फिफाच्या फुटबॉल वर्ल्डकपचा थरार

२३ नोव्हेंबर २०२२

वाचन वेळ : ५ मिनिटं


भारतात क्रिकेटची लोकप्रियता सर्वाधिक असली तरी जगभरातला सर्वात लोकप्रिय खेळ फुटबॉल आहे. दर चार वर्षांनी फुटबॉलचा महाकुंभमेळा म्हणजेच विश्वचषक स्पर्धांचं आयोजन केलं जातं. यंदाचा हा महाकुंभमेळा कतारमधे २० नोव्हेंबरपासून भरलाय. संपूर्ण जगभरात अतीव उत्साहाने पाहिल्या जाणार्‍या या महाकुंभमेळ्याविषयीची काही रंजक माहिती.

जगातला सर्वात लोकप्रिय खेळ म्हणून फुटबॉलकडे पाहिलं जातं. स्टेडियममधे कोणताही सामना पाहण्यासाठी होणार्‍या गर्दीचा विचार केला तर हा विक्रम फुटबॉल सामन्याच्याच नावावर आहे. १९५०चा विश्वचषकाचा अंतिम सामना पाहण्यासाठी एक लाख ९९ हजार ८८५ नागरिकांनी स्टेडियममधे उपस्थिती होती.

या लोकप्रियतेमागचं कारण म्हणजे २११ देशातले एकूण २७ कोटी नागरिक फुटबॉल खेळतात. याचाच अर्थ असा की, जगातल्या एकूण लोकसंख्येच्या ६ टक्के नागरिक फुटबॉल खेळतात. म्हणजेच दर २५ माणसामागे १ फुटबॉलपटू आहे. युरोप आणि लॅटीन अमेरिकेत तर प्रत्येक ६ व्यक्तीमागे १ व्यक्ती फुटबॉलपटू आहे.

अशी असेल स्पर्धा

फुटबॉलचा विश्वचषक हा तर जगभरातल्या समस्त फुटबॉलप्रेमींसाठी जणू कुंभमेळाच. यंदाचा हा कुंभमेळा कतारमधे २० नोव्हेंबरपासून सुरू झालाय. कतारच्या निमित्ताने पहिल्यांदाच एका अरब देशामधे फुटबॉलची विश्वचषक स्पर्धा पार पडणार आहे.

या रोमहर्षक स्पर्धेच्या एकूण १४ दिवसात ४८ गटांचे सामने खेळले जाणार आहेत. प्रत्येक गटामधल्या दोन अव्वल टीमला राऊंड ऑफ १६ मधे प्रवेश करता येणार आहे. ३ डिसेंबरपासून नॉकआऊट सामने खेळले जातील आणि त्यानंतर उपांत्यपूर्व आणि उपांत्य फेरीतल्या टीमचा प्रवास निश्चित होईल.

या संपूर्ण स्पर्धेत एकूण ६४ सामने खळले जाणार असून अंतिम सामना १८ डिसेंबर २०२२ला खेळला जाणार आहे.  ही स्पर्धा अनेकार्थांनी वैशिष्टपूर्ण ठरणार आहे.

हेही वाचा: स्पर्श न करता खेळता येतं, म्हणून आपल्याकडे क्रिकेट वाढलं

फुटबॉलमधलं अर्थकारण

दरवेळी प्रमाणेच यंदाही चर्चा आहे ती फुटबॉल विश्वचषकातल्या खेळाडू आणि टीमना मिळणार्‍या पैशांची. आपल्याकडे क्रिकेटमधे अलीकडच्या काळात प्रचंड पैसा आल्याची चर्चा होत असते. तसंच सामना किंवा स्पर्धा जिंकल्यानंतर खेळाडूंना आणि टीमना मिळणारी बक्षिसं आणि रोख रक्कम यामधेही गेल्या दहा वर्षांत घसघशीत वाढ झाल्याचं दिसून आलंय. त्यादृष्टीने क्रिकेटमधली श्रीमंती वाढल्याचं बोललं जातं; पण फुटबॉलमधलं अर्थकारण विचारात घेतलं तर क्रिकेटचं अर्थकारण थिटं असल्याचं वाटतं.

