इलेक्ट्रिक गाड्या पर्यावरणपूरक की घातक?

०५ ऑक्टोबर २०२१

वाचन वेळ : ६ मिनिटं


महाराष्ट्रात आणि भारतातही इलेक्ट्रिक गाड्यांची संख्या वाढलीय. त्यामुळे शहरांमधलं प्रदूषण कमी होतंच पण जागतिक तापमानवाढ, हवामान बदल रोखण्यातही मदत होते, असं सांगितलं जातं. पण हे अर्धसत्य आहे. काही गोष्टींची काळजी घेतली तरच ते शक्य आहे. नाहीतर या गोष्टी केवळ कागदावरच राहतील असं नाही तर त्यामुळे पर्यावरणावर आघात होण्याचा धोका वाढतो.

महाराष्ट्राच्या अनेक शहरांमधे रस्त्यांवर मोठ्या संख्येने इलेक्ट्रिक गाड्या दिसत आहेत. हिरव्या नंबर प्लेट असलेल्या टू विलर्स, गाड्यांबद्दल पूर्वी अप्रूप वाटायचं, ते आता राहिलेलं नाही. आताची परिस्थिती पाहता इलेक्ट्रिक गाड्या वापरण्याची दोन कारणं पुढे येत आहेत.

एक म्हणजे पेट्रोल, डिझेलची मोठ्या प्रमाणात झालेली दरवाढ, पेट्रोलने ओलांडलेली शंभरी. अशा परिस्थितीत या गाड्या वापरायला परवडतात. पेट्रोल-डिझेलच्या तुलनेत चार्जिंगसाठी फारसा खर्च येत नाही. त्यांची देखभालही विशेष नसते. त्यामुळे दैनंदिन खर्च कमी होतो.

दुसरं कारण म्हणजे, या गाड्यांना ‘इको-फ्रेंडली’ म्हणून मिळालेली मान्यता. त्यामुळे पर्यावरणाबाबत आस्था वाटणारे अनेक जण या गाड्यांचा वापर करतात. रस्त्यावरचं प्रदूषण कमी करणाऱ्या, गोंगाट न करणाऱ्या गाड्या म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. आणि ते खरंही आहे.

अजून एक गोष्ट म्हणजे या गाड्यांमुळे जागतिक तापमानवाढ रोखायला मदत होणार आहे. कार्बन वायूंचं उत्सर्जन होणार नाही. त्यामुळे या खऱ्या अर्थाने ‘ग्रीन गाड्या’ ठरतील आणि आपल्याला जागतिक तापमानवाढ, हवामान बदल या समस्यांमधून वाट काढून देतील.

हेही वाचा: ‘संवर्धन राखीव वनक्षेत्र’ सगळ्यांसाठी फायद्याची का ठरतात?

इलेक्ट्रिक गाड्यांना प्रोत्साहन

अलीकडच्या काळात, केंद्र आणि राज्य सरकारच्या पातळीवरही हा मुद्दा जोरकसपणे मांडला जात आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी तसंच महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडूनही अशी मांडणी होत आहे. त्यामुळे या गाड्यांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने धोरणं आखली जात आहेत.

भारतातला भविष्यातला गाड्यांचा उद्योग कोणत्या दिशेने जाणार आहे, हेही यावरून स्पष्ट होत आहे. या गाड्या एकदा चार्ज केल्यावर जास्त अंतरापर्यंत चालाव्यात यासाठी लागणाऱ्या जास्त क्षमतेच्या बॅटरीज तसंच, त्या झटपट चार्ज करण्यासाठी पुरेशी ‘चार्जिंग स्टेशन’ ही आताची आव्हानं भविष्यात दूर होतील आणि या गाड्यांना, उद्योगाला चालना मिळेल, असं आताचं वातावरण आहे.

पण गाड्यांचा ज्या प्रकारे ‘ग्रीन’ म्हणून प्रचार केला जातोय, तितक्या प्रमाणात या गाड्या पर्यावरणस्नेही आहेत का? त्याचबरोबर त्यांच्या वापरामुळे हवामान बदलाची समस्या दूर होईल यात तथ्य आहे का? हे प्रश्न आहेत. या प्रश्नांमुळे काही वाचक कदाचित संभ्रमात पडतील.

हवेचं आणि आवाजाचं प्रदूषण न करणाऱ्या या गाड्या असताना त्यांच्याबद्दल या शंका का घेतल्या जात आहेत, असा त्यांचा सवाल असेल. मात्र, या गाड्यांचं स्वागत करताना त्यांच्याबद्दल नेमकी वस्तुस्थिती लक्षात घेतली नाही तर कदाचित पुढे कोणत्या दिशेने जायला हवं, यात आपली फसगत होण्याची शक्यता आहे.

इलेक्ट्रिक गाड्या कशावर चालतात?

