डॉ. रत्नाकर पंडितः पत्रकारितेच्या समर्पित शिक्षकाचा सन्मान

१८ एप्रिल २०१९

वाचन वेळ : ७ मिनिटं


विदर्भात जन्म, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पत्रकारिता, कोल्हापुरात पत्रकारितेचं अध्यापन असा महाराष्ट्राला गवसणी घालणाऱ्या डॉ. रत्नाकर पंडित सरांना मुंबईच्या साप्ताहिक मावळमराठाकडून दिला जाणारा पत्रकारिता पुरस्कार यंदा देण्यात येतोय. गेल्या तीन दशकांपेक्षा अधिक काळ पत्रकार घडवणाऱ्या आणि पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव अध्यासनाचे प्रमुख असणाऱ्या पंडित सरांचा छोटासा सन्मानसोहळा उद्या १९ एप्रिलला संध्याकाळी ५ वाजता कोल्हापूरच्या प्रेस क्लबमधे होतोय.

सप्टेंबर १९९९ची सात किंवा आठ तारीख असेल. शिवाजी विद्यापीठाच्या जर्नालिझम अँड कम्युनिकेशन डिपार्टमेंटमधे बीजेसी उत्तीर्ण होऊन एमजेसी करीत होतो. त्यावेळी ‘मास कम्युनिकेशन इन इंडिया’ या आमच्यासाठी बायबल असणाऱ्या पुस्तकाचे लेखक डॉ. केवल कुमार यांनी त्यांच्या आरसीएमईआर या संस्थेतर्फे पुण्यात तीन दिवसांचा फिल्म अप्रिसिएशनचा शॉर्ट टर्म कोर्स आयोजित केला होता.

मी आणि माझा मित्र समाधान पोरे आम्ही दोघेही सिनेमाचे चाहते. त्यातला एक महत्त्वाचा कोर्स आणि तोही केवल कुमार सरांसमवेत तीन दिवस राहून करण्याची संधी असल्याने आम्ही दोघे पुण्याला गेलो. कोर्स करून परत आलो तर आमच्या सहपाठ्यांनी नवीन विभागप्रमुख आदल्या दिवशी रुजू झाल्याची वर्दी आम्हाला दिली.

आम्ही दोघे त्यांना भेटून त्यांचं स्वागत करण्यासाठी विभागप्रमुखांच्या केबिनमधे गेलो.  साधारण सहा फूट उंचीचे हे महोदय खुर्चीत बसलेले. आम्ही आत येण्याची परवानगी घेऊन पुढे झालो. आम्ही काही म्हणण्यापूर्वीच ते उठून उभे राहिले. हसतमुखाने पुढे झाले. अगत्याने म्हणाले, ‘नमस्कार, मी डॉ. रत्नाकर पंडित.’

डॉ. रत्नाकर पंडित या व्यक्तीशी झालेली ही माझी पहिली भेट. खरं तर आम्ही विद्यार्थी होतो. आम्हाला असा उठून मान देण्याची गरज नव्हती. आजही सरांना एखादी व्यक्ती नव्याने भेटते, तेव्हा स्वतःहून पुढे होऊन हात जोडून ‘नमस्कार! मी डॉ. रत्नाकर पंडित,’ अशी नम्रपणे ओळख करून देण्यात त्यांना अजिबात उणेपणा वाटत नाही.

सर औरंगाबादहून पत्रकारितेबरोबरच शैक्षणिक क्षेत्रातही उत्तम कारकीर्द घडवून शिवाजी विद्यापीठाच्या जर्नालिझम अँड कम्युनिकेशन डिपार्टमेंटमधे सहयोगी प्राध्यापक म्हणून रुजू झाले होते. रुजू झालेल्या दिवसापासूनच त्यांनी विभागप्रमुख पदाची जबाबदारी अत्यंत यशस्वीपणे आणि कौशल्याने सांभाळली.

हेही वाचाः बातम्या कवर करतानाचा ताण पत्रकारांना आजारी पाडतोय 

त्याच दिवसापासून पंडित सर आजतागायत माझ्या जीवनाचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग झालेले आहेत. माझे पत्रकारितेच्या अभ्यासक्रमाचे गुरू ते पीएचडी गाईड असा हा प्रवास आहे. आणि या गेल्या वीसेक वर्षांच्या कालखंडात या गुरूशी जुळलेलं एक अनामिक मैत्र, हीसुद्धा माझ्यासाठी एक मर्मबंधातली ठेव आहे.

