झुक्या लेका, ब्लॉक करण्यासाठी पण तुला कांबळेच भेटला?

२८ फेब्रुवारी २०१९

वाचन वेळ : ४ मिनिटं


लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर फेसबुकनेही जोरात तयारी सुरू केलीय. सर्वसामान्यांची ट्रोलिंग, ट्रोलर्सपासून सुटका व्हावी म्हणून यूजरहितार्थ काही जाहिरातीही फेसबुकने शेअर केल्यात. त्यातल्याच एका जाहिरातीमुळे फेसबुकवर जातीची माती खाल्ल्याची टीका होतेय. अनेकांनी तर फेसबुकच्या या वीडियोलाच रिपोर्ट केलंय.

फेसबुकने कुणाच्या ध्यानीमनी नसताना गेल्या लोकसभा निवडणुकीत कळीची भूमिका निभावली. नरेंद्र मोदी यांची सत्ता येण्यास हातभार लावणाऱ्या अनेक गोष्टींमधे फेसबुकही आहे. त्यामुळेच यंदाच्या निवडणुकीसाठी फेसबुकने कसून तयारी केलीय. आपला कुणी दुरुपयोग करणार नाही, याची फिल्डिंग लावलीय. या मोहिमेचाच एक भाग म्हणून फेसबुकने आपल्या अकाऊंटवर काही जाहिराती शेअर केल्यात.

त्यातल्याच एका वीडियोवरून लोक सध्या फेसबुकला शिव्या घालायला लागलेत. ट्रोलर्सपासून स्वतःचा कसा बचाव करावा, हे सांगणारा वीडियो आहे. या वीडियोत एक मुलगी आणि एक मुलगा आहे. काळ्या सावळ्या रंगाचा जाडजूड मुलगा त्या गोऱ्या मुलीला मागे मागे ओरडून इरिटेट करतोय. अशा मुलांपासून सुटकेसाठी ती मुलगी फेसबुकला यावर काही करता येईल, का अशी विचारणा करते. मग लगेच फेसबुक अशा लोकांची प्रोफाईल ब्लॉक करण्याचा सल्ला देतो.

इथपर्यंत सगळं युजरप्रबोधन करणारं आहे. पण वीडियोच्या दुसऱ्या भागात ज्याची प्रोफाईल ब्लॉक करायची आहे, त्या मुलाचं नाव अमोल कांबळे असं दाखवलंय. त्याच्या गळ्यात सोन्याची चैनही आहे. १९ सेकंदाच्या या वीडियोतून पहिल्या भागात प्रबोधन आहे, तर दुसऱ्या भागात ब्लॉक करणारा नेमका कांबळेच का दाखवावासा वाटला, यावरूनचा वाद फेसबुकवरच सुरूय.

फेसबुकने फेसबुक इंडिया या भारतातल्या आपल्या पेजवरून हा वीडियो पोस्ट केलाय. ७ फेब्रुवारीला हा वीडियो पोस्ट झाला. तेव्हाच काही लोकांनी फेसबुकवर जातीयवादी मानसिकता असल्याची टीका केली होती. पण आज फेसबुकविरोधातल्या या टीकेने उचल खाल्लीय.

गेल्या १९ तारखेला सुर्यकांत जाधव नावाच्या अकाऊंटवरून फेसबुकच्या या जाहिरातीवर पहिल्यांदा आक्षेप घेण्यात आला होता. सुर्यकांत यांनी झुक्या लेका ब्लॉक करण्यासाठीपण तुला कांबळेच भेटला का, असा सवाल करत वीडियोमागच्या जातीयवादी जाहिरातीचा निषेध केलाय.

फेसबुकवर सक्रिय राहणारे माध्यम अभ्यासक कुणाल गायकवाड यांनी आज आपल्या पोस्टमधून या विषयाला तोंड फोडलं. त्यांनी या विडिओमागचं सामाजिक, सांस्कृतिक राजकारण उलगडून दाखवलंय. ते आपल्या पोस्टमधे लिहितात,

‘फेसबुकच्या वीडियोवर आक्षेप घेण्यासारखं काय आहे, असा प्रश्न गैरलागू आहे. कारण आडनावं तुमचं सामाजिक-सांस्कृतिक स्थान अंकित करत असतात. अधिक स्पष्टपणे बोलायचं तर तुमचं जातीय उतरंडीतील स्थान अंकित करत असतात. हा प्रकार आपणास काही नवीन नाही. अनेक मालिका आणि चित्रपटातून कशाप्रकारचं नरेशन रेटलं जात, हे माहीत आहे. बऱ्याच मालिकांमधे विलन 'खोब्रागडे' आडनावाचा आणि विशिष्ट रंगाचा-देहयष्टीचा का असतो?’

