शंभुराजेंच्या बदनामीचा दोनशे वर्षांपासूनचा कट एका मालिकेने उधळला!

११ मार्च २०२०

वाचन वेळ : ७ मिनिटं


आज छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिवस. या बलिदानाचं खरं मोल आजच्या मराठी माणसाला कळलं ते स्वराज्यरक्षक संभाजी या टीवी मालिकेमुळे. शंभुराजांची बदनामी करण्यासाठी शेकडो जणांनी गेली जवळपास दोनशे वर्षं तरी आपली प्रतिभा पणाला लावली होती. या एका मालिकेने शंभुराजांची ही बदनामी संपवून त्यांची खरी थोरवी महाराष्ट्रासमोर मांडली. 

स्वराज्यरक्षक संभाजी या झी मराठीवरच्या मालिकेनं नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला. प्रत्येक मराठी माणसाच्या मनावर आपला ऐतिहासिक ठसा उमटवणाऱ्या या मालिकेनं लोकप्रियतेचा नवा कळस गाठला. मालिकेच्या शेवटी छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूचा प्रसंग बघताना तर अनेकांच्या डोळ्यात पाणी तरळलं.

लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच हा प्रसंग बघताना भावूक झाले असतील. काहींनी तर चक्का सिरिअलमधे हा प्रसंगच दाखवू नये, अशी विनंतीही निर्मात्यांना केली. पण इतिहासाचा हाही भाग लोकांसमोर यायला हवा, अशी भूमिका मांडत हा प्रसंग प्रदर्शित केला गेला.

राजा शिवछत्रपती कल्पनेच्या भराऱ्या

याआधी स्टार प्रवाह या चॅनेलवर ‘राजा शिवछत्रपती’ ही शिवाजी महाराजांच्या आयुष्यावरची मालिका चालू होती. या मालिकेत काल्पनिक इतिहासावर भर दिला होता, अशी टीका आजही केली जाते. ऐतिहासिक मालिकेतली वेशभूषा हीसुद्धा फार महत्त्वाची गोष्ट असते. पण राजा शिवछत्रपती या मालिकेत पेशवेकालीन पगड्या बांधलेल्या काही व्यक्ती शिवरायांच्या आजूबाजूला असायच्या. अनेक प्रसंगात सोनोपंत दबीर हे छत्रपती शिवाजी महाराजांना मार्गदर्शन करायचे. या गोष्टी कोणत्याही तथ्यावर किंवा पुराव्यांवर आधारित नव्हत्या.

इतिहासाच्या या मोडतोडीवर मी चित्रलेखा साप्ताहिकामधे एक लेख लिहिला होता. त्यानंतर मालिकेचे लेखक बदलण्यात आले आणि ती जबाबदारी प्रताप गंगावणे यांच्यावर सोपवली गेली. त्यांनी ती लीलया पार पाडली.

पुराव्यांच्या आधारे मांडणी करून ही मालिका पूर्णत्वास नेण्यात त्यांना यश आलं. इतिहासाचा अभ्यासक म्हणून काम करताना ऐतिहासिक कथा, कादंबऱ्या, मालिकांकडे आपल्याला एका वेगळ्या नजरेनं बघावं लागतं. कारण या गोष्टींचा जनमानसावर खूप मोठा प्रभाव पडत असतो.

हेही वाचा : शंभूराजांना औरंगजेबाच्या कैदेतून सोडवण्याचे प्रयत्न का झाले नाहीत?

१५० नाटकांनी शंभुराज्यांची बदनामी केली

नाटकातून येणाऱ्या इतिहासात फक्त २० टक्के तथ्य असतं. उरलेल्या ८० टक्के भागात फक्त कल्पनांच्या भराऱ्या मारलेल्या असतात. पण त्या कल्पनाही इतिहासाशी सुसंगत असाव्या लागतात. संभाजी महाराजांवर आजपर्यंत जवळपास १५० नाटकं रचली गेलीत.

