा भाऊंवर नेहमीच झाली. परंतु कविमनाला जे भिडतं त्याचीच अभिव्यक्ती त्याच्या काव्यातून घडते, हे कसं नाकारता येईल?
मुंबई, महाराष्ट्र आणि भारत यावरचं त्यांचं प्रेम त्यांच्या साहित्यात जागोजागी उमटलंय. महाराष्ट्र देशा अमुच्या, उठला मराठी देश, महाराष्ट्रावरुन टाळ ओवाळून काया, महाराष्ट्राची परंपरा, या केवळ नावांवरुन ते दिसून येईल. म्हणून संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती होताना बेळगाव, कारवार, निपाणी, धारवाड, उंबरगाव, डांग हा सीमाभाग महाराष्ट्राला दुरावणार, कदाचित मुंबईही वेगळी काढली जाणार ही व्यथा त्यांचं काळीज पोखरत होती. या व्यथेतून जन्माला आली एक अप्रतिम लावणी.
माझी मैना गावाला राहिली | माझ्या जिवाची होतिया काहिली |
तरुण, सुंदर, गुणी पत्नी दूर गावाला राहिल्यामुळं, तिच्या विरहाने जळणारा गिरणी कामगार पती हा प्रत्यक्षात मुंबईला, सीमाभागाला दुरावणारा महाराष्ट्र होता.
मुंबईचे अंतरंग जाणून घेतलेल्या अण्णा भाऊंच्या डोळ्यांना दिसलेली मुंबई फार वेगळी आहे. पठ्ठे बापूरावांना मुंबई नगरी बडी बांका वाटली, हे मुंबई बंदर, सगळ्या दुनियेत सुंदर अशी ग्वाही त्यांनी दिली, परंतु अण्णांच्या कारूण्यमयी दृष्टीला मुंबईच्या लावणीत दिसली ती मुंबई अशी
मुंबई उंचावरी | मलबार हिल इन्द्रपुरी | कुबेरांची वस्ती तिथे सुख भोगती ||
परळात राहणारे | रात्रंदिवस राबणारे | मिळेल ते खाऊनी घाम गाळती ||
ही विषमता त्यांचं ह्रदय हेलावू टाकत होती जो श्रम करुन, घाम गाळून मुंबईला भारताची आर्थिक राजधानी बनवतो, त्याच्या नशिबी अर्धपोटी राहणं यावं हा दैवदुर्विलास त्यांना मुंबईत प्रकर्षानं जाणवला.
तळहातावर पृथ्वी पेलणाऱ्या समर्थ हातांना संघटित करणारं साम्यवादी तत्वज्ञान त्यांना मोहून गेलं. कष्टकऱ्यांनी, शेतकरी-कामगारांनी एक होऊन आपलं सामर्थ्य वाढवावं. ही त्यांची तळमळ त्यांच्या अनेक गाण्यांमधून दिसते. दौलतीच्या राजा | उठूनि सरजा | हाक दे शेजाऱ्याला रे | शिवारी चला || किंवा ‘पूर्वेला आली जाग’, ‘रवि आला लावुनी तुरा’, ‘दुनियेची दौलत सारी’ यासारख्या अनेक मधुर गाण्यांनी १९५०-६० या दशकात साऱ्या महाराष्ट्रात त्यांना लोकप्रियता मिळाली होती, ती केवळ त्यातला विचार जनतेला आपला वाटला म्हणून.
हेही वाचा: डॉ. बाबासाहेब आंबेडकरः भारतातल्या मानवी स्वातंत्र्याचे शिल्पकार
इनामदार हे अण्णा भाऊंचं एकमेव नाटक. त्यातही खेड्यातला सावकारी पाश शेतकऱ्यांभोवती कसा आवळला जातो आणि माणसं गुन्हेगारीला का प्रवृत्त होतात, आपल्या फायद्यासाठी धनदांडगे त्याचा कसा फायदा करुन घेतात याचं विदारक चित्र अण्णा भाऊंनी त्यात रेखाटलंय. गमतीचा भाग असा की, या नाटकाचे प्रयोग मराठीत झाले नाहीत. हिंदी रंगभूमीवर मात्र हे नाटक लोकप्रिय ठरलं.
ए. के. हंगल वगैरे डाव्या मंडळींच्या अभिनयाइतकंटच त्याचं श्रेय अण्णा भाऊंच्या सकस लेखणीलाही द्यायला हवं. लोकनाट्यावर जबरदस्त पकड असलेल्या अण्णांना नाट्यलेखन अवघड नव्हतं. लोकनाट्यातली रसरशीत बोलीभाषा इथं न वापरता सावकार, कारकुरांना शोभेल अशी भारदस्त भाषा अण्णा भाऊंनी लिलया वापरली.
