सुरक्षेची जबाबदारी महिलांवर ढकलून बलात्कार थांबणार का?

०२ डिसेंबर २०१९

वाचन वेळ : ६ मिनिटं


तेलंगणातल्या प्रियांका रेड्डी बलात्कार आणि हत्या प्रकरणानं पुन्हा एकदा मुलींच्या सुरक्षेविषयी बोललं जातंय. पोलिस अधिकारी पल्लवी त्रिवेदी यांनी मुलींनी काय करावं आणि काय करू नये, असं सांगणारी एक संस्कारी पोस्ट फेसबुकवर लिहिलीय. पण मुलींनी काय करावं हे सांगण्यापेक्षा मुलांनी काय करावं हे सांगणं गरजेचं आहे, हे सांगणं गरजेचं असल्याचं पत्रकार रवीश कुमार यांनी फेसबूक पोस्टमधे म्हटलंय.

हैदराबादमधल्या प्रियांका रेड्डी या तरूणीवर झालेल्या अत्याचारानं सारा देशाच्या संवेदनशीलतेला धक्का बसला. आपण भोगलेला देह जाळून टाकावा इतकी क्रुर भावना मनात येऊ तरी कशी शकते असा प्रश्न आपल्या सगळ्यांनाच पडलाय.

या निमित्ताने पुन्हा एकदा मुलींच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आलाय. बलात्कारविरोधी शिक्षा आणखी कडक करावी. अशा लोकांना भर चौकात फाशी देऊन मारलं पाहिजे. यासोबतच मुलींनी कराटे शिकावेत. मुलींनी पेपर स्प्रे बाळगावा. आई-वडिलांनी मुलीला एकटं सोडू नये. असे एक ना अनेक उपाय सांगितले जाताहेत. पण या सगळ्याचा खरंच उपयोग होतो का?

भोपाळ इथे कार्यरत असलेल्या अतिरिक्त पोलिस अधिकारी पल्लवी त्रिवेदी यांनीही मुलींनी काय काय करावं याची एक सविस्तर यादीच दिलीय. फेसबुक पोस्टच्या माध्यमातून त्यांनी आपला हा संदेश दिलाय. मुलींना हत्यार वापरायला शिकावं इथपासून ते पालकांनी मुलांवर लक्ष ठेवावं इथपर्यंत प्रत्येक गोष्ट त्रिवेदी यांनी सविस्तरपणे सांगितल्यात. 

त्रिवेदी अत्यंत पोटतिडकीनं सांगतायत, हे लक्षात घ्यायला हवं. एक पोलिस म्हणून, देशाची एक नागरिक म्हणून त्यांना इथल्या मुलींच्या सुरक्षिततेची चिंता वाटते. त्यांची काळजी अस्सल आहे. पण ती व्यक्त करण्याचा त्यांचा मार्ग चुकतोय असं म्हणता येईल. मुलींनी स्वसंरक्षण कसं करावं यापेक्षा पुरुषांनी महिलांचा सन्मान कसा करावा याबाबत बोलणं गरजेचंय. आणि पत्रकार रविश कुमार यांनी नेमकं याचं मुद्द्यावर बोट ठेवलंय.

रविश कुमार यांनी आपल्या फेसबूक पोस्टच्या सुरवातीलाच पल्लवी त्रिवेदी यांचा फेसबूक पोस्टमधे मुद्दे जशास तसे मांडलेत. त्यानंतर त्यांनी स्वतःचं त्यावरचं मत व्यक्त केलंय. प्रियांका रेड्डी बलात्कार प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर रविश कुमार यांची ही टिपणी फारच महत्वाची आहे.

पल्लवी त्रिवेदी यांच्या पोस्टमधले मुख्य मुद्दे -

१. अज्ञान म्हणजेच १८ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलींवर बलात्कार झाला तर त्याची सर्वात जास्त जबाबदारी पालकांची आणि शाळा प्रशासनाची असते. अशा मुली नेमकं काय झालंय हे नीटपणे सांगू शकत नाहीत. त्यामुळे त्यांना सतत नरजेसमोर ठेवणं गरजेचं आहे. ड्रायवर, नोकर, नातेवाईक, ट्युशन टीचर अशा पुरुषांसोबत त्यांना एकटं सोडू नये. आणि लहान मुलींचे कपडे बदलणं, त्यांना आंघोळ घालणं अशी कामं पुरुषांना सांगू नयेत.

मुलगी तीन वर्षांची झाली की तिला गुड टच बॅड टच काय असतं हे सांगावं. वयाच्या आठव्या वर्षी मुलींना अश्लील चाळे आणि बलात्काराचा अर्थ समजवून सांगावा. या गोष्टींची मसज मुलींमधे निर्माण व्हावी यासाठी मुलींना हे सारखं सांगत राहावं. आणि हे एकदा सांगून भागणार नाही. कुणी पुरुष अश्लील इशारे, पॉर्न वीडिओ दाखवणं किंवा हस्तमैथून करत असेल तर लगेचच पालकांना येऊन सांगायचं असं तिला सांगावं. असं करणारा माणूस पुढे बलात्कार करण्याची शक्यता असते. ओरडून, गरज पडली तर थोडा मार देऊन हे मुलींच्या मनावर कायमचं बिबंवलं पाहिजे.