सर आजवर अत्यंत सौजन्यशील, स्नेहाळ आणि समन्वयवादी भूमिका घेऊन वावरत आलेत. एखाद्या गोष्टीविषयी सात्विक संताप किंवा राग अनावर झाला, तरी बोचऱ्या शब्दांऐवजी उपरोधाचा आधार घेऊन ते समोरच्याला त्याच्या कृत्याविषयी अगर वक्तव्याविषयी अंतर्मुख व्हायला भाग पाडतात. पुढे त्यांच्या सहवासात राहून त्यांच्या पुरोगामी विचारसरणीशी परिचय झाला आणि एका अत्यंत दुःखद क्षणी त्यांच्या पुरोगामी कृतीशीलतेची प्रचितीही आली.

पंडित सरांसमवेत वेळोवेळी वेगवेगळ्या विषयांवर चर्चा होत. कधी समकालीन घडामोडींबाबत तर कधी त्यांच्या व्यक्तिगत कारकीर्दीविषयीही. त्यातून उलगडलेले पंडित सरांचं कर्तृत्व फार मोठं आहे.

डॉ. रत्नाकर लक्ष्मण पंडित यांचा जन्म ८ ऑक्टोबर १९४७ रोजी वर्ध्यातील सेवाग्राम इथे झाला. मनोरमा आणि लक्ष्मण राधाकृष्ण पंडित या दांपत्याच्या पोटी ते जन्मले. आईवडलांवर महात्मा गांधींच्या विचारांचा मोठा प्रभाव होता. त्यामुळे वडील सेवाग्राम आश्रमात चरखा संघाचं काम पाहात. संघाचे ते सचिव होते. ते चंद्रपुरातल्या मूल या गावीही चरखा संघाचं काम पाहात. तिथलं त्यांचं काम पाहून सेवाग्रामच्या मुख्यालयात त्यांना अधिक जबाबदारीचं काम देण्यात आलं

हेही वाचाः पत्रकारच भाट असतील तर प्रश्न कोण विचारणारः सिद्धार्थ वरदराजन

पंडित सरांचं बालपण आश्रमाच्या परिसरातच गेलं. तिसरीपर्यंत ते तिथे शिकले. त्यांना तीन भाऊ आणि दोन बहिणी होत्या. १९५३-५४मध्ये नाशिक इथे खादी आयोगाची स्थापना झाली. त्याचे पहिले प्रिन्सिपल म्हणून त्यांच्या वडिलांची नियुक्ती झाली. त्यामुळे हे सारे कुटुंब नाशिकला स्थलांतरित झालं. त्यांचं चौथीपासून आठवीपर्यंतचं शिक्षण त्र्यंबक विद्यामंदिरमधे झाले.

दरम्यानच्या काळात सेवाग्रामला खादी संशोधन संस्थेची स्थापना झाली. त्याचं काम पाहण्यासाठी पंडित सरांच्या वडलांना पुन्हा बोलावून घेण्यात आले. निवृत्तीनंतर महात्मा गांधी वैद्यकीय महाविद्यालयाचे ओएसडी म्हणून त्यांनी अखेरपर्यंत काम पाहिलं.

पंडित सरांचं मॅट्रिकपर्यंतचं शिक्षण वर्ध्यात झालं. त्यावेळी त्यांचे भाऊ ‘गावकरी’ वृत्तपत्र समूहात काम करत होते. त्यांच्यासमवेत तरुण रत्नाकरनेही काम करावे, असा निर्णय घरी झाला आणि ते १ जून १९६५ रोजी नाशिकच्या ‘गावकरी’ वृत्तपत्र समूहात शिकाऊ बातमीदार म्हणून रुजू झाले. माणूस कोणत्याही पदावर असला तरी त्याला हरतऱ्हेची कामे अवगत असली पाहिजेत, असा त्या वेळचा वृत्तपत्रामधला अलिखित दंडकच असे.

त्यामुळे पंडित सरांनी सर्व प्रकारच्या कामात गती मिळविलीच, पण आपल्या लेखनाच्या आणि संपादकीय कौशल्याच्या बळावर समूहाच्या सहाय्यक संपादक पदापर्यंत मजल मारली. मोनोटाइपचा अभ्यास करण्यासाठी कलकत्त्याला जाऊन त्यांनी या मॅकेनिकचा सर्टिफिकेट कोर्सही पूर्ण केला होता. दरम्यानच्या काळात २४ डिसेंबर १९७२ रोजी पद्मविभूषण अनंत वासुदेव सहस्रबुद्धे यांची भाची निर्मला महादेव आगरकर यांच्याशी त्यांचा सेवाग्राम इथे विवाह झाला. त्यांना मृदुला आणि उल्हास अशी मुलं झाली.

गावकरी समूहाचा व्याप अमृत, रसरंग असा विस्तारतच होता. दादासाहेब पोतनीसांनी या विस्ताराचा भाग म्हणून मराठवाड्यातही ‘अजिंठा’ हे वृत्तपत्र औरंगाबादहून ३ डिसेंबर १९५९ पासूनच प्रकाशित करावयास सुरवात केली. हे मराठवाड्यातून प्रकाशित होणारे पहिलंच दैनिक. ‘अजिंठा’ हे नावही साक्षात यशवंतराव चव्हाण यांनी सुचवलेलं.

