फेक न्यूजची बाधा न हो कोणे काळी!

०१ फेब्रुवारी २०२१

वाचन वेळ : ६ मिनिटं


परवा शेतकरी आंदोलकांनी लाल किल्ल्यावरचा तिरंगा उतरवून तिथे शिखांचा भगवा झेंडा फडकवला.  अशी न घडलेली खोटीनाटी गोष्ट सोशल मीडियातून लाखो लोकांच्या डोक्यात बसवली गेली. खरंतर, तिरंगा असतो तिथेच सन्मानाने फडकत राहिला. त्याच्यापासून थोडं लांब एका काठीवर आंदोलकांनी शिखांचा झेंडा लावला. तेही चुकीचंच होतं हे मान्य करताना तिरंगा लाल किल्ल्यावरून उतरवलेला नाही, हे वास्तवही लक्षात ठेवायला हवं.

लाल किल्ल्यावर चढणं. तिथे गुरुद्वारावर असतो तसा शीख धर्माचा झेंडा लावणं. तोडफोड करणं. पोलिसांना हुसकावून लावणं. त्यांच्यावर ट्रॅक्टर घालणं. नंग्या तलवारी नाचवणं. हे सगळं चुकीचंच आहे. त्याचं समर्थन होऊ शकत नाही, कुणी करू नये. त्याचा निषेधच व्हायला हवं. पण त्यांनी जे केलं, त्याचाच निषेध व्हायला हवा. त्यांनी ज्या गोष्टी केल्याच नाहीत, त्याविषयी त्यांच्यावर डूख धरू नये.

गेली अनेक शतकं दिल्ली आणि दिल्लीचा लाल किल्ला देशाच्या सार्वभौमत्वाची खूण बनलाय. त्याच अर्थाने तो नोटेवरही येतो. स्वातंत्र्यदिनी त्याच्या बुरूजावरून पंतप्रधान देशाला संबोधित करतात. तिथंच तिरंगा फडकवतात. त्याला सलामी देताना जगभरातल्या भारतीयांची मान आपसूक अभिमानाने ताठ होते. तो तिरंगा तिथून काढणं म्हणजे देशाच्या एकसंधतेलाच आव्हान देण्यासारखं आहे.

पण परवा २६ जानेवारीला आंदोलकांनी तिथून तिरंगा उतरवलेला नाही. तिरंगा असतो तिथेच सन्मानाने फडकत राहिला. त्याच्यापासून थोडं लांब एका काठीवर आंदोलकांनी शिखांचा झेंडा लावला. तेही चुकीचंच होतं हे मान्य करताना तिरंगा लाल किल्ल्यावरून उतरवलेला नाही, हे वास्तवही लक्षात ठेवायला हवं.

हेही वाचा: कोरोनाची माहिती नको, पण फेक न्यूज आवर!

आंदोलन चिरडण्याचं पहिलं पाऊल

सर्वसामान्यांसाठी इतर गोष्टी माफ होऊ शकतात. पण तिरंगा उतरवणं नाही, हे लक्षात घेऊन त्याचाच आरोप आंदोलकांवर करण्यात आला. काही टीवी चॅनलनी तसं दाखवलं. टीवीच्या पत्रकारांनी ते गृहित धरून त्याचे खुलासे योगेंद्र यादवांसारख्या आंदोलनाच्या नेत्याला विचारले. आंदोलकांनी शिखांचं निशाण फडकवलं हे खरंच होतं. त्यात तिरंगा उतरवल्याचं खोटं जोडण्यात आलं. खऱ्याच्या बरोबर खोटं वाढून अर्धसत्याची फसवी रेसिपी तयार करण्यात आली.

चॅनलवाल्यांनी काही वेळाने तिरंगा उतरवण्यात आला नव्हता, याची स्पष्टीकरणं दिली. पण त्याने अजेंडा सेट झाला होता. भाजपवाल्यांनी बातम्यांचे वीडियो, स्क्रीनशॉट, अर्धवट फोटो ट्विट केले. फेसबूक, वॉट्सअपवरून गावोगाव पोचले. आंदोलकांच्या विरोधात राग खदखदू लागला.

