ड्रायवरलेस गाड्यांचा आपल्याला फायदा होणार की तोटा?

१७ ऑक्टोबर २०१९

वाचन वेळ : ४ मिनिटं


चालकविरहित गाड्या म्हणजे ड्रायवर नसला तरी आपोआप चालणाऱ्या गाड्यांकडे ऑटोमोबाईल इंडस्ट्रीचा भविष्यकाळ म्हणून पाहिलं जातंय. आता अगदी पुढच्या दोनएक वर्षांत अशा गाड्या रस्त्यावर धावू लागतील. आता आपण अशा टप्प्यावर आलोय जिथे कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर आणि त्यावरचं संशोधन थांबवणं शक्य नाही. आणि ते तसं थांबवल्यानं आपलंच नुकसान होणार आहे.

एखादा मेसेज टाइप करताना चुकलेल्या शब्दाचं स्पेलिंग आपोआप बरोबर होतं. कधीकधी तर आपला पुढचा शब्द काय असणार याचं अचूक सजेशन आपल्याला स्क्रिनवर दिसतं. हे कशामुळे होतं माहितीय? आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे. माणसाला ज्याप्रकारे बुद्धी असते तशी बुद्धी माणूस मशीनमधे तयार केली जातेय.

आपल्या ईमेलला क्विक रिस्पॉन्स देणं असो किंवा गुगल ट्रान्सलेशन असो या गोष्टी आपल्या जगण्याचा भाग झाल्यात. जगणं सोपं करणारी ही बुद्धिमत्ता आहे. आता चारचाकी, दुचाकी गाड्यांमधे या कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर होतोय. ऑटोमॅटिक गियर बदलणाऱ्या गाड्यांना आता खूप भाव आलाय. चालवायला सोप्या म्हणून लोक हमखास या गाड्यांना प्राधान्य देतात. पण आता या सगळ्याची पुढची पायरी आपल्यासमोर येतेय आणि ती म्हणजे ड्रायवरलेस किंवा चालकविरहित गाडी.

कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून माणसाच्या मदतीशिवाय रस्त्यावर धावणारी, गिअर बदलणारी, गरजेप्रमाणे ब्रेक दाबणारी, स्वतःच स्पीड कमी जास्त करणारी, वाहतुकीचे नियम पाळणारी अशा गाडीवर सध्या जोमानं संशोधन सुरू आहे. त्याबाबत मिलिंद पदकी आणि प्रसाद शिरगावकर यांनी फेसबुकवर काही निरीक्षणं नोंदवलीत. 

हेही वाचाः काँग्रेसला न्याय, केजरीवालांना चुनौती देणाऱ्या बॅनर्जींना अर्थशास्त्राचा नोबेल

गाडी चालवू न शकणाऱ्यांसाठी वरदान

मिलिंद पदकी लिहितात, ‘अमेरिकेच्या कॅलिफोर्निया या एकाच राज्यातल्या ५२ कंपन्यांनी चालकविरहित गाड्यांच्या चाचण्यांचे परवाने मिळवलेत. २०२० मधे चालकविरहित टेस्ला गाडी बाजारात आणायचं वचनच स्पेसएक्सचे सीईओ इलॉन मस्क यांनी जगाला दिलंय.’

‘आपल्याकडे अशी गाडी असेल तर आपला वापर करून झाल्यावर उरलेला वेळ ही गाडी आपण टॅक्सी म्हणून बाजारात पाठवून पैसे कमावू शकतो. टॅक्सी म्हणून वापरल्यास अशा गाडीचे भाडे चालक-सहित गाडीच्या एक पंधरांश इतकं कमी असू शकतं. म्हणजे आत्ता टॅक्सीचं भाडं १५ डॉलर्स असेल तर अशा टॅक्सीसाठी एक डॉलर इतकंच भाडं द्यावं लागेल.’

पदकी पुढे लिहितात, ‘गाडी न चालवू शकणारे म्हणजे म्हातारे, रुग्ण, अपंग लोक आणि लहान मुलं अशांसाठी ही गाडी वरदान ठरू शकते. अर्थात अशा लोकांना गाडीत चढण्या, उतरण्याचा वेगळा प्रॉब्लेम सोडवावा लागणार आहेच.’

हेही वाचाः अध्यात्माच्या बाजारात गाडगेबाबांच्या कीर्तनाचं अँटीवायरस मारा!

