पीचचं कारण देत इंग्लंड रडीचा डाव का खेळतोय?

१९ मार्च २०२१

वाचन वेळ : ६ मिनिटं


क्रिकेट हे बॅट आणि बॉलचं द्वंद्व आहे. यात कधी बॅट वरचढ ठरते. तर कधी बॉल. पण, बॉल वरचढ ठरल्यानंतर पीचमधे दोष शोधणं हा रडीचा डाव आहे. भारतीय पीचवर भारत ‘दादा’ आहेच. पण आता तो ऑस्ट्रेलिया, इंग्लंडसारख्या आव्हानात्मक इतिहास असलेल्या पीचवरही आपली दादागिरी गाजवू लागलाय. त्यामुळे भारताची टेस्ट टीम इतर टीमच्या तुलनेत सरस वाटते.

जगातल्या सगळ्यात मोठ्या क्रिकेट मैदानावरची पहिली आंतरराष्ट्रीय टेस्ट सिरीज अवघ्या दीड, पावणेदोन दिवसात संपली. या मैदानाचं नाव आहे नरेंद्र मोदी स्टेडियम. तर जुनी ओळख मोटेरा स्टेडियम. या पावणेदोन दिवसाच्या टेस्टमधे तब्बल ३० विकेट पडल्या. या ३० विकेटमधल्या २८ विकेट या दोन्ही टीममधल्या स्पिनरनी घेतल्या.

इंग्लंड पहिल्या डावात ११२ रनमधे गारद. त्यानंतर भारतही पहिल्या डावात १४५ रनमधे गारद. इंग्लंडनं दुसर्‍या डावात कहर केला. ८१ रनमधे सगळ्या बॅट्समननी पॅड सोडलं. यानंतर इंग्लिश मीडिया, आजी, माजी खेळाडूनी पीचचं रडगाणं सुरू केलं. हे रडगाणं गाण्यात माजी कॅप्टन मायकेल वॉगन आघाडीवर होता.

वॉगन याचा चेहरा पीच फिरकीला साथ देतंय असं दिसलं की, कडू कारलं खाल्ल्यासारखा होतो. असा चेहरा होणं साहजिक आहे म्हणा. कारण चेन्नईतल्या दुसर्‍या टेस्टनंतरच इंग्रजांनी भारतातल्या फिरकी पीचना नाकं मुरडायला सुरवात केली होती. आता मोटेरा स्टेडियमवरच्या टेस्टनंतर तर या पीचवर बंदीच येणार, अशी चर्चा इंग्रज नाही तर भारतातले काही लोक करू लागलेत. तेही बरोबरच आहे म्हणा!

कारण पाच दिवसांचा कसोटी सामना अवघ्या दीड-पावणेदोन दिवसात संपला. पण दोष खरंच खेळपट्टीत होता की अजून काही चुकलं आहे? याची चर्चा व्हायला हवी.

‘मोटेरा’च्या डीएनएतच फिरकी

‘मोटेरा’वरची विकेट कधीही पाटा किंवा फास्ट बॉलर्सना पोषक नव्हती. तिचं मुळातच नेचर फिरकी हेच होतं. फरक फक्त इतकाच की, नरेंद्र मोदी स्टेडियम या आपल्या नव्या रूपात तिने आपला मूळ फिरकीचा गुणधर्म सोडला नाही. विशेष म्हणजे गुलाबी बॉलवर फास्ट बॉलर अधिराज्य गाजवतात; पण मोटेराने या वेळी बदलत फिरकीला भरभरून दान दिलं.

आता आपण म्हणाल की, दोन्ही टीमचा इतकी नीचांकी स्कोर झाला की, ही पीच बॅन करायला हवी. पण, हा खेळ इतका सोपा नाही. माझ्या मते पीच बॅन करण्यासाठी दोन महत्त्वाचे मुद्दे आहेत. पहिला मुद्दा बॉल अपेक्षेपेक्षा जास्त उसळी आणि बॅट्समनला जखमी करेल इतका धोकादायक उसळी घेतोय का? आणि दुसरा मुद्दा म्हणजे बॉल इतका खाली राहत आहे का, जिथं बॅट्समन तो खेळूही शकणार नाही.

या दोन्ही दृष्टीने पाहिलं तर मोटेरावरच्या तिसर्‍या टेस्टमधे असं काहीही होताना दिसत नव्हतं. मोटेरावर झालेली तिसरी आणि सिरीजमधली चौथी टेस्टही तीन दिवसात संपली. पण, या टेस्टमधे इंग्लंडने पहिल्या डावात २०५ तर दुसर्‍या डावात १३५ रन केले. भारताने आपल्या पहिल्याच डावात ३६५ रन करून मॅचवर वर्चस्व राखलं.