एरव्ही डोकं थाऱ्यावर असल्यासारखं वाटणाऱ्या हृषिकेश जोशीसारख्या नटानंही फेसबूक पोस्ट लिहिली, यांना चिरडून टाका. हे प्रातिनिधिक मानलं तर शेतकरी आंदोलकांविषयीची सहानुभूती कमी करण्यात सत्तेला यश मिळाल्याचं लक्षात येतं. आंदोलन चिरडण्यासाठीचं पहिलं पाऊल टाकण्यात आलंय, हे त्यातून स्पष्ट झालंय.

हेही वाचा: तुम्हाला कोरोना फेक न्यूज रोगाची लागण झालेली नाही ना?

भगतसिंग कोश्यारी आणि नेताजींचा फोटो

खोट्याचं अर्धखरं फक्त आंदोलकांच्या समर्थकांकडूनच होतं असं नाही. आदल्याच दिवशी मुंबईत शेतकऱ्यांचा मोर्चा झाला. त्यांच्या प्रतिनिधींना राज्यपाल भगतसिंग कोश्यारींनी भेट दिली नाही. कारण ते मोर्चाच्याही आधीच ठरलेल्या कामांसाठी गोव्यात होते. गोव्याचे राज्यपाल म्हणून त्यांना आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलचा समारोप आणि विधानसभेतलं अभिभाषण अशी कामं होती. तरीही शरद पवारांसारख्या जाणकार नेत्याने मोर्चासमोरच्या भाषणात आपला अजेंडा सेट केलाच.

राज्यपालांना कंगना रानावतला भेटायला वेळ आहे, पण शेतकऱ्यांना नाही. प्रसिद्धीप्रवीण आणि प्रसिद्धीप्रवण राज्यपालांच्या यंत्रणांनी त्यावर कितीही खुलासे केले, तरी पवारांना शेवटच्या माणसापर्यंत पोचवायचं होतं ते टीवी आणि सोशल मीडियातून नीट पोचलंच.

त्याच्या दोन दिवस आधी नेताजी सुभाषचंद्र बोसांची जयंती होती. राष्ट्रपती भवनात त्यानिमित्त ठेवलेला फोटो हा बंगाली नट प्रसेनजीत चटर्जी याचा होता, अशा बातम्या आपल्याकडे मराठीतही दुसऱ्या दिवशी छापून आल्या. प्रसेनजीतने "गुमनामी' या बंगाली सिनेमात नेताजींची भूमिका केली होती. राष्ट्रपतींना नेताजींचा फोटोही ओळखता येत नाही का, असा प्रश्न साध्या माणसाला पडला. पण प्रत्यक्षात असं काहीही घडलं नव्हतं.

राष्ट्रपती भवनातला तो फोटो नेताजींचाच होता. सध्या बंगालमधे विधानसभा निवडणुकांचा माहोल आहे. त्यात खुलाशांवर खुलासे करूनही भाजपवाले या प्रकरणात बॅकफूटवर गेले. मोबाईलमधून खुलासा गावभर होत नाही, आरोप मात्र सहज होतो. खाया नहीं, पिया नहीं, गिलास तोडा, बाराना.

सत्ताधाऱ्यांच्या हातातलं मोठं शस्त्र

सोशल मीडिया राजकारणाचं शस्त्र बनलंय तेव्हापासून हे असंच घडतंय. कन्हैय्या कुमार आणि त्याच्या सहकऱ्यांनी देशद्रोही घोषणा केल्याचं कधीही सिद्ध झालं नाही, पण आजही ते लाखो जणांसाठी टुकडे टुकडे गँगच आहेत. जेएनयू देशातली सर्वोत्कृष्ट युनिवर्सिटी असली, तरीही ती बदनाम आहे. शाहीन बाग आंदोलनाविषयी खऱ्यापेक्षा खोट्याच गोष्टी जास्त लोकांना माहीत आहेत.

