एफडी : रिस्क फ्री गुंतवणुकीचा बेस्ट पर्याय

२७ मे २०१९

वाचन वेळ : ५ मिनिटं


हल्ली लोक आपल्याला असं सुचवतात की नोकरीला लागल्यावरच काही वर्षांत पैसे गुंतवायला सुरवात करा. पण नेमकं कशात गुंतवावं हे मात्र कळत नाही. त्यात अनेक मित्रमंडळींना शेअर मार्केटमधे पैसे गमावताना आपण बघितलेलं असतं. अशावेळी एफडी करावी की अजून काही? एफडीचे नेमके फायदे काय आणि इतर गुंतवणुकीच्या तुलनेत किती चांगलं आहे?

आपण रोजच्या खर्चातले उरलेले पैसे साठवण्यासाठी बँक या यंत्रणेचा वापर करतो. पूर्वीच्या काळात तर पैसेच नव्हते. मग बँक होती का? तर हो. इजिप्त, मेक्सिको, पूर्व अमेरिकेतल्या पुरातत्त्वज्ञांना सापडलेल्या पुराव्यांनुसार साधारण इसवीसन पूर्व १२ हजारमधे शिकारीचं सामान, जमवलेलं अन्न आणि लागवड केलेल्या झाडांची फळं साठवण्यासाठी बँक या यंत्रणेचा वापर केला जात होता.

बँकेचा वापर गुंतवणुकीसाठी

कालांतराने आपले पूर्वज प्रगत झाले. त्यांना वेगवेगळ्या गोष्टींचा शोध लागला तसं ते धातू, खडे साठवू लागले. साठवण्याची जबाबदारी टोळीतल्या एका माणसावर दिली जात होती. त्याच्याकडे जास्त वस्तू येऊ लागल्या तेव्हा सगळ्या वस्तूंचे रेकॉर्ड ठेवण्यास सुरवात केली. नंतर हळूहळू बँक ही कन्सेप्ट विकसित झाली. आपल्याला माहिती आहे का की भारतात वैदिक काळात बँक यंत्रणा असल्याचे पुरावे मिळालेत. म्हणजेच माणसाने स्वतःकडच्या त्या त्या काळातल्या मौल्यवान वस्तू ठेवण्यासाठी बँक यंत्रणेचा वापर केला. त्यानंतर आताच्या बँकेप्रमाणे म्हणायचं तर जगातली पहिली बँक इटलीत १३९७ मधे सुरु झाली.

आता मात्र आपल्याकडे कागदाच्या नोटा आणि धातूची नाणी या स्वरुपातले पैसे आहेत. आता तर आपण शाळेत असल्यापासून म्हणजेच वयाच्या १२ वर्षांनंतर बँकेत खातं उघडतो. त्यात आपला पॉकेटमनी साठवतो. मग त्यानंतर आपलं सगळ्यात महत्त्वाचं सॅलरी अकाऊंड उघडतं. मग काही वर्षं नोकरी करताना आपल्याकडे साठलेले पैसे भविष्यासाठी गुंतवतो. ही जणुकाही एकप्रकारची परंपराच आहे. मग त्यासाठी शेअर मार्केट, भविष्यासाठी असलेल्या पॉलिसी, म्युच्युअल फंड, बॅंकच्या वेगवेगळ्या स्किम म्हणजे रिकरींग, फिक्सड् डिपॉझिट इत्यादी.

यामधे बँकेत फिक्सड् डिपॉझिट हा पर्याय सगळ्यात जुना आहे. हा पारंपरिक इन्वेस्टमेंट पर्याय आपल्या घरात आजी, आजोबांपासून बघत आलोय. पण सध्याच्या वेगवेगळ्या इनवेस्टमेंट प्लॅनमधे एफडी कितपत फायदेशीर आहे हे बघणं गरजेचं आहे.

हेही वाचा: थँक्यू करदात्यांनो, तुमच्यासाठीच बजेट आहे!

कोणत्या बँकेत किती इंटरेस्ट रेट?

