आपल्याला एप्रिल फूल बनवणाऱ्या टॉप टेन कोरोना फेक न्यूज

०१ एप्रिल २०२०

वाचन वेळ : ८ मिनिटं


लसूण खाल्ल्यानं कोरोना होत नाही, अशी `बातमी` मोबाईलवर आली. ती वाचून एका बाईनं दीड किलो कच्ची लसूण खाल्ली. कोरोनाच्या अशा अनेक फेक न्यूज वॉट्सअप युनिवर्सिटीवर फिरत असतात. अशा फेक न्यूजमुळे सध्या रोजच एप्रिल फूल होऊ लागलाय. म्हणून फॅक्ट क्रेसेंडो ही वेबसाईट त्याचं खरंखोटं करतेय.

सोशल मीडिया आणि वॉट्सअप युनिवर्सिटीचा वापर वाढल्यापासून फेक न्यूजला जणू रानच मोकळं झालंय. आपण वाचत असलेल्या बातमीचा सोर्स कोणता, त्यात तथ्य किती, या सगळ्या गोष्टी न तपासताच आपण त्या बातम्या फॉरवर्ड करतो. काहीजण तर त्यानुसार वागतातही आणि तोंडघशी पडतात. त्याची लागण सध्या कोरोनापेक्षाही वेगाने होतेय.  

कोरोनाची लागण झालेला पहिला रुग्ण भारतात सापडण्याच्या आधीपासूनच कोरोनाच्या फेक न्यूजना उधाण आलं होतं. भारतातली परिस्थिती जरा गंभीर झाल्यानंतर तर त्या अजूनच वाढल्या. म्हणूनच खोट्या अफवांवर विश्वास ठेवू नका असं आवाहन राज्य सरकार जहिरातींमधूनही सतत करतंय.

दिलासादायक गोष्ट अशी की आपल्याकडे आलेली बातमी खरी आहे की खोटी हे जाणून घेणं शक्य आहे.फॅक्ट क्रेसेण्डो या वेबसाईटवर कोरोनाच्या अशा अनेक बातम्यांचं फॅक्ट चेकिंग केलं जातं. फॅक्ट चेकिंग म्हणजे सत्यता पडताळणी. कोरोना बाबतीतल्या अशा फेक न्यूजचं फॅक्ट चेकिंग या वेबसाईटवर देण्यात आलंय. त्यातल्या या दहा बातम्यांची सत्यता पहायलाच हवी.

हेही वाचा : किराणा दुकानातून आपण कोरोनाला घरी नेण्यापासून कसं वाचू शकतो?

१) लॉकडाऊन ३० एप्रिलपर्यंत वाढवण्याचा आदेश?

१४ एप्रिलपर्यंत संपूर्ण देश लॉकडाऊन राहील असं पंतप्रधान मोंदींनी सांगितलं. त्यानंतर दोन तीन दिवसानंतरच सरकार लॉकडाऊनचा कालावधी वाढवणार, असल्याच्या वावड्या उठल्या होत्या. टाइम्स ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र टाइम्सच्या एका बातमीचा संदर्भ घेत या अफवांना पुराव्याचा आधार देत जोरदार वायरल करणं सुरू झालं.

टाइम्सच्या एका बातमीची लिंक शेअर करून अनेक लोक ही खोटी अफवा पुढे पसरवत आहेत. मुळात ती बातमी वेगळीच होती. हायकोर्टाने सगळ्या खटल्यात दिलेले हंगामी आदेश किंवा अटकेपासूनचे दिलासे ३० एप्रिलपर्यंत कायम राहतील, असा निर्णय मुंबई हायकोर्टाने दिलाय. टाइम्सनं याचीच बातमी दिली होती. केंद्र सरकारने देशभरात १४ एप्रिलपर्यंत लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे हा निर्णय घेण्यात आला होता. पण सरकारनं ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन जारी करावा, असा कोणताही आदेश यात निर्णयात दिला गेलेला नाही.