पोवाडे, गीतं, नाटकं या साऱ्यातून ज्या साम्यवादी विचारांचा, श्रमिकांच्या समस्यांचा प्रभाव दिसून येतो त्या साम्यवादाची जन्मभूमी असलेल्या सोविअत रशियाला जाण्याचं अण्णा भाऊंच स्वप्न १९६१ ला प्रत्यक्षात आलं. ते हरकून गेले. एका सच्च्या श्रमिकाच्या कलावंत मनाला दिसलेला रशिया ‘माझा रशियाचा प्रवास’ या छोटेखानी पुस्तकात आपल्याला भेटतो. या प्रवास वर्णनाचा ढाचाच पार वेगळा आहे. मॉस्कोतली किंवा बाकूतली पर्यटनस्थळं, सौंदर्य या वर्णनापेक्षा अण्णा भाऊ अधिक रंगतात ते तिथल्या माणसांच्या अंतरंगात.
मॉस्कोतल्या ‘सोवियत स्काय’ हॉटेलात भेटलेले दुभाषी डॉ. बारनिकोव, लेनिनग्राड च्या मराठीच्या प्राध्यापिका तातियानाबाई, लेनिनग्राड युनिवर्सिटीच्या विद्यार्थी, रस्त्यावरचे सामान्य नागरिक, अण्णा भाऊंना ‘शाहीरे अझीज’ म्हणणारे बाकूतले डॉ. हमीद, या सर्वांशी आत्मीयतेनं साधलेल्या संवादातून अण्णा भाऊंना रशियातला माणूस पहायचा होता. प्रेमात पडलेल्याला प्रिय व्यक्तीचं सारंच सुंदर वाटतं. अण्णा भाऊ साम्यवादाच्या प्रेमातच पडल्यामुळे त्यांना रशिया म्हणजे भूलोकीचा स्वर्गच वाटला हे त्यांच्या प्रवासवर्णनातून जाणवतं. पण साम्यवादी देशातल्या सामान्य माणसाच्या खोल मनात दडलेलं सत्य शोधण्याचा अण्णा भाऊंचा प्रामाणिक प्रयत्न आपल्या वेगळेपणानं अधिक काळ लक्षात राहतो.
हेही वाचा: शंकर भाऊ साठे : १६ पुस्तकं लिहणारे अण्णाभाऊंचे भाऊ
साम्यवादी रशियाला भेट देण्याची संधी अण्णा भाऊंना बरीच उशिरा मिळाली. साम्यवादाशी त्यांची ओळख १९४० च्या आसपास झाली होती. शोषितांना शोषणमुक्त करण्याचं, एक स्वतंत्र स्वाभिमानी माणूस म्हणून जगण्याचं आश्वासन देणारं साम्यवादी तत्वज्ञान त्यांच्या मनात खोलवर ठसलं होतं. हा ठसा त्यांच्या साहित्यावर आणि सर्वाधिक स्वरूपात त्यांच्या लोकनाट्यावर पडलेला दिसतो.
आपल्या भोवतालच्या बदलत्या वास्तवाचं आणि बदलत्या सामाजिक जाणिवांचं भान ठेवून साहित्यप्रकार जन्म घेतो. तो त्या त्या समाजाच्या जनमानसाची पकड घेतो. या सगळ्या वस्तुस्थितीचं उत्तम उदाहरण म्हणजे अण्णा भाऊंची लोकनाट्य. तमाशा हा ग्रामीण महाराष्ट्राच्या लोकजीवनाचा अविभाज्य घटक आहे. साऱ्याच लोककलांविषयी असं म्हणता येईल. १९ व्या शतकाच्या अखेरीला मुंबईसारख्या शहराला बाळसं आल्यावर, ग्रामीण महाराष्ट्रातून गरिबीनं गांजलेल्यांचे लोंढे मुंबईकडे येऊ लागले. आपल्या ‘काळ्या आई’ला आणि कुटुंबियांना गावाकडेच ठेवून शहरात आलेली ही बहुसंख्य माणसं गिरण्यांमधे भरती होऊन ‘गिरणगावा’त एकमेकांना धरून राहिली.
मोरबाग मिल्समधे राबणारे अण्णा भाऊ गिरणगावच्या, गिरणीकामगारांच्या नव्या समस्यांना सरावत होते, शोषणाला सामोरे जात होते. श्रमिकवर्गाच्या शोषणाला वाचा फोडून, त्यांच्या संघटित शक्तीला जागृत करणारे लाल बावट्याचे साम्यावादी विचार ऐकत होते, पचवत होते. अशावेळी बालपणापासून ज्य़ांची सोबत होती त्या लोककलांच्या, मुख्यत तमाशाच्या, नव्या रुपाचा साक्षात्कार अण्णा भाऊंना झाला.
