डॉ. जयंत नारळीकर यांची अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली. मराठीमधे विज्ञान लेखन खूप उशिरा सुरू झालं. पण या परंपरेत डॉक्टर जयंत विष्णू नारळीकर यांनी ध्रुवताऱ्याची जागा पटकावली. त्यांना मिळालेलं अध्यक्षपद हा विज्ञान साहित्याचाच सन्मान आहे. त्यांच्या लेखनाला आदर्श मानत नवे विज्ञान लेखक घडतायत. त्यामागे सरांची लेखनशैली हे महत्त्वाचं कारण आहे.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी यंदा डॉ. जयंत नारळीकर यांची निवड झालीय. अखिल मराठी विज्ञान साहित्याचाच हा सन्मान आहे. ‘विज्ञान साहित्य’ ही मराठी साहित्यात तशी उशिराने आलेली संकल्पना. आपल्या संत परंपरेत गद्यसाहित्य निर्मिती तशी नव्हतीच. ते अभंग आणि भारुडांच्या रूपात आहे. रामायण-महाभारतासारख्या कथाही पद्यमयच आहेत.
इंग्रजी सत्तेच्या प्रभावाखाली खर्या अर्थाने गद्यनिर्मिती सुरू झाली. त्यानंतर विज्ञान साहित्य हा प्रकार आला. ‘ज्या साहित्यातला आशय विज्ञानावर आधारित असेल ते म्हणजे विज्ञान साहित्य’, असं व. दि. कुलकर्णी यांनी म्हटलंय. अशा अर्थाने पहिलं विज्ञान साहित्य कोल्हापुरातल्या बाळाजी प्रभाकर मोडक यांनी लिहिलं. १८७५ मधे ते प्रकाशित झालं. यात वैज्ञानिक माहिती मराठीमधून देण्यात आली होती.
केवळ विज्ञानाची माहिती असणारं मराठीतलं लेखन लोकप्रिय होऊ शकलं नाही. काही लोकांनी इंग्रजीतलं साहित्य मराठीत अनुवादित केलं. मात्र हे प्रमाण नगण्य होतं. इंग्रजीत त्या मानाने खूप आधीपासून विज्ञान साहित्य निर्मिती झालीय. दुसर्या शतकातल्या स्टारीस्ट यांच्या ‘द ट्रु स्टोरी’चा दाखला यासाठी दिला जातो.
हेही वाचा: तंत्रज्ञानाच्या युगात अश्मयुगातल्या मानवी मेंदूचं काय होणार?
अनेक लेखकांनी आपल्या कल्पनाशक्तीला फुलवून अनेक सुंदर विज्ञान कथा-कादंबर्या लिहिल्या. त्यांच्या लेखन कल्पनाविलासातले काही शोध पुढे संशोधकांनी प्रत्यक्षात साकारले. इंग्रजी भाषेतलं असं साहित्य लोकप्रियतेच्या शिखरावर गेलं. काही भविष्यवेधी कादंबर्यांवर आधारित रंजक चित्रपट निघाले. तेही लोकप्रिय झाले. चित्रपट निर्मितीच्या सुरवातीच्या काळात १९०२ ला ‘अ ट्रिप टू दि मून’सारखा चित्रपट तयार झाला. माणसानं प्रत्यक्ष चंद्रावर पाऊल ठेवायला पुढं अर्ध शतक जावं लागलं.
मराठीमधे विज्ञान लेखन खूप उशिरा सुरू झालं. विज्ञानातलं सत्यकथन अनेकांना रुक्ष वाटतं. मात्र तेच गोष्टीरूपातून समोर आलं तर वाचावंसं वाटतं. हे ओळखून मराठीत अशा कथांची निर्मिती होऊ लागली. बाळ फोंडके, निरंजन घाटे, सुबोध जावडेकर, लक्ष्मण लोंढे, अरुण मांडे ही नावं मराठी नियतकालिकांमधून झळकू लागली. त्यांचं विज्ञान साहित्य प्रसिद्ध होऊ लागलं. या कथांना वाचक मिळू लागला. याच परंपरेतलं महत्त्वाचं नाव डॉ. जयंत विष्णू नारळीकर.
जयंत नारळीकर अभिजात संशोधक. थोर गणिततज्ञ. खगोलभौतिकीतला अढळ तारा. केवळ आपल्या संशोधनाने नाही तर लेखणीने मराठी साहित्यात, विज्ञान साहित्याचं दालन समृद्ध करणारे साहित्यिक. पद्मविभूषण, महाराष्ट्र भूषण अशा अनेक सन्मानांचे मानकरी. त्यांचा जन्म कोल्हापूरचा. जन्मतारीख १९ जुलै १९३८. वडील विष्णू वासुदेव नारळीकर गणितातले रँग्लर.