हेही वाचा : लेजंड धोनीचा अखेरचा 'षटकार'

चूक बॅट्समनची, दोष पीचला

दोन्ही मॅच एकाच मैदानावर झाल्या. पीच खराब असती तर पुढच्या टेस्टमधेही रन कमी झाले असते. तिसर्‍या टेस्टमधे बॉल फक्त जास्त वळत होता इतकंच. तो प्रमाणाच्या बाहेर उसळी घेत नव्हता.  ना प्रमाणाच्या बाहेर खालीही रहात होता. त्यामुळे फक्त दोन्ही टीमच्या रन कमी झाल्या म्हणून पीच बाद ठरत नाही. बाद ठरतात ते बॅट्समन. 

सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दोन्ही टीममधले आघाडीचे बॅट्समन हे बॉलनं अपेक्षाभंग केल्यानं बाद झालेत. म्हणजे बॉल वळणार असं वाटत असतानाच तो सरळ राहिला आणि दोन्ही टीममधले बॅट्समन फसले. हे इंग्लंडच्या बॅट्समनबद्दल झालं असतं तर ठीक होतं. पण भारतीय बॅट्समनही फिरकीच्या तेही रूटच्या पार्ट टाईम फिरकीत अडकावं हे मानहानीकारकच आहे.

त्यामुळे दोष हा पीचला नाही तर फिरकी न खेळता येणार्‍या बॅट्समनचा आहे आणि हा दोष दोन्ही टीममधे आहे. कोणाकडे जास्त प्रमाणात आहे तर कोणाकडे कमी प्रमाणात आहे इतकंच.

फिरकीचं चुकीचं तंत्र

याच पीचवर रोहित शर्माने पहिल्या डावात तब्बल ११ चौकार मारत ६६ रन केलेतच की! दुसर्‍या डावातही त्याने २५ बॉलमधे २५ रन ठोकले. मग त्यावेळी पीच सुधारलं होतं का? तर नाही. रोहितने आपल्या खेळात सुधारणा करून फिरकीला काऊंटर करण्यासाठी स्विप शॉट आणि स्टेप आऊट होऊन खेळण्याची रणनीती अवलंबली. त्याने अशीच रणनीती दुसर्‍या टेस्टमधेही अवलंबली होती.

त्यानंतर तो प्रेस कॉन्फरन्समधे म्हणालाच होता की, पीच अवघड वगैरे नसतं. फक्त वेगवेगळ्या पीचवर आपण आपल्या खेळण्याच्या स्टाईलमधे काय बदल करतो याच्यावर यश आणि अपयश अवलंबून असतं. त्यामुळे पीच बाद नव्हती. तर फिरकीला सामोरं जायचं तंत्र खराब होतं.

क्रिकेट हे बॅट आणि बॉलचं द्वंद्व आहे. यामधे कधी बॅट वरचढ ठरते तर कधी बॉल. पण बॉल वरचढ ठरल्यानंतर पीचमधे दोष शोधणं हा रडीचा डाव आहे. त्यामुळे जागातल्या सगळ्यात मोठ्या क्रिकेट मैदानावरच्या पहिल्या टेस्टचं कोणी मातेरं केलं असेल तर ते फक्त आणि फक्त बॅट्समनच्या फिरकीपुढच्या चुकीच्या तंत्रानं.

हेही वाचा : महेंद्र सिंग धोनी: वनडेतला ‘ग्रेट फिनिशर’

नवख्या बॅट्समनची शतकी खेळी

आता भारतात जरा बॉल फिरायला लागला की, विदेशी समालोचक आणि क्रिकेट पंडितांच्या बुडाखालची खुर्ची सरकते. असाच कांगावा इंग्लंडचा माजी कॅप्टन मायकल वॉगनने केला. त्याने काळ्या ढेकळात स्टम्प रोवून चौथ्या टेस्टची तयारी अशी थट्टा केली. पण, चौथ्या टेस्टमधे त्यांच्याच बॅट्समननी वॉगनचे दात त्याच्याच घशात घातले.

या टेस्टमधे टॉस जिंकून पहिली बॅटिंग करण्याची संधी मिळूनही इंग्लंडला टेस्टवर वर्चस्व मिळवता आलं नाही. टॉसचा डिसअ‍ॅडवान्टेज मिळूनही भारताने या टेस्टमधे फक्त एकदाच बॅटिंग केली. त्यातही एका बॅट्समनने शतक तर दुसर्‍याने जवळपास शतक ठोकलं. गंमत म्हणजे पंत आणि सुंदर यांचा दोघांचाही टेस्टचा अनुभव अवघ्या २४ टेस्टचा आहे.