२. वयात येणाऱ्या मुलींना बाहेर जाण्यापासून थांबवू नका. पण त्यांना स्वतःची सुरक्षा कशी करायची ते शिकवा. त्यांच्याजवळ वन टच पोलिस इमरजन्सी नंबर ठेवा. पेपर स्प्रे, चाकु, कात्री, सेफ्टी पिन, मिरची पावडर अशा गोष्टी तिच्या बॅगमधे असायलाच पाहिजेत. याचा सराव तिच्याकडून करून घ्यावा. कारण सराव नसेल तर ऐनवेळी अशा गोष्टींचा काही उपयोग होत नाही.

मार्शल आर्टसारख्या गोष्टी आपल्या मुलींना शिकवायच्या आहेत हे ध्यानात ठेवा. तरूण आणि सगळ्याच मुलींनी अशी हत्यारं आपल्या पर्समधे ठेवावीत आणि गरज पडेल तेव्हा मागंपुढं न पाहता त्याचा वापर करावा. या हत्यारांसोबत एक जोरात आवाज करणारी शिट्टी आपल्याजवळ ठेवावी. संकटाच्या वेळी ती शिट्टी जोरात मारून आसपासच्या लोकांना सावध करावं. शक्य असेल तर कंपन्यांनी असं एखादं मशीन बनवावं.

३. मुली, महिलांनी पोलिस कंट्रोल रूम किंवा कोणत्याही पोलिस अधिकाऱ्याचा नंबर नेहमी आपल्यासोबत ठेवावा. मोबाईलमधे पोलिस ऍप ठेवावं. जवळच्या पोलिस ठाण्यात जाणं-येणं करून त्या पोलिसांशी मैत्री करावी. संकटाच्या वेळी पोलिसांना लगेच कॉल करावा. जवळच्या पोलिस स्टेशनमधून लवकरात लवकर तुम्हाला मदत पुरवली जाईल.

देशातल्या प्रत्येक मुलीला हवं तेव्हा फिरता आलं पाहिजे. पण आत्ता ती परिस्थिती नाही. पोलिस नेहमीच मदत करू शकतील असं होणार नाही. रात्रीच्या वेळी एकट्यानं घराबाहेर पडू नये. पार्टीमधून घरी जाताना तुमचं लोकेशन घरच्यांसोबत शेअर करा. कॅब किंवा टॅक्सीवाल्याचा फोटो घरच्यांना पाठवा याची माहिती त्या टॅक्सीवाल्याला असू द्या.

४. आरोपी एकटा असेल तर त्याच्याशी सामना करता येऊ शकतो. त्यानं बलात्कार करायचा प्रयत्न केला तर त्याचे टेस्टिकल्स म्हणजेच वृषणं दोन्ही हातानी धरा आणि जितक्या जोरात दाबता येतील तितक्या जोरात दाबा. यानं तो आरोपी काही वेळ अशक्त होईल आणि मुलीला पळून जाण्याची संधी मिळेल.

५. सगळ्यात महत्वाचं म्हणजे समाज स्त्रियांसाठी सुरक्षित बनवला पाहिजे. त्यासाठी आपल्या घरातल्या, गल्लीतल्या आणि समाजातल्या मुलांना लहानपणापासूनच समजावलं पाहिजे. मुलगा दहा, बारा वर्षांचा झाला की त्याच्यावर नजर ठेवावी. त्याचा मोबाईल, त्याचे मित्र, त्याच्या सवयी सगळ्यावर लक्ष ठेवा. समाजातल्या बलात्काराच्या घटनांविषयी त्याच्याशी बोला आणि त्याला संवेदनशील बनवा. महिलांचा आदर करायला शिकवा.

यासोबतच बलात्काराची शिक्षा किती मोठी असते त्याचं भय त्यांच्या मनात निर्माण करा. आपल्या आसपासचा मुलगा सेक्स ऍडिक्ट असेल तर त्याला मानसशास्त्रज्ञाकडे घेऊन जा. त्याचं समुपदेशन करा. कुणी मवाली, दारूडा पुरुष आसपास असेल तर त्याची तक्रार करा.

हा बदल एका दिवसात होणार नाही. त्यासाठी रोज प्रयत्न केले पाहिजेत, असं पल्लवी त्रिवेदी यांना वाटतं. ही पोस्ट त्यांनी सोशल मीडियावर टाकली. त्यांची पोस्ट फार वायरल झाली. अनेकांनी ती शेअर केली. त्यांच्या या पोस्टवर रविश कुमार यांनी काही आक्षेप घेतलेत. 