आता हेच पहा ना, फिफा २०२२मधे सर्वांत खराब कामगिरी करणार्‍या टीमला मिळणारी रक्कम ही विश्वचषक विजेत्या इंग्लंडला मिळालेल्या रकमेपेक्षा तब्बल ६० कोटींनी अधिक आहे. फिफाच्या यंदाच्या स्पर्धेमधे बक्षिसापोटी ३५६८ कोटी रुपये देण्यात येणार आहेत. नुकत्याच पार पडलेल्या टी २० विश्वचषक सामन्यात ही रक्कम केवळ ४५.४ कोटी रुपये होती. हा विश्वचषक जिंकणार्‍या टीमला ३४४ कोटी रुपये मिळणार असून मागच्या अर्थात २०१८च्या विश्वचषक स्पर्धेच्या तुलनेत ही रक्कम ४ मिलियन डॉलरहून अधिक आहे. उपविजेत्या टीमला २४५ कोटी रुपये रोख रक्कम मिळणार आहे. तिसर्‍या स्थानावर राहणार्‍या टीमला मिळणारी रक्कम आहे २०२ कोटी रुपये!

सर्वांत धक्कादायक म्हणजे, पहिल्या राऊंडमधून बाहेर होणार्‍या टीमलाही ७२ कोटी रुपये मिळणार आहेत. आंतरराष्ट्रीय खेळांसाठीची ही सर्वाधिक बक्षिस रक्कम आहे.  अर्थात फुटबॉलच्या विश्वात काही खेळाडू असे आहेत ज्यांची वार्षिक कमाई या बक्षिस रकमेपेक्षा काही पटींनी अधिक आहे. पोर्तुगालचा क्रिस्टियानो रोनाल्डोचेच उदाहरण घेतलं तर त्याची वार्षिक कमाई सुमारे ९२२ कोटी रुपये आहे; तर अर्जेंटिनाच्या लियोनल मेसीची वर्षाकाठीची कमाई आहे ८११ कोटी.

दिग्गज टीम्सची उणीव

यंदाच्या फिफा विश्वचषकामधे उत्कंठावर्धक लढती पार पडतील; पण यामधे जागतिक पातळीवर फुटबॉलविश्वात दबदबा निर्माण करणार्‍या  काही टीमची उणीव भासणार आहे. यामधे तब्बल ४ वेळा फिफा वर्ल्डकप जिंकणार्‍या आणि युरो कप विजेत्या इटलीच्या टीमची उणीव प्रकर्षाने जाणवेल. वास्तविक, ब्राझीलनंतर सर्वाधिक फुटबॉल विश्वचषक जिंकणारा इटली दुसरी टीम आहे. इटली चार वेळा विश्वविजेता ठरला आहे. फिफा क्रमवारीत सध्या सहाव्या क्रमांकावर आहे. पण यंदाच्या विश्वचषक स्पर्धेसाठी इटलीला पात्रता मिळवता आली नाही. मार्चमधे प्लेऑफच्या उपांत्य फेरीत उत्तर मॅसेडोनियाकडून ९२ व्या मिनिटाला झालेल्या पराभवानंतर इटली विश्वचषक स्पर्धेच्या शर्यतीतून बाहेर फेकला गेला.

इटलीप्रमाणेच चिलीच्या टीमची उणिवही जाणवणार आहे. दक्षिण अमेरिकेतली चिली टीम आत्तापर्यंत प्रत्येक विश्वचषकाचा भाग राहिलीय. १९६२मधे ही टीम उपांत्य फेरीत पोचली होती. सध्या या टीमचं रँकिंग २९ आहे. पण कतार विश्वचषक स्पर्धेतल्या शेवटच्या चार पात्रता सामन्यांमधे फक्त एकच सामना चिलीने जिंकल्यामुळे टीम पात्र ठरू शकली नाही. विश्वचषक स्पर्धेला मुकण्याची नामुष्की चिलीवर पहिल्यांदाच आली आहे.

कोलंबियाची फुटबॉल टीम फिफा क्रमवारीत १७ व्या क्रमांकावर असून ब्राझीलमधे झालेल्या २०१४च्या विश्वचषक स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत पोचली होती. या टीमचा स्टार खेळाडू असलेल्या जेम्स रॉड्रिग्जने विश्वचषक गोल्डन बूट पटकावला होता. पण यावेळी जेम्सला आपल्या टीमला विश्वचषकासाठी पात्र ठरवण्यात अपयश आलं.

फुटबॉलच्या स्पर्धांमधे नायजेरियाच्या खेळाडूंचा खेळही नेहमीच पाहण्यासारखा राहिला आहे. अत्यंत वेगवान खेळासाठी ही टीम ओळखली जाते. १९९४ मधे नायजेरियाची टीम पहिल्यांदा विश्वचषक खेळली होती. २००६ चा अपवाद वगळता नायजेरियाची टीम प्रत्येक विश्वचषकात सहभागी राहिलीय. इतकंच नाही तर या टीमने तीन वेळा सुपर १६ फेरीत प्रवेश केला आहे. या टीमचं फिफा रँकिंग ३२ आहे. पण यंदा ही टीम मैदानावर दिसणार नाहीय.