बँकेचे साधारणपणे दोन प्रकार असतात. एक म्हणजे नॅशनल आणि दुसरं म्हणजे को-ऑपरेटिव. आपण आपल्या आईबाबांकडून ऐकलंय की, लाँग टर्म एफडीमधे सगळ्यात चांगला इंटरेस्ट हा को-ऑपरेटिव बँकमधे मिळतो. पण आता नॅशनल बँकसुद्धा ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करून घेण्यासाठी इंटरेस्ट वाढवू लागल्यात किंवा काही स्किम देऊ लागल्यात.

२०१९ वर्षातले बँक एफडीचे इटरेस्ट रेट : एक्सिस बँक ६.७५%, कोटक महिंद्रा बँक ७%, स्टेट बँक ऑफ इंडीया ६.३५%, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी ६.२५% आणि आयडीएफसी ६.७५% असे आहेत.. हे रेट नॅशनल बँकेतल्या तीन महिने ते एक वर्षापर्यंतच्या मुदत ठेवीवरचे आहेत.

सारस्वत बँक ६.७५%, जनता सहकारी बँक ७.२५%, बॉम्बे मर्चंटाइल ६.२५% हे एक ते दोन वर्षांचे रेट आहेत. त्याचबरोबर कंपनी डिपॉइटमधे पैसे ठेवल्यास त्या त्या कंपनीनुसार इंटरेस्ट मिळतो. सध्या कंपनी एफडीत ७.५% ते ९.४०% एवढा इंटरेस्ट मिळतो, अशी माहिती गुंतवणूक सल्लागार महेंद्र नेत्रावळी यांनी दिली.

हेही वाचा: टू डेज वन नाईट: बेरोजगार कुटुंबाची जागतिक गोष्ट

एफडीचे फायदे काय काय आहेत?

आपण दीर्घ मुदतीसाठी म्हणजे दोन वर्षांपेक्षा जास्त काळासाठी पैसे डिपॉझिट करत आहात तर पॉईंट ५ ते २० पर्यंत रिटर्न जास्त मिळतं. प्रत्येक बँकच्या वेबसाईटवर यासंबंधीची माहिती उपलब्ध आहे. आणि काही शंका असतील त्यांच्या हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधल्यास आपल्या प्रश्नांची उत्तर मिळतात. एफडी आपण ऑनलाईनही काढू शकतो. तसंच आपलं त्या बँकेत अकाऊंट नसलं तरी एफडी काढता येते.

बँक एफडी हा प्रकार पारंपरिक आहे आणि आजही टिकून आहे. यामागचं कारण एकच, सेफ्टी. सुरक्षितता. कारण म्युच्युअल फंड आणि शेअर मार्केटमधे स्थैर्य नसतं. त्यामुळे बँक एफडीचं महत्त्व आजही टिकून आहे. यात आपणच ठेवीचा कालावधी ठरवतो. अचानक पैशांची गरज भासल्यास ते पैसे काढताही येतात. यात इंटरेस्टने पैसे मिळणार याची शाश्वती असते. तसंच आयकरातसुद्धा सवलत मिळते. 

हेही वाचा: येणार तर मोदीच हे कळाल्यावर उंचावलेला सेन्सेक्स खाली का गेला?

एफडी आणि आरडी मधला फरक

एफडीशिवाय गुंतवणुकीचे अनेक प्रकार आहेत. रिकरिंग डिपॉझिट हासुद्धा एफडीसारखाच प्रकार आहे. पण त्याआधी आरडी आणि एफडीमधला फरक आपण समजून घेणं गरजेचं आहे. समजा, आपण ७ टक्के इटरेस्ट रेटने २४ हजार रुपये एक वर्षासाठी ठेवले. आणि रिकरींग अकाऊंटमधे दर महिन्याला दोन-दोन हजार रुपये ठेवले तर हिशेब तोच वर्षाला २४ हजार. पण इंटरेस्टप्रमाणे किती फायदा होईल, तर एफडीमधे १ हजार ७२४ रुपयांचा फायदा होईल तर आरडीमधे ९२६ रुपयांचा फायदा होईल.