गाडीच्या चाचण्या सुरू

‘कृत्रिम बुद्धिमत्ता, रडार आणि लायडर या तीन टेक्नॉलॉजींचा यामधे वापर करण्यात येतोय. लायडर म्हणजे सेकंदाला लाखो वेळा आयआर-लेझर प्रकाशातील वेवलेंग्थस पाठवून त्यांच्या परावर्तनाच्या पॅटर्नवरून आसपासच्या प्रदेशाचं त्रिमिती दृश्य तयार करणारं उपकरण.’

‘न्यूयॉर्क, लॉस एंजलिस, अरिझोनातील काही शहरांमधेही यांच्या चाचण्या जोरात चालू आहेत. मध्यंतरी उबर या टॅक्सी सेवा देणाऱ्या कंपनीच्या अशा एका गाडीची चाचणी चालू होती. तेव्हा एका माणसाचा अपघातात मृत्यू झाला. त्यामुळे त्यांचा हा कार्यक्रम सध्या बंद आहे.’

‘इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, चीन, जपान, सिंगापूर या देशांनी या तंत्रज्ञानाला थोडाफार पाठिंबा दर्शवलाय. पण गंमत म्हणजे अमेरिका सोडून इतर सगळ्या देशांच्या वाहतूक नियमांत अजूनही स्टिअरिंग व्हीलमागे चालक असलाच पाहिजे अशी अट आहे.’

‘अशा प्रकारची २४ तास उपलब्ध असणारी एकदम स्वस्त आणि तात्काळ टॅक्सी सेवा सुरू झाली तर स्वतःची खासगी गाडी ठेवण्याची गरज बरीच कमी होईल. हे तंत्रज्ञान यशस्वी झालं तर २०३० पर्यंत गाड्यांचा खप सध्याच्या खपाच्या एक दशांश इतका खाली येईल. आणि मुख्य म्हणजे पर्यावरणासाठी हे वरदान ठरेल.’

हेही वाचाः आहे रे, नाही रे, हीच डिजिटल युगाचीही भाषा

अमेरिकन नागरिकांचा विरोध

पदकी आपला अनुभव सांगताना लिहितात, ‘चालकविरहित गाड्यांविषयी मी अमेरिकन नागरिकांशी बोललो. त्या प्रत्येकाचं मत सध्या अशा गाड्यांच्या पूर्णपणे विरोधातलं आहे. या गाड्या फक्त माणसं मारण्याच्या कामाच्या आहेत असं कॉमन उत्तर लोकांनी दिलं.’

‘अर्थात अशा प्रतिक्रिया देणाऱ्यांमधे कुणीही इंजिनियर किंवा तज्ञ नव्हते. त्यामुळे केवळ अज्ञानाची भीती असंच या मताचं स्वरूप म्हणावं लागेल. अशा गाड्यांची निर्मिती करणाऱ्यांच्या मते अपघात ९९.५% कमी होतील. त्यामुळे लवकरच, कदाचित २०२० मधेच अमेरिकेत या गाड्या वापरात येतील,’ असं पदकी यांना वाटतं.

हेही वाचाः तर आपण विचार करणंही डिजिटल यंत्रांकडे सोपवून देऊ

अपघातांचं प्रमाण ९९% ने कमी

मिलिंद पत्की यांच्या पोस्टला दुजोरा देत आयटी क्षेत्रातले जाणकार प्रसाद शिरगावकर यांनी एक फेसबूक पोस्ट टाकलीय. त्यात शिरगावकर म्हणतात, ‘कृत्रिम बुद्धिमत्तेनुसार, ड्रायवरशिवाय आपल्या आपण चालणाऱ्या गाड्या या अगदी नजीकच्या भविष्यात यायची दाट शक्यता दिसतेय. अक्षरशः पुढच्या दोन-पाच वर्षांतच त्या येतील. हे जेव्हा घडेल तेव्हा जगभरच्या वाहतूक आणि वाहनउद्योग क्षेत्रांमध्ये वादळी वेगानं आमूलाग्र बदल घडतील.’