पंडित सरांचे काम पाहून पोतनीस साहेबांनी त्यांच्याकडे या दैनिकाचा संपूर्ण कार्यभार सोपविण्याचे ठरवलं. पंडित सर १ ऑगस्ट १९७४ला ‘अजिंठा’चे मुद्रक, प्रकाशक, व्यवस्थापक म्हणून रुजू झाले. पुढे कार्यकारी संपादक पदाचीही धुरा त्यांच्याकडे आली. ५ मार्च १९९१ पर्यंत या साऱ्या जबाबदाऱ्या त्या एकहाती यशस्वीरित्या सांभाळत होते.

अशी जबाबदारीची कामं करत असताना त्यांनी शिक्षणाकडे मात्र अजिबात दुर्लक्ष केलं नाही. नोकरी करत करतच त्यांनी बीएचं शिक्षण पूर्ण केलं. समूहाची परवानगी घेऊन औरंगाबादच्या मराठवाडा विद्यापीठातून त्यांनी १९८०-८१ साली बीजे ही पदवी घेतली. त्यावेळी हा कोर्स संध्याकाळी घेतला जायचा. पुढे १९८५ साली विद्यापीठात एमजे हा पदव्युत्तर पदवीचा अभ्यासक्रमही सुरू झाला. या अभ्यासक्रमाच्या पहिल्या बॅचचे पंडित सर विद्यार्थी.

तिथे त्यांना लगोलग पीएच.डी. करण्याची संधी मिळाली. डॉ. सुधाकर पवार हे त्यांचे गाईड. पण त्यांची बदली झाल्याने डॉ. विजय धारुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी संशोधन पूर्ण केलं. १९९३ला त्यांनी आपला शोधप्रबंध सादर केला आणि त्यांना ५ मार्च १९९४ला पीएच.डी.ची पदवी मिळाली. या कालखंडात ते १९८० पासून विद्यापीठात ते विजिटिंग लेक्चरर म्हणून नियमितपणे अध्यापनाचं कामही करत होते.

हेही वाचाः पत्रकारितेच्या पलीकडचे पत्रकार बाळशास्त्री जांभेकर

विद्यापीठाच्या विविध अभ्यास मंडळांवरही ते योगदान देत असत. त्यामुळे त्यांना पीएच.डी. मिळाल्यानंतर गाईडशिपही मंजूर झाली. आजपर्यंत त्यांच्या मार्गदर्शनाखाली एकूण दहा विद्यार्थ्यांनी पीएच.डी. पदवी मिळवलीय. यातला मी त्यांचा दहावा विद्यार्थी आहे, हे या ठिकाणी अभिमानाने नमूद करतो.

५ मार्च १९९१ला काही कारणामुळे पंडित सरांनी ‘अजिंठा’ सोडलं. २ एप्रिल १९९१ला लोकमत समूहात सहाय्यक संपादक या पदावर रुजू झाले. तिथे ते ६ सप्टेंबर १९९९ पर्यंत काम करत होते. सरांचं क्वालिफिकेशन पाहून राजेंद्र दर्डा यांनी त्यांच्याकडे समूहाच्या जवाहरलाल दर्डा इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशनच्या प्रिन्सिपलपदाची जबाबदारी सोपवली. तीही त्यांनी तिथे असेपर्यंत उत्तमरित्या निभावली.

औरंगाबादच्या पत्रकारितेच्या क्षेत्रातही त्यांचं एक चांगलं वर्तुळ निर्माण झालं होतं. औरंगाबादेत दाखल झाल्यावर लगेचच म्हणजे १९७४-७५ या वर्षीच त्यांच्याकडे पत्रकार संघाचं अध्यक्षपद चालत आलं. त्यानंतर तीन वेळा त्यांनी या पत्रकार संघाचं अध्यक्षपद भूषवले. या कालावधीत त्यांनी अनेक विकासकामांसाठी पाठपुरावा करण्याचं काम केले. रेल्वे संघर्ष समितीच्या माध्यमातून केलेलं काम तसंच मराठवाड्यासाठी स्वतंत्र वैधानिक विकास महामंडळासाठी केलेला पाठपुरावा, अशी काही उदाहरणं सांगता येतील.

सहा सप्टेंबर १९९९ रोजी शिवाजी विद्यापीठाच्या जर्नालिझम अँड कम्युनिकेशन डिपार्टमेंटमधे त्यांची प्रपाठक म्हणून निवड झाली. कुलगुरू डॉ. द. ना. धनागरे यांनी त्यांच्याकडे विभागप्रमुख पदही सोपविले. नव्या ठिकाणी रुजू झालेल्या क्षणापासून पडलेली ही जबाबदारी अजिबात न डगमगता त्यांनी अत्यंत यशस्वीपणे निभावली. त्यांच्या या कारकीर्दीचा विद्यार्थी म्हणून मी साक्षीदार आहे. इतकी वर्षे पत्रकारितेमध्ये काढून आल्यानंतरही तयारी केल्याखेरीज ते विद्यार्थ्यांसमोर कधीही लेक्चरला उभे राहिले नाहीत.