हेही वाचा: ख्रिश्चनांच्या पंढरीत अवतरलीय धर्मगुरूंची क्रिकेट टीम

या टीमकडे फुटबॉलप्रेमींचं लक्ष

यावेळच्या स्पर्धेत ज्या टीमच्या कामगिरीकडे लक्ष असेल त्यामधे अर्जेंटिना, नेदरलँड, इंग्लंड, ब्राझील आणि फ्रान्स यांचा समावेश अग्रक्रमाने करावा लागेल. अर्जेंटिनाचा स्टार खेळाडू लिओनेल मेस्सी यंदा आपला पाचवा विश्वचषक खेळणार असून हा त्याच्या कारकिर्दीतला शेवटचा विश्वचषक असल्याची चर्चा आहे. २०१४च्या विश्वचषक स्पर्धेत अर्जेंटिनाचा टीमने अंतिम फेरीत धडक दिली होती आणि त्यात  मेस्सीचं मोठं योगदान होतं. पण अंतिम सामन्यात जर्मनीकडून अर्जेंटिनाचा पराभव झाला.

२०१८ च्या विश्वचषक स्पर्धेत नाक ऑउट मॅचेसमधे अर्जेंटिनाचा फ्रान्सकडून पराभव झाला होता. पण यंदा मेस्सीच्या नेतृत्त्वात खेळणारा अर्जेंटिनाची टीम फॉर्मात आहे. ही टीम गेल्या ३५ सामन्यांत अपराजित आहे. त्यामुळे या टीमकडून मेस्सीच्या चाहत्यांसह जगभरातल्या फुटबॉलप्रेमींना खूप अपेक्षा आहेत. अर्जेंटिनाचा पहिला सामना २२ नोव्हेंबरला सौदी अरेबियाविरुद्ध असणार आहे.

अर्जेंटिनाबरोबरच नेदरलँडच्या टीमची कामगिरीही अलीकडच्या काळात नेहमीच चर्चेत राहिली आहे. २०१० मधे ही टीम फिफा विश्वचषकाच्या अंतिम सामन्यापर्यंत पोचली होती. २०१४च्या नेदरलँडने उपांत्यफेरी गाठली होती. पण नंतरच्या काळात या खेळाडूंची कामगिरी सुमार बनल्यामुळे २०१६ मधे झालेल्या युरो कपच्या स्पर्धेतही नेदरलँडला प्रवेश मिळवू शकला नाही. गेल्या वर्षभरापासून ही टीम पुन्हा एकदा फॉर्ममधे आल्याचं दिसतय. युरो कप २०२० मधल्या धमाकेदार फरफॉर्मन्सनंतर नेदरलँड आता फिफा वर्ल्डकप स्पर्धेत आपल्या दमदार २६ खेळाडूंसह मैदानात उतरणार आहे. सध्या ही टीम फिफा क्रमवारीत आठव्या क्रमांकावर आहे.

भारत यंदाही प्रेक्षकच

हॉकीमधे दबदबा निर्माण करणार्‍या भारताला विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या मैदानावर प्रेक्षकाचीच भूमिका बजवावी लागली आहे. १९५०मधे भारतीय टीम फिफासाठी पात्र ठरली होती. पण त्यावेळी भारतीय खेळाडू शूज न घालता पायाने खेळत होते. स्पर्धेत पायाने फुटबॉल खेळण्याची परवानगी दिली जात नव्हती. तसंच भारतीय टीम ब्राझीलला पाठवण्यासाठी भारताकडे त्यावेळी पैसेही नव्हते, असं म्हटलं जातं.

भारतात फुटबॉलकडे पाहण्याच्या दृष्टीकोनात आमूलाग्र बदल झाला असला तरी स्थितीत फारशी सुधारणा झालेली नाही. त्यामुळेच यंदाच्या विश्वचषकासाठीही सुनिल छेत्रीच्या नेतृत्त्वाखालची भारतीय फुटबॉल टीम पात्र ठरू शकलेली नाही. फिफा रँकिंगचा विचार करता भारत १०६ व्या क्रमांकावर आहे. त्यामुळे भारतीय प्रेक्षकांना यंदाही इतर देशातल्या खेळाडूंच्या कौशल्याचा आनंद घेत त्याला दाद देण्यातच धन्यता मानावी लागणार आहे.

हेही वाचा: 

क्रिकेटचे लघुउद्योग सुटलेत सुसाट

महेंद्र सिंग धोनी: वनडेतला ‘ग्रेट फिनिशर’

आयपीएलच्या तपाची कहाणी : थोडी मिठी, जास्त खट्टी

अपघाताने जन्माला आलेल्या वनडे क्रिकेटची आज पन्नाशी 

(साभार - पुढारी)