संभाजी महाराजांच्या चरित्रावर जितकी नाटकं रचली गेली तितकी आजपर्यंत इतर कोणत्याही ऐतिहासिक व्यक्तिमत्वावर रचली गेलेली नाहीत. यात ‘रायगडला जेव्हा जाग येते’, ‘बेबंदशाही’, ‘गडकऱ्यांचे राजसंन्यास’ अशा कितीतरी गाजलेल्या नाटकांचा समावेश होतो.

या सगळ्याच नाटकातून संभाजी महाराजांना आरोपीच्या पिंजऱ्यात ठेवण्यात आलं आणि त्यांची प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष बदनामी करण्यात आली. त्यामुळे छत्रपती संभाजी राजांची ही बदनाम झालेली प्रतिमा बदलून टाकण्यासाठी आणि सामान्यांना माहीत नसलेला खरा इतिहास समोर आणण्यासाठी ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ ही मालिका सुरू करण्यात आली.

संस्कृतवरची मक्तेदारी मोडून काढली

महाराष्ट्रात धार्मिक वर्चस्व असणाऱ्या एका विशिष्ट जातीचा छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्यावर राग होता. त्याची सुरवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतर झाली. त्याआधी ते स्वराज्याशी एकनिष्ठ होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी सगळ्या वतनदाऱ्या जप्त केल्या. धार्मिक वतनंसुद्धा जप्त केली. त्यामुळे काही लोकांच्या धार्मिक अधिकारावर गदा आली.

याच वर्गानं पुढे छत्रपती संभाजी महाराज यांचाही द्वेष केला. त्यामागचं कारणंही धर्माशी निगडीत होतं. छत्रपती संभाजीराजे धर्मपंडित होते. वयाच्या १४ व्या वर्षी त्यांनी 'बुधभूषण' हा संस्कृत ग्रंथ लिहिला. प्राचीन ग्रंथांमधे राजाने राज्य करताना काय खबरदारी घ्यावी वगैरे गोष्टी सांगितल्या होत्या. त्या सगळ्या गोष्टींचं एकत्रीकरण संभाजी महाराजांनी बुधभूषण या ग्रंथात केलं होतं.

संस्कृत भाषेवर त्यांचं चांगलंच प्रभुत्व होतं. प्राचीन धर्मग्रंथांचा त्यांचा अभ्यास होता. हजारो वर्षांपासून संस्कृत भाषेवर अघोषित मालकी सांगणाऱ्यांसाठी हा मोठा धक्का होता. त्यांच्या विशेषाधिकारांवर अतिक्रमण झालं होतं. संस्कृत ही भाषा केवळ ब्राम्हणांची मक्तेदारी आहे, असा समज समाजात होता. त्याला संभाजी महाराजांनी छेद दिला. शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजेही संस्कृत पंडित होते. शिवरायांनाही ही भाषा अवगत होती. शिवरायांची मुद्रा संस्कृतमधे होती. त्यांनी भाषाशुद्धीकरणासाठी राजकोष तयार केला त्यावरही संस्कृतचा प्रभाव दिसून येतो.

हेही वाचा : मराठीतलं ऐतिहासिक ललित लेखन म्हणजे फॅन फिक्शन: नंदा खरे

सनातन्यांनी महाराजांचा वापर केला

पुराण ग्रंथानुसार ब्राम्हण हत्या हे सर्वात मोठं पाप मानलं जातं. छत्रपती संभाजी महाराजांनी स्वराज्यविरोधी कारवाया करणाऱ्या अष्टप्रधानातल्या काही ब्राम्हण मंडळींना थेट हत्तीच्या पायाखाली दिलं होतं. संभाजी महाराजांचं हेच कृत्य नंतरच्या काळात मंत्र्यांच्या वारसांना झोंबलं. संभाजी महाराजांची बदनामी करणारं साहित्य साधारणतः १८१८ नंतर लिहिण्यात आलं. त्याची सुरवात मल्हार रामराव चिटणीस यांच्या बखरीपासून झाली. त्यामधून संभाजी महाराजांची प्रतिमा बदफैली, नशाबाज अशी करण्यात आली.