इलेक्ट्रिक गाड्यांमधे बॅटरी असते. त्यामुळे बॅटरीवर चालणाऱ्या इतर उपकरणांप्रमाणेच उदा. मोबाईल, लॅपटॉप, वगैरे या गाड्यांमधे ऊर्जा साठवली जाते आणि वापरली जाते. सध्याची पेट्रोल, डिझेल, नैसर्गिक वायू यासारख्या इंधनावर चालणाऱ्या परंपरागत गाड्या यांच्यात वापरली जाणारी ऊर्जा आणि आताच्या इलेक्ट्रिक गाड्या यांच्यात ऊर्जेच्या वापरासंबंधी एक मूलभूत फरक आहे. दोन्ही प्रकारच्या गाड्यांमधे ऊर्जा कोणत्या ना कोणत्या रूपात साठवलेली असते.

परंपरागत गाड्यांमधे ती पेट्रोल, डिझेल, गॅस यासारख्या इंधनाच्या रूपात, तर इलेक्ट्रिक गाड्यांमधे बॅटरीच्या रूपाने ऊर्जा साठवलेली असते. मात्र, या साठवलेल्या ऊर्जेचं रूपांतर चल उर्जेत, कायनेटिक एनर्जी केल्याशिवाय गाड्या चालू शकत नाही. ते होताना परंपरागत गाड्यांमधे इंधनाचं ज्वलन होतं. त्या वेळी त्यातून कार्बन डाय ऑक्साईड किंवा इतर वायू बाहेर पडतात. हेच वायू जागतिक तापमानवाढ करायला कारणीभूत ठरतात. याशिवाय इंधनाचं पूर्ण ज्वलन न झाल्यास त्यातून धूर आणि इतर प्रदूषित घटकही बाहेर पडतात.

याउलट इलेक्ट्रिक गाड्यांमधे असं ज्वलन होत नाही. त्याऐवजी साठवलेल्या ऊर्जेचं चल ऊर्जेत रूपांतर होताना ते विद्युत-रासायनिक पद्धतीनं होतं. त्यामुळे कार्बन डाय ऑक्साईडसारख्या वायूंचं उत्सर्जन होत नाही, शिवाय धूर आणि इतर प्रदूषित घटकही बाहेर पडत नाहीत. इलेक्ट्रिक गाड्यांच्या वापराचे काही फायदे आहेतच. पण इथं एक प्रश्न उपस्थित होतो की, बॅटरी चार्ज करण्यासाठी लागणारी वीज कुठून येते? आणि ती कशी तयार केली जाते?

हेही वाचा: तुम्ही मोबाईल चार्जरशिवाय विकत घेणार का?

वीज अशी तयार होते

इलेक्ट्रिक गाड्यांना लागणारी वीज स्वच्छ प्रकारच्या पद्धतींनी उदा. सौरऊर्जा, पवनऊर्जा, भूऔष्णिकऊर्जा, जलविद्युत यांनी निर्माण केली जात असेल तर या गाड्यांना पूर्णपणे ‘ग्रीन’ म्हणता येईल. पण या गाड्यांसाठी लागणारी ऊर्जा अशा स्वच्छ पद्धतींऐवजी कोळसा, खनिज तेल किंवा नैसर्गिक वायू यासारखं जीवाश्म इंधन जाळून केली जात असेल हा हेतू साध्य होत नाही.

जागतिक तापमानवाढ रोखण्यासाठी कार्बन वायूंचं उत्सर्जन कमी करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी वीज स्वच्छ पद्धतींनी निर्माण होते ना, हे निश्चित करणं गरजेचं आहे. नाहीतर वीज तयार होताना जीवाश्म इंधन जाळलं जात असेल आणि अशा विजेवर इलेक्ट्रिक गाड्या चार्ज केली जात असतील तर अपेक्षित परिणाम साध्य होणार नाही. अशा परिस्थितीत गाड्यांमधून कार्बन वायूंचं उत्सर्जन झालं नाही तरी जिथे कुठे वीजनिर्मिती केली जाते, तिथे या वायूंचं उत्सर्जन होणारच.

हे सगळं आपल्या नजरेआड होत असल्याने कदाचित या गाड्या ‘ग्रीन’ वाटतील, प्रत्यक्षात त्या तशा नसतील. याचा एक फायदा नक्की आहे. अलीकडे दिल्लीसारख्या महानगरांमधे हवेचं प्रदूषण ही प्रचंड मोठी समस्या बनली आहे. त्या दृष्टीने रस्त्यावर धुराचं प्रदूषण न करणाऱ्या गाड्या फायदेशीर आहेत. पण त्यांच्यामुळे जागतिक तापमानवाढ आणि हवामान बदलाची समस्या सुटेल, हे म्हणणं अर्धसत्य आहे.