बनारस हिंदू युनिवर्सिटीतले गणिताचे नामवंत प्राध्यापक. बंधू अनंत विष्णू नारळीकर भौतिकशास्त्रातले नामवंत संशोधक. अशा विज्ञान आणि संशोधनाचा वारसा लाभलेल्या जयंत नारळीकरांनीही विज्ञानाचे धडेच गिरवले. १९५७ मधे त्यांनी बनारस हिंदू युनिवर्सिटीतून विज्ञानात बी.एससीची डिग्री घेतली. पुढच्या शिक्षणासाठी केंब्रिजला गेले. एम.ए. आणि पीएच.डी. मिळवली. तिथल्या संशोधनामुळे खगोलशास्त्रज्ञ म्हणून त्यांचं नाव जगभर पोचलं.
त्यांच्या गुरुत्वाकर्षणाबद्दलच्या संशोधनाचा होएल-नारळीकर सिद्धांत खूप गाजला. तेही वडिलांप्रमाणे रँग्लर बनले. संशोधनातलं स्मिथ पारितोषिक, टायसन मेडल इत्यादी पुरस्कार मिळवले. भटनागर पारितोषिक, कलिंगा पुरस्कार असे सुमारे ६५ पुरस्कार त्यांना मिळाले. १९७२ मधे ते भारतात परतले. मुंबईतल्या टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च संस्थेत १९८८ पर्यंत संशोधन केलं.
हेही वाचा: चंद्रावर पहिलं पाऊल कोण ठेवणार यावरुन वाद झाला होता
पुण्यामधे वीस एकर जागा उपलब्ध होताच आयुका ही संस्था पुण्यात स्थापन केली. खगोल संशोधनातली अग्रगण्य संस्था म्हणून ती जगभर ओळखली जाते. त्यांचं हे वेड अवकाश विज्ञानातलं गूढ प्रश्नांची उकल करण्यापुरतं मर्यादित राहिलं नाही. न्यूटनला ज्या झाडाखाली गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला, असं मानलं जातं, त्या सफरचंदाच्या झाडाचा वारसा सांगणारे रोप आणून संस्थेच्या प्रांगणात त्यांनी लावलं. संस्थेला लहानग्या भावी वैज्ञानिकांनी भेट द्यावी, म्हणून खास सुविधा निर्माण केल्या.
विविध नियतकालिकांतून नियमित लेखन केलं. विज्ञानकथा लिहिण्यामागे वैज्ञानिक संकल्पना मुलांपर्यंत पोचवणं हा त्यांचा निखळ हेतू. विविध ठिकाणी कार्यक्रमाला गेल्यानंतर प्रश्न विचारणार्या, स्वाक्षरीसाठी धडपडणार्या मुलांना ते जोडपत्रावर प्रश्न विचारायला सांगायचे. या प्रश्नांची उत्तरं ते स्वत: पाठवायचे. विद्यार्थ्यांमधे वैज्ञानिक द़ृष्टिकोन निर्माण व्हावा, या हेतूने हा अभिनव उपक्रम त्यांनी अनेक वर्ष चालवला.
नारळीकर सर म्हणजे फळांनी लगडलेलं एक सफरचंदाचं झाडच. हातचं काही न राखता आपल्याकडचं सारं काही इतरांना देणारे. अशा फळभरल्या झाडाकडे कणखर लाकडं असतात. मात्र, त्याची फळांनी सालंकृत टोकं नम्रपणे जमिनीकडे झुकलेली असतात. असंच हे व्यक्तिमत्त्व. आयुकाच्या इमारतींचं बांधकाम सुरू असताना ते संथ गतीने सुरू असल्याचं लक्षात आल्यानंतर एक दिवस त्यांनी स्वत:च घमेलं घेऊन काम सुरू केलं.
त्यानंतर मात्र बांधकाम विक्रमी वेळेत पूर्ण झालं. हे त्यांच्या कणखरपणाचं उदाहरण. कुमार विश्वकोशासाठी सरांनी ‘पृथ्वीबाह्य सजीव’ ही नोंद लिहिली. ही नोंद संपादकांकडे पाठवताना ‘या नोंदीत काही बदल करायचा असेल, तर माझी परवानगी गृहीत धरा’, असं कळवल्याची आठवण डॉ. मोहन मद्वण्णा सरांनी सांगितली. हाच नम्रपणा त्यांच्या चेहर्यावरचं निरागस, प्रसन्न हास्याचं गुपित असावा.
हेही वाचा: इथे रस्त्यावरच उलगडतात विज्ञानातली रहस्यं
विज्ञान आणि संशोधनातले निष्कर्ष विज्ञानाच्या रुक्ष भाषेत लोकांना सांगितलं, तर ते त्यांच्या पचनी पडणार नाहीत. हे ओळखून त्यांनी मराठीत विविध प्रकारचं विज्ञान लेखन केलं. कथा, कादंबरी, माहितीपर लेख या सर्व प्रकारात लिहिले.