‘मागे एक हृदयविकाराच्या संदर्भानं दूरदर्शनवर आरोग्य जनजागृतीची जाहिरात येत होती. त्यात 'बर्वे' आडनावाचा व्यक्ती अत्यंत चांगला असतो आणि 'शिंदे' आडनावाचा व्यक्ती काळा मठ्ठ असतो. असे हजारो उदाहरणं चित्रपट आणि टीवी माध्यमातील प्रोडक्टमधे शोधता येतील. आता इंटरनेटच्या प्रतलातही अशा प्रकारची कास्ट जेंडरची प्रॅक्टीस प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष केली जाते, यात नवलं वाटायला नको. या माध्यमांच्या पॉवर स्ट्रक्चरमधे कोण आहेत, हे शोधलं तर आपणासं बऱ्याच गोष्टींचा अंदाज येईल.

आता ही जाहिरात फेसबुक इंडियाने बनवली. फेसबुकचे भारतीय भाषांमधील डोमेन आणि युजर इंटरफेससाठी काम करणारे अर्थात भारतीय इंजिनिअरच असणार. त्यांची आडनावं शोधली तर सगळा गेम लक्षात येऊ शकतो.

माध्यम, नवमाध्यम, इंटरनेट यामुळे आधुनिकतेला वेग दिला आणि लोकशाही मुल्यं जगभर पसरली. अशी वरकरणी काही अंशी खरी वाटणारी मांडणी अमेरिकन-कॅनेडीयन अकॅडेमियातून होतच असते. ज्यात मार्शल मॅकलूहान, डेनिस मॅक्वेल सारखे अनेक लोक होते. परंतु क्रिटीकल थेअरीमधून माध्यमांच्या व्यवस्थात्मक अंर्तविरोधांना स्पष्टपणे अधोरेखित करणारे विचारवंतही झाले. ज्यात थिओडर अडर्नोचं नाव आहे.

रेमंड विल्यम्सने तर माध्यमं अल्टीमेटली सांस्कृतिक सत्ताच अधिक बळकट करत असतात, असा सिद्धांत मांडला. पुढे माध्यम कशा प्रकारे वंशवादी नरेशन रेटतात, हेही अनेक अभ्यासकांनी सिद्ध करून दाखवलंय. आणि इंटरनेटही त्यात मोठं योगदान देतं, अशा प्रकारचं सिद्धांतीकरण सुरू आहे.

मग भारतात इंटरनेट माध्यम आणि जात असा विचार करताना, भारतीय मीडिया स्टडीजमधील अभ्यासकांनी कोणतंही विशेष काम केलेलं नाहीये. काही अपवादात्मक दिलीप मंडल, अनिल चामडीया, आनंद तेलतुंबडे, सी. सुरेश कुमार अशी नावं आहेत. बाकी बोंबाबोब. तुम्ही आम्ही असं काही निदर्शनास आणून दिलं पाहिजे. एवढंच आपल्या हातात. बर याबदल्यात उलट आपणच जातीयवादी ठरू, अशी जोखीमही यात आहे.’

या पोस्टवर कमेंट करताना कल्पेश सुधाकर लिहितात, ‘माध्यमांची सूत्र विशिष्ट वर्गाच्या हातातच राहिली आहेत सुरवातीपासून. अशा प्रकारे जाहिरातींच्या माध्यमातून एका विशिष्ट समाजाबद्दल नॅरेटिव तयार करणं हासुद्धा सायलेंट ट्रोलिंगचाच भाग झाला.

सगळ्यात प्रभावी मानल्या जाणाऱ्या प्रसारमाध्यमांमधून कामवाली बाई, पोलिस शिपाई, गुंड, घरगडी तत्सम पात्र दाखवताना त्यांचा रंग, वर्तन आणि आडनाव याची विशेष खबरदारी घेतली जाते. फक्त अशा ठिकाणी पात्र जर विशेष प्रामाणिक, धाडसी वगैरे दाखवलं जाणार असेल तर पात्राची लांबीदेखील वाढते आणि आडनावदेखील बदलतं. जनमानसावर, त्यांच्या सबकॉन्शसवर अशा प्रकारच्या साचेबद्ध दृकश्राव्य मांडणीचा चांगलाच परिणाम होत असतो.

सचिन मोहन चोभे यांनी लिहिलंय, ‘मीडिया आणि जाहिरात क्षेत्रात उच्च जातीतले मंद लोक काम करत आहेत. त्यात अजुनही कनिष्ठ समजल्या जाणाऱ्या जातीचे प्रतिनिधी येऊ शकले नाहीत. फेसबुक असो की गुगलचे अधिकारी त्यातही अशाच मंदाडांचा भरणा आहे. मग जातीयवादी विचार असल्या जाहिरातीतून डोकावणारच की.’

फेसबुकच्या या वीडियोतून जातीयवादी मानसिकता डोकावत असतानाच मराठी माणसाचाही अपमान केला गेलाय. भारतात ट्रोल ही गोष्टच मुळात उत्तर भारतातून सगळीकडे पसरलीय. हे ट्रोल धर्माचा बुरखा घालून, धर्माचा ठेका घालून आपल्या विरोधी विचाराच्या लोकांचं जगणं हराम केलं. पण या जाहिरातीत कांबळे आडनावाचा ट्रोलर दाखवून फेसबुकने मराठी माणसाचाही अपमान केलाय.

फेसबुकच्या या कृतीचा निषेध केलाही जातोय. पण फेसबुकने हा वीडियो काढून टाकून माफी मागायला पाहिजे.