मायकल वॉगनचे नखरे

मायकल वॉगनने भारतीय पीचवर टीका केली, त्याचा अनुभव यांच्यापेक्षा जवळपास दुप्पट आहे. जर या दोन नवख्या बॅट्समनना शतकी खेळी करता येत असेल तर इंग्लंडच्या टीममधल्या रथी-महारथींना का करता येऊ नये? यजमानांना आपल्या घरच्या मैदानाचा फायदा होतो हे गृहीतक आहे. पण उलट्या बोंबा सुरू झाल्या.

यजमानांना फायदा ही तक्रार कशी असू शकते? अशी तक्रार सध्याच्या भारतीय टीमनं केल्याचं कधी ऐकण्यात आलं नाही. भारत इंग्लंड, ऑस्ट्रेलिया किंवा न्यूझीलंडमधे पाहुणा असतो, त्यावेळी फिरकीला साथ देणार्‍या पीच तयार करून कोणी त्यांचा पाहुणचार करतं का? नाही ना!

त्यामुळे असा पाहुणचार झाला नाही म्हणून टीममधले खेळाडू किंवा वर्‍हाडी मंडळी रुसले का? नाही ना! मग मायकेल साहेबांनी इतके नखरे करण्याचं कारण काय?

हेही वाचा : स्पर्श न करता खेळता येतं, म्हणून आपल्याकडे क्रिकेट वाढलं

इंग्लंडला मायदेशात पाणी पाजलं

यात एक मेख आहे. भारतात या इंग्रजांना फिरकीचा सामना करावा लागतो. तसा भारतालाही इंग्लंडमधे स्विंग आणि सीम बॉलिंगचा सामना करावा लागतो. पण, गेल्या दशकभरात भारतीय बॅट्समननी अशी बॉलिंग खेळण्याचं तंत्र प्रयत्नपूर्वक आत्मसात केलंय. त्यामुळे विराट, अजिंक्य, रोहित इंग्रजांच्या बाऊन्सर आणि उसळत्या बॉलवर लीलया पूल मारू शकतात. पण अपवाद वगळता इंग्लंडचे बॅट्समन फिरकीपुढे कायमच नाचताना दिसतात.

आता तर भारतीय वेगवान बॉलर इतके वैविध्यपूर्ण आणि अव्वल दर्जाचे झालेत की, ते इंग्लंडच्या बॅट्समनना त्यांच्याच मायदेशात पाणी पाजतायत. बरं. असे फक्त पहिल्या फळीतले बॉलर करत आहेत असं नाही तर दुसर्‍या किंबहुना तिसर्‍या फळीतले बॉलरही पाहुण्यांचा पाहुणचार त्यांच्या घशात घालत आहेत.

भारताची पीचवर दादागिरी

भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा. याचं उत्तम उदाहरण. दौर्‍याची एक महत्त्वाची जिस्ट म्हणजे डे-नाईट टेस्ट सोडली तर इतर ठिकाणच्या पीचवर राक्षसी उसळी किंवा स्विंग झाला नाही. किंबहुना असं होऊ नये म्हणून विशेष काळजी घेतली होती. बहुदा त्यांना जर आपण अशा पीच केल्या तर त्याचे बूमरँग होऊन आपलेच बॅट्समन या सापळ्यात अडकतील अशी भीती असावी.

भारतीय पीचवर भारत दादा आहेच; पण आता तो ऑस्ट्रेलिया, इंग्लंडसारख्या आव्हानात्मक इतिहास असलेल्या पीचवरही आपली दादागिरी गाजवू लागलाय. त्यामुळे भारतीय टेस्ट टीम इतर टीमच्या तुलनेत सरस वाटते. याचीच पोटदुखी मायकेल महाशयांना झाली असावी.

भारत आता इंग्लंड दौरा करणार आहे. गेल्या काही कसोटी सिरीजमधे भारताकडे दोन-तीन फळ्यांचा तोफखाना असल्याचं जगाने पाहिलंय. हाच तोफखाना इंग्लंडच्या थंडीत गर्मी निर्माण करण्यासाठी सज्ज आहे.

हेही वाचा : 

अली अख्तर : टेनिस हाच त्यांचा विश्वास होता

कॉमेंट्रीटर असे अतिशहाण्यांसारखे का वागतात?

आयपीएलच्या तपाची कहाणी : थोडी मिठी, जास्त खट्टी

अपघाताने जन्माला आलेल्या वनडे क्रिकेटची आज पन्नाशी