इंग्लंड जगजेत्ता आणि न्यूझीलंडला चौक्यांचा चकवा

१५ जुलै २०१९

वाचन वेळ : ३ मिनिटं


क्रिकेट वर्ल्डकपचा गेल्या दीड महिन्यापासूनचा थरार काल रात्री थांबला. आतापर्यंत सारं काही सुरळीत सुरू असलेल्या या स्पर्धेचा शेवट मात्र अतिशय चुरशीचा झाला. अटीतटीच्या मॅचमधे इंग्लंडने न्यूझीलंडचा पराभव केला. या हारजीतमधे खरा वाटेकरी ठरला तो चौका. न्यूझीलंडला चौक्यांनी चकवा दिल्याने इंग्लंडला पहिल्यांदाच जगज्जेत्ता होता आलं.

वर्ल्डकप २०१९ च्या फायनलमधे इंग्लंड जगज्जेता झाला. बेन स्टोक्सची मॅच टाय करणारी झुंजार ८५ धावांची खेळी, त्याला साथ देत बटलरने काढलेल्या ५९ धावा, या दोघांची पाचव्या विकेटसाठी ११० धावांची भागिदारी, बटलर-स्टोक्स जोडीच्या १३ बाऊंडरीज, सलामीवीर रॉय-बेअरस्टोनी यांनी मारलेल्या १० बाऊंडरीज हे झालं इंग्लंडच्या विजयाचं थोडक्यात वर्णन.

पण असं थोडक्यात वर्णन करणं एकांगी होईल. कारण इंग्लंडने हा वर्ल्डकप बाऊंडरीजच्या तांत्रिक मुद्यावर जिंकलाय.

तीन वेळा बाऊंड्रीने दिला दगा

या मॅचमधे न्यूझीलंडनेही दमदार खेळ करत २४२ धावांचं आव्हान उभं केलं. हे आव्हान कायम राहील यासाठी न्यूझीलंडच्या बॉलर्सनी इंग्लंडच्या नाकीनऊ आणलं. त्यानंतर इंग्लंडने सुपर ओवरमधे १५ धावांचं आव्हान होतं. न्यूझीलंडनेही १५ धावा काढल्या. पण २४-१६ बाऊंडरीच्या तांत्रिक मुद्यावर इंग्लंडला इतिहास रचण्याची संधी मिळाली. आज क्रिकेटची पंढरी समजल्या जाणाऱ्या लॉर्ड्सच्या बाऊंडरीने न्यूझीलंडचं नशीब  बदललं. तेही एकाच मॅचमधे तीन तीन वेळा.

या कमनशिबी बाऊंडरीने पहिल्यांदा न्यूझीलंडला ४९ व्या ओवरच्या चौथ्या बॉलवर दगा दिला. स्टोक्सने मारलेला उंच फटका बोल्टच्या हातात अलगद विसावला. पण तो बाऊंडरी लाईनच्या इतक्या जवळ होता की त्याचा पाय अनावधानाने बाऊंडरी लाईनवर पडला. त्यामुळे बॉल थेट बाऊंड्रीलाईन पल्याड गेला. तसं बघायला गेलं तर बोल्ट लाईनवर फिल्डिंग करण्यात माहीर आहे. आताही युट्युबवर बघितलं तर त्याने लाईनवर केलेली अप्रतिम फिल्डिंग आपल्याला बघायला मिळेल. पण लार्ड्सवरील बाऊंडरी चकवण्यात बोल्ट चुकाला.

हेही वाचाः एन. डी. पाटील यांचं जीवन, सामाजिक संघर्षाचं एक धगधगतं अग्नीकुंडच

अटीतटीच्या झुंजीचा टेक्निकल निकाल

याच लॉर्ड्सच्या बाऊंडरीने किवींना दुसऱ्यांदा दगा दिला. ५० व्या ओवरच्या तिसऱ्या बॉलवर दोन रन घेताना रनआऊट होण्यापासून वाचण्यासाठी स्टोक्सने डाइव मारला. पण जोराचा थ्रो त्याच्या बॅटला लागून बाऊंडरीच्या दिशेने वेगाने गेला. हा बॉल बाऊंडरी लाईनपर्यंत गेला नसता तर इंग्लंडला फक्त २ रन मिळाले असते. पण बॉलने बाऊंडरी पार केल्याने नियमाप्रमाणे ओवर थ्रोचा चौकार आणि पळून काढलेल्या २ असे सहा रन मिळाले. त्यामुळे मॅच बरोबरीत सुटण्यास किवींनीच हातभार लावला.

या लॉड्सने झुंजार किवींना तिसऱ्यांदा झुकवलं. ४९ व्या आणि ५० व्या ओवरमधे इतका ड्रामा झाल्यानंतरही कडव्या किवींनी सुपर ओवरमधेही कडवी झुंज दिली. इंग्लंडच्या आव्हानाशी बरोबरी साधली. पण तिथेही आडवी आली ती बाऊंडरी. दोन्ही मॅच आणि सुपर ओवर २०१९ चा विश्वविजेता ठरवण्यात अपयशी ठरल्यावर या लॉर्ड्सच्या बाऊंडरीने तिला ज्याने जास्तवेळ पार केले त्यांच्याच गळ्यात माळ टाकली.

बाऊंड्री झाली अजरामर

इंग्लंडने २४ बाऊंडरीसह ४४ वर्षांचा आपला वनवास संपवला. आणि पहिल्यांच वर्ल्डकप आपल्या कवेत घेतला. दुसरीकडे न्यूझीलंडला त्याच लॉर्ड्सच्या बाऊंडरीकडे निराशेने पाहण्याशिवाय काही करण्याची सोय उरलेली नाही. याच लॉर्ड्सच्या बाऊंडरीने ‘पराभूत’ न झालेल्या किवींना काठावर आणून ठेवलं आणि स्वप्नभंगाचं दु:खही दिलं. 

बहुदा क्रिकेटच्या पंढरीला आपलं नाव क्रिकेटच्या इतिहासात अजरामर करायचं असेल. त्यामुळचे त्या पंढरीत खेळलेल्या खेळाडूंचं श्रेय होय नाही होय नाही करत आपल्या बाऊंडरी लाईनवर आणून ठेवलं. आता क्रिकेटच्या इतिहासात काय नोंद होणार तर क्रिकेटचा जन्मदाता इंग्लंडने आपला पहिला वर्ल्डकप ४४ वर्षानंतर लॉर्ड्सवर जिंकला. आणि तोही ‘बाऊंडरी’मुळे. अप्रत्यक्षरित्या कोण अजरामर झालं? तर ती ‘बाऊंडरी’.

हेही वाचाः 

कॉमेंट्रीटर असे अतिशहाण्यांसारखे का वागतात?

देशाने लढाई करावी पासून विश्वचषक जिंकावा हा उन्मादच

सिंगल-डबलची स्ट्रॅटेजी फेल आणि भारत वर्ल्डकप बाहेर

झोपाळू रोहित शर्मा आळस झटकून जगातला टॉप बॅट्समन बनला