कृत्रिम बुद्धिमत्तेनं चालणाऱ्या गाड्यांमध्ये नियम पाळलेच पाहिजेत असं प्रोग्रॅमिंग सेट करण्यात आलंय. त्यामुळे सगळ्या गाड्या वाहतुकीचे आणि वेगाचे नियम तंतोतंत पाळतील आणि रस्त्यावरच्या अपघातांचं प्रमाण तब्बल ९९% ने कमी होईल, असं शिरगावकर यांना वाटतं. आणि हा या गाड्यांचा सर्वांत मोठा फायदा असल्याचं ते सांगतात.

बेरोजगारीत होणार वाढ

शिरगावकर एका धोक्याकडे लक्ष वेधताना लिहितात, ‘गाड्या शेअर करणं, भाड्यानं देणंघेणं, टाईम शेअर करणं इत्यादी खूपच सोपं होईल. त्यामुळे गाड्यांची पूर्णवेळ मालकी असण्याची गरज राहणार नाही. कॉस्ट ऑफ ओनरशिप कमी होईल. गाड्यांचा खप आणि रस्त्यावरच्या एकूण गाड्याही कमी होतील. पण यानं ड्रायवर हा व्यवसाय कालबाह्य होईल. सध्या त्यावर पोट भरणारे बेरोजगार होतील आणि त्यांना नवा व्यवसायाच्या शोधात फिरावं लागेल. या सगळ्यामुळे एक प्रचंड उलथापालथ होईल.’

हे सगळं अमेरिकेत येत्या पाच ते पंधरा वर्षांत घडू शकेल, असं शिरगावकर यांना वाटतं. भारतात हे यायला किती वेळ लागेल याबाबत काही कल्पना नाही असं ते म्हणतात. पण भारत हा अत्यंत टेक्नॉसॅवी, टेक्नॉक्रेझी देश आहे. त्यामुळे हे तंत्रज्ञान भारतात पोचेल तेव्हा प्रचंड वेगानं त्याचा प्रसार होईल आणि स्वीकारलं जाईल असा विश्वास ते व्यक्त करतात.

हेही वाचाः आयपॉड क्रांतीची सतरा वर्षं

भारतात कधी येणार अशा गाड्या?

कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे जसं चालकविरहित गाड्या काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत तसंच डॉक्टरविरहित दवाखाने आणि शिक्षकविरहित शाळांवरही काम सुरु असल्याची माहिती शिरगावकरांनी आपल्या पोस्टमधे नोंदवलीय.

‘आज तिशी, चाळीशीत असलेल्या आपल्या पिढीने इंटरनेट, मोबाईल क्रांती आणि त्यामुळे होत असलेली उपथापालथ आपल्या चिमुरड्या आयुष्यात अनुभवलीय. आता कृत्रिम बुद्धिमत्तेने होणारी क्रांतीही आपण आपल्याच लाईफटाईममधे अनुभवण्याची शक्यता आहे,’ असं शिरगावकर लिहितात.

बदलांना सामोरं जायची तयारी

कृत्रिम बुद्धिमत्तेचा जसा चांगल्या कारणासाठी वापर होऊ शकतो तसंच त्याचे वाईट परिणामही मानवी आयुष्यावर होऊ शकतात हे या दोन निरीक्षणातून आपल्या समोर येतं. चालकविरहित गाड्यांचा जरी म्हाताऱ्या, अपंग माणसांना उपयोग असला तरी त्यानं रोजगाराचं एक मोठं साधन हातातून जाणार हेही खरंय.

आता आपण अशा टप्प्यावर आलोय जिथे कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर आणि त्यावरचं संशोधन थांबवणं शक्य नाही. आणि ते तसं थांबवल्यानं आपलंच नुकसान होणार आहे. तेव्हा आता या कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे भविष्यात आपल्या आयुष्यात होणाऱ्या बदलांना कसं सामोरं जायचं याची तयारी आत्तापासूनच करायला हवी एवढं मात्र निश्चित.

हेही वाचाः 

लोकांनी सध्या गाड्या विकत घेणं का थांबवलंय?

ई-सिगारेटवर बंदी व्यसन रोखण्यासाठी की तंबाखू लॉबीमुळे?

मानसिक ताणतणावांकडे दुर्लक्ष करणं आपल्याला परवडणारं नाही

नोबेल मिळालेल्या लिथियम आयन बॅटरीचा वापर आपण कुठे करतो?

आकाश निळंच असतं असं वाटत असेल, तर 'द स्काय इज पिंक' बघाच