An eye opener for the government to come out of denial #CoronaVirusChallenge #Pakistan pic.twitter.com/sHWRkTFLul

— Murtaza Ali Shah (@MurtazaViews) March 26, 2020

२) वायरल वीडियो सांगलीचा नाही, तर पाकिस्तानचा

सांगलीतल्या इस्लामपूर शहरात एकाच कुटुंबातल्या १२ जणांना कोरोना वायरसची लागण झाल्यामुळे सगळ्यांनाच धक्का बसला. या कुटुंबातल्या सदस्यांचा वीडियो म्हणून सोशल मीडियावर एक क्लीप वायरल होऊ लागली. एका महिलेला श्वास घ्यायला त्रास होत असल्याचं चित्र असल्याचं यात दिसतंय.

एकतर या वीडियोत मागे उर्दू भाषेतल्या पाट्या दिसतायत. महाराष्ट्रात सार्वजनिक ठिकाणी उर्दू भाषेतला फलक लिहिला जाणार नाही. फॅक्ट चेक केल्यावर तो इस्लामपूर शहरातला नसून पाकिस्तानमधला असल्याचं स्पष्ट झालंय. पाकिस्तानातले जिओ न्यूजचे पत्रकार मुर्तजा अली शहा यांनी हा वीडियो ट्विट करून कोरोनाचा धोका सरकारने गांभीर्याने घेण्याची गरज असल्याचं मत व्यक्त केलंय.

पण मुळात, या वीडियोत दिसणारी महिला कोरोनाग्रस्त नाही. पाकिस्तानातल्याच डॉक्टर हुमा सईफ यांनी हा वीडियो ट्विट करून पाकिस्तानमधल्या आरोग्य सेवांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. तेव्हा एका ट्विटर युजरने हा वीडियो पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातल्या अब्दूल हकीम भागातल्या एका दवाखान्यातला आहे. वीडियोत दिसणाऱ्या महिलेला फक्त श्वसनसंस्थेचा त्रास आहे. कोरोनाचा नाही.

हेही वाचा : कोरोनानं नाही, तर आपले मजूर लॉकडाऊनमुळे मरतील?

३) इटलीनं शरणगती पत्करली

इटलीच्या नावावर काहीही खपवलं जातंय. मध्यंतरी इटलीमधल्या नागरिकांची स्थिती पाहून इटलीच्या राष्ट्राध्यक्ष रडत होते, असा एक फोटो वायरल होत होता. नंतर तो फोटो इटलीच्या राष्ट्राध्यक्षांचा नाही तर ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांचा होता. ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष त्यांच्या ऑफिसमधे थॅंक्स गिव्हिंग नावाचा सण साजरा केल्यानंतर भावनिक झाले होते. तेव्हाचा हा फोटो आहे. या फोटोतलं तथ्य लोकांसमोर येतेय न येतंय तोवर इटलीच्या राष्ट्राध्यक्षांच्या फोटोसोबत इटलीनं कोरोनासमोर शरणगती पत्करलीय असे मेसेज फिरू लागले.

‘आम्ही आता कोणत्याही माणसाला वाचवू शकत नाही, असं इटलीनं मान्य केलंय. त्यामुळे आता घरात रहा, जीव वाचवा,’ असं या मेसेज मधे लिहिलंय. पण ही बातमीही खोटी आहे. इटलीचे पंतप्रधान जिसेप कोण्टे यांनी ट्विटरवर अशी कोणतीही घोषणा केलेली नाही. डब्लूएचओच्या वेबसाईटवरही अशी कोणती माहिती दिलेली नाही. उलट इटलीचे पंतप्रधान जिसेप कोण्टे यांनी कोरोना वायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करणार असल्याची बातमी आयटीवीने २२ मार्च २०२० ला प्रसिद्ध केली होती.

४) हा इटलीतल्या डॉक्टर दाम्पत्याचा लास्ट किस?

