आजकाल आपली स्मार्टफोनवर एक ना अनेक कामं होतात. पण आपण जास्त वेळ मोबाईलवर घालवत असू, तर मात्र आपल्याला पाठ आणि मनगटदुखीचा प्रॉब्लेम होऊ शकतो. हे आपल्याला कळलंय. पण वळत नाही. मग त्यावर उपाय काय?
स्मार्टफोनमुळे आपण किती स्मार्ट झालो आहोत. अगदी साधे हिशेब, मनोरंजन ते कामाचं, रोजचं मॅनजमेंट हे सगळं आपण या स्मार्टफोनवर करतो. या फोनशिवाय आपण राहूच शकत नाही. इतके आपण डिपेंडेंट, अडिक्टेड झालेलो आहोत. पण हा फोन आपला मित्र आहे आणि शत्रूही आहे. हे कसं काय?
स्मार्टफोन हा आपल्या बदललेल्या जीवनशैलीतला हक्काचा आणि कधीही न सुटणारा भाग बनलाय. पण आपल्याला वरचेवर सोशल मीडिया आणि वर्तमानपत्रातून मोबाईलचे धोके समजतात. मग या धोक्यांमधे अगदी ब्रेन ट्युमरपासून मानसिकआजारांपर्यंत अनेक गोष्टी सांगितल्या जातात. मात्र हे आजार आपल्याला प्रत्यक्ष दिसून येत नाही. याचा परिणाम आणि लक्षणं कालांतराने दिसून येतात. पण अशा काही प्रत्यक्ष शारीरिक तक्रारी होतात. ज्याच्या सततच्या दुखण्यामुळे आपली खूप चीडचीड होते.
मोबाईलच्या सतत वापरामुळे आपल्याला काही दुखणी सुरु होतात. जे यापूर्वी आपल्याला कधीच दुखलं नव्हतं. याचा अर्थ, शरीराच्या वेगवेगळ्या भागांवर अचानक अतिताण येऊ लागलाय का? तर अशावेळी आपण दिवसभरात काय करतो हे बघितलं पाहिजे. आपण कोणत्या कामासाठी किती वेळ लावत आहोत, त्या कामासाठी आपण कोणत्या पोझिशनमधे जास्त वेळ आहोत. हे बघितलं पाहिजे.
कारण, आपण ज्या पोझिशनमधे जास्त वेळ असतो. त्यामुळे आपल्या स्नायूंवर ताण येतो. त्याच पोझिशनमधे आपण रोज खूप वेळ घालवत असू. तर आपल्याला ही दुखणी सुरु होतात. आणि आपल्याला वाटत अचानक काय झालं? पण हे अचानक असं काही नसतं. सध्या स्मार्ट फोन सोबत आपणही स्मार्ट झालोय खरं. पण सगळा वेळ स्मार्टफोन सोबत घालवल्यावर डोळे चुरचुरणं, कोपरा, मनगट, हातांची बोटं, अप्पर बॅक दुखणं इत्यादी दुखण्यांना जणू आमंत्रणच मिळतं. पण यासाठी औषध न घेता व्यायमाने काही उपचार करता येऊ शकतात.
हेही वाचा: फेसबुकचं व्यसन लावणाऱ्या मार्क झुकेरबर्गची प्रेरणादायी गोष्ट
डोळे चुरचुरणे: आपलं सगळ्यांचं मुख्य काम हे कम्प्युटर किंवा लॅपटॉपवर असतं. त्यामुळे आपण सतत स्क्रिनवर नजर ठेवून असतो. वेळ मिळाला की टाईमपास म्हणून आपण मोबाईलवर सोशल मीडियाच्या पोस्ट चेकआऊट करत असतो. कामावरुन घरी जाताना ट्रेन, बस, रिक्षामधे मोबाईलवर वीडिओ बघतो. मग घरीसुद्धा तेच मोबाईल.
सतत स्क्रिनवर असल्यामुळे डोळ्यांना आराम मिळत नाही. मोबाईलचा उजेड डोळ्यातल्या रेटिनाला त्रासदायक ठरतो. आणि काळोखात तर जास्त त्रासच होतो. त्यामुळे डोळे लाल होणं, चुरचुरणं, पाणी येणं असे त्रास होऊ शकतात.
यावर उपाय म्हणजे सकाळी तोंडात एक घोट पाणी ठेवावं. आणि हलक्या हाताने डोळ्यांवर सात ते आठ वेळा पाणी मारावं. त्यानंतर तोंडातलं पाणी थुकून टाकावं. असं दोनवेळा करावं. जर स्क्रिनवर काम करता करता डोळ्यांना जास्तच त्रास होऊ लागला, तर त्यावेळीही आपण क्रिया करू शकता. आणि त्यानंतर ५ मिनिटं डोळे बंद करून बसा.