वासुदेव सीताराम बेंद्रे आणि कमल गोखले यांनी पुराव्यांच्या आधारे संभाजी महाराजांचा पराक्रमी, शौर्यशाली गौरवशाली इतिहास समाजासमोर आणला. वा. सी. बेंद्रे यांनी संभाजी महाराजांच्या चरित्राचा खूप खोलवर अभ्यास केला. त्यासाठी त्यांनी आयुष्यातली जवळपास १५ ते २० वर्ष खर्च केली. त्यानंतर हळूहळू संभाजी महाराजांबद्दलचा दृष्टिकोन बदलू लागला.

या बदललेल्या प्रतिमेचा वापर आपल्या विचारधारेसाठी आणि स्वार्थासाठी करणं, प्रतिमा चौर्य करणं ही सनातनी चाल आहे. समाजातल्या एका गटाने छत्रपती शिवराय यांच्याप्रमाणेच छत्रपती संभाजी राजांचादेखील आपल्या स्वार्थासाठी वापर करण्यास सुरवात केली. संभाजी महाराजांची धर्मवीर ही प्रतिमा वेगळ्या पद्धतीने समाजासमोर आणण्यास सुरवात झालीय.

धर्मवीर नाही, स्वराज्यरक्षक

शिवराय असो किंवा संभाजी महाराज या दोघांनाही आपल्या धर्माबद्दल प्रचंड अभिमान आणि आदर होता. पण केवळ धर्मवीर या प्रतिमेत संभाजीराजांना बंदिस्त करून त्यांचं खरं कार्य समाजासमोर आणलं गेलं नाही. वा. सी. बेंद्रेच्या पावलावर पाऊल टाकत नंतर अनेक लेखकांनी आपल्या लिखाणातून संभाजी महाराजांचं खरं चरित्र समाजासमोर आणण्यास सुरवात केली. पण त्याला एक मर्यादा होती.

त्यामुळे बरीच चर्चा झाल्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांवर 'स्वराज्यरक्षक संभाजी' ही मालिका सुरू करण्याचं ठरलं. त्याआधारे केवळ धर्मवीर ते स्वराज्यरक्षक ही प्रतिमा पुढे आणायची होती. स्वराज्यरक्षक म्हणजे स्वराज्याचं रक्षण करणारा आणि ते वाढवणारा रयतेचा राजा ही खरी प्रतिमा आणि खरा इतिहास लोकांसमोर आणायचा ठरला. डॉ. अमोल कोल्हे यांचा अभिनय, लेखकाचे धारदार, प्रभावशाली संवादलेखन आणि तथ्यांवर आधारलेल्या घटना यामुळे बघता बघता ही मालिका लोकप्रिय झाली.

हेही वाचा : तान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं?

दुर्लक्षितांना प्रकाशझोतात आणलं

दोन वर्षापूर्वी या मालिकेत जिजाऊ माँसाहेबांच्या मृत्यूचा प्रसंग दाखवण्यात आला. तो नेमका दिवाळीतल्या लक्ष्मीपूजनादिवशी दाखवला होता. पण लोकांच्या भावना आणि दुःख एवढं तीव्र होतं की अनेकांनी दिवाळी साजरी केली नाही. त्याच्याच पुढच्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनाचा प्रसंगही दिवाळीच्या सणातच येणार होता.

पण मागच्या अनुभवावरून हा प्रसंग लांबवण्याचं ठरलं आणि दिवाळीनंतर हा प्रसंग दाखवण्यात आला. पण या प्रसंगानंतर संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली. वॉट्सअप, फेसबुक अशा सोशल मीडियावर त्यासंबंधी प्रतिक्रिया उमटत होत्या. काही हा प्रसंग जणू आत्ताच घडलाय, अशी लोकांची भावना होती.

छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांची भेट ही मालिकेची लिबर्टी म्हणून पन्हाळ्याच्या पायथ्याशी मसूद माले या गावच्या एका भवानीमातेच्या मंदिरात दाखवण्यात आली. हे मंदिर शिवकालीन नव्हतं. नंतरच्या काळातलं होतं. मालिकेची लिबर्टी म्हणून ते ठिकाण घेण्यात आलं. पण या प्रसंगानंतर मसूद माले या गावी जत्रेसारखी गर्दी जमू लागली. दूरदूरवरून अनेक लोक त्या ठिकाणी येऊन भेट देऊ लागले.

या मालिकेमधून इतिहासातली अनेक पात्रं लोकांच्या पसंतीस आली. त्यातून  सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचं स्वराज्यासाठी असणारं निस्वार्थी योगदान हे ठळकपणे समाजासमोर आलं. त्यानंतर त्यांच्या मूळ गावी तळबीडला असणाऱ्या त्यांच्या स्मारकाचं दर्शन घेण्यासाठी शिवप्रेमींची अलोट गर्दी होऊ लागली. कोंडाजी फर्जंद यांचा जंजिऱ्यावरचा पराक्रम, आतापर्यंत दुर्लक्षित राहिलेल्या रामशेजची चिवट झुंज अशा अनेक घटना, अनेक पराक्रमी घराणी, सरदार या मालिकेमुळे लोकांसमोर आले.

शंभुराज्यांचं बलिदान येशू ख्रिस्तासारखं

छत्रपती संभाजी महाराजांची कैद आणि मृत्यूपर्यंतचा त्यांचा एकूण २९ दिवसांचा प्रवास ही मालिकेतली घटना महाराष्ट्रातली लहान मुलं, महिला, तरुण, वयोवृद्ध या सगळ्यांसाठी दुःखद होती. इतिहासाचा एक भाग म्हणून तो प्रसंग दाखवावा लागला. संभाजी महाराजांनी स्वराज्यासाठी दिलेल्या बलिदानाची तुलना थेट येशू ख्रिस्ताच्या बलिदानाशी होऊ शकते.

या मालिकेचा लोकांवर परिणाम सकारात्मक झाला. ऐकीव माहिती किंवा नाटक, कथा-कादंबऱ्या यांच्या आधारे छत्रपती संभाजी राजांचं विरोधी चरित्र लोकांसमोर होतं. जुन्या माणसांचं त्यांच्याबद्दलचं मत पूर्वग्रह दूषित होतं. अशावेळी छत्रपती संभाजी महाराजांना या खोट्या बदनामीच्या प्रतिमेतून बाहेर काढून महापराक्रमी, शूरवीर, रयतेची काळजी घेणारा, स्वराज्यरक्षक अशा पद्धतीनं पुढं आणण्यास या मालिकेनं हातभार लावला.

गडकरी, सावरकर, गोळवळकर अशा लोकांनी त्यांच्या साहित्यातून संभाजी महाराजांची बदनामी केली होती. ती या मालिकेमधून पुराव्यानिशी खोडून काढण्यात आली. यामुळे लोकांना आता खरे संभाजी महाराज समजायला लागले. त्यांचा संभाजी महाराजांकडे पाहण्याचा दृष्टिकोन निश्चितच बदललाय.

हेही वाचा : राजमाता जिजाऊ म्हणजे स्वराज्याचा आधारवड

लोकांना संघर्षाचा इतिहास भावला

काही गोष्टी या मालिकेत दाखवायला नको होत्या. गोदावरी हे इतिहासात कोणताही पुरावा नसलेलं काल्पनिक पात्र या मालिकेमधे घुसवण्यात आलं. त्यावर लेखक आणि निर्मात्यांचं मत वेगळं होतं. आत्तापर्यंत कथा-कादंबऱ्या, नाटकाच्या माध्यमातून गोदावरी या काल्पनिक पात्राआडून संभाजीराजांची प्रचंड बदनामी करण्यात आली. आता जर या मालिकेतून हे प्रकरण वगळलं तर त्यावर शिक्कामोर्तबच होणार होता. शेवटी खूप चर्चे करून हा आरोप खोडून काढणं आवश्यक आहे, असं ठरलं. त्यासाठी हे प्रकरण मालिकेत समाविष्ट केलं गेलं.