इटलीतली भीषण परिस्थिती पाहता तिथले डॉक्टर नागरिकांचा जीव वाचवण्यासाठी झटत असणारच. अशाच एका डॉक्टर दाम्पत्याचा फोटो वायरल झाला होता. आणि त्यासोबत त्या दाम्पत्याने केलेल्या त्यागाचं वर्णन  केलं होतं. हे दाम्पत्य इटलीतल्या हॉस्पिटलमधे दिवस रात्र कोरोना पेशंटच्या सेवेत लागलं होतं. सलग आठ दिवस पेशंटची सेवा केल्यावर त्या दोघांनाही कोरोनाची लागण झाली. नंतर त्यांना वेगवेगळ्या वॉर्डमधे ठेवण्यात आलं. आता आपण आपल्या जोडीदारासोबत फार वेळ घालवू शकणार नाही, हे या दाम्पत्याला समजलं असावं. म्हणूनच ते एकमेकांचा अखेरचा निरोप, एक शेवटचा किस घेण्यासाठी भेटलेत, असं सोशल मीडियावर फिरणाऱ्या या पोस्टमधे सांगण्यात आलंय.

ही लवस्टोरी खूप छान आहे. पण ती सुदैवानं खोटी आहे. वायरल फोटोमधलं दाम्पत्य हे इटालियन डॉक्टर नसून स्पेनमधले सामान्य नागरिक आहेत. हा फोटो इटतलीतल्या हॉस्पिटलमधला नसूव स्पेनच्या बार्सिलोना या एअरपोर्टवरचा आहे. कोरोनाचा प्रसार थांबवण्यासाठी अमेरिकेनं युरोपमधल्या प्रवाशांवर निर्बंध लावले. स्पेननेही कोरोनामुळे राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केलीय. या पार्श्वभूमीवर एकमेकांचा निरोप घेतानाचा या दोघांचा क्षण फोटोजरनॅलिस्ट एमिलो मोरेनाट्टी यांनी टिपलाय. मेडिकल एक्सप्रेस या वेबसाईटवर तो प्रकाशितही झालाय.

हे कोरोना स्पेशलही वाचा : 

कोरोना वायरसही आपल्यासारखा स्त्री-पुरुष भेदभाव करतो का?

तैवान कोरोना डायरी ३ : भीतीच्या सावटातही शिस्त विस्कटली नाही

लॉकडाऊनः कोकणात हापूस घरातच पडून, युरोपात फळं खायला मिळेनात

जय शेंडुरे: कोरोना आणि ट्रम्प प्रशासनाला पुरुन उरणारा रांगडा कोल्हापूरकर

५) इटलीमधे रस्त्यावर मृतदेहाचे खच

कोरोनामुळे इटलीची परिस्थिती भीषण झाल्याच्या अनेक बातम्या आपण पाहिल्या, वाचल्या. इटलीत आता हॉस्पिटलमधे भरती करायला जागा उरलेली नाही, लोक रस्त्यावरच मरण पावतायत, काही पेशंटवर तर रस्त्यावरच उपचार सुरू केले अशी माहिती देत त्यासोबत काही फोटो पुरावे म्हणून वायरल होतायत. त्यातले दोन सगळ्यात जास्त वायरल झालेले फोटो खाली दिलेत. इटलीची परिस्थिती गंभीर आहे, हे खरंय. पण या माहितीसोबत पुरावे म्हणून सादर केलेले फोटो आणि त्या माहितीचा काहीही संबंध नाहीय.

पहिला फोटो हा इटलीतला नाही तर जर्मनीतला आहे. हिटलरच्या काळात नाझी छळछावण्यांमधे मारलेल्या ज्यू लोकांना अनोख्या पद्धतीनं श्रद्धांजली वाहण्यासाठी ६ वर्षांपूर्वी जर्मनीतल्या रस्त्यावर लोकांनी मेलेल्या माणसाचा अभिनय केला होता. त्याचे हे फोटो आहेत. तर दुसऱ्या प्रकारचे फोटो हे इटलीतल्या हॉस्पिटलबाहेरचे नाहीत तर क्रोएशिया या देशामध्ये आलेल्या भूकंपानंतरचे फोटो आहेत. हे सत्य गुगल रिवर्स सर्चच्या माध्यमातून तपासलं गेलंय. 

६) कोरोनावर लस तयार झालीय?