सकाळी किंवा संध्याकाळी व्यायाम करताना काही डोळ्यांचे व्यायामही करता येतील. यात पद्मासन, अर्धपद्मासन किंवा मांडी घालून बसा. हात मांडीवर ठेवा. शरीराची अजिबात हालचाल करू नका. डोळे डाव्या दिशेला, वरती, उजव्या दिशेला आणि खाली हळूहळू फिरवा. प्रत्येक दिशेला २० ते ३० सेकंद थांबा. ज्यामुळे डोळ्यांची स्ट्रेन्थ वाढेल.
तसंच ब्युटी टीप्समधे सांगितलं जातं त्याप्रमाणे, डोळ्यावर काकडी ठेवा. त्यामुळे थंडावा येईल. दिवसातून किमान एकदा गाजर खा. सिझनल फळं खा ज्यामुळे शरिरात थंडावा येईल. स्क्रिनमुळे डोळ्यात उष्णता निर्माण होते आणि अशा तक्रारी सुरु होतात, हे आय स्पेशालिस्ट अनघा सावंत यांनी सांगितलं.
हेही वाचा: वर्ल्ड व्हिस्की डेः बसण्याआधी हे वाचायलाच हवं
बोट दुखणं: एकतर आपल्याला बोटं मोडायची सवय असते. त्यामुळे पन्नाशीनंतर बोटांची हाडं दुखू लागतात. पण आता तरुणपणातच हे बोटांच आणि विशेषत: अंगठ्याचं दुखणं कुठून आलं तर, मोबाईल. सतत टेक्सिंग, अपडेट, पोस्ट करताना सातत्यान टाईप करावं लागतं.
पुन्हा तेच सातत्याने तेच तेच करत असल्यामुळे बोटांवर ताण येतो. त्यामुळे बोटांचे जॉईंट दुखतात, स्टिफनेस येतो, सूज येते. यासाठी हात खांद्याजवळ ठेवून मग ते एखाद मोठं, वजनदार कपाट सरकवत आहोत असा विचार करून ते ढकलत हात पुढे न्यावेत. तसंच पुन्हा कपाट मागे येतंय असा विचार करून हात पुन्हा खांद्याजवळ आणावेत. हाच व्यायाम समोरच्या दिशेने आणि वरच्या दिशेने एक एकदा करवा. हा प्रकार ६ वेळा करावा. तसंच हात एका रेषेत ठेवून फक्त हाताच्या बोटांची आठ ते दहा वेळा उघड झाप करावी.
मनगट दुखणं: सतत मोबाईल हातात पकडून पकडूनसुद्धा मनगट दुखतं. म्हणजे बघा मोबाईलचं वजन साधारण १४० ते १७० ग्रॅम एवढं असतं. आपण कधीतरी काही तासांसाठी वजन उचलणं वेगळं. पण मोबाईल सतत हातात पकडलेला असतो. ट्रेनमधे किती गर्दी असली तरी आपण मोबाईल काही सोडत नाही तो हातातच ठेवतो. त्यामुळे तळहाताच्यामधे आणि मनगटाचं दुखणं सुरु होतं. तसंच हातात पकडून मोबाईलवर तासन तास वीडियो बघितल्यावरही मनगट दुखतं.
यासाठी एक हात दुसऱ्या हाताने मनगटाच्या थोड खाली घट्ट पकडावा. पकडलेल्या हाताची मूळ बंद करून. हळूवारपणे क्लॉकवाईज आणि अँटीक्लॉकवाईज फिरवावा. त्याचबरोबर दोन्ही हाताच्या मूठ हलक्या बंद कराव्यात. दोन्ही हात सरळ रेषेत ठेवावेत आणि मूठ बंद करून मनगटापासून हात गोलाकार फिरवावेत.
हेही वाचा: बॅननंतरही टिक टॉक वाजतं जोरात
कोपर दुखणं: हाताच्या कोपराला कधी चुकून लागलं तर किती जोरात कळ जाते ना. मग आपण सतत मोबाईलवर बोलत असतो. जर आपलं काम फोनवर जास्त असेल आणि त्यासाठी सतत कानावर फोन ठेवतो, नंतर मोबाईलवर इतर काही करत असू तर या दोन्ही वेळी हाताची पोझिशन सारखीच असते. त्यामुळे कोपरा दुखू लागतो म्हणजेच एल्बो पेन होतं. जर हे पेन मोबाईलमुळे होत असेल तर त्याला सेल फोन एल्बो असं म्हणतात.