आम्हाला ते इन्वेस्टिगेटिव आणि अॅनालिटिकल जर्नालिझम हा विषय शिकवायचे. त्याचं कोणतंही लिटरेचर त्यावेळी आम्हाला उपलब्ध नव्हतं. . रेफरन्सेस मिळवण्यासाठी तेव्हा इंटरनेटही आताइतकं प्रचलित नव्हतं. तेव्हा पंडित सर औरंगाबादपासून ते मुंबईपर्यंत कोठूनही या विषयाची पुस्तके पैदा करत आणि त्याच्या नोट्स स्वतः तयार करून शिकवत असत. विषयच मुळात अवघड आणि क्रिटिकल होता. मात्र तो होईल तितका सोपा करून शिकवण्याचा त्यांचा प्रयत्न असे.

याच कालखंडात त्यांच्याकडे विद्यापीठाच्या दूरशिक्षण केंद्राच्या समन्वयक पदाची धुराही सोपवण्यात आली. तीही त्यांनी यशस्वीरित्या पार पाडली. दहा वर्षांपूर्वी सर निवृत्त झाले. मात्र त्यांच्या कामाचा ठसा इतका घट्ट होता की जर्नालिझम डिपार्टमेंटमधे नव्याने सुरू करण्यात आलेल्या पद्मश्री कै. डॉ. ग. गो. जाधव अध्यासनाच्या प्रमुख प्रोफेसर पदाची धुरा त्यांच्याकडेच सोपवण्यात आली.

पत्रकारितेमधल्या नव्या प्रवाहांची जाण आणि भान त्यांच्या ठायी इतकं आहे की या केंद्रामार्फत त्यांनी ऑनलाईन जर्नालिझमचा पीजी डिप्लोमा कोर्स सुरू केला. हा अभिनव अभ्यासक्रम सुरू करणारं हे राज्यातलं पहिलेच अध्यासन असावं. आणि सत्तरीच्या उंबरठ्यावरही तरुणांना लाजवेल इतक्या अमाप उत्साहाने पंडित सर त्याचे काम पाहताहेत. याचं मूळ त्यांनी एकूणच आयुष्यभर केलेल्या संघर्षमय वाटचालीत असावं, असं मला वाटतं.

हेही वाचाः पहिल्या वृत्तपत्रापासूनच मीडियाचा स्वातंत्र्यासाठी संघर्ष आजही सुरूच

पंडित सरांचा जीवनपट हा वरवर सरळसोट वाटत असला तरी परिस्थितीमुळे त्यांच्या आयुष्यात अनेक वळणं, स्थित्यंतरं आली. त्यांना ते अतिशय संयमाने आणि धीराने सामोरे गेले. परिस्थितीचा स्वीकार करून त्यातून मार्ग काढलाय, काढत आहेत. परीक्षा पाहणारे अनेक प्रसंग त्यांच्या आयुष्यात आले, सार्वजनिक आणि व्यक्तिगत जीवनातही. त्या परीक्षेलाही ते धीरोदात्तपणे सामोरे गेले आहेत, जात आहेत.

आयुष्याच्या एका वळणावर अचानक सहचारिणीच्या जाण्याचं दुःख त्यांनी प्रचंड संयमाने पचवलं. वाटेत काटे पेरणाऱ्यांविषयीही त्यांच्या मनात कधी कटुता येत नाही, याचं कारण त्यांच्या आईवडलांनी केलेल्या गांधीवादी संस्कारांमधे आहे. ते थेट गांधीवादी नसले, तरी गांधींचा अहिंसावाद, थेट आंबेडकरवादी नसले तरी आंबेडकरांचा बुद्धिप्रामाण्यवाद आणि समतावाद याचे पंडित सर सच्चे पाईक आहेत.

अशा पंडित सरांचा मी विद्यार्थी आहे, हे सांगताना माझ्या मनात अभिमान दाटून आलाय. ‘डॉक्टर’ झाल्यानंतरचा पहिला लेख हा या गुरूविषयी लिहायला मिळतोय, ही माझी त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी आहे. या एका सच्च्या गुरूचा ‘पत्रकारिता जीवन गौरव’ पुरस्काराने सन्मान करण्यात येतोय, ही माझ्यासारख्या त्यांच्या तमाम विद्यार्थ्यांसाठी अत्यंत आनंदाची आणि गौरवाची गोष्ट आहे.

(लेखक कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी आहेत.)