एक आनंदाची बातमीही सोशल मीडियावर फिरतेय. ही बातमी आहे कोरोनावर लस निघाल्याची. ही बातमी वाचून कुणालाही हायसं वाटेल. ही लस टोचल्यानंतर ३ तासात कोविड १९ चा पेशंट बरा होईल असा दावाही या बातमीत करण्यात आलाय. बातमी कितीही आनंदाजी असली तरी खोटी आहे. कारण कुठल्याही आजाराची लस ही आजार होण्याआधी घेतली तर त्याचा उपयोग होतो. आजार झाल्यानंतर घेतल्यावर त्याचा काहीही फरक पडणार नाही.

तर त्या फोटोत दाखवलेली लस ही लस नसून कोरोनाची तपासणी करण्यासाठी दक्षिण कोरियात बनवलं गेलेलं एक कीट आहे, हे गुगल रिवर्स इमेज केल्यावर स्पष्ट होतं.  गल्ट म्हणजेच gulte या वेबसाइटवर दिलेल्या बातमीत ही माहिती देण्यात आलीय. कोरोनावर लस शोधण्यासाठी संशोधक आणि शास्त्रज्ञ खूप प्रयत्न करतायत. पण अशी लस अजून बाजारात आलेली नाही.

हेही वाचा : युद्धात जिंकणाऱ्या अमेरिकेला कोरोना का हरवतोय?

७) डेटॉलमुळे कोरोनाचे वायरस संपतात?

महाराष्ट्रात कोरोनाचे संशयित रुग्ण आढळल्यावर डेटॉलच्या वापरामुळे कोरोना घरात येत नाही, असा अपप्रचार चालू झाला होता. डेटॉलच्या बाटलीमागे दिलेल्या माहितीचा फोटो आणि सोबत डेटॉल हा कोरोनावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणजे कोरोना होऊ नये म्हणून करायचा उपाय आहे असं या पोस्टमधे लिहिलं होतं.

पण डेली मेलवर प्रसिद्ध झालेल्या एका बातमीचा संदर्भ देत फेक क्रेसेंडोच्या बातमीत हा दावा खोटा असल्याचं म्हटलं गेलंय. याबाबत अजून कोणतंही संशोधन प्रसिद्ध झालेलं नाही, असं या बातमीत सांगण्यात आलंय. स्वतः डेटॉल कंपनीनंही नोवेल कोरोना वायरसबाबत कोणतंही संशोधन न झाल्याने डेटॉल त्यावर प्रतिबंधात्मक ठरेल असं सांगता येत नसल्याचं स्पष्ट केलंय. 

८) बारावीच्या पुस्तकात दिलीय कोरोना वायरसची माहिती

बारावी सायन्सच्या बायोलॉजीच्या पुस्तकात कोरोना वायरसची माहिती दिली असल्याची एक पोस्ट मध्यंतरी खूप वायरल झाली होती. त्या पुस्तकातल्या एका पानाचा फोटो शेयर करून, त्यातल्या कोरोना वायरस या शब्दांना अधोरेखित केलं होतं. आपल्याला जो सर्दी ताप होतो तो या कोरोना आणि राईनो वायरस अशा दोन वायरसमुळे होऊ शकतो, असं या पुस्तकात सांगितलंय. शिवाय त्यावर उपाय कोणते करायचे हेही त्या पुस्तकात लिहिलं आहे.

पण तथ्य पडताळणी केल्यावर असं लक्षात येतं की बारावीच्या सायन्सच्या पुस्तकात ज्या कोरोना वायरसविषयी माहिती दिलीय तो वायरस म्हणजे सध्या पसरलेला नोवेल कोरोना किंवा कोविड – १९ या आजाराचा वायरस नाही. या कोरोना वायरसचं शास्त्रीय नाव आहे सार्स कोव २ म्हणजेच SARS-Cov2. या कोरोना वायरसचा एक सहा जणांचा गट किंवा कुटुंब असतो. याता या कुटुंबात नव्याने तयार झालेल्या या नोवेल कोरोना वायरस किंवा SARS-Cov2 या वायरसची भर पडलीय.