यासाठी आपण दोन्ही हात सरळ रेषेत ठेवावेत. मग कोपरापासून पुढेचे हात गोल फिरवून पुन्हा सरळ करावेत. हे ६ वेळा करावं. त्याबरोबर काटकोनात वाकावं, पण पाठ सरळ रेषेत ठेवावी पोक काढू नये. हात सरळ मागच्या बाजूला न्यावेत. मग कोपरापासून हात मागे पुढे न्यावेत असं १५ वेळा करावं.
अप्पर बॅकपेन: अप्पर बॅकपेन या दुखण्याच्या प्रकारात नेक, शोल्डर, साईड शोल्डर, पाठीचा वरचा भाग याचं दुखणं. बऱ्याचदा शालेय मुलांना सतत लिहिण्याचा अभ्यास असेल तर त्या साईड शोल्डरपेन होतं. हे अप्पर बॅकपेनसुद्धा सतत एकाच पोझिशनमधे राहिल्यामुळे होतं.
मोबाईलवर आपण झोपून वीडिओ बघतो, गेम खेळतो किंवा कम्प्युटरवर सतत माऊस पकडून असतो. अशावेळी शोल्डरचे त्रास होतात. तर मोबाईलमधे बघताना सतत मान खाली घातलेली असते त्यामुळे मान अवघडते.
यासाठी वज्रासनात बसून किंवा उभं राहून मान उभी खाली आणि वर करावी. तसंच साईड टू साईड बेंड करावी. त्यानंतर डोळे बंद करून गोलाकार क्लॉकवाईज आणि अँटीक्लॉकवाईज फिरवावी. मग मान घट्ट करून राईट टू लेफ्ट फिरवावी. हे सर्व प्रकार एका बाजून ५ आणि दुसऱ्या बाजूने ५ वेळा फिरवावी.
हेही वाचा: कामगारांसाठी बनवलेली जीन्स, स्टाईल स्टेटमेंट झाली
शोल्डर आणि साईड शोल्डरसाठी वज्रासनात किंवा उभं राहून हात मांडीवर घट्ट पकडावेत. आणि शोल्डर गोलकार फिरावेत. किमान ६ वेळा हा व्यायाम करावा. त्यानंतर हाताची पाचही बोटं खांद्यावर ठेवून गोलाकार फिरवावेत. यात हात पूर्ण वर नेऊन कानाला टच करण्याचा प्रयत्न करावा. आणि पुढे नेताना कोपरे जोडण्याचा प्रयत्न करावा.
मग एक हात वर करून फोल्ड करून मानेला टच करावे. मग दुसऱ्या हाताने फोल्ड केलेल्या हाताला कोपऱ्यातून हलका दाब द्यावा. असं दोन्ही हातांना व्यायाम द्यावा. एकाला हाताला किंमान १५ ते २० सेकंद दाब द्यावा. पाठीसाठी उजव्या हाताने डाव्या पायाचा अंगठा पकडावा आणि डाव्या हाताने उजव्या पायाचा अंगठा पकडावा. असं २० ते २५ वेळा करावं. मग दोन्हा हात आडव्या सगळ रेषेत ठेवून लेफ्ट आणि राईटला दहा दहावेळा फिरावे, दुखण्यानुसार व्यायाम कसं करावेत याची माहिती फिजिओथेरेपिस्ट मंगला कुलकर्णी यांनी केलाजला दिली.
मोबाईल एक आणि त्याचे शरिराला त्रास पन्नास. अशी अवस्था सध्या मोबाईल युजर्सची झालेली आहे. खरं तर आपण झोपेच्यावेळे व्यतिरीक्त दिवसून किमान एक तास मोबाईलशिवाय राहावं. कारण या दुखण्याबरोबर इतर होणारे आजारही बरेच आहेत. त्यामुळे शरिराची काळजी घेण्यासाठी मोबाईलच्या आहारी न जाता, तो आपण गरजेपुरताच वापरण्याचा प्रयत्न केला पाहिजे. स्मार्टफोन जास्त वापरला म्हणून काय आपण जास्त स्मार्ट होणार नाही.
हेही वाचा:
तर आपण विचार करणंही डिजिटल यंत्रांकडे सोपवून देऊ
कॅन म्हणजे आपल्या कान्स फेस्टिवलच्या ए टू झेड प्रश्नांची उत्तरं