रविश कुमार म्हणतात -

१. पल्लवी त्रिवेदी यांच्या पोस्टमधे अनेक चुका आहेत. मुलीची किंवा महिलांची क्षमता वाढवली, त्यांना हत्यारं दिली तरी बलात्कार थांबणार नाहीत. बलात्कार थांबवण्याची जबाबदारी महिलांवर टाकणं बरोबर नाही. हे विक्टिम ब्लेमिंग म्हणजे पिडीतेलाच दोषी ठरवण्यासारखं आहे.

आरोपी एकटाच असेल तर त्याच्याशी सामना करणं सोपं आहे. फक्त त्याची वृषण पकडून दाबायची असं या पोस्टमधे लिहिलंय. पोस्ट लिहिणारी व्यक्ती कदाचित कधीही बलात्कार पिडितेला भेटलेली नाही. हल्ला झाला की पिडिता जागीच फ्रिझ होते. हालचाल करूच शकत नाही. आरोपी एकच असला तरीही.

२. असं बोलणं म्हणजे तिला स्वतःचं संरक्षण करायला शिकवणं नसतं तर तिला गुन्हेगार ठरवणं असतं. बलात्कारापासून वाचणं सोपं होतं. तू वाचली का नाहीस? वृषणं का पकडली नाहीस? एकच तर आरोपी होता. तू वाचू शकली असतीस. कराटे का शिकली नाहीस? पेपर स्प्रे का जवळ ठेवला नाहीस? वगैरे वगैरे. हे सगळं विक्टीम ब्लेमिंग आहे.

प्रत्यक्षात आपण हे विचारलं पाहिजे की मुलांच्या संगोपनाचे मार्ग कसं बदलावेत. मुलींना वाढवताना एकच गोष्ट करायची गरज आहे. ती बलात्कर आणि लैंगिक हिंसेसाठी तू जबाबदार नाहीस. त्याच्यापासून संरक्षण करण्याची जबाबदारी तुझी नाही. कधीही अशी घटना झाली तर न घाबरता आमच्याशी बोल. आम्ही तुझी साथ देऊ.

३. बलात्कार करणारी माणसं राक्षस नसतात. नेहमी चांगले पुरुष बलात्कार करतात. पुरुष बाईच्या संमतीविना तिच्यावर आपला हक्क सांगतात. सर्वात जास्त बलात्कार नातेवाईक, विश्वासू वाटणाऱ्या माणसांकडून होत असतो. घराच्या चार भिंतीत जास्त लैंगिक हिंसाचार होतो. खासकरून लहान मुलांसोबत. लैंगिक संबंध करताना दोघांच्याही सहमतीची आवश्यकता असते हे मुलगा आणि मुलगी दोघांनाही सांगितलं पाहिजे.

४. लैंगिक अत्याचार फक्त मुलींसोबतच होतो असा पूर्वग्रह या पोस्टमधून दिसून येतो. पण मुलांवरही लैंगिक हिंसाचार होत असतो. मुलींनी रात्री कामाशिवाय घराबाहेर पडू नये कारण जग वाईट आहे, असं म्हणणं साफ चुकीचं आहे. ज्यांचं महत्वाचं काम आहे आणि ते करण्यासाठी घराबाहेर पडलेल्या मुलींचं काय? प्रत्येक पिडीत महिलेला तिचं घराबाहेर पडणं कसं गरजेचं होतं याचं उत्तर द्यावं लागेल.

ज्यावेळी आपण अशा गोष्टी बोलतो त्यावेळी सुरक्षेची जबाबदारी, बलात्कारापासून वाचण्याची जबाबदारी आपण महिलांवर ओझ्याप्रमाणे लादतो. आता सरकार आणि समाजावर हे ओझं टाकूया?

५. रस्ते सुरक्षित करायचे असतील तर जास्तीत जास्त महिला रस्त्यावर फिरताना दिसल्या पाहिजेत. घाबरून घरी बसलेल्या नकोत. रस्ते सुरक्षित करण्याचं काम सरकारचं आहे. याचा अर्थ पोलिसांची गस्त वाढवायची असा होत नाही तर रस्त्यावर दिवे लावायचे, २४ तास सार्वजनिक वाहतूक सेवा चालू ठेवायची, अर्बन प्लॅनिंग करायचं हे सगळं येतं.

सरकारी खर्चातून कोर्ट आणि न्यायाधीशांची संख्या वाढवण्याचीही गरज आहे. एकच केस वर्षानुवर्षे चालू नये. पिडितेच्या नातेवाईकांना आर्थिक मदतही सरकारनं जाहीर केली पाहिजे. याबद्दल अजून माहिती घेण्यासाठी पत्रकार प्रियांका दुबे यांचं नो नेशन फॉर वुमन हे पुस्तक वाचावं.

(अनुवाद : रेणुका कल्पना)