असं का बरं होत असेल. दोन्ही तर सारखंच इंटरेस्ट देत आहेत. कारण, आपण २ हजार मे महिन्यात भरले, पुढे जूनमधे भरले. असं करताना ७ टक्के बाराव्या, अकराव्या महिन्यावर लागणार म्हणजे एक-एक महिना कमी होणार. फिक्समधे एकदाच पैसे फिक्स ठेवल्यामुळे जास्त फायदा होतो. पण ज्यावेळी कमी अमाऊंट दर महिन्याला साठवायची असते त्यासाठी रिकरींग हा पर्याय चांगला आहे. पण बऱ्यापैकी रक्कम असेल तर एफडी करणं सोयीचं आहे.

पोस्टातसुद्धा एफडी असते. ती बँकेसारखीच आहे. २०१८ पर्यंत याचा इंटरेस्ट रेट ६.९ टक्के होता. आता जानेवारी २०१९ पासून ७ टक्के करण्यात आलाय. मात्र यात १, २, ३, ५ वर्षांच्या स्किम असतात. त्यातली एक स्किम निवडून आपण पैसे एफडीत ठेवतो. मात्र काही कारणाने पैसे आधीच काढायचे असतील तर पहिले सहा महिने तरी ते आपल्याला काढता येत नाहीच, असं अर्थ अभ्यासक वरुण परदेशी म्हणाले.

हेही वाचा: शस्त्र घेऊन गुंडागिरीचा सामना करायला सांगणारे गांधीजी माहीत आहेत?

म्युच्युअल फंड, शेअर मार्केट आणि एफडी

आपण भविष्यासाठी गुंतवणूक करतो तेव्हा रिटर्न चांगलं मिळावं ही अपेक्षा असते. इथे भविष्य म्हणजे रिटायरमेंटनंतर या अर्थाने आहे. समजा आपण १ लाख रुपये ६.५ टक्क्यांच्या इंटरेस्ट रेटने २० वर्षांसाठी एफडी केली. तर आपल्याला व्याजासह ३ लाख ५० हजार रुपये मिळतात.

पण म्युच्युअल फंडमधे आपल्याला १३ ते २० टक्के एवढा इंटरेस्ट रेट मिळतो. याचा अर्थ एफडीच्या तुलनेत जवळपास दुप्पटपेक्षा जास्त फायदा मिळतो. हे खरंय. पण यात काही अंशी रिस्क आहे. पण फंडचे वेगवेगळे प्रकार आहेत. त्यातला योग्य फंड आपल्याला निवडता आला पाहिजे. शेअर मार्केटमधल्या ब्रोकर्सकडूनही आपल्याला अशा फंडबद्दल सल्ला मिळू शकतो, अशी माहिती रुपल कौर यांनी दिली.

यात मनी मार्केट, इक्विटी, फिक्स इन्कम, बॅलन्स्ड, टॅक्स फ्री असे काही प्रकार आहेत. फिक्स इन्कममधे सर्वात कमी रिस्क असते. तर शेअर मार्केटमधे सर्वाधिक रिस्क असते. पण म्युच्युअल आणि एफडीचा इन्टरेंस्ट एका दिवसातही मिळू शकतो. आणि एका दिवसात जाऊही शकतो. शेअर मार्केटच्या रिस्कला न घाबरता व्यवहार करण्यासाठी छोटी रक्कम गुंतवून रोज अभ्यास म्हणून शेअरची खरेदी, विक्री करता येईल.

रोज एका टक्क्याचा फायदा झाला तरी चालेल किंवा नाही झाला तरी चालेल. याच सरावातून शेअर मार्केटमधल्या गोष्टी समजून घेता येतील. पण रिस्क फ्री गुंतवणुकीसाठी एफडी हाच पर्याय असल्याचं बँकिग तज्ज्ञ धर्मेंद्र मुखर्जी सांगतात.

हेही वाचा: यूपीत महागठबंधनचं राजकारण फेल गेलं, त्याची दोन कारणं