त्यांचं ‘अंतराळातील भस्मासुर’, ‘अंतराळातील स्फोट’, ‘अभयारण्य’, ‘चला जाऊ अवकाश सफरी’ला, ‘टाईम मशीनची किमया’, ‘प्रेषित’, ‘यक्षांची देणगी’, ‘याला जीवन ऐसे नाव’, ‘वामन परत न आला’, ‘वायरस’ या कादंबर्या आणि विज्ञान कथासंग्रह प्रसिद्ध झालेत.
या व्यतिरिक्त ‘अंतराळ आणि विज्ञान’, ‘आकाशाशी जडले नाते’, ‘गणितातील गमतीजमती’, ‘नव्या सहस्रकाचे नवे विज्ञान’, ‘नभात हसरे तारे’, ‘युगायुगांची जुगलबंदी गणित अन् विज्ञानाची’, ‘विश्वाची रचना’, ‘विज्ञान आणि वैज्ञानिक’, ‘विज्ञानगंगेची अवखळ वळणं’, ‘विज्ञान रचयिते’, ‘सूर्याचा प्रकोप’ या विज्ञानातील संकल्पना विद्यार्थ्यांना समजतील अशा भाषेत उलगडून दाखवणार्या पुस्तकांचं लेखन केलं. ‘चार नगरांतले माझे विश्व’ या आत्मचरित्रातून बनारस, केंब्रिज, मुंबई आणि पुणे या शहरांत झालेली एका वैज्ञानिकाची जडणघडण वाचकांसमोर ललितपद्धतीने येते.
यासोबत ‘नभात हसरे तारे’ आणि ‘पाहिलेले देश, भेटलेली माणसे’ या पुस्तकांचं लेखन केलं. डॉ. विजया वाड यांनी त्यांच्या जीवनावर ‘विज्ञानयात्री’ हे चरित्र लिहिलं. या वर्षीपासून त्यांची प्रेषित ही कादंबरी सोलापूरच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने एम.ए. मराठीच्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात समाविष्ट केली आहे. या पूर्वीही त्यांच्या कथा, कादंबर्या मराठी भाषा अभ्यासकांच्या अभ्यासक्रमात समाविष्ट होत्या.
हेही वाचा: भरकटलेल्या समाजात राहणाऱ्या भटक्यांची एक गोष्ट
मराठीमधे त्यांच्या समृद्ध लेखनानंतर विज्ञान साहित्याला एक प्रतिष्ठा मिळाली. विज्ञान साहित्य वाचणार्या वाचकांचा एक वर्ग तयार झाला. विज्ञान साहित्य जनमानसात रुजू लागले. त्यांच्या लेखनाला आदर्श मानत नवे विज्ञान लेखक घडत आहेत. हे घडण्यामागे सरांची लेखनशैली हे महत्त्वाचं कारण आहे. सूत्रात असलेले अनेकांना नावडणारं विज्ञान त्यांनी मराठीत लालित्यपूर्णरीतीने बांधले. रसिकांच्या गळ्यात उतरवलं.
वाचकाला खिळवून ठेवणारी सोपी भाषा, छोटी वाक्यं आणि आवश्यक तिथं किस्से, घटनांची पेरणी ही सरांच्या लेखनाची वैशिष्ट्ये आहेत. यामुळे ते वाचनीय बनतं. विज्ञान साहित्याची मोठ्या प्रमाणात निर्मिती होत होती. अनेक जणांनी विज्ञान साहित्यावर डॉक्टरेट मिळवली. तरीही विज्ञान साहित्याला म्हणावी तशी मान्यता नव्हती.
ऑगस्ट २०२० मधे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे कार्याध्यक्ष डॉ. मिलिंद जोशी यांच्या सोबतच्या संवादात मी ही खंत बोलूनही दाखवली होती. आणि बातमी आली नाशिक इथं होणार्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ विज्ञान लेखक डॉक्टर जयंत नारळीकर यांची निवड. यामागे योगायोग असेल, पण त्याचा मनापासून आनंद झाला. अखिल भारतीय साहित्य महामंडळाने विज्ञान साहित्याची दखल घेत, या साहित्य शाखेतल्या अढळ तार्याला अध्यक्षपद दिलं.
जयंत नारळीकर सरांचं लेखनातलं योगदान मोठं आहेच. पण विज्ञान जनमानसापर्यंत पोचवण्याचे प्रयत्नही थोर आहेत. विज्ञान साहित्यिकाला हा बहुमान देऊन, मराठी साहित्य विश्वाने, विज्ञान साहित्याला मनापासून स्वीकारलं. त्यामुळेच हा नारळीकरांबरोबरच मराठीतल्या विज्ञान साहित्याचाही सन्मान वाटतो. विज्ञानवादी पिढी घडवणार्या समाजसुधारकाचा हा सन्मान वाटतो.
हेही वाचा:
फेक न्यूजची बाधा न हो कोणे काळी!
सत्य शोधणारी पॉलिग्राफ टेस्ट स्वतः खरं बोलते?
कथागत: अल्पसंख्यांकांच्या अस्वस्थ वर्तमानाच्या कथा
(साभार दैनिक पुढारी)