प्रत्यक्ष परिस्थिती काय?

भारताची ऊर्जानिर्मितीची स्थिती पाहता अजूनही आपण मोठ्या प्रमाणावर जीवाश्म इंधनावरच अवलंबून आहोत. याबद्दल नेमकेपणाने आकडेवारी सांगता येईल. केंद्र सरकारच्या केंद्रीय वीज प्राधिकरणानुसार, देशात जीवाश्म इंधन आणि इतर स्वच्छ इंधन यांच्या क्षमतेचं गुणोत्तर सुमारे ६० : ४० असं आहे. याचाच अर्थ जवळजवळ ४० टक्के ऊर्जा स्वच्छ स्रोतांद्वारे निर्माण केली जाऊ शकते.

या प्राधिकरणाची २०२० वर्षातली वीजनिर्मितीची आकडेवारी वेगळं चित्र दाखवते. गेल्या संपूर्ण वर्षात देशात झालेल्या ऊर्जानिर्मितीत ८४ टक्के वाटा हा जीवाश्म इंधनाचा आहे. तो वेगवेगळ्या महिन्यात ७९ ते ९० टक्क्यांच्या दरम्यान खाली - वर झाला होता.

याचाच अर्थ अजूनही आपण बहुतांश ऊर्जेची निर्मिती जीवाश्म इंधनावरच करत आहोत. या विजेवर इलेक्ट्रिक गाड्यांच्या बॅटरी चार्ज होणार असतील तर मग नुसत्या या मोटारी वापरल्या म्हणून कार्बन वायूंचं उत्सर्जन कसं कमी होणार हा आपल्याकडचा मोठा प्रश्न आहे.

हेही वाचा: एका झाडाची किंमत शोधली कशी?

तरच गाड्या पर्यावरणस्नेही बनतील

या गाड्या लगेचच पर्यावरणस्नेही बनणार नाहीत आणि त्यांच्या वापरामुळे आपल्याला अपेक्षित असलेल्या ‘ग्रीन’ गोष्टी घडून येणार नाहीत. त्यांना चार्ज करणारी ऊर्जा सौर, पवन, भूऔष्णिक, जल किंवा वाया जाणारा काडी-कचरा अशा स्वच्छ स्रोतांपासून तयार होणार नाही, तोपर्यंत त्यांना पर्यावरणस्नेही म्हणता येणार नाही.

या गाड्यांना चार्ज करणारी संपूर्ण वीजसुद्धा पर्यावरणस्नेही असायला हवी. त्यानंतर मग त्यांना खऱ्या अर्थाने ‘ग्रीन’ हा किताब देता येईल. तेच लक्ष्य ठेवून आपली पुढील मार्गक्रमणा करायला हवी. किंबहुना, या गाड्यांच्या चार्जिंगसाठी लागणारी सर्वच्या सर्व वीज ही स्वच्छ स्रोतांमधूनच यायला हवी, अशी सक्ती केली तर या गाड्यांचा प्रसार आणि त्यांचं खरंखुरे ‘ग्रीन’ बनणं हे एकमेकांना समांतर असं घडून येईल.

असा करतील पर्यावरणावर परिणाम

इलेक्ट्रिक गाड्यांसाठी बॅटरीची आवश्यकता असते. कार्यक्षम बॅटरीसाठी पृथ्वीवर कमी प्रमाणात सापडणारी लिथियम, निकेल, कोबाल्ट, ग्राफाईट यासारखी दुर्मिळ मूलद्रव्यं वापरली जातात. ती मिळवण्यासाठी जास्त प्रमाणात ऊर्जेची गरज लागते. या प्रक्रियेत प्रदूषित घटक मोठ्या प्रमाणात निर्माण होतात.

उदाहरण द्यायचं झालं तर, एक टन इतक्या वजनाची ही मूलद्रव्यं मिळवायची असतील तर ७५ टन इतकं अॅसिड वापरावं लागतं. आणि या घातक अॅसिडची विल्हेवाट योग्य पद्धतीने लावली जातेच असं नाही. या प्रकारेही या गाड्यांचा पर्यावरणावर परिणाम होत असतो. ही गोष्टही लक्षात घ्यावी लागेल.

हेही वाचा: 

क्रिकेटचे लघुउद्योग सुटलेत सुसाट

देशासाठी रोल मॉडेल नाशिकची मेट्रो

मालवणच्या राजकीय आखाड्यात अमित शहांच्या गजाली

श्यामकांत मोरे: कम्युनिटी किचनच्या जनकाची जन्मशताब्दी

पाऊस तर जगभर पडतो, पण भारतातला मान्सून जगावेगळा आहे!

(लेखक भवताल नियतकालिकाचे संपादक असून त्यांचा भवतालच्या ताज्या अंकातला हा लेख आहे)