या संदर्भात डॉ. सदा कऱ्हाडे यांनी ‘अण्णा भाऊ साठे संदर्भ ग्रंथा’तल्या आपल्या लेखात म्हटलंय की, ‘परंपरागत तमाशाची सुरावट घेऊन अण्णा भाऊंनी शाहिरीची नवी सजावट केली. या अर्थानं की, पोवाडे, लावण्या, गीतं, गण, वग हे रचनाबंध त्यांनी स्विकारले. त्यात नवा आशय भरला. हा नवा आशय समकालीवन होता. त्यामुळे ह्या परंपरागत कलेला नवी प्रतिष्ठा मिळाली. शाहिरीची ही नवी सजावट लोकनाट्य या अर्थपूर्ण नावानं ओळखली गेली. शाहीर अण्णा भाऊ साठेंचा कलावंत म्हणून आदर करायला हवा तो लोकनाट्याचे प्रवर्तक म्हणूनचं.’
हेही वाचा: एन. डी. पाटील यांचं जीवन, सामाजिक संघर्षाचं एक धगधगतं अग्नीकुंडच
इथं लोकनाट्य या नावाविषयी सांगायला हवं. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ ऐन भरात होती. मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याची योजना जोर धरत होती अशावेळी लाल बावटा कलापथकाद्वारे शाहीर गव्हाणकर, शाहीर अमरशेख आणि शाहीर अण्णा भाऊ साठे ही त्रयी उभा महाराष्ट्र जागवत आणि गाजवत होती. कलापथकाच्या तमाशाला हजारो माणसं यायची. मुंबईत मैदानं तुडुंब भरायची. चवताळलेल्या मोरारजी देसाईंनी तमाशावर बंदी घातली. त्यावर अण्णा भाऊंनी शक्कल लढवली.
त्यांनी ‘माझी मुंबई’ हा ‘वग’ लाखोंच्या जनसमुदायासमोर सादर केला. ते करण्याआधी जाहीर केलं की, मायबाप सरकारनं तमाशावर बंदी आणलीय म्हणून आज आम्ही आपल्यासमोर ‘माझी मुंबई’ हे लोकनाट्य सादर करतोय. टाळ्यांच्या कडकडाटात आणि पोलिसांच्या उपस्थितीत तमाशाचं लोकनाट्य असं बारसं झालं. हे ऐतिहासिक काम अण्णा भाऊंनी केलं. मिश्कीलपणे त्यांनी सरकारला हात चोळत बसायला लावलं.
अण्णा भाऊंनी तमाशाचं केवळ नाव बदललं नाही तर त्याचे अंतरंग बदलले. पारंपरिक तमाशात गण, गवळण, बत्तावणी, सवालजवाब, वग असे घटक असतात. गणामधे गणेशवंदन आणि गणेशस्तवन असतं. अण्णा भाऊंनी ही परंपरा मोडून पहिल्या नमनाचा मान मातृभूमी, हुतात्मे, राष्ट्रपुरुष यांना देण्याचं बहुमोल काम त्यांनी केलं.
प्रथम मायभूच्या चरणा
छत्रपती शिवबा चरणा
स्मरोनि गातो | कवना ||
म्हणणाऱ्या अण्णा भाऊंनी एक अभिमानास्पद बदल करून आपल्या राष्ट्रप्रेमाला साद घातली. सोबत तमाशाकडे पाहण्याची एक नवी दृष्टी दिली.
गणानंतर यायची गवळण. पण मथुरेच्या बाजाराला निघालेल्या गवळणी आणि त्यांना अडवणारी कृष्ण-पेंद्याची जोडगोळीला अण्णा भाऊंनी वगळलं. कारण या संवादातून मनोरंजन होतं असलं तरी त्यात पांचटपणा आणि अश्लिलता अधिक असायची. गणानंतर सरळ वगच सादर करण्याची कालानुरुप प्रथा अण्णा भाऊंनी सुरू केली. वगाच्या सुरवातीला असलेल्या ‘म्हणणी’तून कथानकाची ओळख प्रेक्षकांना करुन देऊन त्यांची उत्सुकता वाढवण्याचं काम त्यांनी केलं.
हेही वाचा: जैतुनबींच्या निमित्ताने महाराष्ट्राचं व्यापक तत्त्वज्ञान भारतभर पोचलं असतं पण?