नेहरू-गांधी घराण्याविषयी तर सपशेल खोट्या असलेल्या लाखांवर तरी पोस्ट आजपर्यंत वायरल झाल्या असतील. आपल्याकडेही पवार आणि ठाकरेंच्या तीन पिढ्यांची बदनामी करणाऱ्या पोस्ट कमी नाहीत. आताशा लोकांना वॉट्सअपवरचे बहुतांश फॉरवर्ड बोगस असतात, हे कळू लागलंय. `फेक न्यूज` ही गोष्ट लक्षात आलीय. ती सत्ताधाऱ्यांच्या हातातलं मोठं शस्त्र असल्याचंही थोडं थोडं लक्षात येऊ लागलंय.

हेही वाचा: हिंदी सिनेमांच्या नव्या हिंदुस्तानला फेक राष्ट्रवादाचा तडका

प्रचाराचं उलटंपुलटं गणित

फार पूर्वी पुराणकथांमधलं खोटंनाटं, त्यानंतर इतिहासाची तोडमोड, मग कुजबुज मोहिमा, त्याच जोडीने कॉन्स्पिरसी थिअरीज आणि आता सोशल मीडियावरच्या फेक न्यूज. काळ बदलतो, पण खोट्याच्या जोरावर राज्य करण्याची सत्ताधाऱ्यांची मानसिकता कायम दिसते. ती सत्ता सांस्कृतिक असो, आर्थिक असो किंवा राजकीय. सत्ताधाऱ्यांनी मुख्य प्रवाहातल्या माध्यमांचा वापर करून घेतला नाही, असं नाही.

पण आता त्यांच्या लक्षात आलंय की तिथे माहिती सांगणारा कुणीतरी लांबचा असतो, परका असतो. मुख्य प्रवाहातल्या माध्यमांना वाचकांशी, प्रेक्षकांशी नातं जोडण्यासाठी, मैत्री मिळवण्यासाठी, विश्वास कमावण्यासाठी अनेक वर्षं कष्ट उपसावे लागतात. पण सोशल मीडिया त्या फंदात न पडता मुख्य प्रवाहातल्या मीडियातल्या प्रचाराचं गणित उलटंपालटं करतो.

मेसेजसोबत विश्वासार्हताही अटॅच

सोशल मीडिया वाचकाच्या आधीच रेडीमेड असलेल्या मैत्रीला, विश्वासालाच वापरून घेतं. उदाहरणार्थ, वॉट्सअपवर आलेल्या एखाद्या मेसेजवर आपण सहज विश्वास ठेवतो. कारण तो आपल्या एखादा जवळच्या मित्राने पाठवलेला असतो. आपल्याला नेहमी मार्गदर्शन करणाऱ्या आईवडील, भाऊबहीण, नातेवाईक किंवा ज्येष्ठ सहकाऱ्याने पाठवलेला असतो.

खरंतर तो फक्त फॉरवर्ड करतो. पण त्याबरोबर त्याने त्याच्या नकळत स्वतःची विश्वासार्हता अटॅच केलेली असते. म्हणजेच मूळ मेसेज तयार करणारे कारखानदार आपल्यासारख्या फॉरवर्ड करणाऱ्यांच्या विश्वासार्हतेला वापरून वाचणाऱ्यावर प्रभाव टाकतात. स्वतःसाठी आपल्याला वापरून घेतात.

हेही वाचा: दिल्लीतल्या शेतकरी आंदोलनाचा ऑन द स्पॉट रिपोर्ट : भाग १

सोशल मीडिया ड्रायवर

लोकांना मेसेज फॉरवर्ड करण्यासाठी उचकवण्याचं एक संपूर्ण शास्त्र विकसित करण्यात आलंय. त्याचा फी देऊन रीतसर कोर्स करता येतो. ते जमलं की मग आपल्या विचारांचा प्रसार सोपा होऊन जातो. मग त्यावर एखादी वस्तू विकता येते, निवडणूक जिंकता येते किंवा देशच्या देश काही काळासाठी आपल्या विचारांचा करता येतो.