छत्रपती संभाजी महाराजांचे एकूण जीवनच खूप नाट्यमय घडामोडींनी खच्चून भरलंय. त्यांचं लहानपण ते त्यांचा मृत्यू यामधे अनेक चढउतार आले. स्वराज्यनिर्मितीसाठी प्रेरणा देणाऱ्या जिजाऊ माँसाहेब या त्यांना आजी म्हणून तर स्वराज्य संस्थापक शिवराय हे वडील म्हणून लाभले. जीवाला जीव देणारे सहकारी, खलनायक म्हणून मुघलसम्राट औरंगजेब, कटकारस्थानं करणाऱ्या अनाजीपंतांसारखी अनेक पात्रं त्यांच्या जीवनात आली. 

अवघ्या नवव्या वर्षी त्यांना आग्र्याला जावं लागलं. तिथून सुटका झाल्यानंतर एक महिना मथुरेला अज्ञातवासात रहावं लागलं. त्यानंतर चार महिन्यांचा प्रवास करत ते रायगडावर पोचले. त्यांच्याविरोधातल्या अंतर्गत कारवाया, त्यांची बुऱ्हाणपूरची लूट, गोव्यावरची स्वारी, जांजिऱ्यावरची स्वारी आणि त्यासाठी समुद्र भरून काढायची योजना या सगळ्या घटना आणि पराक्रमामुळे त्यांचं चरित्र झळाळून निघालंय. त्यामुळे या सर्व गोष्टींची लेखकांना नाट्यमय स्वरूपात मांडणी करणं सोपं गेलं. एकूणच हा संघर्षाचा इतिहास लोकांना भावला.

शंभुराजांवर सिनेमाही काढावा

पुस्तकाच्या किंवा कादंबरीच्या माध्यमातूनही अनेकांनी संभाजी महाराज वाचले असतील. पण पुस्तकांच्या प्रसाराला मर्यादा आहेत. वाचणारे लोक खूप असतात. अनेक चांगल्या लेखकांची आवृत्ती खपता-खपता अनेक वर्ष निघून जातात. त्यामुळे त्याचा समाजावर तितकासा प्रभाव पडत नाही.

पण स्वराज्यरक्षक संभाजी मालिका एकाच वेळी लाखो लोकांनी पाहिली. ऐतिहासिक पुराव्यांच्या आधारावर मांडणी केल्याने तिला नेहमीच सर्वाधिक प्रेक्षक वर्गाचा मोठा पाठिंबा लाभला. सोबतच त्याला सोशल मीडियाचीही जोड मिळाली. त्यामुळे या मालिकेने लोकप्रियतेचे सर्व उच्चांक मोडीत काढले. 

पुढे मागे संभाजी महाराजांच्या जीवनातल्या एका एका घटनेवर स्वतंत्र असा बिग बजेट सिनेमाही काढता येईल. पण या मालिकेमुळे धर्मवीर ते स्वराज्यरक्षक असा संभाजी महाराजांच्या प्रतिमेचा झालेला प्रवास लोकांना भावला. रायगडाप्रमाणेच संभाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घ्यायला आता वढू बुद्रुक इथं गर्दी होते. याचं बरंच श्रेय या मालिकेला जातं. त्यामुळे महाराष्ट्रासाठी असणारा एक महत्वाचा प्रोजेक्ट पूर्ण झाला, असं म्हणायला हरकत नाही.

हेही वाचा : 

पानिपतच्या आधी नेमकं काय झालं होतं? 

पुण्याचे पेशवे: किती होते? कोण होते? कसे होते?

शाहू महाराजांनी खरंच ब्रिटिशांना मदत केली होती?

अफजलखानाचा कोथळा काढला यात दगलबाज शिवरायाचं काय चुकलं?

(प्रख्यात इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत हे स्वराज्यरश्रक संभाजी या मालिकेचे इतिहासविषयक सल्लागर होते. त्यांच्या या लेखाचं शब्दांकन अभिजीत जाधव यांनी केलंय.)