वगामधे येणारी परंपरागत राजाराणीप्रधान पात्र बदलून त्या जागी शेतकरी-सावकार, कामगार-पुढारी अशी प्रेक्षकांच्या रोजच्या ओळखीची वास्तव पात्र आणली. पुराणातल्या काल्पनिक कथांची जागा काळाबाजार, सावकाराने कर्जदाराला नाडणं, गिरणीकामगारांचं शोषण, पुढाऱ्यांच्या भूलथापा, निवडणुकीतलं हिडिस राजकारण यांना देऊन अण्णा भाऊंनी क्रांतिकारक बदल केला. हा बदल बहुजन समाजात रुजला.
तमाशा म्हणजे स्त्रीच्या सौंदर्याचं मांडलेलं प्रदर्शन आणि लावण्या म्हणजे त्या सौंदर्याचा केलेला जास्तीत जास्त उन्मादी आविष्कार ही व्याख्या बदलण्याचं धाडसी पाऊल अण्णा भाऊंनी लोकनाट्यातून टाकलं. या काळात लोकनाट्यात ‘स्त्री’ पात्र येतात ती शेतकऱ्याची बायको किंवा कामगाराची बायको म्हणून. आपले ठसकेबाज संवाद खणखणीतपणे सादर करण्याचं काम ही स्त्रीपात्र करतात. तेव्हा तमाशातली ‘कलावती’ म्हणून त्यांच्याकडे न पाहता लोकनाट्यातलं एक आवश्यक पात्र म्हणून प्रेक्षक पाहतात. तमाशातली स्त्री लोकनाट्यात आणताना अण्णा भाऊंनी तिचा सन्मान किती अबोलपणे आणि सहजपणे वाढवलाय!
शेतकरी, कामगारांच्या समस्या आणि अडचणी, दलित-पीडित-शोषितांच्या व्यथावेदना त्यांनी चटपटीत संवादातून श्रोत्यांपूढे मांडल्या. श्रमिकांच्या एकजुटीचं सामर्थ्य, अन्यायाचा प्रतिकार करु शकणारी संघटित शक्ती आणि विषमतेच्या पलीकडे नेऊ पाहणारा साम्यवादी विचार त्यांनी जनतेपुढे ठेवला. अण्णा भाऊंनी लोककलेचा उपयोग साम्यवादाच्या पक्षीय प्रचारासाठी केल्यामुळे त्यांच्या लेखनाला मर्यादा पडल्या अशी टिका त्यांच्यावर करण्यात आली. ‘ते स्वत काळावर आरुढ झाले पण त्यांची लोकनाट्य मात्र पक्षीय अभिनिवेशामुळे काळाच्या मागेच राहिली.’ असं मत पां. तु. पाटणकरांनी अण्णा भाऊ साठे संदर्भग्रंथात नोंदवलंय.
पण त्याचवेळी डॉ. सदा कऱ्हाडे यांचं मतही विचारात घ्यायला हवं. ते म्हणतात, ‘ऐतिहासिक दृष्ट्या शाहिरी आणि तमाशा या दोन वेगळ्या कला मानल्या गेल्या. वीररसप्रधान ती शाहिरी आणि शृंगाररसप्रधान तो तमाशा. समाजपरिवर्तनाशी आणि राजकीय क्रांतीशी एकरुप होतं समाजातलं चैतन्य फुलवण्याचं काम शाहीर करतो, तर शृंगाराचं आकर्षण ठेवून जनमानसातल्या विकारांना चेतवण्याचं काम तमासगीर करतो, असा परंपरागत समज होता. पण अण्णा भाऊंनी हा समज बदलवून टाकला. तमाशाची रंजनकलाही लोकशिक्षणाकडे वळवता येते, हे भान ठेवून त्यांनी नवे तमाशेही लिहिले.’
मनोरंजनातून समाजप्रबोधन कसं करता येतं याचा तो वस्तूपाठचं खरं तर अण्णा भाऊंनी समाजापूढे ठेवला. ६ ऑगष्ट १९४७ ला ‘ये आझादी जुठी हे देश कि जनता भुकी हे’ असं म्हणणारा हा कलावंत १८ जुलै १९६९ मधे काळाच्या पडद्याआड गेला. लोककलेला कालानुरूप करण्याचं ऐतिहासिक काम अण्णा भाऊंनी केलं. लोकनाट्याला नवी उंची आणि प्रतिष्ठा दिली.
(महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने प्रकाशित केलेल्या ‘लोकशाहीर अण्णा भाऊ साठे’ या पुस्तकातून हा लेख घेण्यात आलाय.)
हेही वाचा:
वि. रा. शिंदेः ते रोज एकदा अस्पृश्यांबरोबर जेवत
आगळ ही कादंबरी गाव आणि शहर यांच्यातला संवादसेतू