आपली फेसबूक वॉल किंवा वॉट्सअप डोकं उघडं ठेवून पाहिला तर आपल्याला हे कळू शकतं. कारण सोशल मीडिया आपल्या जगण्याच्याही ड्रायविंग सीटवर बसलाय. आपल्याला कुठे जायचंय हे आपण नाही, तर सोशल मीडिया ठरवतोय. हे भयंकर आहे. कारण आपण आपल्याला माहीत नसलेल्या कुणाच्या तरी हातचं खेळणं बनतोय.

कल्पनेची बाधा नको

महाराष्ट्राच्या प्रबोधनपर्वातले थोर विचारवंत राजारामशास्त्री भागवत यांनी साधारण शंभर सव्वाशे वर्षांपूर्वी ज्ञानेश्वरीतल्या पसायदानाचं महात्म्य पहिल्यांदा मराठी माणसाला सांगितलं. त्यानंतरही बऱ्याच काळाने `आता विश्वात्मके देवें` हे पसायदान वेगळं गायला सुरवात झाली. त्याआधी आणि आजही पारंपरिक वारकरी कीर्तनांची, भजनांची, कार्यक्रमांची सांगता संत नामदेवरायांच्या प्रार्थनेने करण्याची पद्धत आहे. ती प्रार्थनाही प्रसिद्ध आहे, `आकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, माझिया सकळां हरीच्या दासा.` या अभंगात दुसरी ओळ येते, `कल्पनेची बाधा न हो कोणे काळी, हे संतमंडळी सुखी असो.`

संत नामदेव पांडुरंगाकडे मागणं घालतात की संतमंडळीला कल्पनेची बाधा होऊ नये. या कल्पनेच्या बाधेचा अर्थ प्रत्येकजण आपापल्या समजुतीनुसार वेदांतातल्या मायेपासून संसारातल्या तापापर्यंत काहीही लावतात. पण आपल्या वर्तमानाशी जोडलेला त्याचा अर्थ हाच आहे की देवा, बाकी काही झालं तरी चालेल आम्हाला कल्पनेची, काल्पनिकतेची, खोट्याला खरं मानण्याची, फेक न्यूजची बाधा होऊ नये.

ती बाधा झाली की सुख मिळणार नाही. नामदेवरायांचं मागणं काळालाही भेदून आपल्याला मार्गदर्शन करतंय. कारण खोट्याने कधीही कोणाचं कायमचं भलं केलेलं नाही. खोट्याला खरं मानणाऱ्यांचं नाहीच. पण जाणीवपूर्वक खोटं पसरवणाऱ्यांचंही नाही. कारण खोटारडेपणा उघड झाला की विश्वास संपतो. विश्वास संपला की काहीच उरत नाही. तिरंगा उतरवल्याच्या फेक न्यूजने आंदोलन चिरडता येईलही. पण त्यात विश्वासही चिरडला जातोय. एकदा तुटलेला विश्वास नाही जोडता येत पुन्हा पुन्हा.

हेही वाचा: 

बजेटमधे हवा कोरोना लसीकरणाचा प्लॅन

गांधी का मरत नाही: खरा इतिहास बघण्याचा चष्मा!

दिल्लीतल्या शेतकरी आंदोलनाचा ऑन द स्पॉट रिपोर्ट : भाग २

दिल्लीतल्या शेतकरी आंदोलनाचा ऑन द स्पॉट रिपोर्ट : भाग ३

सरकारच्या झटक्यात निर्णय घेण्यामुळे थंडावलेत गुंतवणूकदार

दाढी वाढवून गुरुदेव होता येत नाही आणि खादी वापरून महात्मा

(साभार - दिव्य मराठी)