कोरोना कुटुंबातल्या चार वायरसमुळे माणासाला साधा सर्दी ताप वगैरे होतो. त्यावर बारावीच्या पुस्तकात सांगितलेली औषधं उपयोगी पडतील. पण सार्स कोव १, मर्स आणि सार्स कोव २ हे उरलेले तीन वायरस जास्त धोकादायक आहेत. त्यातही नव्याने आलेल्या कोरोना वायरसबद्दल फारसं संशोधन झालेलं नाही. त्यामुळे बारावीच्या पुस्तकात ते आधीपासून उपलब्ध असणं शक्यच नाही. थोडक्यात, दिलेल्या माहितीला चुकीच्या पद्धतीने वळवण्याचा हा एक प्रयत्न आहे.

हेही वाचा : कोरोना कुटुंबातलं सातवं पोरच इतकं वात्रट कसं निघालं?

९) कोरोना वायरस बारा तास जिवंत राहतो?

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २२ मार्चला १४ तासांच्या जनता कर्फ्यूची घोषणा केली होती. त्यानंतर हा वायरस १२ तासच जिवंत राहतो त्यामुळे एक दिवसाचा कर्फ्यू पाळून आपण पूर्णपणे कोरोनामुक्त होऊ, असी अफवा पसरवण्यात आली होती. पण फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीमधे हा दावा साफ खोटा ठरलाय.

मुळात कोरोना वायरस सजीव नसतोच. त्यामुळे १२ तास जिवंत राहून त्यानंतर तो मेला असं आपण म्हणूनच शकत नाही. अमेरिकेतल्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थने केलेल्या संशोधनानुसार, वस्तू किंवा एखाद्या जागेवर कोरोना वायरस २४ तासांपेक्षा जास्त काळ सक्रीय राहतो. कोरोना संक्रमित माणूस खोकल्यावर किंवा शिकल्यावर हवेत उडणाऱ्या तुषारांमधे हा वायरस ३ तास सक्रिय राहतो. लाकडाच्या वस्तूंवर २४ तास आणि प्लॅस्टिक आणि स्टीलच्या वस्तूंवर २ ते ३ दिवस कोरोना वायरस तग धरतो. 

थोडक्यात, कोरोना वायरस तीन तास ते तीन दिवस सक्रीय राहू शकतो. जागतिक आरोग्य संघटना म्हणजे डब्लूएचओच्या वेबसाईटवरच्या माहितीमधे देखील हेच सांगण्यात आलंय. म्हणूनच साबणाने अनेकवेळा हात धुणं आणि घरातल्या वस्तू जंतुनाशकानं साफ करणं एवढी काळजी घ्यावी, असं डब्लूएचओनं सांगितलंय.

१०) या उपयांमुळे कोरोनाचा त्रास जातो?

कोरोनाची सुरवात झाली तेव्हापासूनच युनिसेफ किंवा तत्सम संस्थांच्या नावावर कोरोना रोखण्यासाठीचे प्रतिबंधात्मक उपाय कोणते हे सांगणारा एक मेसेज सगळीकडे फिरतोय. गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा, थंड पदार्थ खाऊ नका शिवाय मिठाच्या पाण्याच्या गुळण्या केल्या तर वायरस घशातच मारला जातो, असे अनेक खरेखोटे उपाय यात सांगण्यात आलेत. लोकमत या प्रसिद्ध पेपरनंही या उपायांची एक यादी बनवून फेसबुकवर शेयर करण्यात आलीय.

मात्र युनिसेफने एक पत्रक प्रसिद्ध करून त्यांनी असे कोणतेही उपाय सांगितले नसल्याचं स्पष्ट केलंय.या यादीत सांगितलेले उपाय केल्यानं काही त्रास तर होणार नाही. पण त्या उपायांमुळे कोरोनाची लागण टाळता येईल किंवा कोविड-१९ आजार होणार नाही, असं काही नाही. गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा हा प्रतिबंधात्मक उपाय सोडल्यास उरलेले सगळे उपाय खोटे आहेत, हे स्पष्ट झालंय.

हेही वाचा : 

सोशल कसलं, हे तर दिल्ली डिस्टन्सिंग!

कोविड-१९ आजारावर औषध नसताना पेशन्ट बरं कसं होतात?

कोरोनाला रोखण्यासाठी तैवानकडून आपण काय शिकलं पाहिजे?

कोरोनानंतर आपण वेगळ्याच जगात असणार आहोतः युवाल नोवा हरारी